कोकणच्या दक्षिण काशीचा यात्रोत्सव

carasole

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकशेएकवीस किलोमीटर लांबीचा स्वच्छ आणि निसर्गरम्य सागरकिनारा आहे. तेथेच श्रीक्षेत्र कुणकेश्वराचे विशाल असे शंभू महादेवाचे देवस्थान आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून भाविकांची, पर्यटकांची व मुंबईकर चाकरमान्यांची तेथे सतत वर्दळ असते. ते ठिकाण देवगड तालुक्यापासून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. कोकण रेल्वेच्या नांदगाव किंवा कणकवली स्थानकावरून एसटीने तेथे पोचता येते. स्वयंभू पाषाणातून कोरलेले ते प्राचीन मंदिर म्हणजे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मंदिराचा परिसर स्वच्छ असून गर्द वनराई, डोंगर, शुभ्र वाळू व अथांग अरबी समुद्र यांनी वेढलेला आहे.

फार वर्षांपूर्वी शिवलिंगासभोवती ‘कुणक’ नावाच्या वृक्षांची राई होती, म्हणून त्या देवाला कुणकेश्वर असे नाव पडले. इसवी सनाच्या अकराव्या शतकापूर्वीच ते स्थान प्रसिद्धीस आले होते. मंदिराचे बांधकाम द्राविडीयन पद्धतीचे आहे. कुणकेश्वराची मूर्ती पूर्वाभिमुख आहे. त्याच्या डोक्यावर सर्परूपी मुकुट आहे. शिवलिंगावर दूध व पाणी यांचा अभिषेक केला जातो. मंदिराचे शिल्पकाम आकर्षक असून ब-याच ठिकाणी सूक्ष्म कोरीव कामही केलेले आढळते. त्यातील पाय-या अर्धचंद्राकृती व भव्य शिळायुक्त आहेत. मंदिराचे संपूर्ण आवार घडी व चिरेबंदी तटबंदीने बंदिस्त आहे. तटाबाहेर उत्तरेच्या बाजूस छोटा जुन्या बांधणीचा तलाव आहे. त्‍या मंदिरातील कलाकुसर केलेले भव्य खांब आणि कोल्हापुरातील अंबाबाईच्या मंदिरातील खांब यांमध्ये साधर्म्य आढळते. श्री कुणकेश्वराच्या गाभा-याचे शिखर बरेच उंच आहे. कोकणात आढळणा-या जांभ्या दगडाचा उपयोग बांधणीसाठी केला असून बळकटीसाठी ठिकठिकाणी काळेभोर दगड घातले आहेत. देवस्थानचे क्षेत्रफळ सुमारे पाऊन एकर आहे. मंदिराचा चौथरा पंधरा फूट उंच असून त्यावर तीस फूट उंचीचे मंदिर बांधण्यात आले आहे. गाभारा, मूगसाळ, विश्रांती स्थळ व सभामंडप अशी मंदिररचनेची विभागणी करण्यात आली आहे. तेथे कोरीव नक्षीकाम पुष्कळ असून त्यात गरूड, हनुमान, दशावतार, शेषशायी विष्णू, व्याघ्र, सर्प, फुले व देवदेवतांच्या मूर्ती आढळतात. वेळोवेळी केलेल्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या वेळी मंदिराचे पुरातन अवशेष टाकून दिले गेलेले आहेत. ते लगतच्या समुद्रात सापडतात!

मंदिराच्या आवारात प्रवेश करताच प्रथम दर्शन होते, ते भैरव मंदिराचे. त्याच्या डावीकडे देव मंडलिक, नंतर श्रीदेव कुणकेश्वर. पुढे गेल्यावर लक्ष्मीनारायण व श्रीगणपती मंदिर, ढालकाठी, नारो निळकंठरूपी समाधिस्थळ म्हणजे तुळशी वृंदावन, तर मागील बाजूस समुद्रात सुमारे शंभराहून अधिक कोरलेली शिवलिंगे आहेत. समुद्राच्या ओहोटीच्या वेळेला त्यातील बरीचशी शिवलिंगे दृष्टीस पडतात. उत्तरेला गोमुख आणि जोगेश्वरीदेवीचे स्थान आहे. तेथेही तुळशी वृंदावन आहे. दिवाळीत प्रथम येथील तुळशीचा विवाह लागल्यानंतर गावातील अन्य ठिकाणच्या तुळशींचे विवाह लावले जातात. ईशान्य दिशेला गोड्या पाण्याची विहीर असून वायव्येला भक्त निवासाची इमारत आहे. पूर्वी तेथेही राजापूरप्रमाणे गंगा यायची; पण अलिकडे मात्र ती बंद झाली. पूर्वेला प्राचीन गुहा असून तिचा शोध १९२० मध्ये लागला. त्यात अनेक स्त्री-पुरुषांचे कोरीव मुखवटे आहेत.

