गीता गोरेगावकर-गोडबोले
गीता यांचे पोस्ट डॉक्टरल संशोधन अधिक अभ्यासात्मक व म्हणून आव्हानात्मकही होते. गर्भधारणा होते त्याच वेळेस शरीराच्या प्रत्येक अवयवाची जागा निश्चित होते. इमारत बांधताना आर्किटेक्ट, इंजिनीयर, कामगार – सर्व एकत्रितपणे कामे करतात व इमारत उभी राहते. बांधकामाच्या सुरुवातीला इमारतीचा आराखडा तयार करतात. तीच गोष्ट मेंदूची. बाळाच्या जन्माच्या आधीच मेंदूच्या वाढीसाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे घटक एकत्रितपणे मेंदूचा पायाभूत आराखडा व त्याची वाढ कशी होईल याचे आलेखन करतात. मानवाच्या मोठ्या मेंदूच्या बाहेर मज्जापेशींचा थर असतो. त्याला Cerebral Cortex असे म्हणतात. गीता Cerebral Cortex च्या ब्लूप्रिंटचा अभ्यास करत होत्या. त्या अभ्यासातून Cerebral Cortex च्या वाढीसाठी कोठले घटक लागतात, ते सर्व घटक एकत्रितपणे कसे काम करतात, त्यांची काम करण्याची जागा कोणती, ते घटक त्यावर काम कोणत्या वेळी व किती वेळ करत असतात याबद्दल गीता यांनी त्यांचे निष्कर्ष मांडले. ते त्यांचे तीन शोधनिबंध नियतकालिकात प्रसिद्ध झाले व गाजले. त्यांनी ते संशोधन मादी उंदरांवर केले होते. एका मादी उंदरामध्ये एका वेळेस आठ ते दहा भ्रूण (एम्ब्रयोस) असतात. गीता मादी उंदराच्या गर्भाशयातील भ्रूण आठ-दहा दिवसांचे असताना, त्यांच्या मेंदूवर प्रयोग करत. त्यावेळी त्यांच्या मेंदूचा आकार असतो फक्त दोन मिलिमीटर. प्रयोग करताना वर LCD light असे. पण गीता यांना त्याचा उजेड अपुरा पडत असे. त्यांनी दोन बोटांमध्ये LCD खालच्या बाजूने धरण्यास सुरुवात केली. त्यांना पुरेसा उजेड मिळू लागला. ते सर्व काम दुर्बिणीशिवाय, नुसत्या डोळ्यांनी करावे लागे. त्यासाठी खूप एकाग्रताही लागे. गीता यांच्या पोस्ट डॉक्टरल संशोधनाचेवर्णन सविस्तर केले, कारण त्यामधून त्यांची सूक्ष्म बुद्धी व कष्ट करण्याची चिकाटी दिसून येते. त्यांचा तो अभ्यास सलग पाच वर्षे चालू होता.
गीता यांची कौटुंबिक पार्श्वभूमी डॉक्टरी व्यवसायाची आहे. डॉ. शोभना व डॉ. भालचंद्र गोडबोले यांच्या त्या कन्या. त्यांच्या पणजोबानी परळचे (मुंबई) गद्रे हॉस्पिटल सुरू केले. ते शंभर वर्षांपेक्षा जास्त जुने आहे. गीता यांचे शालेय शिक्षण दादर (मुंबई) येथील किंग जॉर्जमधून (आताची I.E.S. न्यू इंग्लिश स्कूल) झाले. त्या 1997 साली दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यांनी मुंबईतील रुईया कॉलेजमधून B.Sc. पदवी मिळवली. पुढे, त्या Advanced Bio-Chemistry हा विषय घेऊन सेठ जी.एस.मेडिकल कॉलेजमधून M.Sc. झाल्या. त्या विद्यापीठातून पहिल्या आल्या. गीता यांचा Ph.D चा अभ्यास प्रजनन स्वास्थ्य (Reproductive Health) या विषयाशी निगडित होता. त्यांना 2011 मध्ये न्यूयॉर्क मेडिकल सेंटरमध्येReproductive Science या विषयात पोस्ट डॉक्टरेट करण्यासाठी प्रवेश मिळाला. त्यांच्या अभ्यासाचा विषय होता अंडाशयाचा कॅन्सर. परंतु त्यांना कौटुंबिक समस्येमुळे अमेरिकेला जाण्याचा बेत रद्द करावा लागला.
