कुमार गंधर्वांचे तबलजी वसंतराव आचरेकर यांच्या नावाने कणवकवलीत ‘वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान’ची स्थापना करण्यात आली. प्रतिष्ठानचे 2012 हे पस्तीसावे वर्ष आहे. प्रतिष्ठानकडून दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात ‘बॅं. नाथ पै एकांकिका स्पर्धा’ आयोजित केल्या जातात. तसेच सोळा वर्षांपासून कणकवलीत प्रतिष्ठानकडून ‘प्रायोगिक नाट्य महोत्सव’ आयोजित केला जातो. पूर्वी ललित कला केंद्र – पुणे, फोर्ड फाउंडेशन, थिएटर अकादमी, अशा संस्थांकडून नाट्यमहोतसवाला मदत करण्यात येत असे. ही मदत बंद झाल्यावर 2012 पासून महोत्सव संस्थेकडून स्वबळावर भरवण्यात येतो. या महोत्सवाने कणकवलीकरांना नाटकाकडे बघण्याची दृष्टी दिली आहे. याशिवाय संगीत महोत्सव, शास्त्रीय-उपशास्त्रीय गाण्यांच्या स्पर्धा, बुजुर्गांच्या कार्यशाळा असे सातत्यशील उपक्रम संस्था निष्ठेने राबवत आहे. या सगळ्यातून गावात आणि जिल्ह्यातही आचरेकर प्रतिष्ठानचा प्रयत्न सौहार्दपूर्ण आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्याचा आहे.