कुंकवाची गोष्ट

8
101
carasole

सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यात केम नावाचे गाव आहे. रेल्वे स्टेशन असले तरी ते गाव तसे आडवळणाचे. अरुंद रस्ते आणि राज्य परिवहन मंडळाची बस दिवसातून तीन वेळा गावात येते. बाकी केमबाहेर जायचे तर खासगी वाहनाचा वापर करावा लागतो. साधारण पंधरा हजार लोकसंख्या. गावात सतरा सदस्यांची ग्रामपंचायत आहे.

गावात कुंकू बनवण्याचा खूप जुना उद्योग आहे. केमचे कुंकू बैलगाडीतून पंढरपूरच्या बाजारात नेले जाई. स्वातंत्र्यानंतर काही काळ भारतीय रेल्वेच्या वॅगन केमला उभ्या राहत आणि साऱ्या देशभर केमचे कुंकू पोचवत असत. केम गावात लहानमोठे पंचवीस कारखाने आहेत. काही ठिकाणी ‘आगे दुकान पिछे मकान’ अशी अवस्था आहे.  दीडशे-दोनशे वर्षांची परंपरा असणारे काही कुंकू उत्पादक केममध्ये आहेत. केमचे कुंकू म्हणजे हळदीपासून तयार केलेले कुंकू अशी ग्राहकांची खात्री होती.

रामायणात कुंकवाचा उल्लेख येतो, तो असा: वनवासातील राम-सीतेचा चित्रकूटमध्ये प्रवेश झाला तेव्हा सीतेचे स्वागत अनुसूयेने कुंकू लावून केले होते. कुंकुमतिलकाची प्रथा महाभारत काळापासून अस्तित्वात आली असल्‍याचे उल्‍लेख सापडतात. महाभारतात द्रौपदीच्या सोळा शृंगारामध्ये कुंकू लावण्याचे, तसेच कृष्णाची सखी राधा हीचे कपाळावर कुंकू रेखाटत असल्याचे उल्लेख आहेत. मोहंजदारो-हडाप्पाच्या उत्खननात मिळालेल्या स्त्री प्रतिमांच्या कपाळावर कुंकू तर भांगामध्ये सिंदूर दिसतो. भारतीय संस्कृतीने कुंकवाला सौभाग्य अलंकाराचा दर्जा दिला आहे. नवऱ्याला कुंकू म्हणण्याची प्रथा ग्रामीण भागात आहे. विवाहाच्या निमंत्रणपत्रिकांना कुंकवाचे बोट लावण्याची, त्यावर कुंकवाच्या पाण्याचा शिडकावा करण्याची प्रथा आहे. कुंकवाचे उल्लेख वाङ्मयात साधारणपणे तिसऱ्या, चौथ्या शतकापासून दिसू लागतात. रघुवंशात, भर्तृहरीच्या शृंगारशतकात व अमरुशतकात कुंकुमतिलकाचा उल्लेख आढळतो. स्त्रियांच्या कपाळी कुंकू तिसऱ्या-चौथ्या शतकात रंगवलेल्या अजिंठ्याच्या स्त्री-चित्रांमधूनही क्वचित दिसते.

कुंकवाचा उल्लेख सातव्या, आठव्या शतकानंतरच्या वाङ्मयात मोठ्या प्रमाणात आढळतो. तंत्रवाङ्मयात तर कुंकुमतिलकाला विशेष महत्त्व आहे. ग्रामदेवतांना कुंकू प्रिय असल्याचे उल्लेख विपुल आहेत. दुर्गापूजेतही कुंकवाचे अधिक्य असते; सप्तमातृकांनाही कुंकू प्रिय आहे.

हिंदू स्त्रिया नवे वस्त्र वापरायला काढताना त्याला प्रथम कुंकू लावतात. कुंकू हे सुवासिनीने सुवासिनीला लावायचे असते. लग्नप्रसंगी कित्येक जातींत वधू-वराच्या कपाळी कुंकवाचा मळवट भरतात.

स्त्रियांनी कुंकूमदान करावे असा संकेत आहे. तो मंत्र ‘दानचंद्रिके’त पुढीलप्रमाणे आहे :

 

कुंकुमं शोभनं रम्यं सर्वदा मंगलप्रदम् |
दानेनास्य महत्सौख्यं स्यात् सदा मम ||

(कुंकू हे शोभिवंत, रम्य व सर्वदा मंगलप्रद आहे. त्याच्या दानाने मला महत्सौख्य व सौभाग्य प्राप्त व्हावे.)

