चंदा निंबकर यांचा जन्म सातारा जिल्ह्याच्या फलटण येथे झाला. त्यांचे वडील बनबिहारी निंबकर हे प्रथितयश कृषितज्ज्ञ होते. त्यांच्या आई जाई निंबकर या इंग्रजी भाषेतील दर्जेदार लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत.चंदा निंबकर यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण फलटण येथेच झाले. त्यांनी पुणे येथे महाविद्यालयीन शिक्षण घेऊन बी कॉम पदवी सुवर्णपदकासह प्राप्त केली. त्यांनी अर्थशास्त्र हा विषय घेऊन अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठातून एम ए ची पदवी संपादन केली.
त्यांचे वडील बनबिहारी यांचे प्रयोग शेळ्या व मेंढ्या यांच्या भारतातील उपलब्ध जातींची उत्पादनक्षमता वाढवण्याबाबत चालू होते. त्यांनी स्कॉटलंडमधील प्रसिद्ध अनुवंशशास्त्रज्ञ डॉ. जेरॉल्ड विनर यांच्या सहकार्याने उत्पादकतावाढीचा आराखडाही तयार केला. चंदा निंबकर यांनी स्वत: वडिलांच्या कामातील तो धागा उचलून शेळीमेंढी संशोधनात सहभागी होण्याचे ठरवले व स्कॉटलंडमधील एडिंबरा विद्यापीठात एम एस्सी (पशुपैदास) हा एक वर्षाचा अभ्यासक्रम केला. चंदा निंबकर यांनी ती पदवी विशेष प्रावीण्यासह 1989-90 मध्ये प्राप्त केली. चंदा यांनी, पुढे ‘जेनेटिक इंप्रूव्हमेंट ऑफ लँब प्रॉडक्शन एफिशिएन्सी इन इंडियन डेक्कनी शीप’ या विषयावरील शोधनिबंध सादर करून न्यू इंग्लंड विद्यापीठाकडून पीएच डी पदवी मिळवली.
चंदा निंबकर यांनी ‘निंबकर कृषी संशोधन संस्थे’च्या पशू संवर्धन विभागात कामाला 1990 पासून सुरुवात केली. त्यांना मेंढीच्या जातीचा शोध घेत असताना पश्चिम बंगालमधील सुंदरबन भागातील मेंढीची जात ‘गरोळ’ ही सापडली. त्यांनी गरोळ मेंढ्यांचा कळप फलटण येथे आणून त्यांची पैदास व संवर्धन केले. त्यांनी 1998 पासून वीस वर्षे सातत्याने संशोधन करून, जुळी कोकरे देणाऱ्या ‘नारी सुवर्णा’ या मेंढीच्या नव्या वाणाची निर्मिती केली आहे. त्यांना त्या प्रकल्पात पुण्याची राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आणि ऑस्ट्रेलियातील एक विद्यापीठ यांचे सहकार्य लाभले. त्यांना त्या प्रकल्पासाठी ऑस्ट्रेलियाकडून आर्थिक सहाय्यदेखील मिळाले. ‘नारी सुवर्णा’ या, जुळी कोकरे देणाऱ्या मेंढ्यांच्या वाणाची निपज, आता, केवळ संस्थेच्या प्रक्षेत्रावर न होता फलटण परिसरातील मेषपालकांच्या अनेक कळपांमध्ये होऊ लागली आहे.
चंदा निंबकर यांच्या पुढाकारातून घडून आलेल्या या संशोधन प्रकल्पाला केंद्र सरकारची वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद यांच्याकडून पुरस्कार मिळाला आहे. त्यांना संशोधनाचे हे काम पुढेही चालू राहवे यासाठी केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाकडून आर्थिक साहाय्य मिळाले आहे. त्या उद्देशाने फलटणजवळ अद्ययावत प्रयोगशाळेची उभारणी झाली आहे. तेथे जनुकीय तपासणीचे काम चालते. जुळी कोकरे देणाऱ्या मेंढ्यांच्या वाणासंबंधात पुणे येथे 2008 मध्ये आंतरराष्ट्रीय परिषदही भरवली गेली होती.
चंदा निंबकर यांनी फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेळ्यांच्या संदर्भात अनेक प्रयोग गेल्या तीन दशकांत केले आहेत. त्यातून अनेक उपक्रम घडून आले, जसे की उत्पादकतेत सुधारणा, फलटण येथे शेळ्या-मेंढ्यांच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रात्यक्षिक केंद्राची स्थापना, भारतात प्रथमच उच्च उत्पादन क्षमतेच्या बोअर जातीच्या शेळ्यांचे प्रजनन व संवर्धन- त्यासाठी गोठित भ्रूण व रेतमात्रा आयात, शेतकऱ्यांकडील स्थानिक जातीच्या शेळ्यांच्या सुधारित संकरित बोअर शेळ्यांचे उत्पादन- त्यासाठी बोअर जातीच्या नराबरोबर त्यांचा संकर. शेतकऱ्यांकडील उस्मानाबादी जातीच्या शेळ्यांची निवड पद्धतीने पैदास व विकास हा प्रकल्पही राबवला गेला आहे.
चंदा निंबकर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक परिषदांमध्ये प्रबंध सादर केलेले आहेत. चंदा या कृषी संशोधन संस्थेचा पशु-संवर्धन विभाग आणि महाराष्ट्र शेळी व मेंढी संशोधन व विकास संस्थेच्या विश्वस्त व संचालक आहेत. त्या महत्त्वाच्या अशा काही सरकारी व बिनसरकारी संशोधनपर उपक्रमांमध्ये सल्लागार व निर्णयकर्त्या म्हणून काम करतात. चंदा निंबकर यांना शेळीमेंढी संबंधात राज्याचे पैदास धोरण ठरवणे, पंचवार्षिक योजनांमध्ये राज्यातील शेळ्या-मेंढ्यांच्या विकासाची दिशा निश्चित करणे या विषयाच्या सल्लागार समितीत सदस्य म्हणून बोलावले जाते. त्या देशातील शेळ्या, मेंढ्या व ससे यांच्यासंबंधीचे पैदास धोरण ठरवण्याबाबतच्या केंद्र सरकारच्या सल्लागार समितीच्या सदस्य आहेत. भारतीय योजना आयोगाअंतर्गत दहाव्या पंचवार्षिक योजनेत ‘रवंथ करणाऱ्या लहान जनावरांचा विकास’ या विषयाच्या उपसमितीच्या देशातील अन्न सुरक्षेबाबत धोरण ठरवण्यासाठी केंद्र शासनाने गठित केलेल्या राष्ट्रीय आयोगावर सदस्य म्हणून कार्य केले आहे. त्यांना काही प्रकल्पांमध्ये सल्लागार सदस्य म्हणून जागतिक स्तरावरील अन्न व कृषी संघटना, जागतिक अनुवंशशास्त्र परिषद अशा संस्थांनी आमंत्रित केलेले आहे.
– वसंत नारायण जहागीरदार 7304011266 vnjahagirdar2@gmail.com
———————————————————————————————————