तन्वीर हा डॉ. श्रीराम व दीपा लागू यांचा मुलगा. एका अपघातात काही वर्षांपूर्वी त्याचं निधन झालं. तन्वीरच्या जाण्याचं दुःख बाजूला ठेऊन त्याचा वाढदिवस साजरा करावा, अशी कल्पना पुढे आली आणि ‘तन्वीर सन्मान सोहळ्या’ला सुरूवात झाली. दरवर्षी 9 डिसेंबरला, तन्वीरच्या वाढदिवशी डॉ. श्रीराम व दीपा लागू यांनी स्थापन केलेल्या ‘रूपवेध प्रतिष्ठान’तर्फे हा सोहळा पुण्यात साजरा केला जातो.
भारतीय रंगभूमीसाठी महत्त्वाची कामगिरी केलेल्या ज्येष्ठ रंगकर्मींना हा पुरस्कार दिला जातो. विस्मृतीत गेलेले दिग्गज पुन्हा लोकांसमोर यावेत, त्यांचे विचार रसिकांपर्यंत, आजच्या तरूणांपर्यंत पोचावेत, त्यांनी रंगभूमीसाठी खाल्लेल्या खस्ता, त्यांचे रंगभूमीबद्दलचे प्रेम यांचा येथोचित गौरवव्हावा, हा पुरस्कारामागचा हेतू. गेल्या काही वर्षांत रंगभूमीवर आपल्या कामाने ठसा उमटवणा-या तरूण रंगकर्मींना ‘नाट्यधर्मी’ पुरस्काराने गौरवले जाते. रंगकर्मींना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी प्रोत्साहन मिळावे, देशभर फिरून काही नवीन शिकता यावे, यासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. एक लाख रूपये, मानचिन्ह हे तन्वीर सन्मानाचे स्वरूप आहे. नाट्यधर्मी पुरस्कार विजेत्यांचा पन्नास हजार रूपये व मानचिन्ह देऊन गौरव केला जातो.