भारतातील महिला विविध पद्धतींनी कुंकू लावतात. कुंकू लावण्याच्या पद्धतीवरून त्या प्रदेशाची, तेथील संप्रदायाची ओळख पटते. कोकणातील मुली लग्न होईपर्यंत कुंकवाची टिकली लावतात, तर लग्न झाल्यावर कुंकवाची आडवी चिरी लावतात. कित्येक स्त्रिया कुंकू अर्धचंद्राकृती लावतात, तर वैष्णव स्त्रिया कुंकू चंद्रबिंबासारखे वाटोळे लावतात.

हळद आणि पापडखार व सवागी यांच्या मिश्रणातून कुंकू बनवले जाते. हळदीत रोगप्रतिबंधक शक्ती असते. ते पूर्वी गावोगाव घरगुती पद्धतीने तयार केले जाई. हळदीचे कुंकू कसे तयार होते असे विचारताच केमचे शामसुंदर सोलापुरे सांगू लागले, “हळदीपासून कुंकू बनवले जाते. कुंकू करण्याची परंपरा आमच्याकडे सुमारे दीडशे वर्षांची आहे. हळद दळण्यासाठी आमच्या घरी बैलजाते होते. दोन बैल जोडून हळद दळली जात असे. पुढे, घरात ओळीने जाती बसवली गेली. कामाला आलेल्या बायका हळद दळत तेव्हा त्या जात्यावरच्या ओव्या म्हणत. दळलेली हळद आणि इतर रसायने यांचे मिश्रण ओले असते. ओल्या कुंकवाचे वाळवण उन्हात घातले जाते. धूळ, पाऊस यांपासून ओल्या कुंकवाला जपले जाते. हळद महाग झाली. पर्यायाने हळदीचे कुंकूही महाग झाले. त्यामुळे हळदीच्या कुंकवाचा भाव एकशेपस्तीस ते दीडशे रुपये प्रती किलो असा आहे. तरीही काही लोक आवडीने हळदीचे कुंकू खरेदी करतात. मात्र केवळ हळदीपासून कुंकू तयार करून आमचा धंदा चालू शकणार नाही.”

केममध्ये हळदीबरोबर चिंचोका, रताळ्याची पावडर, टोपिओका, डोलामॅट यांपासून कुंकू बनवले जाते. हळद सांगलीच्या बाजारातून तर डोलामॅट, स्टार्च, रताळ्याची पावडर हे पदार्थ कर्नाटकातून आणले जातात.

केममध्ये कुंकू चिंचोक्यापासूनही मोठ्या प्रमाणात बनवले जाते. त्यासाठी बार्शीच्या मार्केटमधून चिंचोके खरेदी केले जातात. चिंचोक्यावरील काळे-तपकिरी टरफल काढले जाते. चिंचोके भाजावे लागतात. टरफल काढलेल्या चिंचोक्यांचा पांढरा गर कुंकू बनवण्यासाठी उपयोगी येतो. चिंचोके दळण्याची चक्की आहे. तेथे केममधील साऱ्या कुंकू उत्पादकांचे चिंचोके दळले जातात. दळलेल्या चिंचोक्यांच्या पावडरमध्ये सेल्फिक अॅसिड, नायट्रिक अॅसिड, हायड्रोक्लोरिक अॅसिड आणि ऑईल घालून ते मोठ्या मिक्सरमध्ये ढवळले जाते. एकजीव झालेले कुंकू ओले असते. ते धुळीपासून सांभाळत कडकडीत उन्हात सुकवले जाते.

कुंकवाचे वाळवण हा रमणीय सोहळा असतो. कामगार तीस-बत्तीस किलो वजनाची छोटी बोचकी पाठीवर घेऊन जेव्हा ओल्या कुंकवाचा सडा घालत असतात तेव्हा ते क्षण पाहण्यासारखे असतात. कुंकवाने रंगलेले कामगार लालेलाल कुंकवाचे वाळवण घालताना कुंकवापेक्षा वेगळे राहत नाहीत.

कुंकू उत्पादक विठ्ठल भिस्ते म्हणाले, की “साधारणपणे 1970 च्या आसपास हळदीपासून बनवलेल्या आमच्या कुंकवाची मागणी अचानक कमी झाली. त्याचा शोध घेतल्यावर कळले, की अमरावतीमध्ये तयार होणाऱ्या कुंकवाने सारे मार्केट काबीज केले आहे. तेथे बनणारे कुंकू स्वस्त होते. मग आम्हीही हळदीबरोबर अन्य प्रकारचे कुंकू बनवू लागलो.”

केमच्या कुंकवाच्या स्पर्धेत अमरावती, पंढरपूर, जेजुरी, अकलूज, इंदापूर, पुणे येथील कुंकू आहे.

