Home वैभव इतिहास चंद्रपूरचे अधिपती धारचे परमार

चंद्रपूरचे अधिपती धारचे परमार

उपेंद्र हा परमार वंशातील पहिला ज्ञानपुरूष मानला जातो. परमार वंशाचे इसवी सन 1950 नंतरचे अभिलेख आहेत त्यात त्याची कथा दिलेली आहे. भगवान रामाचे गुरू ऋषी वशिष्ठ असले तरी त्याचा आश्रम निबीड अरण्यात होता. ऋषी वशिष्ठाची कामधेनू राजर्षी विश्वामित्राने पळवून नेली. तेव्हा तिला सोडवून आणण्यासाठी वशिष्ठ ऋषीने अबू पर्वतावर यज्ञ आरंभला. त्या यज्ञाच्या अग्निकुंडातून एक वीर पुरूष उत्पन्न झाला, त्याने त्याच्या वीरश्रीने कामधेनूला सोडवून आणले. त्याच्या त्या कामगिरीबद्दल वशिष्ठ ऋषीने उपेंद्रलाच परमार – शत्रूचा नाश करणारा ही पदवी दिली आणि राजपदही दिले. तोच पुरूष म्हणजे परमार वंशाचा संस्थापक होय. त्यालाच कृष्णराज या नावाने संबोधत असत. तो राष्ट्रकुटाचा सामंत म्हणून राज्य करू लागला. त्याची राजधानी धारानगरी होती. तेव्हापासून माळव्याचे अर्थात धारचे परमार प्रसिद्धीस आले. 

चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील राजुरा या गावापासून पूर्वेला चनाखा हे गाव आहे. ते गाव बल्लारपूर-आसिफाबाद या लोहमार्गावर आहे. तेथे सुवर्णाची नाणी सापडल्याबाबत निर्देश केला जातो. सुवर्णाच्या त्या नाण्यांवर ‘जगदेव’ हे नाव कोरलेले आहे. तो परमारवंशीय राजा उदयादित्याचा मुलगा होता. जगदेवाला लक्ष्मवर्मन व नरवर्मन या नावाचे दोन भाऊ होते. पण त्या दोन्ही मुलांवर उदयादित्य राजाचे प्रेम नसावे, म्हणून नवीन पुत्रासाठी त्याने भगवान शिवाची आराधना केली. त्यामुळे त्याला मुलगा झाला. त्याने त्याचे नाव जगदेव असे ठेवले (संदर्भ- संशोधन मुक्तावलि सर 3 रा, वा.वी. मिराशी, पृष्ठ 179-182). उदयदित्याने त्याच्यानंतर जगदेवाला माळव्याची गादी मिळावी अशी व्यवस्था करून जगदेवाला मालव राज्याचा एक भाग जेजकभक्ती (बुंदेलखंड) येथे अधिकारी नेमले. त्याला जज्जूमी जगदेव असे म्हटले आहे. वास्तवात, गंमत अशी झाली, की जगदेवाने तिचा स्विकार केला नाही. उदयादित्याच्या मृत्यूनंतर, त्याला वडिलांच्या योजनेनुसार राजलक्ष्मीचा स्वीकार करणे शक्य होते, परंतु त्याने वडील बंधूच्या अगोदर विवाह करण्याचा ‘परिवित्ति’ नामक ‘पातक’ केले होते, त्याच्या भीतीमुळे त्याने गादीवर बसणे टाळले. उदयादित्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वडील पुत्रापैकी प्रथम लक्ष्मवर्मन व नंतर नरवर्मन यांनी राज्य केले (संदर्भ- महाराष्ट्रातील काही ताम्रपट व शिलालेख, वि.भि. कोलते, पृष्ठ 126). त्यांनी चालुक्यांच्या ताब्यात असलेला चंद्रपूर जिल्ह्याचा प्रदेश जिंकून त्यांच्या राज्यास जोडला होता. त्याचे त्यामुळे चालुक्याशी संबंध बिघडले होते. सहाव्या विक्रमादित्याने इसवी सन 1097 च्या शेवटी शेवटी माळव्यावर स्वारी करून धारानगरी उध्वस्त केली. त्यानंतर विक्रमादित्य व राजकुमार जगदेव परमार यांची भेट झाली (संदर्भ- महाराष्ट्रातील काही ताम्रपट व शिलालेख, वि.भि. कोलते. पृष्ठ 126). जगदेवाने मालव राज्याचा त्याग करून तो दक्षिणेत म्हणजे गोंडवनात आला. त्याचे स्वागत कुंतलाधिपती सहावा विक्रमादित्य याने केले. इतकेच नव्हे, तर त्याला पुत्र मानून राज्यातील एका विभागाचे स्वामी केले. मेरू तुंगान्वाऱ्याने ‘प्रबंध चिंतामणी’ ग्रंथात म्हटले आहे, की जगदेवाच्या शौर्यविर्यादी गुणांनी वश होऊन परमार्दिदेवाने म्हणजे सहाव्या विक्रमादित्याने त्याला आपल्याकडे बोलावून, त्याचा गौरव करून एका देशाचा अधिपती म्हणून नेमले (संदर्भ- संशोधन मुक्तावली सर 3 रा, वा.वी. मिराशी, पृष्ठ 181-183). त्यानंतर परमार जगदेवाने सहाव्या विक्रमादित्याच्या बाजूने अनेक लढायांत भाग घेतला. होयसळ श्रीपतीच्या शिलालेखात सहाव्या विक्रमादित्याच्या सेनापतीमध्ये मालवेश्वर जगदेवाचे नाव दिसते. वीर बल्लाळाचा त्याच्याशी जो युद्धप्रसंग झाला त्याचे रोमहर्षक वर्णन त्यात आलेले आहे. तसेच, जगदेवाला मालवराज संबोधून धर्मापुरी शिलालेखातही ‘तो परमार उदयादित्याचा पुत्र होय’ म्हटलेले आहे (संदर्भ- महाराष्ट्रातील काही ताम्रपट व शिलालेख, वि.भि. कोलते. पृष्ठ 127). परमार जगदेव याच्या शौर्याबाबत धाराशिव जिल्ह्यातील तुळजाभवानी देवीच्या तुळजापूर मंदिराच्या पश्चिमेकडील द्वारावर चांदीच्या पटावरील असलेल्या लेखात परमार शासक जगदेवाने तुळजाभवानीला सात वेळा शीर अर्पण केले असल्याचा उल्लेख त्याच्या वंशजाने कोरून ठेवला आहे (संदर्भ- भारतीय इतिहास आणि संस्कृती त्रैमासिक, ऑक्टोबर-डिसेंबर 2003 पृष्ठ 49). त्याने युद्धात सात राजांची शिरे कापून येत असताना, तुळजाभवानी देवीच्या भेटीला जाऊन, तिला कापून आणलेली शिरे अर्पण केली. परंतु, त्या राजांची नावे तेथे नोंदलेली दिसत नाहीत. सदर युद्धे धाराशिव या भागात झाली. जगदेवाचा पुत्र जगध्वल याने तुळजाभवानी देवीच्या मंदिराला भेट दिली असता चांदीच्या पटावर उपरोल्लेखित लेख कोरून तेथे अर्पण केला.

