चित्रकलेत महाराष्ट्र मागास!

1
44
_chitrakalet_maharashtra_1.jpg

‘चतुरंग’ संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार वितरण समारंभ दरवर्षी डिसेंबरमध्ये होतो. जीवनगौरव लोकांच्या देणग्यांतून करावा ही कल्पना त्यांची. तो पुरस्कार पाच हजार लोकांनी प्रत्येकी दोन-पाच हजार रुपये देऊन जमा झालेल्या रकमेतून दिला जातो. त्यामुळे त्याचे आगळे महत्त्व. शिवाय ‘जीवनगौरव’ या ‘टायटल’चे पेटंटदेखील ‘चतुरंग’कडे आहे. पण तो शब्द सध्या सर्रास सर्वत्र वापरला जातो. ‘चतुरंग’चा यंदाचा अठ्ठाविसावा पुरस्कार भारतीय कीर्तीचे व्यक्तिचित्रकार सुहास बहुळकर यांना दिला गेला. त्यावेळी ते महाराष्ट्रात चित्रकलेची उपेक्षा होते याबद्दल तिडिकेने बोलले. त्यांच्या भाषणातील हे उतारे –

“महाराष्ट्रात साहित्य, संगीत, नाटक या कला जेवढ्या लोकप्रिय आहेत तेवढ्या प्रमाणात आमची चित्र-शिल्पकला दुर्लक्षित आहे. त्याला सर्व समाज, राज्यकर्ते आणि आम्ही स्वत: चित्र-शिल्पकारदेखील जबाबदार आहोत. आम्ही समाजापर्यंत पोचण्यात कमी पडतो… पूर्वी कॅलेंडरे, सण-उत्सव, सिनेमांचे बॅनर, पुस्तकांची मलपृष्ठे यांतून तरी चित्रसंस्कार व्हायचा. तोही कमी झाला आहे. चित्रकार बोलत नाहीत, समीक्षक समजेल असे लिहीत नाहीत. मग ही ‘दूरी’ वाढतच चालली आहे. सर्वसामान्यजन आधुनिक भारतीय चित्र-शिल्पकलेपासून कोसो दूर आहेत. श्रीमंत भारतीय लोक चित्रे फक्त ‘इनव्हेस्टमेंट’ म्हणून खरेदी करत आहेत. त्याचे प्रतिबिंबच समाजात सभोवती दिसते. नागरिक लाखो रुपयांचे फ्लॅट विकत घेतात; पण त्यात ओरिजिनल चित्र सोडाच, चित्राचा प्रिंटदेखील लावला जात नाही. निदान काही घरांत पुस्तके असतात, समाजात साहित्याची चर्चा चालते, प्रकाशनांचे जंगी समारंभ होतात, पण चित्रसंस्कार व्हावा, दृश्यकलेचा आनंद मिळावा म्हणून घरात काहीही नसते. हे बदलावेच लागेल.

“महाराष्ट्र शासनही त्याबाबतीत अत्यंत उदासीन आहे. महाराष्ट्रात तर चित्रकला शिक्षकच शाळांतून हद्दपार केले जात आहेत. मुंबईतील जे.जे.सारख्या दीडशे वर्षें जुन्या संस्थेत कायमस्वरूपी शिक्षक वर्षानुवर्षें नेमले गेलेले नाहीत. मग इतर कलाशिक्षण संस्थांची गोष्टच सोडा. राज्यात चित्र-शिल्पकारांसाठी शिष्यवृत्ती नाहीत; स्टुडिओसारख्या सोयी नाहीत. महाराष्ट्र राज्य हे इतर बाबतींत कितीही प्रगतिशील असले तरी दृश्यकलेच्या क्षेत्रात सोयी-सवलतींसंदर्भात देशात सगळ्यात मागासलेले राज्य आहे. गोव्यासारख्या छोट्या राज्यात कला व संस्कृती यासाठी बजेट शंभर कोटी रुपये आहे; ओरिसाचे बजेट तीनशे कोटी, तर हरयाणाचे बजेट सहाशे कोटी रुपये आहे. महाराष्ट्राचे त्यासाठी बजेटच सत्तर-ऐंशी कोटी रुपये आहे. मग मराठी कलावंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पुढे कसे जाणार?

“मुंबईत एकशेतीस वर्षांची जुनी ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’सारखी संस्था आहे; एकशेएक वर्षांची जुनी ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ आहे. पण त्या संस्थांना एकाही पैशाचे सरकारी अनुदान नाही. हे वास्तव आहे. त्यातून मार्ग काढावाच लागेल. मी त्याची सुरुवात करत आहे. मी मला ‘चतुरंग प्रतिष्ठान’ने दिलेल्या तीन लक्ष रुपयांपैकी एकावन्न हजार रुपये चित्रशिल्पकलेवरील कार्यक्रम ‘चतुरंग प्रतिष्ठान’तर्फे आयोजित करण्यात यावेत यासाठी देत आहे. ‘चतुरंग प्रतिष्ठान’तर्फे साहित्य-काव्य-नाट्य अशा विषयांवर अनेक कार्यक्रम होतात, पण त्यात चित्रशिल्पकलेचा अंतर्भाव कमी प्रमाणात असतो. तो वाढवावा.”

