मराठी साहित्यातील सर्वश्रेष्ठ कथाकार म्हणून मान्यता पावलेल्या जीए कुळकर्णी यांचा पत्रव्यवहार दांडगा होता. सुनीता देशपांडे, ग्रेस, म. द. हातकणंगलेकर, ग. प्र. प्रधान अशा काही सुहृदांना त्यांनी असंख्य पत्रे लिहिली.
जीएंनी ग. प्र. प्रधानांना लिहिलेल्या एका पत्रात ‘कशाचा पन्हाळा रिघे खानदेशा’ अशी म्हण वापरली होती. प्रधानमास्तर नेहमी फिरतीवर असत. त्यामुळे त्यांचा नक्की ठावठिकाणा लागत नसे. जीएंनी ही म्हण त्यास अनुलक्षून वापरली होती.
काही लोकांच्या पायाला भिंगरी किंवा चक्र असते. ते एका जागी फार काळ कधीही ठरत नाहीत. त्यांची भटकंती सतत चालू असते. कल्पना केली जाईल त्यांच्या विरूद्ध दुसरीकडेच त्यांचा मुक्काम असतो. अशा लोकांच्या संदर्भात ‘कशाचा पन्हाळा रिघे खानदेशा’ ही म्हण वापरली जाते.
ती म्हण नसून एका काव्यातील ओळ आहे. महादेव मोरेश्वर कुंटे यांनी ‘राजा शिवाजी’ नावाचे खंडकाव्य सुमारे दीडशे वर्षांपूर्वी लिहिले. शिवाजी महाराजांच्या बहिर्जी नाईक ह्या गुप्तहेराचे त्यातील दुसऱ्या खंडात वर्णन आहे. त्याचा ‘बहिर्जी नाईक’ ह्या नावाने कवितेच्या स्वरूपात शालेय क्रमिक पुस्तकात एके काळी समावेश होता. ती कविता आठवणीतल्या कवितांमध्ये आढळते.
त्या कवितेत बहिर्जींची तुलना नारदाशी केलेली आहे. नारदमुनी जसे क्षणात भूलोकी तर क्षणात स्वर्गलोकी संचार करत, तसाच बहिर्जी करत असे. त्याला चोरवाटा, ढोरवाटा ठाऊक होत्या. त्यामुळे तो कमी काळात दूरवर पोचायचा. शत्रूला वाटे, तो पन्हाळ्याला गेला; पण प्रत्यक्षात तो पोचलेला असायचा खानदेशात. कवितेतील ओळी अशा आहेत –
कधी चालतां पोचतो सूर्यलोकी
कधी आडवाटे फिरे स्वर्गलोकी
तसा हा बहिर्जी फिरे सर्व देशी
कशाचा पन्हाळा रिघे खानदेशी
कवितेतील शेवटची ओळ उचलली गेली व सर्वपरिचित झाली. त्यामुळे तिची म्हण बनून गेली. रघुनाथ पंडितांच्या ‘नल दमयंती’ आख्यानातील ‘कठीण समय येता कोण कामास येतो’, भा. रा. तांबे यांच्या कवितेतील ‘मरणात खरोखर जग जगते’ किंवा कुसुमाग्रजांच्या ‘क्रांतीचा जयजयकार’ ह्या काव्यातील ‘रात्रीच्या गर्भात असे उद्याचाउषःकाल’ अशी काही उदाहरणे त्या प्रकारची म्हणून अशा संदर्भात देता येतील.
– डॉ. उमेश करंबेळकर
(राजहंस ग्रंथवेध, जून २०१५ वरून उद्धृत, संपादित-संस्कारित)