मुंबई बेटाच्या गेल्या दोन-तीन शतकांचा इतिहास मुंबईच्या रस्त्यारस्त्यावर लपलेला आहे. शोधणाऱ्याला तो सापडतो. हे शोधकार्य रोमांचक आणि मनोरंजक तर आहेच पण त्यातून ज्ञान आणि माहितीही मिळते. हे शहर उभे करणाऱ्या लोकांविषयी प्रेम, आदर वाटतो. नितीन साळुंखे हे असे एक चळवळ्ये मुंबईप्रमी आहेत, जे मुंबईतल्या अनेक अनवट जागांचा शोध घेत राहतात आणि आपल्या जिज्ञासू वाचकांना आपल्या शोधात सहभागी करून घेतात.
आपल्या आजच्या लेखात नितीन साळुंखे, मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्याचा आणि महाराष्ट्र राज्याचे शासकीय अतिथी गृह असलेल्या सह्याद्री बंगल्याचा इतिहास उलगडून दाखवत आहेत.
मोगरा फुलला या सदरातील इत लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
-सुनंदा भोसेकर
‘कोर्सले’चा झाला ‘सह्याद्री’ आणि ‘डनवेगन’चा ‘वर्षा’
मुंबई शहरात अजूनही शिल्लक असलेल्या इतिहासाच्या पाऊलखुणा शोधताना मुंबईवर लिहिली गेलेली अनेक जुनी पुस्तक वाचावी लागतात. ह्यातील मुंबई शहराच्या अभ्यासकांसाठी अपरिहार्य असलेले पुस्तक म्हणजे ‘Glimpses of old Bombay and western India’, हे जेम्स डग्लस यांनी १९०० सालात लिहिलेले पुस्तक.
या पुस्तकात डग्लस यांनी जुन्या मुंबईतल्या आठवणी जागवण्यासोबतच मुंबईत असलेल्या काही प्रसिद्ध घरांबाबत फार आत्मीयतेने लिखाण केले आहे. विशेषत: मलबार हिल, माजगांव परिसरात ही घरे होती. हे पुस्तक लिहिले जात होते तेव्हा म्हणजे विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच, त्यातली काही घरे काळाच्या पडद्याआड गेली होती, तर काही थोडेफार स्वरूप बदलून शिल्लक होती. उदा. माजगावच्या टेकडीवर मुंबईच्या इतिहासातील एक गाजलेल्या प्रेमप्रकरणाचा साक्षीदार असलेला ‘बेल्वेडर(Belvedere)’ हा बंगला हे पुस्तक लिहीपर्यंत नाहीसा झाला होता. मलबार हिलच्या पश्चिम किनाऱ्यावर असलेल्या नेपिअन सी रोडवरची, तीन बाजूंनी समुद्रांनी वेढलेली ‘Bee-Hive (बी-हाईव्ह) नावाची प्रचंड वास्तूही दिसेनासी झाली होती. कंबाला हिलच्या पश्चिम उतारावरची ‘नेपिअन इस्टेट’ही विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काही दशकात काळाच्या उदरात गडप झाली होती. मलबार हिलवरच असलेल्या Wilderness(वाईल्डरनेस), ‘वेस्टफिल्ड (Westfield)’, ‘रिजवे कॉटेज (Ridgeway Cottage)’, ‘Randle Lodge, Hermitage, The Mount, The Retreat अशा अनेक बंगल्यांची नावे डग्लस यांनी या पुस्तकात दिली आहेत.
डग्लस यांनी उल्लेख केलेल्या ह्या बंगल्यांच्या जागी काय असेल याचा शोध घ्यायला हवा, असे वारंवार वाटायचे. तथापि हे पुस्तक लिहून जवळपास १०० वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेला आहे आणि मुंबईच्या वाढीचा वेग, इंच इंच जागेबद्दल दिवसेंदिवस राक्षसी होत जाणारी शहराची भूक लक्षात घेता; आता हे बंगले सापडणे किंवा त्यांचा काही माग लागणे अवघड आहे, असाही विचार मनात यायचा. तरीही ह्या वास्तू सतत खुणावत राहायच्या. अस्वस्थ करत राहायच्या. ही अस्वस्थतता घालवून स्वस्थता लाभण्यासाठी एकच उपाय होता, तो म्हणजे किमान काही वास्तूंचा तरी शोध घेणे..! शेवटी हे शोधकाम हाती घेतले. शोधकामाची सुरुवात डग्लस यांनी त्यांच्या पुस्तकात दिलेल्या ‘द क्लिफ’ या बंगल्यापासून पासून करायचे ठरवले.