माळवा प्रदेशात असलेल्या धार येथून राजा भोज (इसवी सन 1000-1047) हा राज्य करत असताना, त्याने  मित्राच्या साहाय्याने कल्याणीचा चालुक्य नृपती जयसिंह (1015-1047) याच्यावर स्वारी केली. राजा जयसिंहाने तेव्हा त्याचा पराभव केला. जयसिंहानंतर त्याचा प्रथम पुत्र सोमेश्वर (1043-1068) याने माळव्यावर स्वारी करून त्याला धडा शिकवला. त्याचा पुत्र जयसिंह हा भोजानंतर गादीवर बसला. कलचुरी व चालुक्य यांनी मिळून राजा जयसिंहाला पदच्युत केले. जयसिंहाने प्रथम सोमेश्वराकडे जाऊन मदतीची याचना केली. सोमेश्वरानेही पूर्वीचे वैर विसरून त्याचा धाकटा पुत्र विक्रमादित्य याला जयसिंहाच्या मदतीला पाठवले. विक्रमादित्याने शत्रूचा पराभव करून राजा जयसिंहाला पुन्हा माळव्याच्या गादीवर बसवले. तेव्हापासून जयसिंह हा विक्रमादित्य चालुक्याचा मित्र व चाहता बनला. प्रथम सोमेश्वरानंतर त्याचा वडीलपुत्र द्वितीय सोमेश्वर (1068-1076) गादीवर बसला. त्याचा धाकटा भाऊ सहावा विक्रमादित्य हा त्याला पदच्युत करून गादी हस्तगत करण्यासाठी कारस्थाने करत आहे, या शंकेमुळे द्वितीय सोमेश्वराने कलचुरी नृपती कर्ण व गांगेय नृपती यांनी उदयादित्य राजाशी संधान बांधले व त्या तिघांनी मिळून माळव्यावर स्वारी केली. त्यात जयसिंह मारला गेला. त्या कठीण प्रसंगी दिवंगत भोजराजाचा भाऊ उदयादित्य याने पुढे येऊन सर्व शत्रूंचा मोड केला व माळवा राज्याचे संरक्षण केले. त्यानंतर माळव्याच्या (धार) गादीवर उदयादित्य बसला (1080-1086). त्या उदयादित्याचे व चालुक्य विक्रमादित्याचे संबंध सलोख्याचे होते (संदर्भ- महाराष्ट्रातील काही ताम्रपट व शिलालेख, वि.भि.कोलते. पृष्ठ125 आणि संशोधन मुक्तावलि सर 3 रा, वा.वी. मिराशी, पृष्ठ 176). जगदेवाने तो संबंध पुढे कायम ठेवला. 

