‘केम्ब्रिज’ सर्वोच्च स्थानी

0
25
Cambridge-University

केम्ब्रिज हे जगातील सर्वश्रेष्ठ विद्यापीठ होय! त्याखालोखाल नंबर लागतो तो अमेरिकेतल्या हॉर्वर्ड चा आणि पाठोपाठ, तिसर्‍या क्रमांकावर येते ते अमेरिकेतीलच एमआयटी विद्यापीठ.

ब्रिटनमधील केम्ब्रिज ची श्रेष्ठता भारतीयांच्या डोक्यात पक्की बसलेली असते. र.पु.परांजपे यांच्यापासून जयंत नारळीकरां पर्यतचे किंवा अलिकडच्या करमरकर (टीआयएफआर) यांच्यापर्यंत जे अनेक रँग्लर झाले, ते केम्ब्रिज विद्यापीठातून. त्यामुळे केम्ब्रिजचा लौकिक मराठी माणसांना तर फारच अपूर्व वाटत असतो. त्याच्याच बरोबरीने येते ते ऑक्सफर्ड विद्यापीठाचे नाव. आपल्या शिक्षणसंस्था ऑक्सफर्ड-केम्ब्रिज या, पाच-सातशे वर्षे जुन्या विद्यापीठांच्या धर्तीवर व दर्जाच्या असाव्यात असे सर्व विदवतजनांना वाटत आले आहे. परंतु रँग्लरशिपचे प्रस्थ कालौघात कमी झाले, पदव्युत्तर एमबीएसारख्या डिग्र्यांचे महत्त्व वाढले, तेव्हा या ब्रिटिश विद्यापीठांचे महत्त्व झाकोळले आणि अमेरिकेतील हॉर्वर्ड, एमआयटी यांची महती अग्रगण्य ठरली.

मात्र हल्ली प्रत्येक क्षेत्रात वर्ल्ड रँकिंग (जागतिक मानांकन) असते. तसे विद्यापीठांचेदेखील वार्षिक क्यूएस वर्ल्ड युनिर्व्हसिटी रँकिंग केले जाते. यंदा त्यामध्ये वीसातल्या पहिल्या तेरा जागा अमेरिकेतील विद्यापीठांनी पटकावून आपले उच्च शिक्षणक्षेत्रातील अव्वल स्थान अबाधित ठेवले असले तरी सर्वोच्च स्थान मात्र इंग्लंडमधील केम्ब्रिज विद्यापीठाने मिळवले आहे. पहिल्या वीस विद्यापीठांमध्ये ब्रिटनची पाच विद्यापीठे येतात. त्यात ऑक्सफर्डचा नंबर पाचवा तर एडिंबरा विद्यापीठाचा नंबर विसावा आहे. पहिल्या विसांमध्ये इंग्रजी भाषा नसलेल्या एकाच विद्यापीठाचा समावेश होतो. ती आहे झुरिचची स्वीस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी.

विद्यापीठांच्या रँकिंगमध्ये दिल्लीची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ही दोनशेअठराव्या क्रमांकावर आहे. तर मुंबईची आयआयटी दोनशेपंचविसाव्या. मात्र आशियातील हाँगकाँग, टोकियो, सिंगापूर येथील विद्यापीठांनी अनुक्रमे बाविसावा, पंचविसावा आणि अठ्ठाविसावा नंबर मिळवला आहे.

केम्ब्रिजने आपले सर्वोच्च स्थान यावर्षी, लागोपाठ दुसर्‍यांदा राखले आहे.

(संकलित)

About Post Author