घोरपड

पाल, सरडा, घोयरा यांसारख्या सरपटणाऱ्या प्राण्यांशी घोरपडीचे नाते जवळचे आहे. तिला सरड्याची थोरली बहीणच म्हणायची! घोरपडीला इंग्रजीत ‘मॉनिटर लिझार्ड’ असेच म्हणतात. व्हॅरॅनस बेंगॉलेन्सिस (बेंगॉल मॉनिटर) ही घोरपडीची जात भारतात जवळजवळ सर्वत्र आढळते.

तानाजीच्या ऐतिहासिक घोरपडीचे नाव ‘यशवंती’ होते. मावळे तिच्या साहाय्याने सिंहगड चढले, असे म्हणतात. त्यातील सत्याचा भाग किती, हा प्रश्न बाजूला ठेवला तरी कातळाला किंवा जमिनीला घट्ट चिकटून राहण्याचा गुण घोरपडीत असतो. घोरपड तिच्‍या नखांनी खडकसदृश्‍य कठिण भागास घट्ट धरून राहू शकते. म्हणून पूर्वीच्‍या काळी किल्ल्यांवर, अथवा उंच भूस्‍तरांवर चढताना घोरपडीच्‍या कमरेस दोर बांधून तिचा चढाईसाठी उपयोग करून घेत होते. एखाद्या बिळात किंवा कडेकपारीत लपलेली घोरपड तिचे अंग फुगवते, तेव्हा तिला तेथून ओढून बाहेर काढणे अतिशय कठीण असते.

तिच्या ह्या गुणधर्मामुळे घोरपडीला ‘चिकटा’ असेही म्हणतात. ज्ञानेश्वरीत एका ओवीत, पारधी लोक शिकारीला जाताना जाळे, वागुर, कुत्री, ससाणा, भाले यांबरोबर घोरपडही घेऊन जातात – असे वर्णन आले आहे :

पाशिकें, पोंतीं, वागुरा | सुणीं, ससाणें, चिकाटी खोचरा |
घेऊनि निघती डोंगरा | पारधी जैसे || १६.३४५

काहींच्या मते, पारधी लोक पक्ष्यांना पकडण्यासाठी चिकट पदार्थ लावलेला जो बांबू बरोबर नेतात, त्याला चिकटा म्हणतात.

घोरपडीला उष्ण व ओलाव्याची हवा लागते. त्‍यामुळे हा प्राणी उष्ण कटिबंधांतील नदीनाल्यांच्या आसपास आढळतो. या प्राण्याची जास्तीत जास्त लांबी पाच फुटापर्यंत असते. तिचे वजन शंभर किलोपर्यंत असते. घोरपडीचे डोके धडाला एका मणक्याने जोडलेले असते. तिच्‍या शरीरावर बाह्यत्वचा असून काही जातीतील घोरपडींची त्‍वचा कठिण व जाड असते. घोरपडीची त्वचा साधारणत: खरबरीत व जाड असून हनुवटीच्या खाली बारीक त्वचा असते. तिचे दात तीक्ष्ण असून पायांची बोटे मोठी असतात. शेपूट बारीक व लांब असते. हा प्राणी अत्यंत चपळ असतो. भारतापेक्षा दक्षिण अमेरिका व वेस्ट इंडिज या ठिकाणी हा प्राणी मोठ्या प्रमाणात आढळतो.

