गोटूल ही आदिवासी समाजसंस्कृतीतील बहुआयामी व्यवस्था आहे. तेथे गावाच्या विकासाचे, जत्रा-उत्सवांच्या विधींचे निर्णय घेतले जातात. तेथे गावाचे प्रश्न मांडले जातात. ते सोडवण्याचे मार्ग शोधले जातात. त्या अर्थाने गोटूल ही ग्रामसभा आहे, सामाजिक-सांस्कृतिक केंद्र आहे, शिक्षण-प्रशिक्षणाचे साधन आहे, ते सामूहिक संवादाचे माध्यम आहे, गावातील प्रश्न सोडवण्याचे कोर्टही आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्वांच्या सहभागातून गावाच्या सामूहिक निर्णयप्रक्रियेचे ते स्थान आहे; लोकशाहीचे पारंपरिक केंद्र आहे.
महाराष्ट्राच्या उत्तरेला गडचिरोली भागातील गोंड, माडिया आदिवासींची संस्कृती म्हणजे ‘गोटूल’ आणि गोटूल म्हणजे मुक्त लैंगिक संबंध एवढाच अर्थ पसरवला जातो. उलट, आदिवासींसाठी ‘गोटूल’ हे नाचगाण्यापलीकडे सामुदायिक जीवनपद्धतीचा, सामूहिक निर्णयप्रक्रियेचा एक प्रगत नमुना आहे.
गोटूल महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोंड, माडिया, मुरिया या आदिवासी गावांमध्ये आहेत. त्याशिवाय ती मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यात त्याच समाजात आढळतात. गोटूल गावाच्या मध्यभागी असते. पण गोटूल म्हणजे फक्त गावचे सभागृह नाही, तेथे गावातील लोक जमतात, चर्चा करतात, निर्णय घेतात, न्यायनिवाडे करतात, उत्सव साजरे करतात.
‘गोटूल’ हा शब्द माडिया भाषेतील ‘गोटिंग’ या शब्दावरून तयार झाला. गोटिंग म्हणजे चर्चा करणे. पण गोटूलमध्ये होणाऱ्या चर्चेत महत्त्वाचे गुणात्मक वेगळेपण आहे. गोटूलमधील चर्चेतून निर्णय घेण्यात येतात. ते सामूहिक असतात, ते सगळ्यांना मान्य असतात आणि ते सगळे जण पाळतात. गोटूलमध्ये झालेल्या निर्णयांना आदिवासींमध्ये अधिमान्यता असते. त्यातून लोकांचा सहभाग आणि खुलेपणा, पारदर्शीपणा दिसतो. जे गोटूलमध्ये ठरते ते गावातील सर्वांना माहीत असते आणि मान्य असते. तो निर्णय सर्वांवर बंधनकारक असतो. सण-उत्सव साजरे करण्याचे, प्रथापरंपरा पाळण्याचे, पेरण्या-लावण्या ठरवण्याचे निर्णय गोटूलमध्ये घेतले जातात. गायता म्हणजे गावचा प्रमुख; त्याच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतले जातात. त्याला त्या प्रक्रियेत पेरमा म्हणजे धार्मिक प्रमुख; त्यासाठी मार्गदर्शन करतो. गोटूलमध्ये एकत्र जमण्याचा हाकारा गावातील कोतला देतो. त्याला ‘जमावा’ म्हणतात. कधी कधी सगळे गावकरी रानात गेलेले असताना, काही निर्णय तातडीने घेण्याची वेळ येते. अशा वेळी कोतला गोटूलमधील ढोल बडवून ‘जमावा’ देतो. त्याला माडिया भाषेत ‘डोल पायतीतोर’ असे म्हणतात. ढोलाचा ताल उत्सवातील वेगळा असतो, जमावासाठी वेगळा असतो.
हे ही लेख वाचा –
कातकरी-मराठी शब्दकोशाधारे शालेय शिक्षण – गजानन जाधव यांचा उपक्रम
वारली विवाह संस्कार
बंड्या साने- पौर्णिमा उपाध्याय – मेळघाटातील लढवय्या दांपत्य
‘गोटूल’ वर्तुळाकार रचनेचे असते, उघड्या सभागृहासारखे असते. छत्तीसगडमधील नारायणपूर जिल्ह्यात दोन खोल्यांची ‘गोटूल’ आहेत. पुढील उघडी खोली बैठकांसाठी वापरली जाते, तर मागील बंद खोलीत गावकीची वाद्ये, भांडी ठेवली जातात. गावात मुक्कामी असलेले पेरमा, सरकारी कर्मचारी, गावचे पाहुणे तेथे राहूही शकतात.
