गुडघे गावचा ग्रामोदय

0
20

कोकणचे प्रत्येक ठिकाण हे अंगाखांद्यावर निसर्गखुणा मिरवत राहते. भातशेतीची हिरवी मखमल, पुळण आणि सागरलाटांची श्रीमंती, नारळी-पोफळीच्या झावळ्यांतून मिळणाऱ्या शीतल सावल्या, चाफा-बकुळी-सुरंगी या कोकणफुलांचा दरवळ असा नितांतसुंदर अनुभव कोकणात मिळतो. दाभोळच्या खाडीजवळ डोंगरावर वसलेल्या ‘गुडघे’ गावाची कुळकथा इतिहासाशी जोडलेली आहे. दाभोळची खाडी जेथे समुद्राला मिळते त्या भागाला ‘नस्त’ म्हणतात. समुद्राची वाळू खाडीच्या तोंडावर जमा होत असते. जहाजे भरतीच्या वेळी समुद्रातून खाडीत प्रवेश करतात.

सतराव्या शतकातील गोष्ट आहे. जंजिऱ्याच्या सिद्दीचे चाचे गलबते घेऊन, भरतीच्या वेळी खाडीत शिरून किनाऱ्यावरील गावातून लुटालूट करत. खाडीकाठावरील गावांतील जनता त्रस्त भयभीत झाली होती. सैन्यबळ कमी होते. अंजनवेल किल्ल्यातील किल्लेदार अंतोजी शेणवी प्रतिकार करण्यास असमर्थ ठरले. चाच्यांना रोखणे कठीण झाले. कसे करणार संरक्षण चाच्यांपासून? अंतोजी शेणवी यांनी बाबाजी दांडेकर यांना किल्ल्यावर बोलावले. बाबाजींनी अंतोजींना एक योजना सांगितली. योजना अशी होती की- अमावस्येच्या रात्री उधाणाच्या भरतीच्या वेळी चाच्यांची गलबते खाडीत शिरल्यावर त्यांना खेड-चिपळूणकडे जाऊ द्यावे. ओहोटीच्या वेळी नस्तात पाणी कमी होते, त्यावेळी खाडीतील पाण्यात दाभोळकडून अंजनवेलकडे साखळदंड बांधावे. दोन्ही किनाऱ्यांवर स्वराज्याचे आरमार सज्ज ठेवावे. जहाजे समुद्राकडे जाऊ लागली, की त्यांची सुकाणू साखळदंडात अडकतील आणि जहाजे उभी राहतील, रोखली जातील. त्याचवेळी दोन्ही तीरांवरील मशाली पेटतील आणि स्वराज्याचे आरमार चाच्यांच्या गलबताबर तुटून पडेल. अट होती, एकही चाचा जिवंत सुटणार नाही. सर्वांचे शिरकाण केले जाईल. गलबतलुटीचा माल स्वराज्यात जमा होईल. ती दहशत चाच्यांना पुरेशी होईल आणि खाडीतील चाचेगिरी बंद होऊन जाईल. बाबाजी दांडेकर यांची ही योजना अंतोजी शेणवी यांना पसंत पडली, त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचे ठरले.

