झुंड आणि संस्कृती

0
122

–  दिनकर गांगल

  पुण्यातील चार मोठ्या, मानाच्या गणेश मंडळांनी एकत्र निर्णय करून नियमभंग केला आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत रात्रभर वाद्यांचा दणदणाट चालू ठेवला. त्यांनी लोकांची सोय-गैरसोय न पाहता, देवाच्या नावावर मनमानी केली. खरेतर हा सिव्हिल सोसायटीला मोठा दणका आहे, कारण सुसंस्कृतता हे नागर समाजाचे लक्षण आहे!


–  दिनकर गांगल

     अण्णा हजारे यांच्या आंदोलनात एक मुद्दा निर्माण झाला, तो झुंडीचा. अण्णांच्या नावाने रामलीला मैदानात लक्षावधी व गावोगावी, प्रत्येक ठिकाणी हजारो लोक जमले हे खरे. त्यांचे सहानुभूतीदार अगणित मानले तरी ती संख्या दशकोटीच्या पुढे जाऊ शकत नाही. सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या देशात दशकोटी माणसांची झुंडच म्हणायची व त्या बळावर अण्णा संघाचा हेका चालू होता व कदाचित यापुढेही राहील.

     अण्णा संघाचा हेतू स्तुत्य आहे. त्यांनी आमजनांची अपराधभावना व विवेकबुद्धी जागी केली, मात्र ती संस्कारित करण्याचा ना त्यांच्याजवळ मार्ग आहे, ना त्याबाबत जाणून घेण्याची त्यांची इच्छा आहे. ते काम ज्यांना जमेल त्यांनी करावे अशी त्यांची भूमिका, पण असे दीर्घकालीन काम हाती घेण्यास सध्याच्या तत्काळयुगात कोणाला वेळ नाही; म्हणजे कोणा विचारवंतांची वा कार्यकर्त्यांची तशी मानसिक तयारी नाही.

     हा मुद्दा गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रकर्षाने जाणवला अनंत चतुर्दशीच्या दिवशी आवाजाच्या दणदणाटाने अवघा महाराष्ट्र वैतागून गेला; ध्वनिप्रदूषणाचे हे गुन्हे आजपर्यंत वांड, तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून होत, परंतु यावेळी सार्वजनिक गणेशोत्सवाची आद्यनगरी पुणे येथील चार मानाच्या गणपती मंडळांनी एकत्र येऊन नियमभंग करायचा व रात्रभर वाजंत्री वाजवायची असा निर्णय केला. ती मंडळे म्हणजे ‘दगडूशेठ हलवाई’, ‘मंडई’, ‘भाऊ रंगारी’ व ‘हुतात्मा बाबु गेनू’ त्यांना हे धाडस कुठून आले? तर त्यांच्या संघटित झुंडीमधून. त्यांनी कायदेभंग केला, त्यांना शिक्षा व्हायला हवी! या ठिकाणी माजी पोलिस अधिकारी सुरेश खोपडे यांनी ‘एक दिवस लोकांचा बाकी दिवस आमचे’ या मोहिमेनुसार भिवंडीत शांतता प्रस्थापित केली याची आठवण होते. त्यांच्या योजनेची तत्कालीन राष्ट्रपतींपासून सर्वांनी प्रशंसा केली होती.

     पण सध्या, पोलिस हेच संघटित गुन्हेगार आहेत (त्यांची झुंडच!) कारण कायदा त्यांच्या हाती आहे, हा सिद्धांत लोकांच्या प्रत्ययाला येत आहे.

     लोकशाहीत लोकसंख्येचे राजकारण असल्याने झुंडशाही अटळ आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर आमजनांचा प्रतिनिधी म्हणता येईल असा एकही नेता नाही. जे आहेत ते टोळ्यांचे सरदार. उदा. नारायण राणे कोकणचे तर विलासराव देशमुख लातूरचे आणि छगन भुजबळ नासिकचे सरदारच आहेत. ते अधिकारावर आहेत. त्यांच्या त्या पदांमुळे त्यांच्याकडे नेतृत्व आले असे म्हणतात. या सरदारांची सैन्यदले नाहीत, तर कार्यकर्त्यांच्या झुंडी आहेत.

     अण्णांच्या झुंडीने व त्या पाठोपाठ गणेशोत्सव मंडळांच्या संघटित झुंडींनी समाजाच्या लोकशाही नियंत्रणाची मर्यादा दाखवून दिली आहे आणि झुंडीचा असंस्कृतपणा उघड केला आहे. झुंडीला शह केवळ सांस्कृतिक वातावरणामधूनच बसू शकतो. विचारी, संवेदनाशील मंडळी सांस्कृतिक वातावरण निर्माण करू शकतात. ते महात्मा गांधींच्या अहिंसा, सत्याग्रह या तत्त्वांशी जाऊन भिडते, कारण त्यात मूल्ये प्रकट होतात. आजच्या सर्व तर्‍हेच्या बकालपणावर संस्कृती हेच उत्तर आहे. तेथे लोकसंस्कृती कामाची नाही. प्रथम मूल्यांचा आग्रह निर्माण करावा लागेल व त्या आधारे समाजाचे वर्तन असावे लागेल. यासाठी समाजजागृती व कायद्याचे व्यवस्थापन अशा दोन्ही गोष्टी लागतील. त्याआधी समाजधारणेची एक सर्वंकष योजना तयार करावी लागेल. ते बुद्धिवंतांचे, विचारवंतांचे काम आहे. तेच सगळे आज मूग गिळून बसले आहेत अथवा गेल्या चारशे वर्षांत निर्माण झालेल्या नव्या मूल्यांच्या चाकोरीत अडकून पडले आहेत. या नव्या मूल्यांनी दिलेल्या स्वातंत्र्याच्या, मोकळेपणाच्या आधारेच नव्या युगासाठी नवा विचार करावा लागणार आहे. मानवी संस्कृती हे त्यासाठी क्षेत्र असणार आहे. तंत्रविज्ञानाच्या प्रगतीमधून लाभ खूपच आहेत, पण त्यामधून तयार होणार्‍या मानसिकतेचे आव्हान मानवी संस्कृतीलाच वेगवेगळ्या पातळ्यांवर असणार आहे. विचारी जनांनी वेळीच या घटनेची दखल घेणे गरजेचे आहे, अन्यथा राजेशाहीमधून सरदारांचे राज्य निर्माण झाले व त्यातून अंधारयुग आले. लोकशाहीतदेखील सरदार व त्यांच्या झुंडी तयार होऊ लागल्या आहेत. जनराजा, वेळीच सावध हो!

दिनकर गांगल – इमेल : thinkm2010@gmail.com

{jcomments on}

About Post Author

Previous articleराष्ट्रगीताची स्वायत्तता
Next articleडिस्कव्हरी सायन्स सेंटर
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.