चांगभलं करणारं ‘पवतं’ (Sacred Thread for Public Good – Tradition)

0
116

पवतंबांधण्याची परंपरा कोकणसह महाराष्ट्रभर अनेक गावांत सुरू आहे. पवतंम्हणजे पवित्र रक्षक धागा. हाताला गंड्याचा दोरा, कंबरेला करगोटा बांधतात तसे. पवत्यांचे उल्लेख वेगवेगळ्या पद्धतींसह आढळतात. कोकणात ग्रामदेवतेला पवतंबांधण्याचा कार्यक्रम नागपंचमी ते नारळी पोर्णिमा यांच्या दरम्यान होत असावा. पारंपरिक महाराष्ट्रीय लोकगीतातील स्त्रीधन समजल्या जाणाऱ्या उखाण्यात, ‘पंचमीचं पवतं, आलं गवरी भवतं, गवरीचं घेते दोरं, आलं शिलंगान म्होरंअशा शब्दांनी पवतांचा उल्लेख मिळतो. त्यानुसार पवतं पंचमीचे हे खरे असले तरी ते विविध ठिकाणी स्थानिक सोयीनुसार दिवस ठरवून बांधले जाण्याची परंपरा आहे. पालवण-ढोक्रवली गावच्या श्रीबाजी वाघंबर देवस्थानची पवतंबांधण्याची परंपरा ही श्रावण शुक्ल त्रयोदशीची आहे. गावच्या खोत मंडळींवर पवतं उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पूर्वी असायची. कोष्टी (विणकर) समाजाचे मानकरी खोतांच्या घरी बसून पवतं विणत असत. ती पद्धत बंद झाली. तेव्हा ग्रामदेवतेला पवतं अर्पण करण्याच्या आदल्या दिवशी देवाला जागरव्हायचा. जागरम्हणजे ग्रामदेवतेला रात्रभर जागवण्याचा कार्यक्रम होय. आदली रात्र जागवल्यावर दुसऱ्या दिवशी पहाटे देवाला रूपे (मुकुट) लावून सजवले जायचे. तो दिवस असायचा द्वादशीचा. पण त्या दिवसाला जागर पौर्णिमाम्हणत. पवतं त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे त्रयोदशीला, नारळी पौर्णिमेच्या दोन दिवस आधी बांधले जायचे. ते तसेच विद्यमान काळातही बांधले जाते. फक्त रात्र जागवली जात नाही.

मंदिरातील मूर्ती

कोष्टी समाजाच्या मानकऱ्यांना पवतं बनवण्याचा दोरा आणण्यासाठी गावाकडून पैसे दिले जात. श्रीबाजी वाघंबर देवस्थान ग्रामदेवतेच्या पारंपरिक पद्धतीनुसार वर्षाच्या एकूण दिवसांइतके बारीक पांढऱ्या दोऱ्याचे ढोपरांवर केलेले तीनशेपासष्ट सलग फेऱ्यांचे एक अशी सात पवतं (श्रीबाजी वाघंबर, श्रीसोमेश्वर, श्रीवाघजाई, श्रीकेदार, श्रीनवलाई, श्रीपावनाई, श्रीचोपडाई) सात देवतांसाठी कोष्टी समाजाकडून तयार करून घेतली जातात. पवतं ग्रामदेवतेला अर्पण करण्यापूर्वी गुरवत्यांची विधिवत पूजा करतात. त्यानंतर गावाच्या उपस्थित खोतांकडून, ‘पवतं घालण्यास घ्यायची काय?’ असा हुकूम मागितला जातो. हुकूम काढण्याची जबाबदारी गुरवांची असते. पवतं ग्रामदेवतेला प्रत्यक्ष अर्पण करताना गुरवांच्या हातात धुपारती असते. देवाची आरती गुरव करतात. सोबत परटांच्या घरचा एक माणूस दिवा दाखवण्यास असतो. त्यांच्या मागून पालवण-ढोक्रवली गावचे खोत, गावकर आणि चार-पाच मंडळी ग्रामदेवतेला प्रत्यक्ष पवतं अर्पण करतात. पवतं देवाला अर्पण करून झाले, की ती मंदिराच्या खांबाला, इमारतीला बांधली जातात. उपस्थित सर्वांना बांधण्यासाठी स्वतंत्र पवतं आणलेले असते. ते घातले जाते. गावकर मंडळी उपस्थित ग्रामस्थांना मानाप्रमाणे पवतं बांधतात. एकमेकांच्या हातावर पवतं बांधताना, ‘इडा पिडा जावो, बळीचं राज्य येवो. चांगभलं!असे म्हटले जाते. ग्रामदेवतेला साकडे घातले जाते. आज जसे तुला हे पवतं घालत आहे तसे तू आमचे रक्षण करम्हणून देवाच्या नावाची दोऱ्याची गाठ हातावर बांधून बंधन केले जाते. पवत्याचा दोरा काही ग्रामस्थांच्या हातात वर्षभर पाहण्यास मिळतो. नवा बांधण्याची वेळ आल्यावर जुना काढला जातो. पवतं हातात किंवा गळ्यातही बांधले जाते.