हळदीपासून दोनच प्रकारचे कुंकू तयार होऊ शकते. एक म्हणजे लाल कुंकू आणि दुसरा पिवळा भंडारा, पण अन्य माध्यमातून जवळ जवळ पंचवीस प्रकारचे कुंकू बनवले जाते. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुलाल, वारकरी लावतात तो अबीर (बुक्का) व अष्टगंधही तयार होते. केममध्ये ऐंशी टक्के कुंकू चिंचोक्यापासून तर वीस टक्के कुंकू हळदीपासून बनवले जाते. कुंकू केममधून पंढरपूर, गाणगापूर, अक्कलकोट, सोलापूर, भगवंताची बार्शी या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी जाते. त्याचप्रमाणे केमच्या कुंकवाला कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या महाराष्ट्राशेजारील राज्यांतही मागणी आहे.

कुंकू कारखान्यात काम करणारे कामगार हे अर्धकुशल गटात मोडतात. त्यांना रोजगार साधारणपणे शंभर ते एकशेपस्तीस रुपयांपर्यंत मिळतो. कुंकू बनवण्याचा कालखंड हा सप्टेंबर ते मे असा नऊ महिन्यांचा असतो. पावसाळ्याच्या कालावधीत कुंकू उद्योग थंडावतो. कारण पावसाळ्यात कुंकू वाळवता येत नाही. कामगार बहुतेक अल्पभूधारक शेतकरी आहेत. ते पावसाळ्यात त्यांच्या शेतात काम करतात.

कुंकवाची वाहतूक ट्रकमधून होते. त्या गाड्यांत भराई करणाऱ्या कामगारांच्या टोळ्या आहेत. एक टोळी साधारणपणे दहा लोकांची असते. तशा आठ-नऊ टोळ्या केममध्ये आहेत. प्रत्येक कारखान्यात कमीत कमी पाच आणि जास्तीत जास्त वीस अशी कामगारांची संख्या आहे. ते सकाळी नऊ वाजता त्या कामगारांचे रोजचे काम सुरू होते, ते आदल्या दिवशी बनवलेले ओले कुंकू वाळत घालण्यापासून. त्यानंतर मग नवीन कुंकू बनवण्यास सुरुवात होते.

केममध्ये कुंकवाचे कारखाने घरोघरी चालतात. विठ्ठल भिस्ते म्हणाले, “आमचा गेल्या साठ वर्षांचा उद्योग आहे आणि तो घरात आहे, पण त्याचे कोणतेही वाईट परिणाम आमच्या कुटुंबीयांवर झालेले नाहीत. कारण हळद ही रोगप्रतिबंधक आहे.”

शामसुंदर सोलापुरे म्हणाले, “आम्हाला राज्य प्रदूषण महामंडळाचे प्रमाणपत्र मिळाले आहे. आमच्या उद्योगापासून कोणतेही प्रदूषण होत नाही.”

केम या नावाची उत्पत्ती कशी झाली याबाबतची आख्यायिका श्रवणीय आहे. फार पूर्वी उज्जैन नगरीत राजा क्षेम राज्य करत होता. त्यास श्वेतकुष्ठाची बाधा झाली. अनेक उपचारानंतरही त्याला फरक पडला नाही. त्याने शंकराची आराधना केली. भगवान शंकरांनी क्षेम राजास दक्षिण दिशेस जाण्यास सांगितले. फिरत फिरत, राजा त्या गावात आला. शंकराच्या दृष्टांतानुसार त्याने तलाव खोदला. त्यात राजाला सात शिवलिंगे सापडली. त्यातील एक लिंगाची उत्तरेश्वर या नावाने प्राणप्रतिष्ठा केली. अन्य सहा शिवलिंगेही वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन केली गेली. त्या तलावात अंघोळ करताच क्षेम राजाचे कुष्ठ नष्ट झाले. ही झाली पुराणकथा. या परिसरात क्षेम राजाने त्याचे नगर वसवले असेल. त्या नगराचे नाव क्षेम असावे. पुढे ते अपभ्रंशित होऊन केम झाले असावे असा अंदाज वर्तवला जातो. केमच्या  ग्रामदैवताचे, उत्तरेश्वराचे पुरातन मंदिर गावात आहे. त्या मंदिराच्या मागच्या बाजूस पिंडीच्या आकाराची विहिर आहे. उत्तरेश्वराच्या जत्रेमध्ये मातंग, ब्राम्हण आणि मराठा समाजाला मान असतो. पुराणकथेप्रमाणे गावात इतर सहा शिवलिंगे पाहायला मिळतात. उत्तरेश्वराच्या मंदिरासमोर दर शनिवारी मोठा बाजार भरतो. केमपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या‍ वरकुटे गावात तलाव खोदत असताना पस्तीस दगडी मूर्ती सापडल्या. आता ते गाव मूर्त्यांचे वरकुटे अशा नावाने ओळखले जाते.

