गौराईचे फूल

0
128
-gauraicheful

ठाणे जिल्ह्यात खास करून मुरबाड-शहापूर तालुक्यात गौरीच्या रूपात फुले पुजली जातात. त्या फुलांच्या जोडीला अनेक प्रकारचे जंगलातील वेल; तसेच, शेंदोलीची फुले असतात. पण अग्रस्थानी असतात ती गौराईची फुले. ती फुले गणपती आगमनाच्या दोन-तीन दिवसआधी घरी आणून ठेवली जातात. त्यांची पूजा तीन दिवस घरात केली जाते. विशेष म्हणजे ती फुले कोमेजून जात नाहीत. चूल वेगळी झाली की गौराई घरात पाहुणी म्हणून येते. घरातील कोणी तरी एखादा पुरुष नवीन कपडे चढवून, डोक्यात टोपी घालून मुलारी (माहेरवाशिणीला आणायला जाणारा)जातो. गौराईला घरी घेऊन येतो. तिला कुंकू व हळद पाण्यात कालवून पावलांचे ठसे घरभर उमटवून घरात सर्वत्र फिरवले जाते. भिंतींवरही हातांचे ठसे उमटवले जातात. घरच्या भगिनी जागरण, पारंपरिक खेळ खेळून गौराईला जागवत असतात. घरातील वातावरण आनंदाचे असते.

गौराईची फुले म्हणजे ‘अग्निशिखा’. ग्रामीण भाषेत त्यांना ‘कलही’ म्हणतात. हिंदीमध्ये कलिहीरा तर इंग्लिशमध्ये Gloriosa Superba हे शास्त्रीय नाव आहे. ती लालपिवळसर रंगाची फुले दिसण्यास खूपच आकर्षक असतात.

-agnishikhaमी त्या फुलाला गौराईच्या रूपात लहानपणापासून बघत आलो आहे. म्हणून माझी त्या फुलांशी आत्मीयता जोडली गेली आहे. ती वेलावरून तोडल्यानंतरही आठ ते दहा दिवस कोमेजून जात नाहीत वा त्यांच्या सौंदर्यात तसूभर कमतरताही दिसत नाही. त्यांचा मनमोहक रंग मनाला आनंद देणारा असतो. निसर्गातील ते फूल गौराईच्या रूपात पूजनीय, वंदनीय असे आहे. त्यांच्या सभोवताली गृहिणी नाचतात व गातात. त्यांचे गुणगान करून त्यांच्याकडे सुखसमृद्धीची मागणी करतात.

भारतीय संस्कृती निसर्गावर प्रेम करण्यास शिकवते; त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यास शिकवते. गणेशोत्सवाचा आनंद तर असतोच, गणेशाची माता गौराई तो आनंद द्विगुणित करत असते.

– प्रभाकर पवार 8850256866, 9702276441
prabhakar.807@rediffmail.com

About Post Author