छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीचे 2022 हे शताब्दी वर्ष आहे. जे कोल्हापुरात कृतज्ञता पर्व म्हणून साजरे केले जात आहे. शाहू महाराज यांचा कोल्हापूर संस्थानाचा राजा म्हणून राज्याभिषेक त्यांच्या वयाच्या विसाव्या वर्षी झाला. त्यांनी त्यानंतर, दुसऱ्या दिवशीच संस्थानाचे लोककल्याणकारी काम म्हणून कोल्हापूर ते मिरज या रेल्वेमार्गाची पायाभरणी केली होती. तो प्रकल्प त्यांच्या जिद्द व चिकाटीमुळे अवघ्या तीन वर्षांत पूर्णत्वास गेला. एक राजा लोहमार्ग बांधतो, याचेच सगळ्यांना अप्रूप होते !
शाहू महाराज यांचा कोल्हापूर संस्थानाचा राजा म्हणून राज्याभिषेक त्यांच्या वयाच्या विसाव्या वर्षी, 2 एप्रिल 1894 रोजी झाला. त्यांनी त्यानंतर, दुसऱ्या दिवशीच संस्थानचे लोककल्याणकारी काम म्हणून कोल्हापूर ते मिरज या रेल्वेमार्गाची पायाभरणी केली होती. तो शाहू महाराज यांचा पहिला जाहीर समारंभ होता. त्यांनी चांदीचे खोरे वापरून कोल्हापूर स्टेट रेल्वेच्या कार्यास प्रारंभ केला. ते भाषणात म्हणाले, “सर्व लोकांच्या संबंधीचे काम करण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग आहे. त्या कामी आपण मला मेहेरबानी करत आहात. त्याबद्दल मी आपले आभार मानतो. जे थोडेबहुत शब्द बोलण्यास मला सुचवले आहे, ते मी बोलण्याचा प्रयत्न करतो. हे आगगाडीचे काम तडीस गेल्याने माझ्या राज्याची संपतिसाधने वाढण्याच्या कामी त्याचा फायदेशीर परिणाम होईल. माझी उमेद आहे, की साहजिक रीतीने घडून येणाऱ्या क्रमाप्रमाणे आजपासून तीन वर्षांच्या आत हा आगगाडीचा रस्ता करण्याचे काम माझ्या हातून होईल.”
कोल्हापूर–मिरज रेल्वेमार्ग योजना मुंबई सरकारने फेब्रुवारी 1879 मध्ये मंजूर केली. ते काम लवकर पूर्ण करण्याचा संकल्प कोल्हापूर संस्थानच्या कौन्सिल ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन यांनी घेतला. तेव्हा कोल्हापूर संस्थानचे रिजंट म्हणून राजर्षी शाहू महाराजांचे जनक पिता जयसिंगराव ऊर्फ आबासाहेब घाटगे होते.
कोल्हापूर स्टेट रेल्वे प्रकल्पाचे अठ्ठेचाळीस किलोमीटर म्हणजे अठ्ठावीस मैल लांबीच्या प्रकल्पाचे भूमिपूजन गुरूवारी 3 मे 1888 ला सायंकाळी साडेपाचला शाहूपुरीतील माळरानावर म्हणजेच सध्याच्या कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी झाले. कार्यक्रमास खास निमंत्रित म्हणून युरोपीयन अधिकारी, संस्थानचे मानकरी, अधिकारी व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या रेल्वे प्रकल्पाच्या प्राथमिक खर्चाचा अंदाज बावीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये होता. रेल्वेमार्ग बांधणीसाठी मुख्य अभियंता म्हणून आर.जे. शानन यांची कोल्हापूर संस्थानाने नेमणूक केली आणि कोल्हापूर स्टेट रेल्वे नावाने ती योजना आखली गेली.
कोल्हापूर दरबारने कोल्हापूर ते मिरज हा अठ्ठेचाळीस किलोमीटरचा मार्ग तीन वर्षांच्या कालावधीत बांधण्यात यश मिळवले. पंचगंगा आणि कृष्णा या नद्यांवरील छोटे–मोठे पूल व मोऱ्या यांची संख्या पंच्याहत्तरवर गेली. प्रकल्प तीन वर्षांत पूर्णत्वास गेला. त्यावरून कोल्हापुरी जिद्द व चिकाटी दिसून आली. एक राजा लोहमार्ग बांधतो, याचेच सगळ्यांना अप्रूप होते !
