ही गोष्ट आहे एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीची! दुस-या बाजीराव पेशव्यांच्या काळातली. मराठी राज्य पानिपतच्या दारुण पराभवातून सावरू पाहात होते, भारतभर पसरत चाललेल्या इंग्रजांच्या साम्राज्याला तोंड देण्याचा निकराचा प्रयत्न करत होते. राजकीय व सामाजिक अस्थिरता, अंतर्गत कलह, फाटाफुटीचे राजकारण यांमध्ये मराठी दरबारापुढे एक आव्हान येऊन ठेपले, ते हैदराबादच्या निजामाकडून! विविध राज्यांमधून विजय मिळवत आलेल्या अली व गुलाब या, दोन कसलेल्या, भीमकाय व बलदंड पैलवानांनी दुस-या बाजीराव पेशव्यांच्या भरदरबारात कुस्तीचे आव्हान दिले. पैलवानांचा आत्मविश्वास, त्यांची रग व तयारी बघून दरबारात पेशव्यांच्या पदरी असलेल्या बावन्न पैलवानांपैकी एकाचीही आव्हान स्वीकारण्याची हिंमत झाली नाही. पेशव्यांची इभ्रत पणाला लागल्याचे पाहून, पेशव्यांकडे भिक्षुकी करणा-या सतरा-अठरा वर्षांच्या बाळंभटदादा देवधर यांनी ते आव्हान स्वीकारले व तयारीसाठी काही मुदत मागून घेतली. त्यांनी त्यांच्या नाशिकजवळच्या कोठुरे गावी जाऊन मातेचे आशीर्वाद घेतले आणि नाशिक जिल्ह्यात असलेल्या, वणीच्या डोंगरावर वसलेल्या सप्तशृंगी देवीची आराधना सुरू केली. असे म्हणतात, की त्यांच्या कठोर अनुष्ठानाने देवी प्रसन्न झाली आणि तिने बाळंभटदादांना आशीर्वाद दिला, की प्रत्यक्ष मारुतीराय त्यांना कुस्तीचे डाव शिकवतील! त्याप्रमाणे बजरंगबलीने दृष्टांत देऊन एका लाकडी लाटेवर (खांबावर) कुस्तीचे डाव दाखवले. बाळंभटदादा ठरलेल्या मुदतीत पुण्याला परतले आणि स्वत:पेक्षा वयाने, अनुभवाने, वजनाने मातब्बर असलेल्या अलीला गळखोड्याच्या डावांनी चीतपट केले. गुलाब बाळंभटदादांची तयारी पाहून अक्षरश: पळून गेला. दादांनी ज्या लाकडी खांबावर कसून सराव केला, त्या खांबाला त्यांनी ‘मल्लखांब’ असे नाव दिले. मल्लांनी साथीदाराच्या अनुपस्थितीत ज्याच्यावर सराव करायचा तो मल्लखांब. अशा त-हेने कुस्तीला पूरक व्यायामप्रकार म्हणून मल्लखांबाची सुरुवात झाली.
मराठा संस्थान १८१८ मध्ये खालसा झाले आणि इंग्रजांनी पेशव्यांची रवानगी उत्तरप्रदेशमधील कानपूरजवळील ब्रम्हावर्त येथे केली. पुण्याहून मजल-दरमजल करत कानपूरला जाताना पेशव्यांबरोबर बाळंभटदादाही होते. पेशव्यांनी त्या प्रवासात जिथे जिथे मुक्काम केला तिथे तिथे त्यांनी कुस्तीचे आखाडे सुरू केले आणि त्या आखाड्यांमध्ये मल्लखांबही लावले. बाळंभटदादांनी पहिला ‘आखाडा’ वाराण्सी येथे सुरू केला. कोंडभटनाना गोडबोले यांना मल्ल्खांबाचे प्रशिक्षण दिले. कोंडभटनानांनी बाळंभटदादांना मल्लखांबाचा प्रसार करण्याच्या दृष्टीने साह्य केले. त्या आखाड्यात बाळंभटदादांनी ज्या शिष्यांना सर्वप्रथम प्रशिक्षण दिले त्यात वाराणसीच्या टकेजमाल यांचा समावेश होता. ते पुढे वडोद-याला स्थायिक झाले. मल्लखांबाची प्रात्यक्षिके देताना ते बाळंभटदादांसोबत असत.