विसाव्या शतकाचया सुरुवातीला मुंबईची मलबार हिलची ओळख त्याठिकाणी असलेल्या वाळकेश्वर देवालय आणि बाणगंगा तलावामुळे हिंदुचे तीर्थक्षेत्र अशी होती. चौपाटीवरून वाळकेश्वरला जाणाऱ्या रस्त्याच्या चढावावर आणि बाणगंगा तलावाच्या काठावरच्या देवालयांच्या आवारात असलेल्या काही धर्मशाळा सोडल्यास उर्वरित मलबार हिलचा भाग जंगलाने व्यापलेला होता. त्याकाळातल्या मलबार हिलची थोडीशी झलक मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला ज्या ‘भाऊसाहेब हिरे मार्गा’वर (जुने नाव ‘माऊंट प्लेझंट रोड’) आहे, त्या रस्त्यावर किंवा बी. जी. खेर मार्गावरील ‘कमला नेहरू उद्याना’च्या शेजारी असलेल्या ‘डुंगरवाडी’ ह्या ठिकाणी पाहायला मिळते. गर्द जंगलाने व्यापलेल्या या टेकडीवर एखाद-दुसरा बंगला वगळल्यास वस्ती नव्हती. नाही म्हणायला या टेकडीच्या उत्तर टोकावर-मलबार पॉईंटवर मुंबईचा गव्हर्नर विल्यमा मेडोज (१७८८-१७९०) याने अधूमधून राहण्यासाठी एक लहानसे घर बांधले होते. ‘नेपिअन सी रोड’ला ज्याचे नाव दिले आहे, तो मुंबईचा गव्हर्नर सर इव्हान नेपियन (१८१२-१८१९ ) येथे एका छोट्या खोलीत-Summer House-मध्ये राहत होता. या नंतरचे गव्हर्नर या ठिकाणी अधून-मधून येऊन रहात असत. सत्ता ईस्ट इंडिया कंपनीच्या हातातून ब्रिटिश सरकारकडे गेल्यानंतच्या काळात १८७७ ते १८८०च्या दरम्यान गव्हर्नर असलेल्या सर रिचर्ड टेम्पल याने परळ येथले त्याचे निवासस्थान मलबार पॉइंट येथे औपचारिकरित्या स्थलांतरित केले होते, मात्र तो परळ येथेच मुक्कामाला असे. एप्रल 1880 मध्ये मुंबईच्या गव्हर्नरपदी आलेल्या जेम्स फर्ग्युसन याच्या पत्नीचा परेल हाऊसमध्ये कॉलऱ्याने मृत्यू झाला आणि त्यानंतर मात्र गव्हर्नमेंट हाऊस अधिकृतपणे मलबार पॉइंट येथे स्थलांतरीत झाले.
गव्हर्नराचा मुक्काम मलबार हिलवर हलल्यानंतर अनेक ब्रिटीश उच्च अधिकाऱ्यांनी निवासासाठी मलबार हिल जवळ करायला सुरुवात केली. मलबार हिलच्या पठारावर मोक्याच्या ठिकाणी असलेला ‘द क्लिफ (The Cliff)’ हा प्रशस्त बंगला त्यापैकीच एक. हा बंगला कदाचित गव्हर्नर नेपिअन याच्या काळात बांधला गेला असावा. कारण डग्लस यांच्या पुस्तकात सन १८३३ मध्ये याची मालकी डॉ. स्मिटन (Dr. Smyttan) यांची होती आणि दिनांक २८ डिसेंबर १८३३ आपल्या निवृत्तीच्या समयी डॉ. स्मिटन यांनी हा बंगला डॉ. विल्सन यांना भेट म्हणून दिला असा उल्लेख आहे. डॉ. विल्सन यांच्याकडे या बंगल्याची मालकी आली, तेंव्हा त्याचं नांव ‘द क्रेग(The Craig)’ असं होतं, जे बदलून विल्सन यांनी ‘द क्लिफ’ असे केले (असावे) असाही उल्लेख या पुस्तकात आहे. १८७९ आणि १८९५ च्या नकाशातही ‘द क्लिफ’ ठळकपणे दिसून येतो.
