चांगुलपणा अवतीभवती

2
302

श्रीकांत पेटकर यांनी “चांगुलपणा अवतीभवती” हे छोटेखानी पुस्तक ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलवरील काही निवडक लेखांचा संग्रह या स्वरूपात प्रकाशित केले आहे. पुस्तक ‘ग्रंथाली’ या मान्यवर संस्थेच्या देखरेखीखाली प्रकाशित झाले आहे, तर ‘थिंक महाराष्ट्र’चे मुख्य संपादक दिनकर गांगल यांची प्रस्तावना पुस्तकाला लाभलेली आहे.

सामाजिक, कला आणि संस्कृती क्षेत्रात स्वतःला झोकून दिलेले परंतु प्रसिद्धीविन्मुख अशा व्यक्तींबाबत लेख या पुस्तकात आढळतात. पेटकर हे ‘थिंक महाराष्ट्र’च्या सोलापूर जिल्हा संस्कृतिवेध, नाशिक जिल्हा संस्कृतिवेध, कल्याण शहर संस्कृतिवेध अशा विविध मोहिमांत सहभागी झाले होते. त्यांनी लेखन त्या त्या जिल्हा/शहरांतील व्यक्तींच्या मुलाखती घेऊन केले आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील पारधी समाजासाठी अविश्रांत कार्य करणारे ज्ञानेश्वर भोसले, एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे, विद्यादात्या विद्या धारप, वन्य जीवनाचे भाष्यकार अतुल धामणकर, व्यंगचित्रकार/ अवलिया कलाकार मनोहर सप्रे, सोलापूरचेच ‘नासा’त काम करणारे राजेश जगताप, अफलातून चित्रकार शशिकांत धोत्रे अशा अनेक व्यक्तिचित्रांचा समावेश या पुस्तकात होतो.

पुस्तकाचे लेखक श्रीकांत पेटकर हे महाराष्ट्र विद्युत मंडळात कार्यरत आहेत. पेटकर यांच्या प्रयत्नांमुळे त्यांच्या वीज केंद्रास सलग तीन वर्षे उत्कृष्ट वीज केंद्राचा पुरस्कार मिळाला. त्यांना लेखनाची आवड असून त्यांची ‘आणि मी बौद्ध झालो‘ या अनुवादित पुस्तकासोबत कल्याण, शांबरीक खरोलिका, चांगुलपणा अवतीभोवती, बेहोशीतच जगणं असतं, गजल अशी आठ पुस्तके आजवर प्रकाशित झाली आहेत. पेटकर यांनी माहिती अधिकाराचा वापर, विधायक काम करणाऱ्या व्यक्तींना प्रकाशात आणणे अशा सामाजिक विषयांत विविध पातळ्यांवर प्रयत्न केले आहेत. पेटकर स्वतः कवी व चित्रकार आहेत. गझल हा त्यांचा आवडता काव्यप्रकार. त्यांच्या रचना नित्य प्रसिद्ध होत असतात. त्यांची दोन चित्र प्रदर्शने भरली आहेत. श्रीकांत पेटकर आणि त्यांचे बंधू किशोर यांनी त्यांच्या शेगाव बुद्रुक (जिल्हा चंद्रपूर) या गावी ‘कवितेचे घर’ची स्थापना केली आहे. त्यांना ‘कल्याण रत्न’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

श्रीकांत पेटकर पुस्तकातून येणारी रक्कम ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ संस्थेला देणगीदाखल देत असतात.

गिरीश घाटे 9820146432 ghategp@gmail.com|

About Post Author

2 COMMENTS

  1. श्री. श्रीकांत पेटकर हे आमच्या साहित्य संपदा चे सदस्य आहेत

    • होय.मला चांगले उपक्रम करणाऱ्या जास्तीत जास्त संस्थेत कामं करायला आवडते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here