जगदेवाने विक्रमादित्याच्या (सहावा) बाजूने अनेक लढायांत भाग घेतला. त्याने काही प्रदेशावर स्वतंत्र राज्य केले होते. विदर्भाचा पूर्व-पश्चिम भाग त्याच्या अधिकाराखाली येत होता. त्यात चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ परभणी जिल्ह्याचा समावेश होता असे उपलब्ध शिलालेखाच्या आधारे म्हणता येते. जगदेव हा या प्रदेशाचा स्वतंत्र शासक होता. परमार जगदेव हा स्वतःचे भाग्य अजमवण्यासाठी दक्षिणेत आला. विक्रमादित्याने त्याला गोदातीरावरील प्रदेशाचा प्रांतीय शासक नेमले होते. साहजिकच, जगदेवाचे शासन जिल्ह्यांवर होते. त्याने स्वतःचे राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो अयशस्वी झाला. म्हणून त्याने चालुक्याचा प्रांतीय शासक म्हणून गडचांदूर (जिल्हा चंद्रपूर) येथे राजधानी स्थापून राज्यकारभार केला (संदर्भ- चंद्रपूर आणि गडचिरोली पुरातत्त्व, र.रा. बोरकर पृष्ठ 138).

जगदेवाच्या अगोदर परमार नृपतीचा उल्लेख सन 1104-05 च्या परमारकालीन शिलालेखातून मिळतो. पश्चिम विदर्भावर उत्तर चालुक्यांची सत्ता असली तरी त्या दरम्यान धारच्या परमारांनी स्वारी करून पूर्व विदर्भाचा काही भाग अधीन करून घेतला होता. परमार नरेश लक्ष्मवर्मनने एका देवालयास दोन गावे दान दिल्याचा उल्लेख आढळतो. स्थळाचा शोध घेतल्यास भद्रावतीच्या आजूबाजूला मोखालपाठक हे गाव मोखाळा या नावाने असावे. मोखालपाठक हा गाव त्या देवळास दान दिला. ते दान त्याने 1105 मध्ये केले (संदर्भ- चंद्रपूरचा इतिहास द्वितीय आवृत्ती अ.ज. राजूरकर, पृष्ठ 179). 

 उत्तर चालुक्यवंशीय सम्राट सहावा विक्रमादित्य आणि परमारवंशीय भोज राजाचा पुतण्या जगदेव यांचा 1112 मधील पुसदजवळील डोंगरगाव शिलालेख, आदिलाबाद जिल्ह्यातील जनपद येथील शिलालेख, परभणी जिल्ह्यातील सादरभाव शिलालेख, बीड जिल्ह्यातील धर्मापुरी येथील 1134 चा शिलालेख. या परमारवंशीय शिलालेखातील उल्लेखांमुळे परमारसाम्राज्याच्या इतिहासावर प्रकाश पडतो. त्या भागावर गडचांदूरच्या राजाची सत्ता असताना त्याने राज्यात आर्थिक व्यवहार सुरळीत चालावे म्हणून टाकसाळद्वारे चलनी नाणे काढून व्यवहारात उपयोग केला. राज्याचा आर्थिक व्यवहार सुरळीत चालावा म्हणून जगदेवानेही त्याच्या नावाची नाणी पाडली. त्या सुवर्णनाण्यांवर ‘श्री जगदेव’ ही अक्षरे अंकित करवली.

चनाखा या गावी भवन निर्माणाकरता खोदाईचे काम चालू असताना सुवर्णाच्या नाण्यांनी भरलेला हंडा जमिनीत दिसून आला. त्यात एकूण पाचशेचोपन्न नाणी आढळली. त्यांपैकी एकशेएकोतीस नाण्यांवर कोणतेही अंकन नाही. त्या नाण्याचा आकार 19×19 मिलीमीटर असून, नाण्याचे वजन 3.70 ग्रॅम असल्याचे आढळून आले. अंकन असलेल्या नाण्यांवर ‘श्रीजगदेव’ (संदर्भ- हिंदी दैनिक नवभारत, नागपूर, दिनांक 18 मे 2009) अशी अक्षरे कोरलेली असून ती परमारवंशीय असल्याचे नाणेअभ्यासक अशोकसिंह ठाकूर यांचे म्हणणे आहे. त्या नाण्यांवरील लिपी देवनागरी असून त्यात श्रीजगदेव या नावात मात्र ‘ग’ हा शब्द उलटा ‘ठा’ असा लिहिलेला आढळला. त्यावरून धारचा परमारवंशीय राजा श्रीजगदेव याचे अधिपत्य चंद्रपूर जिल्ह्याच्या भागावर होते हे स्पष्ट दिसते.

– दत्ता तन्नीरवार 9922089301
gshirpurkar@gmail.com
 

About Post Author

Exit mobile version