‘द क्लिफ’ बंगल्याचा शोध घेताना त्या बंगल्यात घडलेल्या एका महत्वाच्या घटनेचा शोधही लागला. ती घटना आधी सांगतो. त्यामुळे त्या बंगल्याचे (किंवा त्या जागेचे) ऐतिहासिक महत्व लक्षात येईल. ही घटना आहे सन १८९६-९७च्या दरम्यानची. मुंबईत प्लेगचा भडका उडाला होता. हजारो माणसे मरत होती. सुरुवातील तो प्लेग आहे याची कल्पना कुणालाही नव्हती. त्यामुळे त्यावर काय उपाय करायचे हेही समजत नव्हते. काही वर्षे अगोदर कोलकत्याला कॉलऱ्याची साथ आली होती, तेव्हा ब्रिटीश सरकारने डॉ. वाल्देमर हाफकिन (Waldemar Mordechai Wolff Haffkine) यांना बोलावून घेतले होते. युरोपमध्ये आलेल्या अशाच प्रकारच्या साथीत हाफकिन यांनी लसीचा यशस्वी शोध लावला होता. त्यांनी ज्या प्रमाणे कॉलऱ्यावरील लस शोधली, तशीच ते मुंबईतल्या प्लेगवरही शोधतील या हेतूने ब्रिटीश सरकारने त्यांना मुंबईत पाठवले. दिनांक ०७ ऑक्टोबर १८९६ या दिवशी डॉ. हाफकिन मुंबईत दाखल झाले आणि लगेच दुसऱ्या दिवसापासून ग्रांट मेडिकल कॉलेजमध्ये (जे. जे. हॉस्पिटल) एक क्लार्क आणि तीन हरकामे मदतीला घेऊन एका लहानशा खोलीत आपली प्रयोगशाळा थाटली. जवळपास सहा महिने डॉ. हाफकिन आणि त्यांचे सहकारी प्लेगवर लस शोधण्यासाठी विविध प्रयोग ग्रांट मेडिकल कॉलेजमधल्या या लहानशा खोलीत करत होते. शोधलेल्या लसीचे माणसांवर काय परिणाम होतात ते तपासून पाहण्यासाठी, रोगाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर असलेल्या रुग्णांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये ठेवून त्यांचे निरीक्षण करता यावे यासाठी अनेक खोल्या असलेल्या अधिक मोठ्या जागेची आवश्यकता होती. प्लेगच्या लागणीमुळे मरणपंथाला लागलेल्या माणसांना आयुष्याचे वरदान देऊ शकणाऱ्या या लसीचे महत्त्व ओळखून मुंबई म्युनिसिपालीटीने, ‘द क्लिफ’ हा मलबार हिलवरचा बंगला भाड्याने घेऊन डॉ. हाफकिन यांच्या ताब्यात दिला. दिनांक १ एप्रिल १८९७ या दिवशी डॉ. हाफकिन तिथे आपली प्रयोगशाळा तिथे थाटली आणि नंतरचे आठ महिने या बंगल्यात ते महत्त्वाचे प्रयोग करत होते. या दरम्यान त्यांचा मुक्कामही याच बंगल्यात होता. इथून ही प्रयोगशाळा प्रिन्स आगाखान यांच्या माजगावातल्या नेसबिट लेनमध्ये असलेल्या ‘खुश्रू लॉज’ येथे आणि नंतर परळच्या जागेत गेली, जी अजूनही तिथेच आहे.
