आनंद सांडू मूळ मुंबई-चेंबूरचे व्यक्तिमत्त्व विविध गुणी आहे. ते व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहेत. त्याखेरीज, त्यांनी बांधकाम व्यवसायातही मोठी कामगिरी केली आहे. त्यांचे पूर्वज, प्रसिद्ध आयुर्वेद औषधांचे जनक शंभराहून अधिक वर्षांपूर्वी ठाकूरद्वार सोडून चेंबूरला येऊन स्थिरावले. आनंद सीए झाले. त्यांचा औषधी कंपनीशी संबंध राहिला नाही. ते हिशोबांत आणि वेगवेगळ्या व्यवसायांत रमले. त्यांचा उद्योग त्यांचे दोन मुलगे ‘त्रिधातू कन्स्ट्रक्शन’ या नावाने पुढे विस्तारत आहेत. आनंद सांडू हे तेथे मार्गदर्शकाच्या भूमिकेत नजर ठेवून असतात.
आनंद सांडू यांचा खरा जीव मात्र साहित्यात, विशेषत: कवितेत रमतो. ते जातिवंत रसिक माणूस आहेत. त्यांचा मोजक्या कविसंमेलनांत सहभाग असतो. त्यांची स्वत:ची तीन-चार पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांची जीवनशैली तशीच टापटिपीची, शिस्तशीर आहे. ते मुंबईत होणाऱ्या विविध संगीतादी सांस्कृतिक कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित असलेले दिसतात. ते चेंबूरच्या साहित्यव्यवहारात संयोजकाच्या भूमिकेत वावरत असतात.
‘दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठान’तर्फे दिल्या जाणाऱ्या साहित्य पुरस्कार समारंभात प्रतिष्ठानच्या स्थापनेची व त्या प्रतिष्ठानामार्फत दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक साहाय्याची माहिती दिली गेली. त्यातील औचित्याचा भाग असा, की त्या वेळी त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून देवनारच्या ‘कुमुद विद्यामंदिर’चे अध्यक्ष शरद पाटील यांना बोलावले होते. पाटील यांनी आनंद सांडू त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गेली दहा वर्षें शिष्यवृत्ती देत आलेले आहेत हे जाहीर करून चेंबुरवासीयांना सुखद धक्का दिला.
आनंद सांडू म्हणाले, की त्यांच्या प्रतिष्ठानामार्फत सध्या दरवर्षी पाच-सहा लाख रुपयांपर्यंतचे साहाय्य दिले जाते. ते मुख्यत: शिक्षण, आरोग्य व आश्रमशाळा या क्षेत्रांत असते. त्यांचा कल सर्वसाधारणपणे माहितीतील मुले निवडून त्यांना मदत करावी असा असतो. त्याचबरोबर ज्या मुलांना मदत केली जाते त्या मुलांची शैक्षणिक प्रगती योग्य होत आहे ना यावर प्रतिष्ठानमार्फत नियमित नजर ठेवली जाते. ते म्हणाले, की आम्ही दहा मुलांना पाचवीपासून ते पदवीधर होईपर्यंत गुणवत्तेच्या आधारावर मदत केली. ती दहा मुले आता विविध क्षेत्रांत सुस्थापित आहेत. त्यांच्यापैकी एक, जनाबाई गवळी यांचा नातू लंडनमध्ये ‘इन्फोसिस’मध्ये नोकरी करत आहे! जनाबाई आमच्या जवळच्या, माहितीच्या म्हणून त्यांचा येथे उल्लेख केला.
प्रतिष्ठान चेंबूर परिसरातील विविध शाळांमधील गुणी व गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, ‘इंडियन कॅन्सर सोसायटी’तील अनेक रुग्णांना औषधांसाठी साहाय्य असे विविध उपक्रम करत असते.
