आदिमानवाने त्याला अद्भुत, विस्मयकारक आणि भीतिदायक वाटलेल्या गोष्टी तसेच, त्याच्या बहादुरीच्या घटना चिरकाल स्मरणात राहण्यासाठी गुहेतील भिंतींवर तीक्ष्ण हत्यारांच्या साहाय्याने कोरून ठेवल्या, हजारो वर्षांपूर्वीच्या त्या घटना अशा गुहांतून आजही पाहण्यास मिळतात.
पुढे, माणसाची जसजशी प्रगती होत गेली, तसतशी लेखनकलाही विकसित झाली. माणसाच्या एका पिढीला झालेले ज्ञान पुढील पिढीला ज्ञात करून देण्यासाठी लेखनाचा उपयोग होतो, हे लक्षात आल्यावर माणसाने लेखनासाठी वेगवेगळी साधने निर्माण केली. भूर्जपत्र, वल्कले, पापीरस, वस्त्र यांच्यावर नैसर्गिक रंगाने लिखाण केले जाऊ लागले. जुने ग्रंथ, काव्य तशा विविध साधनांवर लिहिलेले आढळतात. ते लिखाण दीर्घकाळ टिकणार नाही हेही माणसाला समजले. त्यामुळे कायम स्मरणात राहण्यासाठी आणि चिरकाल टिकण्यासाठी वेगळे साधन वापरण्यास हवे हे त्याच्या ध्यानात आले. त्यातून दगडावर लेखन करण्याचे प्रयत्न सुरू झाले. तशी वेगळी कला विकसित झाली.
दगडावर लेखनासाठी काळ्या दगडाची शीळा वापरली जाई. ती शीळा प्रथम सारख्या आकाराची व गुळगुळीत करून घेतली जाई. दगडावर जो मजकूर लिहायचा असेल, तो जाणकार कवी-पंडितांकडून तयार करवून घेत. नंतर सूत्रधार कारागिरांकडून मजकूर कोरून घेतला जाई. प्राचीन काळी लोकप्रिय पद्धत म्हणून राजाज्ञा आणि प्रसंगानुरूप राजादिकांच्या प्रशंसा त्यावर कोरीत. ते दगड ‘शिलालेख’ म्हणून प्रसिद्ध आहेत. शिलालेख लिहिणे, हे कष्टाचे आणि कौशल्याचे काम होते. कोरताना टवका उडाला तर दगडाच्या रंगाच्या धातूने जागा भरून काढत. अक्षर उडाले, तर धातूने भरून काढत व अक्षर कोरत.
शिलालेख शेकडो वर्षे टिकून राहिले आहेत. त्यावरूनच एखादी गोष्ट कधीही न बदलणारी, खात्रीची असेल, तर तिचे वर्णन करताना ‘काळ्या दगडावरची रेघ’ असा वाक्प्रचार वापरला जातो. ‘काळ्या दगडावरची रेघ’ या वाक्प्रचाराबरोबरच ‘दगडापेक्षा वीट मऊ’ असाही एक वाक्प्रचार रूढ आहे. पूर्वी दगडाप्रमाणे मातीची वीटसुद्धा लेखनमाध्यम म्हणून वापरत असत. बौद्धांची धर्मसूत्रे विटांवर लिहिलेली आहेत. कच्च्या विटांवर लेख लिहून नंतर त्या विटा भाजून काढत. भाजलेल्या विटा खूप काळ टिकतात. नैनितालच्या पायथ्याशी सापडलेल्या विटा इसवी सनाच्या तिसऱ्या शतकातील आहेत. विटांवर लिहिणे हे दगडावर लिहिण्यापेक्षा सोपे आणि कमी श्रमाचे होते. कदाचित त्यावरूनच हालअपेष्टा, संकट इत्यादी दोन स्थितींची तुलना करताना त्या दोघींमधील एक त्यातल्या त्यात बरी हे दाखवताना ‘दगडापेक्षा वीट मऊ’ असा वाक्प्रचार व्यवहारात रूढ झाला असावा.
– उमेश करंबेळकर
('राजहंस ग्रंथवेध' जुलै २०१८ उद्धृत)