श्रीबाजी वाघंबर ग्रामदेवता मंदिर

घरपट आलेला माणूस त्या त्या घरातील व्यक्तींच्या संख्येप्रमाणे पवतं घेऊन जातो. पूर्वी गावचे गुरव पवतं वाटत घरपट फिरायचे. ती परंपरा कोकणातील काही गावांत कायम आहे. परंतु ढोक्रवली आणि पालवण ग्रामदेवतेच्या मंदिरात नाही. पूर्वी ते मंदिर तीन गावांचे मिळून होते. तेथे देवराई होती. तेव्हा त्या गावांना निवाचा कोंड (निवळी), पालाचा कोंड (पालवण) आणि ढोकाचा कोंड (ढोक्रवली) असे म्हटले जाई. कालांतराने, निवळकरांनी त्यांचे श्रीनवलाई, श्रीपावणाई ग्रामदेवतेचे स्वतंत्र मंदिर उभारले. ग्रामदेवतेला पवतं बांधण्याचा कार्यक्रम पूर्ण झाल्यावर मंदिरातील देव भंडाऱ्याला घेतला जातो. देवाची वस्त्रे आणि मुकुट उतरवून पेटीत पूर्ववत ठेवली जातात. ती पेटी गावकरांकडे सुपूर्द केली जाते. पूर्वी दोन-तीन गावच्या ग्रामदेवतांची जबाबदारी असलेल्या गुरवांचा गळा त्या दिवशी पवतांनी भरून जायचा. मंदिरात येऊ न शकलेली मंडळी, लहान-लहान मुले पवतं घ्यायला त्यांच्याजवळ यायची. गावोगावी हाती ग्रामदेवतेचे पवतं बांधलं गेल्यावर नारळी पौर्णिमेचे रक्षाबंधनव्हायचे, आजही ते होत असते.

श्रीबाजी वाघंबर ग्रामदेवता मंदिर परिसरात पवतं अर्पण कार्यक्रम प्रसंगी वृक्षारोपण करण्यात आले. ग्रामस्थांनी त्यांच्या गळ्यात घातलेले पवतेदिसत आहे.

जिंतूरच्या (परभणी) प्रा.जी.एन. गडदे यांची नारळी पौर्णिमेला पवती पुनवसंबोधणारी एक पोस्ट सोशल मिडीयावर (2020) वाचनात आली आणि पुन्हा पवतंआठवले. मराठवाड्याच्या ग्रामीण भागात जुन्या पिढीतील लोक नारळी पौर्णिमेला पवती पुनवम्हणतात. त्या दिवशी घरातील सर्वांच्या हाती पवतं बांधले जाते. मराठवाड्यात त्याला राखी म्हणूनही संबोधले जाते. त्याच दिवसांत कापसाला पातं लागण्यास सुरुवात होत असते. ते गळून पडण्याची शक्यता असते, म्हणून एक दिवस शेतीची कामे बंद असतात. महाराष्ट्रातील काही ग्रामीण भागांत पन्नास वर्षांपूर्वी राखी पोर्णिमाहा शब्द रूढ नसावा. तेव्हा गावचे जंगम किंवा पुजारी भिक्षामागताना सोबत पवतंआणत; घरोघरी पुरुषमुलांना बांधत. ते पवतंघरच्या देवासह सायकल, गाडी, मशीन, दुकानातील तराजू यांसह व्यवसायातील अवजारांना बांधले जाई. काही भागात नागपंचमीच्या दिवशी, भिंतीवर काढलेल्या नागोबांना हळदीने पिवळे केलेले दोरे चिकटवले जायचे. दुसऱ्या दिवशी तेच दोरे पवतं म्हणून हातावर बांधले जात. काही भागात पावसाळ्यात खरिपाची पेरणी संपल्यानंतर ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये बैलपोळ्या वेळी बैलांच्या शिंगांनाही पवतं बांधली जायची. नारळी पौर्णिमेला, महाराष्ट्रातील लाखो लोकांचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबालाही पवतं अर्पण केले जाते. त्यानंतर पवित्र रक्षक धागा (पवतं) मिळवण्यासाठी भक्तांची गर्दी होत असते. राज्यातील काही ठिकाणी पूर्वी दानवीर महाबली राजा बळी यांना जे बांधले गेले तेच रक्षासूत्रतुम्हाला बांधत आहे अशा अर्थाचा, ‘येन बद्धो बलि राजा, दानवेन्द्रो महाबल: तेन त्वाम् प्रतिबद्धनामि रक्षे माचल माचल:। हा मंत्र म्हणून पवतं बांधले जात होते.

(देव भंडारला जाणे – उत्सवाप्रसंगी देवाला लावलेली चांदीची रूपे उत्सवानंतर पुन्हा उतरवून पेटीत ठेवणे.)

टेलिग्राम

व्हॉट्सअॅप

फेसबुक

ट्विटर

– धीरज वाटेकर  98603 60948 dheerajwatekar@gmail.com

धीरज मच्छिंद्रनाथ वाटेकर हे मुक्त पत्रकार आणि छायाचित्रकार आहेत. त्‍यांनी चिपळूण तालुका पर्यटन, श्री परशुराम तीर्थ क्षेत्र दर्शन (मराठी व इंग्रजी), श्रीक्षेत्र अवधूतवन, ठोसेघर पर्यटन अशा विविध पुस्तकांचे लेखन केले आहे. त्‍यांच्‍याकडे देशभरातील विविध विषयांवरील सुमारे पंचवीस हजार फोटोंचा संग्रह आहे. त्‍यांनी कोकणच्या संशोधित नकाशाची निर्मिती व संपादन केले आहे. त्‍यांचे लेख विविध नियतकालिकांत प्रसिद्ध होत असतात. त्‍यांना लेखनासाठी उत्‍कृष्ट जिल्हा युवा पुरस्कार‘, ‘उल्हास प्रभात‘, ‘नलगे ग्रंथ पुरस्कारअसे काही गौरव प्राप्‍त झाले आहेत.

———————————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here