खगोलशास्त्रज्ञ डॉ. पुष्पा खरे

1
49
carasole1

पुष्पा खरे यांचा जन्म 16 जानेवारी 1950 या दिवशी झाला. पुष्पा खरे शालेय वयापासून अभ्यासू आणि बुद्धिमत्तेची चमक दर्शवणा-या विद्यार्थिनी होत्या. त्यांना शिक्षणासाठी नॅशनल मेरिट स्कॉलरशिप मिळाली. त्यांना एम.एस्सी. परीक्षेत सुवर्णपदक मिळाले. त्यांनी पीएच.डी. संशोधन करावे यासाठी आणि तीच करिअर पुढे निवडावी म्हणून स्पर्धा परीक्षा दिल्या. मुंबईच्या भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटर (बी.ए.आर.सी.), टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल (टी.आय.एफ.आर.) आणि कानपूर येथील आय.आय.टी. या, देशातील तिन्ही सर्वोत्कृष्ट म्हटल्या जाणाऱ्या संस्थांत त्यांना प्रवेश मिळाला. पुष्पा खरे कानपूरला गेल्या आणि काही दिवसांनी, मुंबईला राहण्याची नीट सोय झाल्यावर टी.आय. एफ.आर.मध्ये रुजू झाल्या.

त्या अवकाशविज्ञान विषयातील तज्ज्ञ मानल्या जातात, त्या विषयाकडे मात्र त्या अपघाताने वळल्या. तो विषय त्यावेळी गणितावर आधारित आणि फारसा लोकप्रिय नव्हता. त्यांना त्या विषयाची जाण ‘टी.आय.एफ.आर.’मध्ये आली. त्यांनी पीएच.डी. सात वर्षांच्या अवधीत चिकाटीने पूर्ण केली. त्या असे म्हणतात, की त्या कालावधीत शिक्षण घेताना, फिजिक्स हा विषय निवडताना, संशोधन करताना आणि त्यासाठी प्रयोग करणे-परिषदांना हजर राहणे आणि इतर संबंधित उपक्रमात कुठेही स्त्री म्हणून त्यांना त्रास सहन करावा लागला नाही वा त्यांची अडवणूक केली गेली नाही.

पुष्पा खरे यांचे, पीएच.डी. झाल्यावर डॉ. अविनाश खरे यांच्यासोबत लग्न झाले आणि त्या त्यांच्या समवेत भुवनेश्वरला गेल्या. डॉ. खरे तेथील ‘इन्स्टिट्युट ऑफ फिजिक्स’ या प्रसिद्ध सरकारी संशोधन संस्थेत High energy physics या विषयात संशोधक म्हणून काम करत होते. भुवनेश्व‘र येथून Distinguished professor म्हणून रिटायर झाल्या नंतर डॉ. खरे सध्या IISER, Pune येथे Raja Ramanna संस्थत फेलोशिप करत आहेत. खरे यांना भुवनेश्वरला त्यांच्या खगोलशास्त्रातील डॉक्टरेटला योग्य ठरेल असे काम उपलब्ध नव्हते. एकूणच, भारतात खगोलशास्त्रात काम करणाऱ्या संस्था कमी आणि पूर्ण ओरिसात तर एकही नाही अशी अवस्था होती. त्यांना हैदराबाद वा मुंबईला राहून काम करावे लागणार होते. लग्न झाल्यानंतर नोकरीसाठी पतीपासून दूर राहवे हा विचार सत्तरच्या दशकात तरी कोणाच्या पचनी पडला नसता. पुष्पा खरे यांचा तो काळ अस्वस्थतेत गेला.

भुवनेश्वरच्या उत्कल विद्यापीठातील फिजिक्स विभागाचे प्रमुख प्राध्यापक बिभूती भूषण देव यांना पुष्पा खरे यांची हुशारी आणि बुद्धिमत्ता ठाऊक होती. त्यांना खगोलशास्त्रात रसही होता. त्यांनी पुष्पा खरे यांना विभागात नेहमी येत जा असे निमंत्रण दिले. पुष्पा खरे यांनी नुसते जाऊन भेटण्यापेक्षा तेथे काहीतरी संबंध असावा आणि त्यातून काम करायला मिळावे या हेतूने पुन्हा संशोधनासाठी त्यांचे स्वत:चे नाव तेथे रजिस्टर केले. ते काही पावले मागे जाण्यासारखे होते. पण संशोधनाच्या आवडीपोटी आणि बुद्धीला काहीतरी खाद्य हवे, विषयाशी संपर्क हवा याची त्यांना नितांत गरज वाटली आणि तोच निर्णय त्यांना लाभदायी ठरला. जर्मनीतील ‘मॅक्स प्लांक इन्स्टिट्यूट’ येथे काम करत असलेल्या ज्युडिथ पेरी यांनी काही व्याख्याने देण्यासाठी उत्कल विद्यापीठाच्या फिजिक्स विभागाला भेट दिली. त्या अल्प काळात दोघींमध्ये विषयाबद्दल जी देवघेव, चर्चा झाली त्यातून पेरी यांनी म्युनिक येथील त्या संस्थेत पोस्ट डॉक्टरल फेलोशिपसाठी पुष्पा खरे यांना सुचवले. पुष्पा खरे यांनी अर्ज केला, त्यांची सर्व कागदपत्रे तयार झाली. तोवर काळ उलटला आणि त्यांच्या हातात होकाराचे पत्र पडले, तेव्हा त्यांचा मुलगा फक्त तीन महिन्यांचा होता. पुष्पा खरे यांचे सुदैव तेथेही त्यांना साथ देत होते. त्यांच्या सासुबाई त्यांच्यासोबत जाण्यास आनंदाने तयार झाल्या.