पुढे टकेजमाल यांनी वाराणसीच्या जुम्मादादांना प्रशिक्षण दिले. राजरत्न प्रा. माणिकराव हे जुम्मादादा यांचे शिष्य. वडोद-याचे दामोदरगुरू मोघे यांनी कोंडभटनानांकडून मल्लखांबाचे प्रशिक्षण घेतले. त्यांनी पुढे जाऊन वेताचा मल्लखांब विकसित केला. बाळंभटदादांचे पुत्र आणि कोंडभटनानांचे शिष्य नारायणगुरू देवधर यांनी मल्लखांबाचा भारतात प्रसार करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले. सुरत, बडोदा, भोपाळ, उज्जैन, देवास, इंदूर, झांशी, ग्वाल्हेर येथे त्या काळी सुरू झालेले आखाडे आजही अस्तित्वात आहेत व तेथे मल्लखांब चालतो.
ग्वाल्हेरच्या अच्युतानंद व्यायामशाळेचे संचालक रामचंद्र हरनाथ पेंटर, वडोद-याचे हरी महादेव तथा तात्यासाहेब सहस्रबुध्दे, गजाननपंत टिळक, गोविंदराव तातवडेकर, धोंडो नारायण विद्वांस, लक्ष्मण नारायण सप्रे, वसंत बळवंत कप्तान, रंगनाथ वाटोरे, उज्जैनचे विष्णू मार्तंड डिंगरे, साता-याचे दामोदर बळवंत भिडे, पुण्याचे गणेश सखाराम वझे मास्तर, भाऊराव गाडगीळ, सरदार अनंत हरी खासगीवाले, ल. ब. भोपटकर या मंडळींनी मल्लखांबाच्या व मल्लविद्येच्या प्रचारार्थ प्रयत्न केले.
असेही म्हणतात, की रामायणकाळात महाबली हनुमानांनी मल्लखांबाचा शोध लावला. सोमेश्वर चालुक्याने बाराव्या शतकात सन ११३५ मध्ये लिहिलेल्या ‘मानसोल्लास’ या ग्रंथात मल्लखांबसदृश काही उड्या आढळतात. ओरिसामधील प्रसिध्द जगन्नाथपुरीच्या प्राचीन मंदिराशेजारी, पंधराव्या शतकात सुरू झालेल्या जगन्नाथ वल्लभ आखाड्यामध्ये स्थापनेपासून मल्लखांब प्रशिक्षण वंशपरंपरेने सुरू आहे असे म्हटले जाते. त्याच प्राचीन कौशल्याला बाळंभट्टदादांनी पुनर्जन्म दिला, त्याचे जतन-संवर्धन केले असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
मल्लखांब हा एक स्वयंपूर्ण, स्वतंत्र व्यायामप्रकार म्हणून केवळ महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राबाहेरच्या राज्यांमध्येही प्रचलित आहे.
सुमारे आठ फूट उंचीचा, सरळसोट, गुळगुळीत, वर निमुळता होत जाणारा मल्लखांब हा मूळ प्रकार. त्याला पुरलेला मल्लखांब म्हणतात. तो जमिनीच्या आत सुमारे दोन फूट गाडलेला असतो. त्याच्या जमिनीवरील भागाचा आकारही मनुष्यदेहाप्रमाणे वर गोल डोके, मग अरुंद मान व खाली भक्कम शरीर असा असतो.
शिसवीच्या लाकडाचा मल्लखांब सर्वांत उत्तम समजतात. तो थंड असतो. त्याचे तंतू जवळ असल्याने तो गुळगुळीत होऊ शकतो आणि त्यावरून शरीर घसरले तरी कातडे सोलवटत नाही. सागवानी लाकडाच्या मल्लखांबावर तो धोका संभवतो.
मल्लखांब पुरताना त्याच्या खळग्यात विटा, चुना, वाळू असे पदार्थ टाकतात. त्याच्या तळच्या अंगाला डांबराचा जाड लेप लावल्याने त्यास वाळवी लागत नाही. मल्लखांबाजवळची जमीन मऊ करतात, त्यामुळे कसरतपटू उडी मारून सहज उतरू शकतो.