श्रीक्षेत्र कुणकेश्वराविषयीच्या दंतकथा रंजक असून, त्या मनाला भावत नाहीत; कारण इतिहासकारांनी अलिकडेच उत्खननात सापडलेल्या पुरातन अवशेषांच्या आधारे मंदिराच्या बांधणीचा कालखंड हा राजा चालुक्याच्या कारकिर्दीतील असून ते देवालय सुमारे बाराशे वर्षें पुरातन असल्याचा निर्वाळा दिला. मंदिराविषयी अनेक दंतकथा ऐकायला मिळतात. त्यातील एक म्हणजे पांडव अज्ञातवासात असताना एके दिवशी कुणकेश्वर परिसरात आले. तेथील नयनरम्य व अथांग अरबी समुद्राच्या सान्निध्यात शांततेचे वातावरण आढळल्याने ते त्या परिसराच्या प्रेमातच पडले. येथील दक्षिण भागातील लोकांना दूर काशीला जावे लागू नये, म्हणून एका रात्रीत एकशेआठ शिवलिंगे निर्माण करण्याचा त्यांनी निर्धार केला. त्यानुसार त्यांनी शंभराहून अधिक शिवलिंगे निर्माणही केली. परंतु त्याच वेळी, काशी विश्वेश्वराने त्याचे महत्त्व कमी होऊ नये, म्हणून स्वत: कोंबड्याचे रूप घेऊन पहाटेची बांग दिली व त्यामुळे एकशेआठ शिवलिंगे पूर्ण होऊ शकली नाहीत. परंतु तेव्हापासून काशी क्षेत्राएवढेच महत्त्व कुणकेश्वर क्षेत्राला मिळाल्याने त्याला ‘दक्षिण काशी’ म्हटले जाऊ लागले.

कुणकेश्वराचा राज्याभिषेक शके ५५ मध्ये शंभू छत्रपतींनी (करवीरकर) केला असल्‍याचे म्‍हटले जाते. त्‍यांनी कान्होजी आंग्रे यांस कुणकेश्वराच्या देवस्थानाच्या बाबतीत काही भानगडी असल्यास त्या दूर करून त्यावर लक्ष ठेवावा म्हणून हुकूम केला होता. गॅझेटिअरमधील उता-यात सन १६८० मध्ये कोल्हापूरच्या राजाने मंदिर दुरूस्त केल्याचा उल्लेख आहे.

किंबहुना नारो निळकंठांनी मुगलांसोबतच्या लढाईच्या वेळी मंदिराच्या कळसावरून उडी मारल्याचे वर्णन कुणकेश्वराच्या आरतीमध्ये असून त्यांची स्मृती म्हणून मंदिर परिसरात भव्य तुळशी वृंदावन दिसते. त्या तीर्थावर अस्थी विसर्जनासह अन्य विधीही पार पाडले जातात.

महाशिवरात्रीपासून सुरू होणा-या त्या यात्रेदरम्यान देवगड, कणकवली, कुडाळ व मालवण येथील देवस्वाऱ्या कुणकेश्वराच्या भेटीला आवर्जून येतात. सोमवती अमावस्येला देवस्वा-यांचे समुद्रस्नान ही भाविकांसाठी पर्वणीच असते. यात्रेची सांगता या शाही स्नानाने होते. यात्रेदरम्यान परिसरात व मंदिरावर विद्युत रोषणाई केल्याने मंदिर प्रकाशमय झालेले असते. भाविकांची प्रचंड गर्दी, विविध प्रकारची दुकाने, पोलिस, वाहतूक व शासकीय यंत्रणेची तारांबळ, ध्वनिवर्धक, ढोल-ताशांचा गजर या सगळ्यांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात बुडून गेलेला असतो.

-पांडुरंग बाभल

(‘दैनिक प्रहार’ २६ फेब्रुवारी २०१४ वरून उद्धत)

About Post Author

1 COMMENT

  1. सुंदर देवालय, इतिहास त्याहुन
    सुंदर देवालय, इतिहास त्याहुन सुंदर.

Comments are closed.