त्यांनी त्यांची फेलोशिप म्युनिक येथील ‘मॅक्स प्लांक संस्थे’त पूर्ण केली. त्या प्राध्यापक बिभूती भूषण देव, डॉ. पेरी आणि सासुबाई यांच्या मदतीने फिजिक्स याच विषयाशी संबंधित असे काम करू शकल्या असे त्या आवर्जून सांगतात.

म्युनिकहून परतल्यावर त्यांनी पूल ऑफिसर म्हणून उत्कल विद्यापीठात नोकरी पत्करली आणि नंतर तेथेच त्यांना व्याख्याता म्हणून नेमणूक मिळाली. उत्कल विद्यापीठात राहून खगोलशास्त्रात संशोधन करणे त्यांना सुरुवातीस खूप कठिण गेले कारण तेथे त्या वेळेस त्या विषयाची पुस्तके व journals अजिबात उपलब्ध नव्हते. पण तरीही पुष्पा खरे यांनी विद्यादानाचे काम करत त्यांच्या विषयातील संशोधन पुढे नेले.

ओरिसा राज्यात त्यावेळी आणि आजही त्या एकुलत्या खगोलशास्त्रज्ञ आहेत. मग त्या एक वर्ष पतीसमवेत शिकागो विद्यापीठात गेल्या. तेथेही त्यांना डॉन यॉर्क यांच्यासोबत काम करण्यास मिळाले. तेथून त्यांचा यॉर्क यांच्या बरोबर जे collaboration सुरु झाले ते वीस वर्षानंतरही कायम आहे.

खगोलशास्त्रात भारताचे जे योगदान आहे त्यात त्यांनी ‘क्वासार अॅब्सॉर्प्शन लाईन्स’, ‘ग्रॅव्हिटेशनल लेव्हरिंग’, ‘टू फेज मॉडेल ऑफ इंटरस्टेलर मिडियम’ आदी विषय हाताळले. त्या त्या विषयांतील महत्त्वाच्या तज्ज्ञ मानल्या जातात. त्यांना ‘कार्डिफ विद्यापीठा’ची संशोधन फेलोशिप मिळाली. त्यांनी ‘इलिनॉईस विद्यापीठ – शिकागो’, ‘साऊथ कॅरोलिना विद्यापीठ’ येथे मानद व्याख्यात्या म्हणून काम केले. तीन मेजर डी.एस.टी. प्रकल्प पूर्ण केले. त्यांनी शांघाय, क्युमिंग, शिकागो, कोलंबिया, मार्साय यांसह अनेक परदेशांतील आणि भारतीय विद्यापीठातील परिषदांतून चांगले पेपर वाचले. त्या ‘इंटरनॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी’, ‘अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया’, ‘इंडियन फिजिक्स असोसिएशन’, ‘ओरिसा फिजिकल सोसायटी’ आदी संस्थांच्या क्रियाशील सदस्य आहेत. त्या खगोलशास्त्राला वाहिलेल्या जर्नल्सच्या संपादनाशी संबंधित आहेत. त्या संशोधनाला पूरक अशा सर्व उपक्रमात उत्साहाने भाग घेतात.

१९८८ मध्ये पुण्याला डॉ. जयंत नारळीकरांच्या पाठपुराव्यामुळे ‘आयुका’ (इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स) ही संस्था स्थापन झाली आणि पुष्पा खरे यांच्या कामाला एक चांगले व्यासपीठ मिळाले. त्या तेथे नियमित जाऊ लागल्या. त्यांच्या संशोधनाला वाव मिळाला आणि रघुनाथन श्रीआनंद हा चांगला विद्यार्थीही पीएच.डी. करण्यासाठी मिळाला. श्रीआनंद आता आयुकात प्रोफेसर म्हणून काम करतो. दोघांनी मिळून एकत्र काही पेपर प्रकाशित केले. तोवर इंटरनेट आले आणि त्यांना भुवनेश्वरला राहून, जगभरात संपर्क साधून त्यांचे संशोधनकार्य अद्ययावत ठेवता आले. पुष्पा खरे 31 जानेवारी 2015 रोजी आयुकातून निवृत्त झाल्या.