मल्लखांबावरील कसरतीचे पंधरा वर्ग सांगितले आहेत; ते असे –
१) अढी – मल्लखांबाच्या कसरतींचा प्राथमिक प्रकार. मल्लखांबावर विविध प्रकारे पकड घेऊन व शरीर उलटे करून पोट मल्लखांबांच्या बाजूला येईल अशा पद्धतीने दोन्ही पायांनी मल्लखांबास विळखा घालण्याच्या क्रियेला ‘अढी घालणे’ असे म्हणतात. या अढ्यांतून पुन्हा जमिनीवर उतरण्याचे अढीनुसार भिन्नभिन्न प्रकार आहेत. अढ्यांचे एकंदर ९० च्या वर प्रकार आहेत. उदा., साधी अढी, खांदा अढी, कानपकड अढी इत्यादी. ह्याचा उपयोग कुस्तीत होतो. तसेच अश्वारोहणात पायाने घोड्यास पकडून ठेवताना होतो. या उड्यांनी मुख्यत्वे पायाचे स्नासयू बळकट होतात.
२) तेढी – मल्लखांब विविध प्रकारे पकडून शरीर उलटे करून मल्लखांबाकडे पाठ करून एका विशिष्ट पद्धतीने मल्लखांबास विळखा घालण्याच्या प्रक्रियेस ‘तेढी घालणे’ असे म्हणतात. तेढीनंतर अढी घालून नंतर मल्लखांबावरून खाली उतरतात. या उड्यांमुळे पोटातील स्नायू, दंड, बगल इ. ठिकाणच्या स्नायूंना व्यायाम होतो. उदा., साधी तेढी, बगलेची तेढी, एकहाती तेढी इत्यादी.
३) बगली – मल्लखांब बगलेत निरनिरळ्या तऱ्हांनी पकडून तेढी मारण्यास ‘बगली’ असे म्हणतात.
४) दसरंग – मल्लखांबावरून न उतरता अढी, तेढी, बगली यांसारखे प्रकार दोन्ही बाजूंनी उठून सतत करत राहणे याला ‘दसरंग’ असे म्हणतात. हा ‘दस्तरंग’ (दस्त म्हणजे कोपरापुढील हात) शब्दाचा अपभ्रंश आहे. ज्या अढीचा वा तेढीचा दसरंग त्याप्रमाणे त्याचे नाव असते. उदा. साधी दसरंग, एकहाती दसरंग इत्यादी.
५) फिरकी – मल्लखांबावर दसरंग करीत असताना हाताची व पायाची पकड कायम ठेवून वरचेवर शरीर फिरवून एका बाजूवरून दुसऱ्या बाजूवर जाण्याच्या क्रियेला ‘फिरकी’ असे म्हणतात. फिरक्यांचे अनेक प्रकार आहेत.
६) सुईदोरा – सुईमध्ये दोरा ज्याप्रमाणे ओवतात, त्याप्रमाणे हाताने मल्लखांब पकडून दोन हातातील जागेतून पाय पुढे घालून पलटी मारून पाय काढून घेणे याला ‘सुईदोरा फिरणे’ असे म्हणतात. ह्याचेदेखील अनेक प्रकार आहेत.
७) वेल – हाताच्या व पायाच्या विशिष्ट पकडीच्या सहाय्याने,त्या पकडी सतत बदलत हळूहळू वर चढत जाणे, या क्रियेला ‘वेल’ असे म्हणतात. झाडावर वेल जशी नागमोडी चढत जाते, त्याचप्रकारे खेळाडू मल्लखांबावर चढत जातो. उदा., साधीचा वेल, मुरडीचा वेल, नकीकसाचा वेल इत्यादी.
८) उतरती – ही वेलाच्या विरूद्ध पद्धतीची हालचाल आहे. वेलाप्रमाणेच पकडी बदलत या क्रियेत मल्लखांबपटू खाली घसरत घसरत येतो. उदा., साधी उतरती, बगलीची उतरती इत्यादी.
९) झाप – मल्लखांबाच्या बोंडावर उभे राहून अथवा बसून पतंगी, विविध फरारे अशा प्रकारांतून मल्लखांबापासून दूर फेकले जाऊन पुन्हा मल्लखांब अढीमध्ये पकडणे याला ‘झाप टाकणे’ असे म्हणतात.
१०) फरारे – मल्लखांबावर हातांनी विविध प्रकारे धरून व पाय दूर ताठ करून तोल सांभाळण्याच्या क्रियेला ‘फरारे’ असे म्हणतात. क्वचित मल्लखांब पायाने पकडून हात मोकळे सोडले जातात. उदा., आकडी, गुरुपकड, बजरंग−पकड इत्यादी.