या रेल्वेमार्गासाठी स्लिपर लाकडी वापरण्याचे सुरुवातीस ठरवले होते. पण नंतर लोखंडी स्लिपर वापरावे अशी योजना झाली. त्यामुळे वाढीव आर्थिक तरतूद करणे आवश्यक ठरले. अपेक्षित खर्च बावीस लाख बहात्तर हजार दोनशेपन्नास रूपयांवरून तेवीस लाख पाच हजार एकशेतेवीस रुपयांपर्यंत वाढला. शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानाच्या विकासाविषयीची तळमळ व महत्त्वाकांक्षा यामुळे हे मोठे कार्य निर्विघ्नपणे पार पाडले. त्या कार्यासाठी मिरजेच्या राजेसाहेबांची हद्द कृष्णा नदीपर्यंत होती. तो मार्ग त्यांच्या अखत्यारीत असूनही त्यांनी या कामी सक्रिय सहकार्य केले.
कोल्हापूर–मिरज रेल्वेमार्गावर सुरुवातीला रूकडी, हातकणंगले व उदगाव ही तीन स्थानके होती. उदगाव स्थानकाचे नामकरण शिरोळ रोड असे कालांतराने झाले. शाहू महाराजांनी त्यांचे जनकपिता जयसिंगराव यांच्या स्मृतिनिमित्त जयसिंगपूर गाव 1917 मध्ये वसवले. तेव्हा शिरोळ रोडचे जयसिंगपूर रेल्वे स्थानक असे नामांतर झाले. रूकडीजवळ पंचगंगा नदीवर; तसेच, उदगावनजीक कृष्णा नदीवर दोन मोठे पूल बांधले गेले.
रेल्वे सुरू झाली तेव्हा डब्यात फक्त बसण्याची सोय होती. विजेचे दिवे व पंखे नव्हते; तीन वर्ग फर्स्ट क्लास, सेकंड क्लास आणि थर्ड क्लास असे होते. थर्ड क्लासच्या डब्यात मलमूत्र विसर्जनाची सोय नव्हती. युरोपीयन लोकांसाठी स्वतंत्र डबा असे. कोल्हापूर–रूकडी दोन आणे, हातकणंगलेसाठी दोन आणे नऊ पैसे, जयसिंगपूरला चार आणे नऊ पैसे व मिरजेस सहा आणे तीन पैसे असे तिकिट दर होते. कोल्हापूर स्टेट रेल्वे या नावाने ओळखली जाणारी ती रेल्वे कालांतराने मद्रास आणि सदर्न मराठा रेल्वेच्या तर 2 ऑक्टोबर, 1966 पासून दक्षिण मध्य रेल्वेच्या आणि 1 एप्रिल 2004 पासून मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या नियंत्रणाखाली आहे.
भारत देश 1947 ला स्वतंत्र झाल्यानंतर मीटरगेज मार्गाचे रूंदीकरण करण्याचे ठरले. पुणे–मिरज रेल्वेमार्गाचे रूंदीकरण ब्रॉडगेजमध्ये करण्याचे 1968 मध्ये निश्चित झाले. पण कोल्हापूर–मिरज रेल्वेमार्ग मीटरगेजच राहणार होता. त्यावेळी शाहूपुरी मर्चंटस असोसिएशनचे शांतिनाथ पाटणे, बाबूभाई पारीख व कोल्हापूर नगरपालिका यांनी याही मार्गाचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये करावे अशी आग्रही मागणी केली. त्याचा परिणाम म्हणून कोल्हापूर–मिरज–पुणे रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेज रूपांतर देशाचे गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते 7 नोव्हेंबर 1968 ला झाले आणि कोल्हापूर–मिरज या मार्गावरील मीटरगेजची शेवटची गाडी 9 मे 1971 ला सुटली. कोल्हापूर–मुंबई मार्गावरील प्रतिष्ठेची महालक्ष्मी एक्सप्रेस 11 मे 1971 रोजी धावू लागली. त्यावेळी रेल्वेमंत्री सी.एम. पुनाचा, मुख्यमंत्री वसंतराव नाईक व शांतिनाथ ऊर्फ तात्यासाहेब पाटणे यांच्या उपस्थितीत मिरज येथे समारंभ झाला. कोल्हापूर–मिरज मार्गाचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये झाल्यानंतर, श्री शाहू मार्केट येथे मालवाहतुकीसाठी गुड्स यार्ड गूळ मार्केट या नावाने उभारले गेले.
– रावसाहेब पुजारी 9322939040 sheti.pragati@gmail.com
——————————
Very good information
Very nice 👌🏻👍🏻