पंचायत राज व्यवस्थेमध्ये आणि ‘पेसा’सारख्या आदिवासींसाठीच्या विशेष कायद्यानंतर, गावपातळीवरील कारभाराला घटनात्मक मान्यता मिळाली आणि गोटूलचे स्थान अधिक बळकट झाले. पंचायत पातळीवर ‘गोटूल इलाखा समिती’ असते. भामरागड पारंपरिक ‘इलाखा’ गोटूल समितीत एकशेआठ गावे आहेत. त्यांची मीटिंग तालुक्यातील समाजाच्या जागेत भरवली जाते. इलाखा समित्यांसाठी चार दिशांचे चार कोतले आहेत. कोतले इलाखा समितीत घेतले गेलेले निर्णय गावांपर्यंत पोचवतात आणि ‘गोटूल’मध्ये गावाने घेतलेले निर्णय, त्यांचे प्रश्न इलाखा समित्यांपर्यंत आणतात. त्या अर्थाने ‘गोटूल’ हे इलाखा समित्या आणि गावे यांच्यातील संवादाचा दुवा आहेत. तेथे ‘गोटूल’ हे कम्युनिटी कम्युनिकेशन सेंटर म्हणून काम करते.
‘गोटूल’चे वैगुण्य म्हणजे त्यात स्त्रियांना स्थान नाही. मूळ आदिवासी संस्कृती ही मातृसत्ताक आहे. विवाहानंतर मुलीने सासरी नाही, तर मुलाने मुलीच्या घरी जाऊन राहण्याची परंपरा अनेक गावांमध्ये पाळली जाते. कमारमुत्ते, जंगो या माडियांच्या देवता स्त्रीरूपातील आहेत. ‘गोटूल’च्या निर्णयप्रक्रियेचे प्रमुख असलेले पेरमा, गायता हे पुरुषच आहेत. ‘गोटूल’मधील बैठकांमध्ये गावातील पुरुषच येतात. आम्ही ते चित्र बदलण्याचा प्रयत्न करत आहोत. ते स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांच्या प्रतिनिधित्वामुळे शक्यही होत आहे.
सरकार आदिवासी गावांत समाज मंदिरांच्या बांधकामांसाठी प्रत्येकी साडेसहा लाख रुपयांचा निधी देते. अनेक ठिकाणी ‘गोटूल’ पाडून त्या जागेवर समाज मंदिरे बांधली जात आहेत. तेच काम करणारी ‘गोटूल’सारखी व्यवस्था अस्तित्वात असताना, सरकारने ‘गोटूल’बांधणीसाठी तो निधी देण्याची गरज आहे. गावप्रमुख या नात्याने ‘गोटूल’च्या माध्यमातून गायता कारभार करत असतो. सरकारने गायत्यांनाच पोलिस पाटील केले आहे. त्यांच्या नावात पोलिस आल्यावर ते नक्षलींचे लक्ष्य ठरतात. त्याऐवजी ‘गोटूल’च्या पारंपरिक रचनेतील ‘गायते’पदाच्या माध्यमातून सरकारने गावाच्या विकासासाठी त्यांचा सहभाग करवून घ्यावा.
‘गोटूल’व्यवस्था संपण्याच्या मार्गावर आहे. लाहेरी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ‘गोटूल’ बंद पडून, तेथे फक्त मातीचे खिंडार उरले आहे. रात्री गोटूलमध्ये आदिवासी जमत, ढोल वाजवत. तेही पोलिसांनी जमावबंदीचे आदेश निघाल्यानंतर बंद झाले आहे. ‘गोटूल’मधील विश्वास आणि मोकळेपणा, खुला संवाद, विचारविनिमय करण्याचे जुने वातावरण पूर्ववत कसे निर्माण व्हावे?
लालसू सोमा नोगोटी
शब्दांकन : दीप्ती राऊत, diptiraut@gmail.com
(मूळ स्रोत – ‘दिव्य मराठी’, उद्धृत, संपादित-संस्कारित)