घोरपडीचे मांस फार रूचकर असते असे म्हटले जाते. घोरपडीस पोहता येते. ती पोहताना तिच्‍या शेपटीचा उपयोग वल्‍ह्यासारखा करते. ती श्वास रोखून पाण्याखाली बराच वेळ राहू शकते. तिच्‍या शरिराचा रंग हिरवट असतो. घोरपड हा प्राणी दिसायला भयंकर असला तरी तो भित्रा असतो. मात्र संकटात सापडल्यास घोरपड मागील पायावर उभी राहते आणि अंग फुगवून मोठा आकार धारण करते. जोराने फुस्कारते, शेपटीचा तडाखा देते किंवा दातांनी चावा घेते. घोरपड जुलै ते सप्टेंबर या काळामध्ये बिळात किंवा वाळवीच्या वारुळात पंचवीस ते तीस अंडी घालते. अंडी घालून झाल्यावर ती पालापाचोळ्याने बीळ बंद करून निघून जाते. बिळातील उष्णतेमुळे अंडी उबतात. घोरपड वेगाने पळू शकते. ती पळताना तिची शेपटी वर उचलते. घोरपड दिवसा शिकार करते. पक्षी व त्यांची अंडी, उंदीर, सरडे, साप, मासे, कवचधारी प्राणी व लहानमोठे कीटक यांवर ती उपजीविका करते. वसई येथील जंगली भागांमध्‍ये विविध जातींच्‍या घोरपड आढळतात.

घोरपडीत नर व मादी असतात, परंतु मराठीत घोरपड हा शब्द स्त्रीलिंगी रूपातच वापरला जातो. त्यामुळे ‘सशाचं स्त्रीलिंग काय?’ त्याप्रमाणे ‘पालीचे किंवा घोरपडीचे पुल्लिंग काय?’ असा प्रश्न पडतो.

महाराष्‍ट्रातील दिमडी या वाद्यासाठी घोरपडीचे कातडे वापरले जात असे.

घोरपड दिसायला कुरूप असते; म्हणून एखाद्याचे कुरूप स्त्रीशी लग्न लागले गेले, तर ‘घोरपड गळ्यात बांधली गेली’ असे म्हटले जाते. त्याच अर्थाने पुलंच्या बटाट्याच्या चाळीतील राघुनाना त्यांच्या कन्येस पुण्यातून लिहिलेल्या पत्रात म्हणतात, ‘मला माणसे ऐतिहासिक दिसू लागली. कोणी मिशीवाला गेल्यास तो नरवीर तानाजी वाटून त्याची घोरपड पाहू लागलो, तो त्याची बायको मागून जाताना आढळे.’

घोर याचा अर्थ चिंता किंवा काळजी. त्यावरून जिवाला घोर पडणे म्हणजे काळजी वाटणे असा वाक्प्रचार रूढ झाला आहे. घोरपडीचे तेल वातविकारांवर उपयोगी पडते अशा गैरसमजुतीतून घोरपडींची हत्या केली जाते. माणसाच्या या अशा वागण्यामुळे निसर्गातील घोरपडीलाच नव्हे तर इतर प्राण्यांनाही घोर पडला आहे, एवढे नक्की!

– डॉ. उमेश करंबेळकर

About Post Author

Previous articleदुष्काळ आहे सुनियोजनाचा
Next articleमुंबईतील मैलाचे दगड
डॉ. उमेश करंबेळकर हे साता-याचे आहेत. ते तेथील मोतीचौकात असलेल्‍या त्‍यांच्‍या दवाखान्यात वैद्यकी करतात. त्‍यांच्‍याकडे 'राजहंस' प्रकाशनाच्‍या सातारा शाखेची जबाबदारी आहे. ते स्‍वतः लेखक आहेत. त्‍यांनी 'ओळख पक्षीशास्‍त्रा'ची हे पुस्‍तक लिहिले आहे. त्‍यांना झाडे लावण्‍याची आवड आहे. ते वैयक्तिक पातळीवर वृक्षरोपणाचे काम करतात. त्‍यांनी काही काळ बर्ड फोटोग्राफीही केली. त्‍यांनी काढलेले काही फोटो कविता महाजन यांच्‍या 'कुहू' या पहिल्‍या मल्टिमिडीया पुस्‍तकामध्‍ये आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9822390810

4 COMMENTS

  1. खरंच चांगली माहिती आहे .
    खरंच चांगली माहिती आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version