सातारा जिल्ह्यातील चाफळ हे गाव मांड नदीच्या तीरावर वसलेले आहे. मांड ही कृष्णा नदीची उपनदी. चाफळ गाव उंब्रजपासून अकरा किलोमीटर अंतरावर आहे. ते गाव सह्याद्री पर्वताच्या रांगांनी चहुबाजूंनी वेढलेले आहे. समर्थ रामदास यांच्या जीवनचरित्रात चाफळ गावाचे स्थान महत्त्वाचे आहे. त्या गावास समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने धार्मिक आणि ऐतिहासिक विशेष प्राप्त झाला आहे. समर्थ रामदास यांनी त्यांच्या त्र्याहत्तर वर्षांच्या आयुष्यातील छत्तीस वर्षे चाफळ येथे वास्तव्य केले.
समर्थ रामदासांनी त्यांचे शिष्य आणि चाफळचे गावकरी यांच्या सहकार्याने गावात शके 1569 (सन 1648) मध्ये राममंदिर बांधले. त्या कामात छत्रपती शिवाजी महाराजांनी सहाय्य केले होते. समर्थांनी चाफळच्या मंदिरात श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना केली. त्याबद्दलची आख्यायिका प्रचलित आहे. समर्थ रामदास यांना श्रीरामचंद्रांनी दृष्टांत दिला. त्यांनी त्यानुसार अंगापुरच्या डोहातू दोन मूर्ती बाहेर काढल्या. एक श्रीरामाची आणि दुसरी अंगलाई देवीची. समर्थ रामदासांनी श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना चाफळ येथे केली. त्यानंतर चाफळ गाव समर्थ संप्रदायाच्या मठाचे मुख्य स्थान होऊन गेले. अंगलाई देवीची मूर्ती सज्जनगडावर स्थापना करण्यात आली. अंगापूरच्या ग्रामस्थांनी रामाची मूर्ती चाफळला नेण्यास विरोध केला होता. त्यावर समर्थांनी त्यांना ती मूर्ती घेऊन जाण्यास सुचवले. मात्र त्या गावक-यांनी ती मूर्ती जागची हलवता येईना. गावक-यांनी समर्थांकडे स्वत:ची चूक मान्य केली. चाफळ येथे त्या मूर्तीची स्थापना झाल्यापासून तेथे श्रीरामनवमीचा उत्सव अखंडीतपणे साजरा केला जात आहे.त्या उत्सवात अंगापुरच्या गावक-यांना सासन काठ्यांचा मान देण्यात आला आहे.
चाफळ येथील मंदिर काळ्या दगडी चौथ-यावर उभे आहे. त्याचा आकार तारकाकृती आहे. मंदिराशेजारी मजबूत दगडी तटबंदी असून तिला चार बुरुज आहेत. मंदिराच्या जुन्या बांधकामांपैकी महाद्वार आणि पाय-या हे भाग शाबूत आहेत. मंदिरावर पाच शिखरे असून सर्वात उंच शिखरावर सुवर्णकलश व तांब्याचा ध्वज आहे. त्या मंदिराच्या बांधकामात कोठेही लोखंड वापरलेले नाही. मंदिराच्या पाय-या चढून आत जाताना विष्णूच्या दशवतारांची शिल्पे नजरेस पडतात. मंदिरात प्रवेश करताना दोन बाजूंस दोन खांब दिसतात. त्यापैकी उजव्या खांबावर मत्स्य, कूर्म, वराह व नरसिंह या अवतारांची शिल्पे कोरलेली आहेत. तर डाव्या खांबावर वामन, परशुराम, बौद्ध, व कलंकी यांच्या मूर्ती आहेत. उर्वरीत दोन दोन अवतार मागील बाजूस भिंतीवर कोरलेले आढळतात.