अमावस्येची रात्र होती. चाच्यांची जहाजे लुटमार करण्यासाठी खाडीत शिरून मार्गस्थ झाली. दुपार कलू लागल्यावर भरतीचे पाणी भराभर ओसरू लागले. दोन्ही किनाऱ्यांवर ठरल्याप्रमाणे आरमार उभे ठाकले. अटीतटीचा प्रसंग होता. ठरल्याप्रमाणे तांडेल यांनी आज्ञा केल्यावर दोन्ही तीरांवर पाण्याखाली साखळदंड पक्के बांधले गेले. सैनिक अंधारात नावांवर पूर्ण जोशात तयारीत राहिले. मध्यरात्रीच्या आधीच चाच्यांची जहाजे नस्तात आली आणि आक्रित घडले. गलबतांची सुकाणू साखळदंडात अडकली, जहाजे उभी राहिली, काय होते हे कळण्याच्या आत दोन्ही किनाऱ्यांवर मशाली पेटल्या. सैनिक छोट्‌या छोट्या नावांतून त्वरेने गलबतांपाशी पोचले आणि तलवारी-भाले घेतलेले सैनिक गलबतावर चाच्यांना भिडले. त्यांनी सर्व चाच्यांचे पराक्रमाने शिरकाण केले. हरहर महादेव गर्जनांनी अवघा आसमंत दुमदुमून गेला. अंजनवेल किल्ल्यावर विजयाच्या तोफा धडाडल्या. चाच्यांची गलबते साखळ्यांतून सोडवून किनाऱ्यावर आणली गेली. लुटीचा माल किल्ल्यावर पोचला. एकही चाचा जिवंत राहिला नव्हता. किल्लेदार अंतोजी शेणवी यांनी बाबाजी दाडेकर यांना अत्यानंदाने मिठी मारली. त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रूच्या धारा निघाल्या. दोघेही आनंदाने चिंब झाले. तो सिद्दीच्या चाच्यांवर खूप मोठा विजय होता. खाडीकाठावरील जनता लुटारूंच्या जाचातून मुक्त झाली होती !

दांडेकर हे घराणे मूळ रत्नागिरीजवळील दांडेआडोमचे. त्यांचे मूळ आडनाव पोंक्षे होते. विश्वनाथ सखाराम दांडेकर हे तेथून दाभोळला आले. विश्वनाथ दांडेकर यांचा पुत्र बाबाजी दांडेकर. तो काळ होता 1650 चा (शके 1728) बाबाजी यांच्यासमवेत त्यांचा मुलगा बाळाजी ऊर्फ बल्लाळ हा होता.

अंजनवेलचे किल्लेदार अंतोजी शेणवी यांच्याकडून सर्व हकिगत शिवाजी महाराजांपर्यंत पोचली. बाबाजींना त्या पराक्रमाचे व बुद्धिचातुर्याचे बक्षीस देण्यात यावे असे त्यांनी अंतोजींना सांगितले. अंतोजींनी बाबाजी दांडेकर यांस ‘गुडघे’ हा गाव खोतीहक्काने इनाम म्हणून दिला. तो गाव जंगली आणि पठारावर ओसाड असा होता. बल्लाळ याने त्याच्या दोन चुलत भावांना घेऊन त्या ओसाड आणि जंगली गावात वसाहत केली. परंतु सहभागीदार म्हणून भांडणे होऊ लागली. बाळाजीचा मुलगा रघुनाथ ऊर्फ राघो बल्लाळ यांनी पेशवे दरबारी तक्रार केली. निकाल रघुनाथ बल्लाळ यांच्या बाजूने होऊन रघुनाथ बल्लाळ हेच त्या टापूचे खरे मालक ठरले. गावाची सनद आणि ताबा रघुनाथ बल्लाळ यांना मिळाला. त्याच रघुनाथ बल्लाळ ह्यांचे वंशज म्हणजे आमचे आजोबा कीर्तनवाचस्पती रामचंद्रबुवा दांडेकर. ती गुडघ्यातील दांडेकरांची सातवी पिढी. ती सनद पेशवाईत गावाला मिळालेली आहे.

दाभोळ खाडी किनाऱ्याने चालत चालत ओणी गावाला आले, की एक नदी ओलांडून उभा डोंगर चढायचा की लागते ते गुडघे गाव- अगदी छोटे गाव, दुर्गम. त्या गावाला यायचे म्हणजे पूर्वी गुडघे टेकण्याची वेळ येई. विसाव्या शतकातही गाव भौतिक सुखसोयींच्या दृष्टीने मागासच होता. निसर्ग मात्र नितांत रमणीय, दांडेकर कुटुंबीयांच्या कष्टाने गावाचे रूप पालटत गेले. तेथे नारळीपोफळीच्या हिरव्यागच्च दाट बागा, आंबाकाजूच्या डौलदार बागा, गोड पाण्याचे पाट, सगळे कसे स्वच्छ, निखळ आणि निर्मळ… एकूणच निसर्गाची अथांगता आणि गूढता ! ती कोकणी माणसातही आहे. म्हणूनच तेथील माणूसही विलक्षण आहे.