‘द क्लिफ’ या बंगल्यात साधारण १९३२ ते ४० च्या दरम्यान बैरामजी जीजीभाई राहत होते. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा हा बंगला श्रीमती साबावाला यांच्या ताब्यात होता, तर १९५७-५८ च्या दरम्यान या बंगल्यात National Indian Association च्या महिला शाखेचे कार्यालय होते. पुढच्या काळात याची मालकी अनेक हातात बदलत गेली.
नकाशात म्हटल्याप्रमाणे मलबार हिलवरच्या ‘रिज रोडवर (Ridge Road – आताचा ‘बाळासाहेब गंगाधर खेर मार्ग’)’ त्या बंगल्याचा शोध घेताना ‘The Cliff’ बंगला नाही, पण त्याची जागा सापडणे ही काही आश्चर्याची गोष्ट नव्हती. आश्चर्य वाटले ते याचे की जवळपास १४५ वर्षांचा कालावधी उलटूनही त्या बंगल्याच्या जागी आता उभी असलेली वास्तू, रूप बदलून परंतु तेच नांव धारण करून उभी आहे! वाल्देमार हाफकिन ज्या बंगल्यात राहिले, वावरले त्या बंगल्याच्या जागी आज उभ्या असलेल्या इमारतीचे नावही ‘Cliff (Cliff Building)’असेच आहे. बंगला नामशेष होऊनही त्याचे नांव इमारतीला देणारे जे कुणी असतील त्यांचे यासाठी आभारच मानायला हवेत.
‘द क्लिफ’ बंगल्याचा माग काढताना डग्लसने त्याच्या पुस्तकात उल्लेख केलेल्या दुसऱ्याही काही वास्तूंचा अनपेक्षितपणे शोध लागला. ‘क्लिफ बिल्डींग’ला अगदी लागून उभ्या असलेल्या आणखी एका प्रसिद्ध परंतु जिच्या इतिहासाविषयी फारशी कुणाला माहिती नसेल अशा आणखी एका वास्तूची माहिती घेऊ.
सत्ता बदलानंतर आणि एरवीही नेहेमी चर्चेत असलेली मलबार हिलवरची सर्वात प्रसिद्ध प्रसिद्ध वास्तू म्हणजे मुख्यमंत्र्यांचा मलबार हिलवरील ‘वर्षा’ बंगला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान. पण ते नंतर १९६५ सालात झाले. त्या अगोदर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे निवासस्थान होते सह्याद्री अतिथीगृहाच्या जागी उभा असलेला, ‘क्लिफ बिल्डींग’चा सख्खा शेजारी ब्रिटीश कालीन भव्य बंगला ‘Corsley (कोर्सले)’!
महाराष्ट्राचे सत्ता केंद्र ‘कोर्सले’वरून ‘वर्षा’पर्यंत कसे सरकले त्याची ही कथा:
विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काही दशकांत मलबार हिलवर त्याकाळच्या सरकारातील पदाधिकारी आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना राहण्यासाठी सरकारच्या पी.डब्लू.डी. खात्यामार्फत जे काही बंगले बांधण्यात आले होते, त्यापकी एक Corsley हा बंगला होता. वर लिहिलेल्या क्लिफ बंगल्याचे काय किंवा कोर्सले बंगल्याचे काय, ‘लोकेशन’ भन्नाट होते. या बंगल्याच्या गच्चीवर उभे राहिले असता, मलबार हिलच्या पायथ्याशी असलेल्या गिरगाव चौपाटीपासून पार कुलाब्याच्या दांडीपर्यंतचा विस्तीर्ण परिसर, दृष्टीला कोणताही अडथळा न येता नजरेच्या टप्प्यात येत असे. म्हणून की काय हा बंगला मुंबई प्रांताच्या पोलीस कमिशनरांच्या ताब्यात देण्यात आला होता. सन १९३० ते १९४७ पर्यंत भारत स्वतंत्र होईपर्यंतच्या सतरा वर्षांच्या कालावधीत या बंगल्यात जी. एस. विल्सन, डब्लू. आर. जी. स्मिथ, आणि एच. ई. बटलर इत्यादी उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यांचा मुक्काम होता.