आनंद सांडू यांनी, प्रतिष्ठान त्यांच्या आजोबांच्या नावाने सुरू करण्यात आले आहे असे सांगितले. ते म्हणाले, की “दत्तात्रेय कृष्ण सांडू यांनी एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी फार धाडसी निर्णय घेऊन, रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातून मुंबईत आगमन केले व येथे आयुर्वेदीय औषधनिर्मितीला चालना दिली. आमच्या कुटुंबाचा त्या औषध उद्योगाशी भागधारक म्हणून संबंध आहे, तो उद्योगव्यवसाय आमचे चुलतभाऊ, काका वगैरे बघतात. परंतु दत्तात्रेय कृष्ण यांनी धाडसाने निर्णय घेतला व ते मुंबईला आले, त्यामुळेच आम्ही, मी व माझे कुटुंबीय आमचा विकास साधू शकलो. त्याबद्दलची कृतज्ञता म्हणून त्यांच्या नावाचे हे प्रतिष्ठान! त्यातील सर्व निधी माझ्या कुटुंबीयांनी उभा केला आहे.” तो एक कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा संकल्प आहे व तो लवकरच पुरा करू असेही त्यांनी सांगितले.
व्यवसायाचे क्षेत्र जरी गणिताचे, अर्थशास्त्राचे असले, तरी त्यांना मराठी साहित्याची, विशेषत: कवितेची आवड आहे. त्यांचे दोन कवितासंग्रह, व्यक्तिचित्रणे प्रसिद्ध झालीआहेत. त्यांच्या् पहिल्याच कवितासंग्रहाला ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’चे, तसेच ‘कवी अनंत फंदी’, ‘सुफी संमेलन’, ‘मुंबई ज्येष्ठ नागरिक संघ’ वगैरेंचे पुरस्कार मिळाले आहेत.
पत्रलेखन ही अलिकडच्या काळात हरवत चाललेली कला आहे. टेलिफोन, मोबाईल यांच्यामुळे असेलही, तरीही अक्षररूपात भावना व्यक्त करणे चिकाटीचे काम आहे. आनंद सांडू यांनी विविध व्यक्ती, नातेवाईक, मित्र, कलावंत यांना नऊशेच्यावर पत्रे गेल्या चाळीस वर्षांत लिहिली आहेत. पत्रे कौतुकाची आहेत-सांत्वनाची आहेत-धीर देणारी आहेत. त्यांच्या निवडक पत्रांचे ‘शब्दफुले ही अंतरीची’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.
आनंद सांडू यांचा अगदी वेगळा असा एक अभ्यास आहे तो ज्योतिषाचा. त्यांचे म्हणणे असे, की ज्योतिषात साठ टक्के गणित, पंचवीस टक्के तर्क व पंधरा टक्के उत्स्फूर्तता असते. आनंद स्वत: काही लोकांच्या पत्रिका पाहतात व भविष्य सांगतात. त्यांतील मंडळींना अचूक पडताळा येतो असा त्यांचा दावा आहे. ते स्वेच्छेने भविष्य पाहतात. त्यामुळे त्यासाठी फी वगैरे घेत नाहीत.
आनंद सांडू यांचा समाजिक सहभाग पुढीलप्रमाणे – ते सहकार क्षेत्रातील ‘अ’ वर्ग सातत्याने टिकवणारी ‘चेंबूर नागरिक सहकारी बँके’चे संचालक आहेत. तसेच ते ‘कोकण मराठी साहित्य परिषद’चे उपनगर जिल्हा व चौदा शाखांचे; तसेच, चेंबूर, ठाणे, नेरळ येथील अनेक सामाजिक-शैक्षणिक, आश्रमशाळा वगैरे पन्नास-साठ संस्थांचे ऑडिटरचे काम गेले कित्येक वर्षें विनामूल्य करत आहेत.
– दिनकर गांगल
Great
Personality
Great
Personality
shri Anand S. Sandu -…
shri Anand S. Sandu – yanchyavar aalela lekh khup chan aahe – aavadala. Thyanchi Pustake vachaniy , parinamkar aahet.
Comments are closed.