गीता यांचा Ph.D. साठी केलेला गर्भधारणेसंबंधातील अभ्यास जाणून घेणेही कुतूहलाचे आहे. गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात भ्रूणाचे गर्भाशयात रोपण कसे होते? भ्रूण रुजण्यास सुरुवात होते त्यावेळी गर्भाशयावरील शेष्मलामधील (Endometrium) रोगप्रतिकारक शक्तीला तो भ्रूण म्हणजे परकीय गोष्ट (Semi Foreign) वाटते. ती रोगप्रतिकारक शक्ती भ्रूणाला स्वीकारण्यास नकार देऊ शकते. तसे झाल्यास गर्भधारणा होणे अवघड असते. त्याचा अर्थ असा, की कोठला तरी घटक आहे जो त्या वेळेस गर्भाच्या रोपणाला मदत करतो. तो घटक कोणता याचे संशोधन गीता करू लागल्या. संशोधनाअंती, त्यांनी असे सिद्ध केले, की स्त्रीच्या गर्भाशयातील पेशींमध्ये Homeosox A 10 हे जनुक त्यावेळी रोगप्रतिकारक शक्ती व भ्रूण यांमधील संतुलन राखते आणि भ्रूणाचे गर्भाशयात रोपण यशस्वी होते. जर Homeosox A 10 या जनुकात काही दोष असेल तर गर्भधारणा होत नाही अथवा गर्भपात होतो. गीता यांचे त्या संबंधात नऊ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. ते संशोधन करताना गीता यांना बॉनेट प्रजातीच्या माकडांवर काम करण्याची संधी मिळाली. त्या माकडांना वैज्ञानिक परिभाषेत Macca Radiata असे म्हणतात. तो अभ्यास चालू असताना, गीता यांनी दुसरीकडे नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट दिली. त्यात त्या उत्तीर्ण झाल्या. त्यांचे विद्यार्जन व विद्यादान, दोन्ही एकाच वेळेस सुरू होते. त्या त्या काळात M.Sc. चे विद्यार्थी व पदवीधर इंटर्न्स यांना मार्गदर्शनही करत होत्या. त्यांचा प्रबंध 2010साली पुरा झाला.
त्यांनी पोस्ट डॉक्टरल संशोधन मुंबई येथील टाटा इन्स्टिटयूट ऑफ फंडामेंटल रिसर्च येथून केले. त्यांच्या अभ्यासाचा विषय होता Developmental Neurobiology. तो विषय त्यांच्यासाठी नवीन होता. त्यांनी स्वतंत्रपणे संशोधन करण्याचे ठरवले. त्या विषयात संशोधनात्मक अभ्यास करण्यासाठी प्रचंड पैसा लागणार होता. युके वेलकम ट्रस्ट आणि भारत सरकारचा जीवतंत्रज्ञान विभाग यांनी त्यांना संयुक्तपणे पाठ्यवृत्ती (Early Career Fellowship) दिली. ती फार प्रतिष्ठित समजली जाते. ती तीन टप्प्यांत मिळते. गीता यांना सर्व टप्पे उत्तीर्ण करून 2012 साली ती पाठ्यवृत्ती मिळाली. त्यांना एकूण एक कोटी वीस लाख रुपये पाच वर्षांसाठी मिळाले होते.
