माधव आत्माराम चितळे हे जागतिक कीर्तीचे मराठी जलतज्ज्ञ आहेत. त्यांचा विवाह आशा पटवर्धन (विजया चितळे) यांच्याशी झाला. विजया चितळे (आशा पटवर्धन) यांच्या सहजीवनाबद्दल अपर्णा चितळे यांनी घेतलेली त्यांची ही मुलाखत.
आशा पटवर्धन या विद्याथिदशेत उत्तम खेळाडू, संगीत विशारद व सुवर्णपदक विजेत्या होत्या. त्यांनी माधव चितळे यांच्या बरोबरच्या सहजीवनावर ‘सुवर्णकिरणे’ या नावाचे पुस्तक लिहिले आहे.
माधव चितळे यांनी पुण्यात पानशेत धरण फुटल्यानंतर पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था कार्यान्वित करण्यासाठी विशेष अधिकारी म्हणून कामगिरी बजावली. त्यांनी नगरचा मुळा प्रकल्प, मुंबईचा भातसा प्रकल्प येथेही अभियंता म्हणून काम केले. त्यांची नियुक्ती कोयनेच्या भूकंपानंतरची परिस्थिती नियंत्रणात आणून कोयनेच्या तिसऱ्या टप्प्याचे काम मार्गी लावण्यासाठी चिपळूण तालुक्यातील अलोरे येथेही झाली होती.
तुम्ही कामाच्या निमित्ताने इतक्या गावांत राहिलात! लक्षात राहण्यासारखे मुक्काम कोणते?
सरकारने भातसा धरणाची निर्मिती करण्याचे 1967 मध्ये ठरवले. माधवांची त्या प्रकल्पासाठी नेमणूक झाली. भातसा प्रकल्पाचे कार्यालय मुंबईला मंत्रालयात होते. ते ठाणे जिल्ह्यातील शहापूर या वनक्षेत्रीय भागात हलवण्याचा निर्णय माधवांनी घेतला. ज्या घरात गेली चाळीस वर्षे कोणीही राहिले नव्हते अशा बंगल्यातील पुढील खोली म्हणजे कार्यालय व मागील भाग म्हणजे घर अशी सोय होती. बाकी टेकडीवर घनदाट झाडी, माणसांच्या उंचीएवढे दाट गवत होते. रात्री सारा आसमंत काजव्यांच्या प्रकाशाने चमचमत असे.
पावसाळ्याचे सुरुवातीचे दिवस! पाऊस आडवातिडवा कोसळत होता. एकदम खूप विचित्र आवाज येऊ लागला. ते बेडकांचे समूहगान होते! सहज भिंतीवर नजर गेली तर भीतीने थरकाप झाला. दहा-बारा इंच लांबीच्या पालींचा मुक्त संचार भिंतीवर चालू होता. रात्री जेवण्याची तयारी करून मांडलेली ताटे सुलट केली तर दिव्याच्या प्रकाशात चकाकणाऱ्या स्टीलच्या ताटांवर खोलीतील छपरावर बसलेल्या हाताच्या पंज्याएवढ्या मोठ्या फुलपाखरांनी झडप वेगात घातली. नंतर तांब्यातील पाणी हात धुण्यासाठी हातावर घेतले तर मोरीच्या भोकातून हातभर लांबीचा काळाभोर जाडजूड साप वेगाने सळसळत आला. ‘गर्भगळित’ शब्दाचा खरा अर्थ तेथे समजला!
कोयनेला प्रलयंकारी भूकंप झाला. माधवांची नेमणूक तेथील काम मार्गी लावण्यासाठी झाली. माधव मला व दोन मुलींना छोट्या, दोन खोल्यांच्या घरात पोचवून म्हणाले, “भूकंप झाला तर घाबरू नका. घराचा सांगाडा हलेल, पण भिंती कोसळणार नाहीत. मी कामाला जात आहे. रात्री वेळेत घरी येईन का ते ठाऊक नाही. कारण भूकंपानंतर बंद झालेल्या कामावरून काढलेले दोनशे मजूर मला घेराव घालणार आहेत. तेव्हा तुम्ही सांभाळून राहा.” आम्ही तेथेसुद्धा मजेत राहिलो; भीती अजिबात वाटली नाही. कारण त्यांनी सांगितले होते ना, ‘भिंत पडणार नाही.’ मग नाहीच ती पडणार असा विश्वास होता! ते मुंबईच्या मुक्कामात मात्र संध्याकाळी साडेसहा वाजता घरी येऊ लागले. तेव्हा मुलींना नवल वाटून त्यांनी वडिलांना विचारले, “येथे तुम्हाला काही काम नसते का?”
