झुंजार कामगार नेता – पी डिमेलो

0
30
-p.demelo-heading

पी. डिमेलो यांचा जन्म कर्नाटक राज्याच्या मंगलोर शहरापासून तेवीस किलोमीटरवरील वेलमन या खेड्यात 5 ऑक्टोबर 1919 रोजी झाला. त्यांचे मूळ नाव प्लासिड डिमेलो. त्यांचे मूळ गाव आणि घराणे गोव्यातील. ते मूळचे सारस्वत ब्राह्मण. वडील रेमंडबाबू कामत ऊर्फ बाबू डिमेलो. आई अप्पीबाई म्हणजे अपोलिना ऊर्फ रूईया. ते कामतचे डिमेलो पोर्तुगिजांनी केलेल्या धर्मांतरामुळे झाले. पी. डिमेलो यांना त्यांच्या मूळ हिंदू सारस्वत ब्राह्मण जातीबद्दल अभिमान होता. त्यांचे आईवडील धर्मांतरानंतर मंगलोर येथील वेलमन या गावी स्थायिक झाले.

प्लासिडचे शिक्षण वयाच्या सहाव्या वर्षी वेलमन गावच्याच सेंट जोसेफ हायर एलिमेंटरी स्कूलमध्ये सुरू झाले. त्याने पहिली ते सातवीपर्यंत पहिला क्रमांक सोडला नाही. त्याने पुढील शिक्षण मंगलोरच्या सेंट एलॉयसिस ज्युनियर कॉलेजच्या माध्यमिक विद्यालयातून पूर्ण केले. प्लासिड विद्यालयाच्या जेवणाच्या मेसमधील श्रीमंत-गरीब असा ‘पंक्तिभेद’ पाहून अस्वस्थ होत असे. त्याने मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण 1936 साली केली. प्लासिडच्या घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे, त्याने नोकरी धरावी व अर्थार्जन करावे हे गरजेचे झाले. त्याचे मामा मुंबईत पोलिस खात्यात होते. त्यांनी त्याला पोलिसात भरती करण्यासाठी गोऱ्या साहेबाच्या पुढे उभे केले. प्लासिड उंचापुरा, सुदृढ देहयष्टीचा होता. तो दोन्ही हात खिशात घालून गोऱ्या साहेबापुढे उभा राहिला, गोरा इंग्रज साहेब भडकला, त्याने ‘गेट आऊट फ्रॉम हियर, यू हॅव नो मॅनर्स’ असे बोलून त्यांना हाकलून लावले. प्लासिड यांनी मामांच्या सांगण्यावरून कर्नाक बंदरामध्ये ‘बॉम्बे पोर्ट ट्रस्ट’मध्ये टॅली क्लार्क म्हणून नोकरी मिळवली. परंतु ती नोकरी धड नव्हती. पगार रोजंदारीवर; काम नाही त्या दिवशी पगार नाही! प्लासिड टॅली क्लार्क म्हणून रूजू झाले तो दिवस होता 15 एप्रिल 1936. तेथेच त्यांना अन्यायाची व शोषणाची जाणीव झाली व बंडखोरीची बीजे मनात रुजली. प्लासिड टॅली क्लार्क झाल्यापासून त्यांची सही व ओळख पी. डिमेलो अशा नावाने देऊ लागले. ते डिलिव्हरी क्लार्क1946 साली झाले. त्यांच्यातील कामगार नेता त्याच काळात घडत गेला, पी. डिमेलो यांनी एकदा एका गुंडाकडून कामगारावरील होणाऱ्या छळवादाच्या वेळी त्या गुंडाच्या कानशिलावर दोन जोरदार थपडा दिल्या आणि तेव्हापासून ते कामगारांमध्ये प्रिय बनले. त्यांचे लक्ष राजकारणावरही होते. पी. डिमेलो यांच्यावर मानवेंद्रनाथ रॉय यांच्या कम्युनिस्ट विचारांचा प्रभाव पडला. त्यामुळे त्यांनी धर्म बुडवला असे समजून मंगलोरच्या चर्चने पूर्ण डिमेलो कुटुंबीयांवर बहिष्कार टाकला. पुढे, पी. डिमेलो यांचे आईवडील व कुटुंबीय मुंबई येथील गिरगाव भागात येऊन राहिले. डिमेलो कुटुंब विलेपार्ले येथे राहत असे.

हे ही लेख वाचा –
भीमाशंकर कठारे मराठी उद्यमशीलतेसाठी चार दशके!
मिस्टर बिडी – किसनलाल सारडा