समर्थ रामदासांनी महाबळेश्वरपासून क-हाडपर्यंत मारुतीची अनेक मंदिरे उभी केली. चाफळच्या राममंदिरासमोर त्या अकरा मारुतींपैकी एक ‘दास मारुती’चे मंदिर आहे. त्या हनुमान मूर्तीची उंची सहा फूट आहे. मूर्तीच्या चेह-यावर विनम्र भाव आहेत. त्या मारूतीसाठी बांधलेले मंदिर सुस्थितीत आहे. गावात आलेल्या 1968 सालच्या भूकंपातदेखील हे मंदिर सुरक्षीत राहिले. राममंदिराच्या मागे उंचवट्यावर ‘प्रताप मारुती’चे मंदिर आहे. त्यास भीममारूती किंवा वीरमारूती अशा नावांनी ओळखले जाते. त्या मंदिराचे शिखर पन्नास फूट उंच आहे. शिखराचे शिल्पकाम आकर्षक आहे. त्या मारूतीची उंची सात ते आठ फूट असावी. मूर्तीच्या मस्तकावर मुकुट आणि कानात कुंडले आहेत. कमरेभोवती सुवर्णाची कासोटी व तिला घंट्या आहेत. ती मूर्ती नेटकी व सडपातळ आहे. रामदास समर्थांनी ‘भीमरूपी महारूद्रा’ या स्तोत्रात त्या मूर्तीचे वर्णन केले आहे.
चाफळच्या राममंदिराच्या पश्चिमेकडील डोंगरावर एक घळी आहे. त्या घळीत समर्थ रामदास यांचे वास्तव्य होते. ती घळ ‘रामघळ’ या नावाने ओळखली जाते. त्या घळीतून राममंदिराचे दर्शन होते. म्हणूनच समर्थांनी म्हटले आहे, की…
“दास डोंगरी राहतो,
यात्रा रामाची पाहतो।
देव भक्तासवे जातो, ध्यान रुपे।।”
चाफळचे मंदिर असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्या मंदिरांची देखरेख ‘श्रीराम देवस्थान ट्रस्ट’मार्फत केली जाते. ट्रस्टकडून भाविकांसाठी तसेच मुलांवर संस्कार घडवण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. तेथे दर्शनासाठी जाणा-या भाविकांची जवळच असलेल्या मठामध्ये राहण्याची व्यवस्था होते.
चाफळ गावापासून जवळच शिंगणवाडी येथे समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रथम भेट घडली होती. त्या ऐतिहासिक घटनेप्रित्यर्थ तेथे स्मारक बांधण्यात आले आहे. चाफळ गावाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ते बडोदा संस्थानाचे राजकवी यशवंत दिनकर पेंढरकर यांचे जन्मस्थान आहे. पेंढरकर यांना गौरवाने ‘महाराष्ट्रकवी’ असे म्हटले जाई. पेंढरकर यांच्या नावाचा उल्लेख ‘रविकिरण मंडळातील’ सप्तर्षींमध्ये माधव जूलियन यांच्यासोबत अग्रक्रमाने केला जात असे.
– संतोष अशोक तुपे
संतोषराव एक नंबर लेख लिहलात
संतोषराव एक नंबर लेख लिहलात
खुप सुंदर
खुप सुंदर.
फार छान माहिती दिलीत
धन्यवाद…
फार छान माहिती दिलीत
धन्यवाद
संपर्कासाठी चाफळ राम मंदिराचा दुरध्वनी / भ्रमणध्वनी आहे का आपणाकडे
।। श्रीराम ।।
छान माहिती दिलीत
चाफळ राम…
छान माहिती दिलीत
चाफळ राम मंदिराचा फोन नंबर आहे का
मी मूळ घराणे चाफळ असणाऱ्या…
मी मूळ घराणे चाफळ असणाऱ्या डोंगरे पैकी आहे याचा मला अभिमान वाटतो श्रीराम हे आमचे ग्रामदैवत आहे जवळच डोंगरे वाडा हे आमचे वस्तीस्थान वाड्या जवळ माता नंदला ई या ग्राम देवतेचे मंदिर आहे .आमचे चाफळ गावी खूप वेळा जाणे होते. विजय डोंगरे ९८५०७१७६७६ पुणे
।। श्रीराम समर्थ ।।
मनापासून…
।। श्रीराम समर्थ ।।
मनापासून धन्यवाद
फारच छान माहिती दिली आहे
छान….??
छान….??
नमस्कार मी बजरंग भानुदास…
नमस्कार मी बजरंग भानुदास सुरवसे राहणार मंगळवेढा तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर आपल्या श्री राम मंदिर चाफळ येथे येऊन गेलो होतो तिथे आल्यावर मला खूप प्रसन्न वाटलं तेथे मला देणगी द्यायची आहे त्यासाठी आपल्याला मोबाईल नंबर मिळावानंबर मिळावा ही विनंती
करतो
Comments are closed.