‘गृहस्थ’ माधवरावांबद्दल काय सांगाल?
माधवरावांनी त्यांचे कोटुंबिक भान विविध प्रकारची कामे अंगावर ओढवून घेत असताना कधीही सुटू दिले नाही. त्यांचा सक्रिय सहभाग बारशी, मुंज, लग्न असे काहीही असले तरी त्या सर्व ठिकाणी असतो. सर्व कौटुंबिक कार्यक्रमांना ते त्यांच्या पळापळीच्या दिनचर्येतून शांतपणे हजर असतात. विविध प्रसंगांना अनुसरून काव्ये करतात. त्यानुसार राग निवडून स्वरचित कवनांना चाली लावतात. त्यांना ती निर्मिती होत असताना पाहणे हा अनोखा अनुभव असतो.
तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस कोणता?
मी 13 ऑगस्ट 1993 हा दिवस विसरू शकतच नाही. त्या आधीची छत्तीस वर्षे अखंडपणे करत असलेल्या परिश्रमाचे फलस्वरूप म्हणून स्टॉकहोम जलपुरस्कार स्वीकारण्यास निघालेल्या माधवरावांना निरखत असताना तोपर्यंतच्या कडुगोड आठवणी व सुखदु:खाचे क्षण मला आठवले. आनंद व कृतकृत्यता यांचे कल्लोळ मनात उठत असताना, ते बाजूला सारून मी आनंदाने व अभिमानाने रस्त्यावरून गर्दीतून चालत असणाऱ्या माधवरावांना निरोप दिला.
एका बाजूला टेबलावर साडेबारा किलो वजनाचे शिशाच्या स्फटिकाचे बनवलेले स्टॉकहोम जलपुरस्काराचे (पाण्यासाठी नोबेलचे) स्मृतिचिन्ह हिऱ्यासारखे चमकत होते. ते उचलून देणेही कठीण होते. त्याला केवळ हात लावून स्वीडनच्या राजांनी माधवरावांच्या हातात मानपत्र दिले. टाळ्यांचा कडकडाट झाला. माधवरावांनी सर्व उपस्थितांना नमस्कार भारतीय परंपरेप्रमाणे दोन्ही हात जोडून केला आणि परत एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला. सी.व्ही. रमण यांच्यानंतर त्रेसष्ट वर्षांनी, 1993 मध्ये एका भारतीयाचा स्वीडनच्या राजाकडून सत्कार होत होता. त्यानंतर उणेपुरे सहा तास ‘माधव आत्माराम चितळे’ हे एकच नाव मला ऐकू येत होते!
मागे वळून पाहता सहजीवनाबद्दल काय वाटते?
मी माधवांचा आश्वासक हात सप्तपदीत माझ्या हातात घेऊन, त्यांच्या दमदार पावलांवर पावले टाकत त्यांच्याबरोबर चालले. त्यावेळी आमचे कौटुंबिक जीवन कसे असावे याबद्दल त्यांचा विचार पक्का होता. मी ते प्रत्यक्ष अनुभवल्याचा आनंद मनात साठवून आहे. त्यांनी लग्नानंतरच्या सुरुवातीच्या काळात अनभिज्ञ असलेल्या मला सांभाळून घेत संसारात रुळवले. ते स्वत: सुखदु:खाच्या, आनंदाच्या कठीण चढणीच्या प्रवासात अविचल राहून मला स्थिर करते झाले. अशा त्या सहचराबरोबर माझी लग्नानंतरची छपन्न वर्षे कोठे सरली ते समजलेच नाही!
– विजया चितळे
माधव चितळे भारतीय संस्कृतीचे अभिमानी व अभ्यासक आहेत. ते भग्वद्गीता, वाल्मिकी रामायण या विषयांवर प्रवचने करतात. त्यांना मिळालेले महत्त्वाचे बहुमान –
मानद डॉक्टर ऑफ सायन्स – जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (हैदराबाद), कानपूर कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (पुणे); वसुंधऱा पुरस्कार – आशय फिल्म क्लब – पुणे
डॉ. माधव चितळे 9823161909
– अपर्णा चितळे 9225316424
(समतोल, दिवाळी 2016 वरून उद्धृत, संपादित-संस्कारीत)
———————————————————————————————-