तत्त्वचिंतक डॉ.रविन थत्ते हे ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक आहेत. ते ज्ञानेश्वरीवरील श्रद्धा समजू शकतात, ज्ञानेश्वरीतील कवित्व जाणतात आणि त्यातील तत्त्वचिंतन व त्याचा व्यवहारोपयोग समजावून सांगतात. त्यांची तशी भली पुस्तके आहेत. त्यांनी ज्ञानेश्वरी इंग्रजीत रूपांतरीत केली आहे आणि सध्या ते ‘ओबडधोबड ज्ञानेश्वरी’ मराठीत लिहीत आहेत. त्यापलीकडे ते ‘ज्ञानेश्वरीतील जीवसृष्टी’ नावाचा एक ऑनलाइन कॉलम लिहितात. गरजेप्रमाणे भाटिया हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची प्लॅस्टिक सर्जरीची कामे करतात आणि हो! सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी वयाची ऐंशी वर्षे गतसाली पार केली तरी त्यांच्या प्लॅस्टिक सर्जरी विषयातील ताज्या ताज्या नोंदी नियमित सर्व जगभर इंटरनेटवरून प्रसृत होतात. एडिंबरोची एफआरसीएस पदवी कित्येक वर्षांपूर्वी त्यांना सन्माननीय स्वरूपात बहाल करण्यात आली आणि तसे ते एकमेव आशियाई डॉक्टर आहेत. याशिवाय त्यांची थोरवी अनेक प्रकारची आहे, पण ती पुन्हा केव्हातरी.
त्यांना विचारले, की लॉक डाऊनमधील दिवस कसे चाललेत? ते म्हणाले, की उत्तम. गच्चीवर गार्डन लावली आहे ना! सकाळचा महत्त्वाचा वेळ झाडा-फुलांत छान जातो. तसे दोन तास गेले, की सूर्य वर आलेला असतो, दिवस मार्गी लागलेला असतो. स्वाभाविकच रात्री शांत झोप येते.
थत्ते यांनी कोरोनावरही भाष्य केलेच. ते म्हणाले, की “कोरोनाचा प्रसार हे कशाचे लक्षण आहे आणि ह्या प्रसारात माणूस त्यांचा वाहक (Vector) कसा झाला आहे याबद्दल माझ्याही मनात कुतूहल आहे. माझे त्याकडे बघणे गीता आणि ज्ञानेश्वरी यांच्या माध्यमातून झाले आहे. त्या ग्रंथांचा अशा तऱ्हेने आधार घेणे ही एक सनातन आणि सुदृढ प्रथा आहे.
पृथ्वीवरील जीवसृष्टीत माणूस जातीची संख्या 0.50 पेक्षाही खूपच कमी आहे. तेव्हा माणसाला कोरोना बाधला आहे म्हणजे पृथ्वीवर फार मोठे गंडांतर आले आहे असे नाही. गंडांतर माणसावर आले आहे आणि ते करणी तशी भरणी ह्या न्यायाने आले आहे.
थत्ते यांनी माणसाच्या आणि इतर सगळ्यांच्याच सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणात्मक प्रकृतीचे वर्णन केले. ते म्हणाले, सत्त्वाचा अतिरेक भयंकर गर्वात रूपांतरित झाला आहे. रज गुणाने समाजात धुमाकूळ घातला आहे. हपापलेपण आणि विषयी वृत्ती हे समाजाचे ब्रीद बनले आहे. बुद्धीच्या जोरावर विवेकीपण जाणण्याऐवजी ती बुद्धी भोगाच्या घरी पाणी वाहत आहे.”
हे एक वाक्य जाणले तरी जगात जे चालले आहे त्याची सहस्रावधी चित्रे आपल्याला दरक्षणी दिसतात. त्यातील एका चित्रात माणसे धुळीचा कण जसा इतस्ततः, वाटेल तसा भरकटला जातो त्याप्रमाणे भरकटलेली दिसत आहेत. करोनाचा विषाणूदेखील तसाच वागत आहे. तोही माणसाबरोबर भरकटत आहे आणि जेथे जमीन मऊ असेल तेथे ढोपराने खणत आहे. त्याच्या जिविताला अर्थात मर्यादा आहेत. त्या मर्यादांवर माणूस बुद्धीच्या जोरावर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, ह्या निमित्ताने माणूस जात विवेकाला प्राधान्य देत निसर्गाच्या सोबत समजूतदारपणे जगू शकेल की नाही हा पुढील काळातील प्रश्न आहे.