दिनांक १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारत स्वतंत्र झाला आणि प्रशासनात असलेले इंग्रज अधिकारी हळूहळू भारताचा निरोप घेते झाले. स्वातंत्र्यानंतर भाषिक आधारावर राज्यांची निर्मिती करण्यात आली. या दरम्यान महाराष्ट्र आणि गुजरात मिळून निर्माण झालेल्या ‘द्वी-भाषिक मुंबई राज्या’ची (Bombay State) स्थापना झाली आणि या राज्याचे पहिले मुख्यमंत्री (१९४७-१९५२) – तेव्हा या पदाला ‘प्राईम मिनिस्टर’ किंवा ‘प्रिमिअर’ असे म्हणत – होण्याचा मान बाळासाहेब गंगाधर खेर यांना मिळाला. मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान म्हणून त्यांना (बहुतेक) हाच बंगला मिळाला. नंतरच्या काळात या बंगल्याच्या समोरून जाणाऱ्या रस्त्याचं ‘रिज रोड (Ridge Road)’ हे नाव बदलून ‘बाळासाहेब गंगाधर खेर मार्ग’ असे ठेवण्यात आले. बाळासाहेब खेर यांच्यानंतर द्वी-भाषिक राज्याच्या मुख्यमंत्रीपदी मोरारजी देसाई आले. मुख्यमंत्र्यांचे अधिकृत शासकीय निवासस्थान म्हणून मोरारजींनी जेव्हा कोर्सले या बंगल्याचा ताबा घेतला, तेव्हा हा प्रशस्त, ‘कलोनिअल’ पद्धतीचा बंगला आतून खूप साधा होता. ऐसपैस आवार असलेला, झाडांच्या गर्दीत लपलेला हा बंगला बाहेरून पाहणाऱ्याच्या मनावर छाप पडत असे. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या संपूर्ण कालावधीत (१९५२-१९५६) मोरारजी या बंगल्यात राहत होते.
मोरारजी देसाई यांच्यानंतर मुख्यमंत्री झालेल्या यशवंतराव चव्हाणांचा मुक्कामही मुख्यमंत्री या नात्याने कोर्सले बंगल्यातच होता. मराठी भाषक महाराष्ट्र राज्याच्या मागणीसाठी झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनानंतर दिनांक १ मे १९६० रोजी द्वी-भाषिक मुंबई राज्याचे विभाजन होऊन गुजरात आणि महाराष्ट्र अशी दोन स्वतंत्र राज्ये निर्माण झाली. स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री असलेल्या यशवंतरावांचे निवासस्थान म्हणून ‘कोर्सले’ बंगला कायम राहिला. यशवंतरावांनी आपल्या निवासस्थानात बदल केला नसला तरी, बंगल्याच्या नावात मात्र केला. ‘कोर्सले’ बंगल्याचं नाव बदलून त्याचं नामकरण ‘सह्याद्री’ केले..!
यशवंतराव मुख्यमंत्री म्हणून जेमतेम दोन वर्ष ‘सह्याद्री’वर राहिले. १९६२ सालात झालेल्या भारत-चीन युद्धाच्या दरम्यान देशाचे संरक्षण मंत्री म्हणून यशवंतराव दिल्लीला गेले. यशवंतरावांनंतर महाराष्ट्राचे द्वितीय मुख्यमंत्री म्हणून मारोतराव कन्नमवार ‘सह्याद्री’ बंगल्यात मुक्कामाला आले.मारोतरावांना जेमतेम वर्षभर ‘सह्याद्री’तून महाराष्ट्राचा कारभार हाकण्याची संधी मिळाली. दुर्दैवाने मुख्यमंत्रीपदावर असतानाच दिनांक २४ नोव्हेंबर १९६३ रोजी मारोतरावांचं निधन झालं. मारोतरावांच्या मंत्रिमंडळात गृहमंत्री असलेल्या पी. के. सावंत यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. त्यांनी अवघ्या दहा दिवसांसाठी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळला. काळजीवाहू मुख्यमंत्री असल्याने ते सचिवालयातूनच (आता मंत्रालय) कारभार पहात असत. या काळात सह्याद्री बंगला मोकळाच होता.
