लहान मूल खेळताना पडले आणि त्याला खरचटले, तर ते मोठ्याने भोकांड पसरते. त्या वेळी मूल त्याच्यासमोर कोणी ‘आला मंतर, केला मंतर, जादूची कांडी छू.’ असे म्हणताच रडायचे थांबते. त्यांपैकी ‘छू’ हा मराठीतील एकाक्षरी शब्द आहे.
‘छाछू’ (किंवा नुसतेच छू) याचा अर्थ अंगारे, धुपारे, मंत्रतंत्र किंवा जादूटोणा करणे असा आहे. जादूगार ‘छू मंतर’ म्हणून मुठीतील वस्तू गायब करून दाखवतो. ती त्याची हातचलाखी असते. जादूचे प्रयोग हे विज्ञानावर आधारित असे मनोरंजनाचे कार्यक्रम असतात. जादूगार त्यातून लोकांचे प्रबोधन करतो. परंतु काही लोक ‘छाछू’ करून भोळ्याभाबड्या लोकांना फसवतातही. त्यामुळे कोठे काही बनवाबनवी आढळली, तर त्यात काहीतरी ‘छाछुगिरी’ आहे असे म्हटले जाते. जादूटोणाविरोधी कायद्यामुळे छाछुगिरी करणाऱ्या लोकांना गजाआड टाकता येते.
‘छू करणे’ हा वाक्प्रयोग ‘एखाद्याच्या पाठी सोडणे’ अशा अर्थानेही केला जातो. प्रामुख्याने, ‘छू’ हा कुत्र्याला इशारा किंवा हुकूम करण्याचा शब्द आहे. ‘छू’ म्हणताच कुत्रा कान टवकारतो व बोट केलेल्या दिशेने धावून जातो आणि युऽऽयूऽऽ करताच कुत्रा जवळ येतो. तसेच कुत्र्याला हाकलण्या/साठी ‘हाडऽ’ हा शब्द उच्चारला जातो. आणि तसा तो शब्द म्हणताच कुत्रे दूर होते. परंतु तसे होण्यासाठी हजारो वर्षें आणि कुत्र्यांच्या शेकडो पिढ्या जाव्या लागल्या आहेत. माणूस आणि कुत्रा यांचे नाते जुने आहे. महाभारतातील धर्मराजाचा कुत्रा त्याच्याबरोबर पार स्वर्गापर्यंत होता अशी कथा आहे. महाभारताचा काळ इसवी सनपूर्व 2000 धरला जातो. त्याच्याही आधीपासून माणसाने कुत्रा पाळण्यास सुरुवात केली असणार. अर्थात त्या काळी कुत्र्याला आज्ञा देण्यासाठी कोणत्या शब्दाचा वापर केला जाई का याची कल्पना नाही. परंतु ‘छू’ हा शब्द त्यासाठी तीन-चारशे वर्षांपूर्वी नक्की वापरात होता. तुकाराम महाराजांच्या एका अभंगात तसा उल्लेख आहे –
येऊनि दडे तुमच्या पायी ।
धावे तई छो म्हणा ॥
तुकाराम महाराजांचे पाच विशेष अभंग आहेत, त्यात त्यांनी स्वत:ला विठ्ठलाचे कुत्रे म्हणवून घेतले आहे. तुकाराम महाराज म्हणतात –
देवा, मी तुमचे कुत्रे असून तुमच्या पायांजवळ लपून बसत आहे. तुम्ही म्हणाल (आज्ञा करा), त्या वेळी सांसारिक लोकांच्या अंगावर धावून जाईन.
– उमेश करंबेळकर, umeshkarambelkar@yahoo.co.in