११) आसने – निरनिराळ्या प्रकारची आसने मल्लखांबाच्या अंगापासून बोंडापर्यंत विविध प्रकारे करता येतात.
१२) आरोहण−उड्या – मल्लखांबापासून काही अंतरावरून पळत येऊन, अथवा मल्लखांबाच्या शेजारी उभे राहून, अथवा उडी मारून हाताने पकड घेता, अगर न घेता पायाने मल्लखांब अढीत अथवा तेढीत पकडणे यांना ‘आरोहण-उड्या’ असे म्हणतात. यात घोडा अढी, घोडा तेढी, सुळकी अढी, गुलाट अढी इत्यादींचा समावेश होतो. आधुनिक स्पर्धात्मक मल्लखांबात या उड्यांना फार महत्त्व आहे.
१३) अवरोहण – मल्लखांबावरून विविध प्रकार केल्यानंतर उतरण्याचे अनेक प्रकार आहेत. त्या क्रियेला ‘उड्या’ असे म्हणतात. यातच विविध कलाटींचा समावेश होतो. त्यामध्ये मुख्यत्वे अढीच्या स्थितीमधून कलाट, त्याचप्रमाणे विविध आसनांमधून उडी व कलाट असे प्रकार आहेत. ह्या प्रकारांमध्ये नावीन्य आणण्याच्या दृष्टीने मल्लखांबावरून पुढे अथवा मागे गुलाट मारणे यांसारखे नवीन प्रकार केले जातात.
१४) ताजवे – मल्लखांबाच्या बोंडावर पोट, पाठ अथवा शरीराचा अन्य भाग टेकवून, मल्लखांब हातापायाने न पकडता शरीर तोलण्याला ‘ताजवे’ (तराजू) असे म्हणतात. ह्याचे पोटाचा ताजवा व पाठीचा ताजवा हे प्रकार विशेष प्रचलित आहेत. ताजवे म्हणजे फरारे या प्रकारातीलच पोट-उड्या म्हणाव्या लागतील.
१५) सलामी – अढ्यांप्रमाणेच विविध प्रकारे मल्लखांबावर पकड घेऊन, शरीर उलटे करून अढी न मारता पुन्हा जमिनीवर उतरण्याच्या क्रियेला ‘सलामी मारणे’ असे म्हणतात. सलामीच्या पकडीनुसार त्यांना एकहाती, दुहाती, बगलीची अशी नावे आहेत.
मल्लखांबाचा दुसरा प्रकार म्हणजे दोरीचा मल्लखांब. तो पूर्वी वेतावर केला जात असे, पण वेत मिळणे दुष्कर झाल्यावर त्या जागी दोरी वापरली जाऊ लागली. वरून टांगलेल्या वीस फूट लांब व अंगठ्याएवढ्या जाड सुती दोरीवर नयनरम्य व चित्तथरारक कसरती केल्या जातात. तो प्रकार प्रामुख्याने मुली करतात.
तिसरा प्रकार टांगत्या मल्लखांबाचा. पुरलेल्या मल्लखांबाच्या अर्ध्या उंचीचा, तसाच दिसणारा लाकडी खांब वरून टांगलेला असतो. तो झुलता असल्याने स्वत:भोवती गोल फिरतो व लंबकाप्रमाणे आडवाही हलतो. त्यावर कसरत करणे आव्हानात्मक व जोखमीचे असते.
हे तिन्ही प्रकार स्पर्धात्मक मल्लखांबाचे आहेत. त्याव्यतिरिक्त काचेच्या बाटल्यांवर ठेवून केलेला बाटली मल्लखांब, शरीराभोवती शॉट लावून केलेला हत्यारी मल्लखांब, दोन्ही हातात जळत्या मशाली घेऊन केलेला पलिते मल्लखांब हे मल्लखांबाचे अन्य प्रात्यक्षिकात्मक प्रकार संभवतात.