कन्नमावारांच्या पश्चात वसंतराव नाईक यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आले. महाराष्ट्र हे द्विभाषिक राज्य असल्यापासून, म्हणजे १९५६ सालापासून वसंतराव मंत्रीमंडळात होते. ज्येष्ठ मंत्री या नात्याने त्यांना सह्याद्रीपासून जवळच असलेला ‘डनवेगन (Dunvegan)’ नावाचा बंगला देण्यात आला होता. हा बंगला देखील ब्रिटीश काळात बांधलेला, देखणा, झाडा -झुडुपात लपलेला, परंतु सह्याद्रीच्या मानाने थोडा लहान होता. दिनांक ५ डिसेंबर १९६३ रोजी महाराष्ट्राचे तिसरे मुख्यमंत्री म्हणून वसंतराव नाईक यांनी शपथ घेतली त्यावेळी त्यांचा मुक्काम ‘डनवेगन’वरच होता. मुख्यमंत्री झाल्यावर वसंतरावांनी आपला मुक्काम मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या सह्याद्रीवर हलवणे आवश्यक होते. परंतु जवळपास सात वर्षे त्यांनी ज्या बंगल्यात सहकुटुंब मुक्काम केला होता, त्या डनवेगन बंगल्याशी त्यांचे बंध जुळले होते. मुळातच हौशी असलेल्या या शेतकरी पुत्राने बंगल्याच्या आवारात अनेक झाडे आपल्या हाताने लावली होती. सह्याद्रीच्या तुलनेत ‘डनवेगन’ बंगला अगदीच साधा होता. कौलारू छपराची बैठी बांधणी, सगळीकडून मोकळे दरवाजे आणि कोणताही खासगीपणा नसलेल्या, परंतु घरंदाजपणाचा स्पर्श असलेल्या या बंगल्याशी नाईक कुटुंबाचे एक नाते तयार झाले होते. परिणामी मुख्यमंत्री होऊनही वसंतरावांनी आपले अधिकृत निवासस्थान सह्याद्री बंगल्यावर न हलवता ‘डनवेगन’ बंगल्यातच ठेवायचा निर्णय घेतला. वसंतरावांनी फक्त एक बदल केला. ‘डनवेगन’ बंगल्याचे नाव बदलून ते ‘वर्षा’ असे केले. शेतीप्रधान महाराष्ट्राचे पावसाशी असलेल्या नात्याचे प्रतिबिंब या नावात उतरले होते. वसंतरावानंतर ’वर्षा’ हेच मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान झाले आणि ती परंपरा कायम झाली ती आजतागायत. ‘मुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणून ‘वर्षा’चे स्थानमहात्म्य आजही कायम आहे. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सह्याद्रीवरून वर्षावर आल्यानंतरच्या काळात ‘सह्याद्री’ बंगल्याचे रुपांतर ‘शासकीय अतिथी गृहात’ करण्यात आले.
जेम्स डग्लसच्या पुस्तकात उल्लेख केलेल्या ‘द क्लिफ’ या बंगल्याचा शोध मध्येच मार्ग बदलून कोर्सले, डगवेगन मार्गे कधी गेला हे लक्षात आले नाही. एक जुनी माहिती शोधताना दुसरी तेवढीच मनोरंजक माहिती हाती लागते आणि सर्व लक्ष तिकडेच लागून आपण मूळात कशाचा शोध घेत होतो हेच विसरले जाते तसे काहीसे झाले हे..!
– नितीन साळुंखे
9321811091
salunkenitin@gmail.com
खूप छान माहिती.
साळुंखे साहेब सप्रेम नमस्कार
मुंबई संबधी काहीही नवी माहिती दिसली तर मला फार आनंद होतो .आपण अतिशय सोप्या भाषेत लिहिलेला लेख फारच आवडला. आपण त्या त्या घरात राहून गेलेल्या लोकांच्या उल्लेखामुळे बहार उडालीआहे .बी जी खेर यांचे सरदार पटेलांना लिहिलेले पत्र आवडले , फक्त एकच शंका विचारतो, ‘कोर्सले’ आणि ‘डनवेगन’ या व्यक्ती कोण ?