रवीन थत्ते अमेरिकेच्या डल्लस येथील बीएमएम कन्व्हेन्शनचे प्रमुख पाहुणे होते. तेथे सुबोध भावे वगैरे सेलिब्रेटी मंडळीही होती. थत्ते यांचे भाषण बरेच प्रभावी झाले (ते नेहमीच होते) असे ऐकले होते, पण त्याचा एक वेगळाच पैलू त्यांच्या बरोबरच्या संभाषणात कळून आला. ते म्हणाले, की सुबोध भावेचा दोन-तीन आठवड्यांपूर्वी फोन आला होता. त्याला त्याची लेखक-नट वगैरे वीस-पंचवीस मित्रमंडळी जमवून, त्यांच्यासमोर माझे ज्ञानेश्वरी प्रवचन करावे असे वाटते.
याचा अर्थ थत्ते जे तत्वज्ञान मांडतात ते समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत सुगमतेने पोचते. एवढेच नव्हे तर थत्ते यांच्या प्रतिपादनातून तत्वज्ञानदेखील सर्व सामान्य माणसांस ऐकण्यास आवडते. म्हणजे थत्ते आजच्या काळातील प्रवचनकार होतात. मी म्हटले, की भावे हा असा वेगळे काही शोधणारा नट आहे असे ऐकतो, त्याच्या काही कृतींतून ते जाणवतेही, थत्ते म्हणाले, या करोना लॉकडाऊनमुळे ती बैठक आता लवकर होईल असे वाटत नाही.
डॉ. रवीन थत्ते 9820523616 rlthatte@gmail.com
– दिनकर गांगल 9867118517(दिनकर गांगलहे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम‘ या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत.)
|
रवीन थत्ते अमेरिकेच्या डल्लस येथील बीएमएम कन्व्हेन्शनचे प्रमुख पाहुणे होते. |
|
|
थत्ते यांनी गच्चीवर गार्डन लावले आहे. |
———————————————————————————————————–
Lekh aavdala.vishshta tyatil tatvdyan
Thatte सरांसारखी ज्ञानी आणखी वास्तवात रहाणारे काही लोक समाजात आहेत म्हणून या पृथ्वीवर माणूस टिकण्याची शक्यता आहे.
सरांचे “जे देखे रवी” हे सदर फार भारी होते. ग्रेट respect फॉर डॉ थत्ते सर. 🙏
सुंदर सरखूप बोलता व लिहीता येत नाहीमांडता येत नाही.पण मर्म समजले
थत्ते सरांबद्दल खूप ऐकले आहे .विशेषतः त्यांच्या ज्ञानेश्वरी चिंतनाबद्दल व निष्णात plastic surgery बद्दल .त्यांचे मोलाचे मार्गदर्शन समाजासाठी आवश्यकच आहे
ज्ञानेश्वरी आणि शहरी शेती… दोन्ही उपक्रम झकास.मराठी विज्ञान परिषदेचे श्री. दिलीप हेर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरी शेतीचे प्रयोग आम्ही काही जण करीत आहोत lockdown मध्ये ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावयास घेतला आहे त्याला पुष्टी मिळाली खूप खूप धन्यवाद
ज्ञानेश्वरी आणि शहरी शेती… दोन्ही उपक्रम झकास.मराठी विज्ञान परिषदेचे श्री. दिलीप हेर्लेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरी शेतीचे प्रयोग आम्ही काही जण करीत आहोत lockdown मध्ये ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावयास घेतला आहे त्याला पुष्टी मिळाली खूप खूप धन्यवाद
रविन् थत्ते सरांचं श्री ज्ञानेश्वरी वरील प्रवचन ऐकायची ईच्छा झाली आहे. एका डाॅक्टरांची अध्यात्मिक ज्ञानेश्वरी विज्ञानाच्या अंगाने ऐकणे यासारखी पर्वणी नाही.