_chitrakalet_maharashtra_2.jpgसुहास बहुळकर यांना तीन लाख रुपयांचा ‘चतुरंग’ जीवनगौरव पुरस्कार दिला गेला, प्रसिद्ध व्यंगचित्रकार शि.द. फडणीस यांच्या हस्ते. फडणीस त्र्याण्णव वर्षांचे आहेत. त्यांनीही बहुळकर यांच्या म्हणण्यास ठाम दुजोरा दिला. ते म्हणाले, “मराठी समाजात चित्रकलेला स्थान नाही. सरकारच नव्हे, तर खासगी संस्थादेखील चित्रकलेस नगण्य समजतात. ते म्हणाले, की चित्रकलेच्या क्षेत्राने जेवढा अंधार पाहिला आहे, तेवढा इतर कोणत्याही कलेने पाहिलेला नाही. चित्रकलेकडे अजिंठ्याच्या चित्र-शिल्पांपासून बहुळकरांपर्यंतच्या चित्रकृतीपर्यंत गेली आठशे-हजार वर्षें सतत दुर्लक्षच होत आले आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृती मंडळ असे म्हटले जाते. परंतु तेथे साहित्याचा विचार सतत होत राहतो. फक्त साहित्य हीच कला आहे का? चित्रकलेला संस्कृतीत स्थान नाही? कलारसिकांच्या भावविचारातदेखील चित्रकलेला स्थान नाही? पु.ल. देशपांडे बहुविध कलानिपुण होते. त्यांनी साहित्य-संगीत-नाट्य या क्षेत्रांतील कलावंतांचा गौरव खूप केलेला दिसतो. त्यांच्याकडूनही चित्रकारांची उपेक्षाच झाली. ललित कलेचे भान असणारे म्हणजे पुल. पण चित्रकलेला त्यांच्यासहित कोणी अजिबात विचारात घेतच नाही. अभंग मराठी लोकांपर्यंत जितक्या सहजतेने पोचले तशी चित्रे लोकांपर्यंत सहजपणे पोचली पाहिजेत. त्या कलेत तेवढी ताकद आहे. शब्दाचा जन्म होण्याआधी आदिमानवाने चित्रे काढली आहेत. त्याने चित्रभाषेतून निसर्गाशी नाते जोडले आणि आपापसात संवाद साधला. इतिहासामध्ये वास्तववादी ते अमूर्त असे चित्रकला विकासाचे टप्पे सांगत व त्याचीच चर्चा करत न बसता वारली पेंटिंगपासून व्यंगचित्रांपर्यंत सर्व चित्रकलेचे प्रकार आहेत हे ध्यानी घेऊन चित्रकलेचा उत्सव समाजाने केला पाहिजे.

दिनकर गांगल यांचेही पुरस्कार वितरण समारंभात भाषण झाले. त्यांनी समारंभानिमित्त निघालेल्या स्मरणिकेतील बहुळकर यांच्याबाबतच्या लेखात महाराष्ट्रातील चित्रकलेच्या सद्यस्थितीचा उल्लेख केला आहे, तो असा – “चित्रकलेला महाराष्ट्रात फार मर्यादित स्थान आहे. सांस्कृतिक विश्वात संगीत, नाटक आणि अलिकडच्या काळात चित्रपट यांना जसे महत्त्व लाभले आहे तसे ते चित्रकलेच्या वाट्यास आलेले नाही. मुले शाळा-शाळांतून एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा पास होतात. सरकार त्या नियमाने घेते. त्यामुळे पालकांना त्यांच्या पाल्यांना कलेची ओळख झाल्याचे समाधान लाभते. पुढे, त्या चित्रकलेचे काहीच होत नाही. घराघरांतील चित्रकलेची जाण म्हणजे मुख्य दालनात हंड्या-झुंबरांसहित लावलेली राजा रविवर्मा यांची चित्रे आणि दलाल व मुळगावकर यांनी एके काळी सजवलेली व आता, नव्या चित्रकारांची कमीजास्त कलात्मक फरकाने असलेली दिवाळी अंकांची मुखपृष्ठे. सर्वसाधारण मराठी माणूस ‘शोभे’पलीकडे कलाजाणिवेच्या पातळीवर कधी गेला नाही.”

– नितेश शिंदे 

About Post Author

Previous articleआपोआप
Next articleसुहास बहुळकर – चित्रकलेतील चतुरस्रता!
नितेश शिंदे हे 'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे सहाय्यक संपादक आहेत. त्यांनी इंजिनीयरींग आणि एम ए पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. ते विविध वर्तमानपत्रांत लेखन करतात. त्यांचा विविध स्पर्धांमध्ये सहभाग असतो. त्यांनी एनसीसी आणि एनएसएससाठी विविध सामाजिक विषयांवर 'स्ट्रीट प्ले' आणि 'लघुनाटके' लिहिली आहेत. ते सूत्रसंचालनही करतात. त्यांना 'के. जे सोमय्या गोल्ड मेडलिस्ट बेस्ट स्टुंडट ऑफ द इयर' हा पुरस्कार मिळाला आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here