गुडघे गावात सतराव्या शतकात विलक्षण प्रयोग होत होता. त्या काळात त्या गावात पाटाच्या पाण्यावर ऊसाची शेती केली जाई. या गावातील ‘बिवलीचा चोंढा’ हा भातखाचराचा भाग- ऊस गाळून रसाचा गूळ तयार करण्याची जागा म्हणून दाखवला जाई. गूळ तयार झाल्यावर खाडी पट्ट्यातील खेड-चिपळूणच्या बाजारपेठेत विकला जाई. शेतकऱ्याच्या प्रयोगक्षम वृत्तीची साक्षच ती ! जेथे गूळ तयार होतो ते गुडग्राम, त्याचा अपभ्रंश होऊन गुडघे हे नाव पडले असावे. भूगोलाच्या नकाशावर किंवा इतिहासाच्या पानांवर या गावची नोंद काळाने केली नाही. दांडेकर कुलभूषण दुर्गमहर्षी गोपाल नीलकंठ दांडेकर (गोनीदां) यांनी ‘पडघवली’ या नावाने मराठी माणसाला तो गाव परिचित करून दिला. त्यांच्या ‘पडघवली’, ‘मृण्मयी’, ‘शितू’, ‘काका माणसात येतो’, ‘तांबडफुटी’ या साहित्यकृती त्याच गावातील होत.

त्याच लहानशा गावाने एक महान व्यक्तिमत्त्व देशाला दिले. ते व्यक्तिमत्त्व म्हणजे हरिभक्तपरायण, राष्ट्रीय कीर्तनकार रामचंद्रबुवा दांडेकर. ते माझे आजोबा. रामचंद्रबुवा दांडेकर म्हणजे धगधगते राष्ट्रतेज. क्रांतिकारी, व्यासंगी, अभ्यासू, तत्त्वचिंतक, चिकित्सक, तत्त्वासाठी झगडणारा, समाजमनस्क अशी कितीतरी विशेषणे त्या व्यक्तिमत्त्वास लावता येतील.

अप्पा (कृष्णाजी रामचंद्र दांडेकर) आणि माझे वडील आबा (गंगाधर दांडेकर) या दोघा भावांनी शेतीत अनंत प्रयोग केले. देशी गुलाबाचे मळे फुलवून शंभर वर्षांपासून घरी आयुर्वेदीय पद्धतीने गुलकंद तयार केला. ऊस, गहू, भात, नाचणी, रताळी, आले असा अनेक प्रकारचा भाजीपाला पिकवला. अमाप पिके येत होती. माझ्या वडिलांनी छोट्या खाचरात वापरता येईल असा लोखंडी ‘कोकण नांगर’ तयार केला होता. त्याचे पेटंट घेतले होते. माझे भाऊ विकास बी एस्सी (अॅग्री) होऊन गावातच राहतात. त्यांचा मुलगा चैतन्यही बी एस्सी शिकून गावातच पाय रोवून उभा आहे. त्या परिसरातील व गावातील मुले गणित व इंग्रजी विषयांत मागे पडत होती. एकदा नापास हा शिक्का लागला की शिक्षण थांबत असे. त्यावर उपाय म्हणून विकास आणि चैतन्य या बापलेकांनी त्या मुलांसाठी रोज दोन तास मोफत अभ्यासवर्ग सुरू केला. त्या विषयांचा निकाल शून्य टक्क्यांपासून शंभर टक्क्यांवर पोचला आणि नंतर कायमही राहिला आहे.

रत्नागिरीने देशाला अनेक नररत्ने दिली आहेत. त्यातही दापोली तालुक्याचा सहभाग खूप मोठा आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न धोंडो केशव कर्वे, भारतरत्न डॉ. पां. वा. काणे, लोकमान्य टिळक, सानेगुरुजी, रँग्लर परांजपे, र. धों. कर्वे, रावसाहेब मंडलिक, माझे काका कॅप्टन नारायण रामचंद्र दांडेकर, गो. नी. दांडेकर, श्री. ना. पेंडसे, कवी केशवसुत, आजच्या काळातले एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सुहास वायंगणकर, माझी मुलगी मेजर मैत्रेयी दांडेकर अशी आणखी किमान पन्नास एक नावे घेता येतील.

