कोळथरे हे स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनाऱ्यासाठी प्रसिद्ध असलेले दापोली तालुक्यातील गाव ! तेथील समुद्र हा पर्यटकांच्या आकर्षणाचा भाग आहे. ते गाव दाभोळमधील बुरोंडीच्या पुढे मुख्य रस्त्यापासून खाली, समुद्रकिनारी वसलेले आहे. तेथील पंचनदी ही छोटीशी नदी जेथे समुद्राला मिळते तेथील परिसर निसर्गरम्य आहे.
कोळथरे हे गाव तसे अगदी छोटेसे. तरीही अठरापगड जातींची घरे त्या गावात आहेत. गावची लोकसंख्या 1007 असून, गोमराई, आपतडी, बोरिवली, पंचनदी या गावाच्या सीमा लागून आहेत. तेथे ‘ना.के. मनोहर’ ही मराठी शाळा आहे, उर्दू शाळाही आहे. कोळथरे गावाला शिक्षणाची मोठी परंपरा लाभली आहे. कै. कृष्णामामा महाजन यांनी इंग्रजी शाळा 1960 साली सुरू केली; त्याचबरोबर विद्यार्थी आश्रमही सुरू केला. शाळा आणि आश्रमाची कीर्ती सर्वदूर पसरली आणि मुंबईसारख्या शहरातील विद्यार्थी कोळथरेसारख्या खेडेगावात शिकण्यासाठी येऊ लागले. तेथे कडक शिस्त, राष्ट्रीयत्वाचे संस्कार, सर्वांगीण विकास व स्वावलंबन अशा गुणांचे पोषण जाणीवपूर्वक केले जाते. आई आनंदी गोपाळ महाजन विद्यामंदिर हे एक आदर्श विद्यालय म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहे.

कोळी बांधव तेथे मोठ्या संख्येने राहतात, म्हणून गावाचे नाव ‘कोळथरे’ पडले असे सांगितले जाते. कोळथरे गावामध्ये कोळेश्वराचे मंदिर आहे. एका कोळ्याला शंकराने दृष्टांत दिला व त्याने शंकराची पिंडी तेथे स्थापन केली असे ग्रामस्थ सांगतात. कोळ्यांचा देव म्हणून तो कोळेश्वर. मंदिराचा घुमट मुस्लिम स्थापत्य शैलीतील आहे. जांभा दगडातील मंदिराचे बांधकाम दोनशे-अडीचशे वर्षे जुने आहे. त्या मंदिरातील शंकर हे महाराष्ट्रातील विविध कुटुंबांचे कुलदैवत आहे. बर्वे, भावे, कोल्हटकर, सोमण, बाम, पेठे, जोगदंड, दातार, मोडक ही त्यांपैकी काही घराणी. महाशिवरात्र, वैकुंठ चतुर्दशी आणि त्रिपुरी पौर्णिमा या दिवशी त्या मंदिराच्या परिसरात उत्सव होतात. त्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित स्थान आहे अशी धारणा ग्रामस्थांची आणि भक्तांची आहे.
कोळथरे येथे पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. हवामान समशीतोष्ण आहे. हिवाळ्यात तेथील हवामान थंड असते. सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात तेथे भातशेती व नागलीशेती केली जाते.

कासव संवर्धन प्रकल्प कोळथरे गावात 2005 पासून वनविभाग, निसर्गप्रेमी आणि गावकरी यांच्या सहकार्याने राबवला जातो. त्या प्रकल्पाला ‘सह्याद्री निसर्ग संस्थे’चे भाऊ काटदरे, ‘आगोम’चे दीपक महाजन, केदार व प्रवीण तोडणकर यांची साथ लाभली आहे. ‘ऑलिव्ह रिडले’ या प्रजातीची कासवांची घरटी या समुद्रकिनारी संरक्षित करण्यात येतात. सर्वसाधारणपणे, कासवांनी किनाऱ्यावर अंडी घातल्यापासून बावन्न ते पंचावन्न दिवसांत त्यातून पिल्ले बाहेर येतात. पिल्ले बाहेर पडून समुद्राकडे धाव घेतात. तो नैसर्गिक ओढीचा सोहळा निसर्गप्रेमींना पाहता येतो. ‘कासव जलार्पण सोहळा’ असे त्यास म्हटले जाते.
भारताच्या क्रिकेट संघातील एके काळचा जलदगती गोलंदाज अजित आगरकर यांचे कोळथरे हे गाव. त्यांचे बालपण त्याच गावात गेले. अजित यांचे तेथे येणे होत नाही. परंतु त्यांचे आईवडील नित्य तेथे येतात आणि घर व वाडी यांच्यावर लक्ष ठेवून असतात. कोळथरे गावचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे तेथील आगोम औषधालय. कोळथरे गावाची ओळख महाराष्ट्रात घरोघरी पोचली ती त्या प्रसिद्ध औषधनिर्मिती कंपनीमुळे.
– संकलित माहिती नितेश शिंदे 9323343406, info@thinkmaharashtra.com
———————————————————————————————————————–