शासनाने केमच्या कुंकू उद्योगाला लघुउद्योगाचा दर्जा दिला आहे, पण उद्योजक त्यासाठी मिळणाऱ्या सवलती घेऊ शकत नाहीत. कारण बहुतेक सारे उद्योग हे पाच-सहा पिढ्यांपासून चालू आहेत. लघुउद्योग सुरू करण्यासाठी शासनाला प्रस्ताव सादर करताना अनेक अडचणी निर्माण होतात. नवा उद्योग सुरू करण्याचे प्रस्ताव देताना जागा, कच्चा माल, यंत्र यांच्यासाठी आर्थिक मदत शासन देते. केममधील उद्योजकांसाठी तीच समस्या आहे. कारण त्यांच्याकडे यंत्रसामुग्री, जागा ही खूप आधीपासूनची आहे आणि फक्त कच्च्या मालासाठी शासनाची आर्थिक मदत मिळत नाही. शासनाने कुंकू निर्मितीच्या लघुउद्योगाबाबत पुन्हा वेगळ्या पद्धतीने विचार करणे आवश्यक आहे.

केममधील कुंकू उत्पादकांची संघटना आहे. सर्व कुंकू उत्पादकांना त्यांचा उद्योग वाढवायचा आहे. त्यासाठी उत्तरेश्वर औद्योगिक वसाहतीचे स्वप्न त्या साऱ्यांनी उराशी जपले आहे. त्यांनी ‘उत्तरेश्वर औद्योगिक वसाहत’ नावाने एक संस्था स्थापन केली आहे. मनोज सोलापुरे हे त्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांचे प्रयत्न लहान स्वरूपाच्या एमआयडीसीला मान्यता मिळावी म्हणून चालू आहेत. उद्योजकांनी वीस एकर जागा खरेदी केली आहे, पण करमाळा तहसील कचेरीकडून त्यांचा प्रस्ताव मंजूर होत नाही.

– रवींद्र गोळे

(‘साप्‍ताहिक विवेक’वरून उद्धृत, संपादित-संस्कारीत)

Last Updated On – 18th April 2019

 

About Post Author

8 COMMENTS

  1. अतिशय सुंदर माहिती आहे शुभेचछ
    अतिशय सुंदर माहिती आहे शुभेचछ आणी धन्यवाद

  2. फारच सुंदर अशी कुंकवाची
    फारच सुंदर अशी कुंकवाची माहीती मिळाली .विठ्ठलराव भिस्ते साहेब आणि श्यामसुंदर सोलापूरे साहेब व त्यांचे अनेक सहकारी बांधवांनी हा व्यवसाय परम्परेने चालू ठेवला आणि भारतीय संस्कृतीचे प्रतिक असलेले कुंकू आमच्यापर्यंत पोचते केले. खरंच मनापासून आभार !!!

  3. कुंकू निर्मितीची माहिती मी
    मी कुंकू निर्मितीची माहिती बरेच दिवस शोधत होतो. अतिशय उपयुक्त माहिती आपल्यामुळे मिळाली. धन्यवाद…! पण एक प्रश्श्न आहे. शुध्द कुंकू म्हणजे हळदी पासूनच बनवलेले इतर भेसळ नको. कोठे मिळू शकेल का? कारण बाजारात उपलब्ध असलेल्या कुंकवाचा रंग हात साबणाने धुतला तरी जात नाही. परिणामी मूर्तींची देखिल झिज होते. परवडत नाही हे उमजले. पण योग्य मोबदला दिला तर मिळू शकेल का? आणि कोठे व कसे?
    varadmmasale@gmail.com

  4. केम विषय चांगली माहिती मिळाली
    केम विषय चांगली माहिती मिळाली..

  5. खुपच छान माहिती आहे वाचुन…
    खुपच छान माहिती आहे वाचुन फार चागले वाटले सोप्या आणि चागल्या भाषेत माहिती आहे.
    तसेच एक विनती भिस्ते साहेब व सोलापुरे साहेब याचा मोबाईल नबर मिळाला तर फारच छान होईल
    माझा मो. न 8888668830
    नबर मिळाला तर वरील नबरवर कळवाल हि विनती

  6. Khup Upayukta Mahiti…
    Khup Upayukta Mahiti. Vadiloparjit Udyog chalu thevun ‘Bharatiya Paramparet’ molacha yogadaan dilyabaddal Kemvasiyanthe abhinandan. Tyanche MIDC che swapna poorna hovo.

Comments are closed.