पी. डिमेलो यांनी 1950 च्या दशकात मुंबईत, ‘बॉम्बे म्युनिसिपल मजदूर संघ (बीएमसीएम युनियन)’, ‘बेस्ट वर्कर्स युनियन’, ‘टॅक्सीमेन्स युनियन’, ‘ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन’, ‘द ऑल इंडिया पोर्ट अॅण्ड डॉक वर्कर्स फेडरेशन’ अशा युनियन्स आणि त्यांचा महासंघ यांची स्थापना केली. जॉर्ज फर्नांडिस या तरुण तडफदार कामगार नेत्याचाही त्याच काळात, मुंबईत उदय होत होता. पी. डिमेलो त्यांचे मार्गदर्शक व सल्लागार होते. पी. डिमेलो यांना मृत्यू अकाली आला. परंतु पी. डिमेलो यांनी त्यांच्या कर्तृत्वाने तोपर्यंतचा काळ, 1946 ते 1958 गाजवला. त्यांच्या कामाचा झपाटा आणि झंझावात इतका तीव्र होता, की त्यांना खाण्यापिण्याचेही भान राहत नसे; विश्रांती तर नाहीच. त्यांच्या आईने त्यांच्यापाठी लग्नाचा तगादा लावला. तेव्हा ते म्हणाले, “माझे जीवन लोकांचे, कामगारांचे संसार उभे करण्यासाठी आहे. लग्न करून मी काय करू?”

मुंबईतील गोदी कामगारांसाठी तो काळ अतिशय कष्टाचा आणि भयानक अवस्थेचा होता. हाणामाऱ्या, संप, हरताळ, उपोषणे अशी धकाधक असे. तो काळ दुसऱ्या महायुद्धाचा होता. जगात आर्थिक मंदीची लाट आली होती. भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही शिगेला पोचली होती. गोदी कामगार, मुंबई महानगरपालिका कामगार, बेस्ट कामगार यांचे प्रश्नही उग्र स्वरूप धारण करू लागले होते. डिमेलो त्या साऱ्या समस्यांच्या उकलीसाठी अहोरात्र झटत होते. गोदी कामगारांमध्ये किनारा कामगार हा महत्त्वाचा घटक होता. त्यांना बोटीवर माल चढवणे व बोटीवरून माल उतरवणे हे काम मालाचे नुकसान न करता करावे लागे. त्या किनारा कामगारांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील कामगार बहुतांशाने होते. ती माणसे देवभोळी; त्या कामगारांमध्ये तेव्हाच्या भारतातील पेशावर, लाहोर, कराची व भारतातील युपी, बिहार, ओरिसा येथीलही कामगार होते. त्यांच्यात मुस्लिमही होते. त्या साऱ्या हिंदू-मुस्लिम कामगारांना एक ख्रिस्ती कामगार नेता संघटित करत होता. ते काम धार्मिक, भावनिक, सामाजिक पार्श्वभूमीवर करणे हे मोठे आव्हान होते. डिमेलो यांनी ते आव्हान यशस्वीपणे पेलले आणि संघटनेचे तारू यशस्वीपणे वल्हवले.

-demeloत्यांनी ‘बॉम्बे डॉक वर्कर्स युनियन’, ‘बी.पी.टी.डॉक स्टाफ युनियन’, ‘लोखंड जथ्या कामगार युनियन’, ‘लॉरी ड्रायव्हर्स व क्लिनर्स युनियन’ या सर्व युनियनना एकत्र आणले आणि ‘ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन’ या एकाच प्रबळ युनियनची मोळी बांधली. डिमेलो त्या युनियनचे अध्यक्ष झाले, मग डिमेलो यांनी भारतभरच्या गोदी कामगारांची एक मध्यवर्ती संघटना बनवण्याकडे लक्ष केंद्रित केले व ते पूर्ण केले. त्यावेळी पी. डिमेलो म्हणाले होते, की “भारतभरचे गोदी कामगार समान काम करतात, परंतु त्यांचे वेतन समान नाही. त्यासाठी सर्वानी एकत्र येणे गरजेचे आहे. नाही तर सरकार एकेकाला गाठून संपवून टाकील.” त्यानुसार 1954 साली दिल्लीत ‘ऑल इंडिया पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशन’ची स्थापना झाली. ती किमया पस्तीस वर्षांच्या पी. डिमेलो नावाच्या युवकाची होती! त्यांनी कामगार युनियनच्या माध्यमातून कामगारांच्या प्रश्नांसाठी लढा देताना आक्रस्ताळेपणा किंवा लोकशाही मूल्यांची पायमल्ली केली नाही. ते सुसंस्कृत कामगार नेते होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकोणसाठ संप केले.

पी. डिमेलो यांच्या गावच्या बेलमन चर्चने त्यांच्या पंचाहत्तराव्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृत्यर्थ स्मरणिका काढली आणि पश्चाताप केला. पी.डिमेलो यांचे वडील म्हणाले होते, “धर्म म्हणजे बेशुद्धावस्थेतील स्वप्न नव्हे, डोळस विचारांचा आरसा घेऊन मानवतेची सेवा करणे म्हणजेच धर्म.” तोच धर्म पी. डिमेलो यांनी बाळगला व ते सेवाव्रती बनले. दक्षिण मुंबईतील गोदी भागात ‘पी.डिमेलो रोड’च्या रूपात झुंजार कामगार नेता ‘पी.डिमेलो’ अमर आहेत. पी.डिमेलो हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने 20 मार्च 1958 रोजी निधन पावले.

-संदीप राऊत 9892107216
संदर्भ : अमरदीप चरित्र – ज. रा. कांबळे
(जनपरिवार, 22 जुलै 2019 वरून उद्धृत, संपादित- संस्करित)

About Post Author