आजी शंभर वर्षांची होऊन गेली. गुडघ्याजवळच लोकमान्य टिळक आमच्या घरी दोन वेळा आले होते. शंभर वर्षापूर्वीचे गुडघ्याचे आमचे घर आजही सुस्थितीत आहे. ते ज्या झोपाळ्यावर बसायचे, तो झोपाळा अजूनही आहे. आणखी एक गंमत, झोपाळ्या- जवळच्या दोन खुंट्या दाखवत आजी सांगत असे, “या खुंटीवर तुझ्या आजोबांची बाराबंदी आणि पगडी आणि या खुंटीवर लोकमान्यांचा अंगरखा आणि पगडी”, त्या खुंट्‌याही अजून आहेत आणि तेथेच कोनाड्‌यात टिळकांसाठी तांब्याचा पाण्याचा तांब्या भरून ठेवलेला असे. तिने तिच्या हातांनी रांधून लोकमान्यांना दोन वेळा जेवू घातले होते. टिळक यांनी देशभक्तीच्या प्रचारासाठी, प्रसारासाठी अनेक माध्यमांचा वेगळ्या भूमिकेतून विचार केला. विशेषतः कीर्तन परंपरेबद्दल टिळकांना विशेष आदर होता. भाऊंनी त्या त्यांच्या भूमिकेशी सुसंगत अशीच कीर्तन परंपरा आयुष्यभर जपली. रामचंद्रचे ‘रामचंद्रबुवा’ 1895 पासून झाले.

रामचंद्रबुवा गुडघे मुक्कामी आले, तेव्हा ब्रिटिशांचा ससेमिरा सुरू झाला. मुख्य केंद्र गुडघे हेच होते. घरची व्यवस्था लावावी, बाहेर पडावे, पुन्हा घरी यावे असा त्यांचा जीवनक्रम असे. त्यांचा पुण्यात 1904 मध्ये चार महिन्यांचा मुक्काम होता, तेव्हाच शिवराज्याभिषेक उत्सवात कीर्तन झाले. त्याच काळात त्यांचा लोकमान्यांशी परिचय झाला. दोघांची भेट होई. अनेक विषयांवर चर्चा होत. 1905 मध्ये वंग भंग आंदोलनात ज्या चतुःसूत्रीचा स्वीकार करण्यात आला, त्यापैकी ‘स्वदेशी’चा जोरदार पुरस्कार आजोबांनी केला. त्यांनी खादीचा प्रचार-प्रसार कीर्तनाच्या माध्यमातून केला. त्यामुळे लोकमान्यांनी त्यांचा उल्लेख ‘राष्ट्रीय कीर्तनकार’ असा केला. रामचंद्रबुवांची कीर्तने पुण्यातल्या पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवात आणि किल्ले रायगडावरच्या पहिल्या शिवजयंती उत्सवातही झाली होती. रामचंद्रबुवांच्या नागपूरच्या पहिल्या कीर्तन संमेलनात झालेल्या कीर्तनाबद्दल टिळक यांनी केसरीत लिहिले, “असे दहा कीर्तनकार मिळाले तर देशाला दहा वर्षांत स्वातंत्र्य मिळेल!”

बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्यासमोरही बुवांचे ‘राष्ट्रविचारांचे’ कीर्तन झाले होते. त्या कीर्तनालाही टिळक आणि शेगावचे गजानन महाराज प्रत्यक्ष उपस्थित होते. सयाजीराव महाराजांनी ‘कीर्तन विद्यालंकार’ पदवी देऊन बुवांचा गौरव केला. त्यांना पालखीचा मान दिला. त्यावेळी बुवांनी त्या पालखीत ग्रंथ ठेवले आणि स्वतः पायी चालत राहिले. रामचंद्रबुवांनी कोकणात खेडोपाडी फिरून जनजागरणाचे व्रत स्वीकारले होते. एकदा त्यांचे अलिबागमध्ये कीर्तन होते. ब्रिटिश सरकारने ऐनवेळी कीर्तनावर बंदी घातली. बुवांनी त्या धाकाला न जुमानता एक युक्ती लढवली. गावकऱ्यांना म्हणाले, “कीर्तन तर होणारच, सरकारचा कायदा जमिनीवर ना… चला, मग नौका काढा.” त्यासरशी गावक-यांनी भराभर होड्‌या काढल्या, बुवांसह श्रोते होड्‌यांमध्ये बसून समुद्रात गेले आणि बुवांनी समुद्रातच कीर्तन केले !

गावात पहिल्या आलेल्या दांडेकर कुटुंबाबरोबर खोतांकडे कूळ म्हणून आलेली कुटुंबे कालांतराने कुळवाड्‌यात परिवर्तित झाली. ती कुळे ज्या गावामध्ये आली, त्या गावातच जमिनी खरेदी करून कुळांचे मालक बनली. हे सामाजिक परिवर्तन खूप मोलाचे आहे.

सतरावे शतक ते एकविसावे शतक यांतील या गावाची स्थित्यंतरे विलक्षण आहेत. गुडघे हे गाव एकविसाव्या शतकात गुलकंद तयार करून विकतो आहे. दांडेकरांच्या नवीन पिढ्या शिक्षण घेऊन पुन्हा गावाकडे परतून गावात स्थायिक होत आहेत. गावात विकासाचे पाट पुन्हा वाहू लागले आहेत. नारळी-पोफळीच्या बागा, हापूस-आंबा कलमांच्या बागा, काजूच्या बागा यांनी गुडघे गावाचा डोंगर फुलून आला आहे. फणस, कोकम, करवंद, जांभूळ, आवळा यांच्या रसरशीत फळांनी कोकण मेवा समृद्ध होत आहे. गावात सध्या ड्रॅगन फ्रूटची शेती प्रसिद्ध आहे. चैतन्यने वाशिष्ठी ब्रँडचा गुलकंद तयार केला आहे.

आमच्या गावाजवळील उंबरघर हे गाव शंभर टक्के मुस्लिम लोकसंख्येचे आहे. त्या गावात पूर्वी आमच्या घरातील दूध-दही विकण्यास जात असे. आमच्या लग्नात अठरापगड जातीतील लोक पंगतीत 1982 साली जेवले. हे सामाजिक परिवर्तन आहे. 

शेती विकसित होत आहे. शेतीपूरक उद्योग सुरू झाले आहेत. भौतिक साधन सुविधा झाल्या आहेत. पक्क्या सडका, एस टी बस वाहतुकीची इतर साधने गावात आली आहेत. रस्ते घरांपर्यंत पोचले आहेत. गावात पोचण्यासाठी दापोली-उंबरघर-गुडघे-पंदेरी एसटी येते. गुडघे हे गाव दापोलीपासून पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे. मोबाईल टॉवर आहे. दूरदर्शन संच घरोघर आहेत. प्राथमिक-माध्यमिक शिक्षणाची सोय गावात, परिसरात आहे. किराणा दुकान, पिठाची गिरणी, दूध, भाजीपाला अशा सर्व सुविधा गावात आहेत. मंदिरांचे जीर्णोद्धार झाले आहेत. पूजाअर्चा, सण, उत्सव आनंदाने, एकोप्याने साजरे होत आहेत. येथून बाहेर पडून शिकून मोठी झालेली माणसेही दरवर्षी आवर्जून गावात येतात. गावच्या सुखदुःखाशी समरस होतात. जातीपाती, भेदभाव, हेवेदावे विसरून सातमाई (सप्त मातृका) या ग्रामदेवतेच्या आशीर्वादाने गावातील सर्व समाज एकोप्याने नांदत आहे. गुडघ्याचा आता ग्रामोदय झाला आहे.  

-डॉ. राजा दांडेकर 7499825998 / 9422431275 rajadandekar@yahoo.com

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here