चौदा ह्या संख्येशी निगडित काही गोष्टी भारतीय संस्कृतीत आणि व्यवहारात आढळतात. उदाहरणार्थ, विद्या एकूण चौदा आहेत. ‘हरिविजया’तील
चौदा जणींची ठेव ।
नचले स्वरूप वर्णावया ॥
या ओवीत चौदा जणी म्हणजे चौदा विद्या. दीर्घकाळ केलेले राज्य ह्यासाठी ‘चौदा चौकड्यांचे राज्य’ असा वाक्प्रचार केला जातो. कृत, त्रेता, द्वापार व कली या चार युगांची मिळून एक चौकडी होते. अशा चौदा चौकड्या होईपर्यंत केलेले राज्य म्हणजे प्रदीर्घ काळ केलेले राज्य होय. रावणाच्या राज्याचे वर्णन चौदा चौकड्यांचे राज्य असे केले जाते. चौदा कॅरट हे सोन्याच्या शुद्धतेचे परिमाण आहे. शंभर नंबरी सोने म्हणजे चोवीस कॅरट. त्या दृष्टीने चौदा कॅरट हे कमअस्सल सोने मानले जाते. देव-दानवांनी मिळून जे समुद्रमंथन केले, त्यातून चौदा रत्ने बाहेर आली. हलाहल हे विष सर्वांत प्रथम बाहेर आले. ते शंकराने प्राशन केले. त्यामुळे त्याचा कंठ निळा झाला. त्यानंतर अनुक्रमे कामधेनू नावाची गाय, उच्चै:श्रवा नावाचा अश्व, ऐरावत हा हत्ती, कौस्तुभ हे रत्न, पारिजातक वृक्ष, रंभादि अप्सरा, सुरा नावाचे मद्य, चंद्र, शंख, धनुष्य, लक्ष्मी, धन्वंतरी आणि शेवटी, अमृत अशी एकूण चौदा रत्ने बाहेर आली. कामधेनू देवांनी घेतली, तर बळीने उच्चै:श्रवा घोडा घेतला. इंद्राने ऐरावत, तर विष्णूने कौस्तुभ रत्न, शंख व धनुष्य घेतले. पारिजातकाची स्थापना स्वर्गात झाली. रंभादि अप्सरा स्वर्गात राहिल्या. दैत्यांनी सुराप्राशन केले, लक्ष्मीने विष्णूचा पती म्हणून स्वीकार केला आणि अमृत देवांनी घेतले.
अशा तऱ्हेने चौदावे रत्न हे अमृत असले, तरी व्यवहारात मात्र ‘चौदावे रत्न’ म्हणजे चाबूक असा अर्थ घेतला जातो. तो अर्थ त्याला कसा प्राप्त झाला? चौदा रत्ने वर्णन करणाऱ्या ‘लक्ष्मी कौस्तुभ पारिजातक’ या श्लोकातील ‘शंखामृतं चांबुधे:’ या तिसऱ्या पदाच्या शेवटी असलेल्या चांबुधेचा उच्चार चुकीने चाबूक असा केल्याने चौदावे रत्न म्हणजे चाबूक असा अर्थ त्याला चिकटला. त्यावरून चौदावे रत्न दाखवणे म्हणजे खरपूस मार देणे असा वाक्प्रचार रूढ झाला. कधी कधी अतिशय हट्ट धरून आकांडतांडव करणाऱ्या मुलाला त्याची आई हात उगारून ‘थांब, आता तुला चौदावे रत्न दाखवते’ असे म्हणते, त्याबरोबर ते मूल वठणीवर येते. पोलिसही गुन्हेगारांकडून माहिती काढण्यासाठी कधी कधी चौदाव्या रत्नाचा वापर करतात.
– उमेश करंबेळकर, umeshkarambelkar@yahoo.co.in