जगभर मोठमोठे टेलिस्कोप आहेत; उपग्रहांमार्फत अनेक तपशील गोळा करता येतात आणि खगोलशास्त्रातील संशोधनाला भरारी मिळालेली आहे. संगणकाच्या वापरामुळे मोठमोठ्या आकड्यांची समीकरणे सोडवणे सुलभ झालेले आहे. अनेक प्रकारच्या संगणक प्रणाली संशोधनासाठी उपयुक्त ठरत आहेत. अवकाशाचा वेध घेणे मानवाला शक्य झालेले आहे. भारतात अगदी थोड्या स्त्रिया या क्षेत्रात कुठे कुठे दिसत आहेत. पुष्पा खरे त्यांच्या काळातील तशा एकमेव म्हणायला हव्यात. निवृत्त झाल्यावर पुष्पा खरे पुण्याला आल्या आणि त्यांना सी.एस.आय.आर. एमिरेट्स प्राध्यापक म्हणून ‘आयुका’मध्ये मानाचे पद मिळाले. दोन विद्यार्थ्यांनी त्यांच्या हाताखाली डॉक्टरेट केली. अनेकांनी एम.फिल.चे प्रबंध लिहिले. त्यांच्या नावावर जगभरातील खगोलशास्त्र या विषयाला वाहिलेल्या नियतकालिकातून पंचावन्न संशोधन पेपर प्रकाशित झाले आहेत. त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अभ्यास परिषदांतून सक्रिय सहभाग घेतलेला आहे. पेपर वाचलेले आहेत. त्या संशोधनाचे कार्य करत आहेत. त्यांनी संसार आणि संशोधनासारखी वेळ आणि व्यक्तिमत्त्वाची संपूर्ण गुंतवणूक लागणारी करिअर यांचा मेळ यशस्वीपणे घातलेला आहे. दोन्ही मुलांनी आईवडिलांचा संशोधनाचा वारसा पुढे चालवला आहे. मुलगा स्टॅनफोर्ड विद्यापीठात गणिताचा प्राध्यापक आणि संशोधक आहे तर मुलगी कोलंबिया विद्यापीठात जेनेटिक्स या विषयात संशोधन अभ्यास करत आहे. पुष्पा खरे यांना संगीताची आवड आहे. त्यांना लहान वयात वाचनाची आवड लागली ती सोबत करत आहे.

पुष्पा खरे
(020) 25604121/ 9637367667
pushpakhare@gmail.com

(मूळ लेखन प्रा. माधुरी शानबाग, मासिक जडण-घडण, सप्टेंबर 2014 वरून उद्धृत)

About Post Author

Previous articleगोफण
Next articleप्रशांत यमपुरे – पोट्रेटमागचा रंगीत चेहरा!
माधुरी शानबाग या पेशाने प्राध्‍यापक. त्‍यांनी १९७७ ते २०१२ पर्यंत बेळगाव येथील गोविन्दराम सक्सेरिया सायन्स (वरिष्ठ) महाविद्यालय येथे फिजिक्स हा विषय शिकवला. त्‍यानंतर त्या २००७ ते २०१२ पर्यंत प्राचार्य पदावर कार्यरत होत्या. त्‍या कालावधीत त्‍यांच्‍या कॉलेजला नॅक या युजीसीप्रणित संस्थेकडुन ’ए’ ग्रेड मानांकन तसेच ’कॉलेज विथ पोटेन्शियल फॉर एक्सलन्स’ हा गौरव प्राप्‍त झाला. त्‍या राणी चन्नम्मा विद्यापीठ बेळगाव, या नव्या विद्यापीठात अनेक कमिट्यावर सदस्य राहिल्‍या आहेत. परिक्षा मूल्यांकन कॅम्पच्‍या प्रमुखपदासोबत विद्यापीठाच्या फिजिक्स सिलॅबस कमिटीवर त्‍यांनी काम केले आहे. त्‍यांनी बेळगाव, कोल्हापुर, सांगली, मिरज, कोकण परिसरात अनेक कॉलेजमधून नॅक मूल्यमापन पध्दतीवर व्याख्याने दिली आहेत. त्‍यांचा अनेक शैक्षणिक, तसेच फिजिक्स विषयक परिषदांमध्‍ये सहभाग होता. माधुरी शानभाग यांनी कथासंग्रह, विज्ञानकथा, कादंबरी, चरित्रलेखन, ललित लेखसंग्रह, अनुवाद, बालसाहित्य अशा विविध विषयांवर लिहिलेली छत्‍तीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्‍या नियत‍कालिकांमधून सदर लेखन, स्फुट लेखन, मराठी अन इंग्लिश पुस्तक परिचय लेख, ललितलेख, प्रवासवर्णनपर लेख असे लेखन करत असतात. त्‍यांच्‍या पुस्‍तकांना महाराष्‍ट्र राज्‍य शासनाच्‍या पुरस्कारांसह इतर अनेक पुरस्‍कार लाभले आहेत. लेखकाचा दूरध्वनी 09341102832

1 COMMENT

Comments are closed.