मल्लखांबावर वेगवेगळ्या कसरती, अढ्या-तेढ्या, फिरक्या-गिरक्या, वेल-दसरंग, आसने, विळखे-फरारे, उड्या, झापा आदि प्रकार केले जातात. मल्लखांबाचे अशा हालचालींमुळे होणारे फायदे अमाप आहेत. तेल लावलेल्या खांबाभोवती संपूर्ण शरीराचे सतत घर्षण झाल्याने पूर्ण शरीराला उत्कृष्ट मालीश होते. उलट्या-सुलट्या वेगवान हालचालींमुळे श्वसनसंस्था, पचनसंस्था, रक्ताभिसरण संस्था आदि शरीरांतर्गत व्यवस्था कार्यक्षम होतात. हातापायांच्या आढ्या-तेढ्या, विळखे-फरारे, झापा यांमुळे हातापायांचे पंजे, पोट-या, मांड्या, दंड, खांदे आदींच्या अंतर्गत संस्था अधिक कार्यक्षम होतात. वेल, दसरंग, फिरक्या- गिरक्या, सर्पाकृती गतिमान हालचालींमुळे कंबरेचे व पोटाचे स्नायू, बरगड्या आणि आरोग्याची गुरुकिल्ली असलेला पाठीचा कणा यांना बळकटी येते. त्याशिवाय यकृत, प्लिहा आणि अंतरिंद्रियेही कार्यक्षम बनतात. मेद, सुटलेले पोट, वाढलेली चरबी कमी होते. केवळ शारीरिक नव्हे तर अनेक मानसिक कुवतींचाही विकास मल्लखांबामुळे होऊ शकतो.
आठ इंग्रजी ‘सी ’ कसोट्या – १. Concentration (एकाग्रता), २. Coordination (अनुसंधान), ३. Confidence (आत्मविश्वास), ४. Courage (धैर्य), ५. Control (नियंत्रण) ६. Cost effectiveness (मूल्य परिणामकारकता),७. Creativity (सृजनशीलता) व ८. Culture(संस्कृती) परिपूर्ण करणारा मल्लखांब हा एकमेव खेळ असावा आणि म्हणूनच मल्लखांबाला ‘पायाभूत खेळ’ किंवा ‘Mother Discipline’ मानले जाते.
मल्लखांब हा काटकसरीचा खेळ आहे. त्याच्यासाठी फार मोठी साधनसामुग्री लागत नाही. मोठे मैदान, वारंवार लागणारे चेंडू, रॅकेटस्, बूट यांचीही गरज नसते.
मल्लखांबाचे सर्व प्रकार डाव्या व उजव्या अशा दोन्ही बाजूंनी केले जात असल्यामुळे शरीराची जडणघडण दोन्ही बाजूंनी चांगली होते. शरीर प्रमाणबध्द व सौष्ठवपूर्ण दिसू लागते. मल्लखांब हा एकमेव क्रीडाप्रकार असा आहे, की तो उत्तम आरोग्यासाठी, प्रमाणबध्द शरीरासाठी, कुशाग्र मानसिक क्षमतेसाठी आणि स्पर्धात्मक क्रीडाकौशल्य वृध्दीसाठी उपयोगी आहे. परदेशी क्रीडातज्ज्ञांनीही ‘कमीत कमी वेळात शरीराच्या जास्तीत जास्त भागांना जास्तीत जास्त व्यायाम देणारा जगातील एकमेव क्रीडाप्रकार’ असे मल्लखांबाचे यथार्थ वर्णन केले आहे.
असा हा अल्पमोली, बहुगुणी आपल्या मातीतला अस्सल म-हाटमोळा व्यायामप्रकार.
खोखो, लंगडी, कुस्ती, कबड्डी, चेंडूचेही खेळ आहेत ।
देशी, परदेशी क्रीडाप्रकार – सगळ्यांत सुप्त गुण आहेत ।।
वेग, शक्ती, लवचीकता व कसावाचून चालत नाही ।
देवाशप्पथ खरं सांगतो, मल्लखांबाला पर्याय नाही ।।
नीता ताटके
‘ध्यास’दिवाळी अंक २०१० वरून साभार
मल्लखांबांच्या प्रकारांची माहिती ‘मराठी विश्वकोश’संकेतस्थळावरून साभार
Mallkhamb pratye school madhe
Mallkhamb pratye school madhe suru karun navi pidhi aarogyadayi karavi. Lahan mulanna video game & mobile phone mule vyayam nahi.
Utkrushta mahitipoorna lekh.
Utkrushta mahitipoorna lekh. Dhanyawad. Navin Pidhila marshal art aiwajee Mallakhamb shikwawa.
I like this game, mallakhamb
I like this game. mallakhamb is a one of the best physics game for me. It’s develop our physical fitness, I’m a player of this game.
I want to learn it
मला शिकायचे आहे.
हा व्यायाम प्रकार प्रत्येक…
हा व्यायाम प्रकार प्रत्येक शाळेतून शिकवला पाहीजे.
Comments are closed.