पोस्ट डॉक्टरल संशोधन पूर्ण झाल्यानंतर, त्यांनी लगेच सिप्ला या औषधी कंपनीमध्ये मेडिकल अँड सायंटिफिक अॅडव्हायझर म्हणून नोकरीला सुरुवात केली. तेव्हा त्यांच्यासमोर एक पेच उभा राहिला. तो आता गंमतीदार वाटतो. त्यांनी त्याच बेताला इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये ‘वैज्ञानिक‘ या पदासाठी अर्ज केला होता. त्यांना सातशे उमेदवारांमधून निवड होऊन दिल्लीतील ते पद मिळाले. पेच असा, की नोकरी स्वीकारायची की ते मानाचे पद? शिवाय त्यात आणखी एक पदर होता, तो म्हणजे गीता यांच्या मनावर आध्यात्मिक पुस्तकांचा पगडा होता. त्यामुळे त्यांना प्रयोगासाठी प्राण्यांचा वापर करणे आवडत नसे. गीता या प्राण्यांचे बलिदान दिल्यावर दिवसभर बेचैन असत. ‘दिल्लीतील वैज्ञानिक‘ या पदावर त्यांना प्राण्यांवर प्रयोग करावे लागणार होते. त्या त्यामुळे दिल्लीला गेल्या नाहीत. गीता यांनी सिप्लामध्ये अस्थमा व इतर श्वसनविकार असलेल्या रुग्णांना उपयोगी होते अशा हॅण्ड नेब्युलायझरचा कारभार पाहिला. गीता यांना तेथे श्वसनरोग संबंधात आंतरराष्ट्रीय परिषदा योजाव्या लागल्या; आणि त्यांना त्या त्या ठिकाणी उपस्थितही राहवे लागले. त्यांना चिली देशात भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत त्यांच्या संशोधनासाठी पुरस्कार मिळाला आहे. त्या सिप्लामधील नोकरीबरोबर इन्स्टिट्यूट फॉर केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणूनही काम करत होत्या. दरम्यान, त्यांनी फायझर बायोफार्मास्युटिकल्समध्ये नवी नोकरी ऑन्कॉलॉजी विभागात स्वीकारली आहे. त्या मास्टर्स व पीएच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.
गीता चाळीस वर्षांच्या आहेत; स्वभावाने शांत व मृदुभाषी आहेत. साधेपणा व निगर्वी स्वभाव हे त्यांचे गुण सहज लक्षात येतात. त्यांचे कुटुंब म्हणजे त्यांचे पती अमित व मुलगी स्वरा. अमित नोकिया नेटवर्कमध्ये प्लॅनिंग व स्ट्रॅटेजिक इंजिनीयर म्हणून काम करतात. गीता यांना संशोधन, औषधनिर्मिती या दोन्ही क्षेत्रांत अनुभव आहे. भारत या दोन्ही क्षेत्रात कोठे आहे या प्रश्नाचे उत्तर देताना गीता सांगतात, “संशोधन क्षेत्राचा लाल फितीत अडकलेला कारभार फास्ट ट्रॅकवर आणण्यास हवा. या दोन्ही क्षेत्रांत स्पर्धा जागतिक पातळीवर आहे. त्यामुळे निर्णय वेगाने घ्यावेत, निधी वेळेवर मिळावा ही संशोधकांची अपेक्षा असते.”
गीता यांना भारतीय तत्त्वज्ञान परंपरेची ओढ आहे. त्या तत्संबंधी वाचनही करत असतात. त्याचा परिणाम त्यांच्या स्वत:च्या विचारपद्धतीवर जाणवतो. त्या म्हणतात, “आयुष्य हे वळणा वळणाचे आहे. प्रत्येक वळणावर किमान दोन पर्याय उभे असतात. मी मला सोयीचा उत्तम पर्याय निवडते. त्यानुसार एकनिष्ठेने काम करते. त्या पर्यायाचे सोने करणे हे माझे ध्येय असते. स्पर्धा, चुरस, करिअर या गोष्टी माझ्या मनात कधी डोकावतच नाहीत.”
गीता गोरेगावकर-गोडबोले geetg7@gmail.com
गीता गोरेगावकर-गोडबोले geetg7@gmail.com
– विनीता वेल्हाणकर 9967654842 vineetavelhankar@gmail.com
विनीता वेल्हाणकर यांनी बँकेत तेहेतीस वर्षे नोकरी केली आणि 2011 साली स्वेच्छानिवृत्ती पत्करली. त्यांचे पती चार्टर्ड अकाउंटंट आहेत. त्यांचे एम ए पर्यंत शिक्षण झाले आहे. त्यांची मुलगी मानसी वैद्य व तिचा परिवार अमेरिकेत आहे आणि मुलगा अमेय व त्याची पत्नी तेजश्री लंडनला वास्तव्यास आहेत. विनीता यांना वाचनाची आवड आहे. तसेच, त्यांचा शेअर मार्केटचाही अभ्यास आहे.
————————————————————————————————————————-
उत्तम लेख.
खूप छान शब्दांकन
खरोखर स्कौलर…
खूप छान लेख आहे.
वेगळी माहीती असलेला लेख आहे
सुंदर लेख. विनिता ताई, अभिनंदन!असेच लिहित रहा. Dr गीता,यांची, उत्तरोत्तर प्रगती होत राहो.!
Very informative artical.
Very well written and informative article. Complex topic but very nicely captured.
सर्वांचे मनापासून आभार .