संस्कृतमध्ये जे अनेक मजेशीर ‘न्याय’ आहेत त्यातलाच एक म्हणजे घट्टकुटी प्रभात न्याय. हे नाव ऐकून ‘ह्यात मजेशीर ते काय ?’ असा प्रश्न काहींना पडेल. तर काहींना पुलंच्या जलशृंखला योग, कनिष्ठ भगिनी योग अशा काही नवीन ग्रहयोगांतलाच हा एखादा प्रकार असावा, असे वाटेल. तसे काही नाही. घट्टकुटी प्रभात न्याय हा फार जुना, संस्कृत साहित्यातील न्याय आहे.
घट्ट या शब्दाचा अर्थ जकात असा आहे. कुटी म्हणजे झोपडी. घट्टकुटी म्हणजे जकातनाका. प्रभात म्हणजे पहाट हे आपल्याला माहीतच आहे.
सध्या अनेक शहरांतील जकात रद्द झाली आहे. पण काही वर्षांपूर्वी सर्व नगरांत आणि शहरांत प्रवेश करताना गाडीचालकाला मालावर जकात द्यावी लागे. त्यावेळी ‘इतक्या लाखांची जकात चुकवलेला मालट्रक पकडला.’ अशा तऱ्हेच्या बातम्या वर्तमानपत्रांत वाचायला मिळत. जकात चुकवण्याची व्यापाऱ्यांची प्रवृत्ती त्यातून दिसून येई. पण गंमत म्हणजे ही प्रवृत्ती आजकालचीच नाही तर फार पुरातन आहे. कारण जकातीची परंपराही तितकीच जुनी आहे.
जकात चुकवण्यासाठी आताचे व्यापारी जशा अनेक युक्त्या योजतात तसेच पूर्वीचे व्यापारीही करत. पूर्वी व्यापारी त्यांचा माल बैलगाड्यातून वाहून नेत. ते जकातनाका टाळण्यासाठी सहसा रात्री प्रवास करत, ते देखील आडमार्गाने. पण अनेकदा गंमत होत असे. त्यांचा आडमार्गाचा रस्ता चुकायचा. त्यांची गाडी रात्रभर अंधारात भरपूर हिंडल्यावर पहाटेच्या प्रकाशात हमरस्त्याला लागायची आणि नेमका जकातनाकाच समोर दृष्टीस पडायचा. हाच तो घट्टकुटी प्रभात न्याय. मूळ उद्देश फसणे, असफल होणे हा त्या न्यायाचा अर्थ.
आताच्या महामार्गांवरील टोलनाके म्हणजे एक प्रकारचे जकातनाकेच. तेथील टोलदेखील जबरदस्त असतात. पेट्रोलपेक्षा टोलचेच पैसे जास्त अशी परिस्थिती. त्यामुळे हे टोलनाके टाळण्यासाठी अनेक वाहन चालक आडमार्गाने वाहने नेतात आणि नेमके टोलनाक्याच्या अलिकडेच महामार्गाला लागतात. अशा वेळी हा घट्टकुटी प्रभात न्याय आठवतो आणि त्यातील गंमतही कळते.
– डॉ.उमेश करंबेळकर
Please inform the book where
Please inform the book where different NYAY are available.
shuhadab4@gmail.com