– ज्ञानदा देशपांडे/सदानंद डबीर/अंजली कुळकर्णी
“ज्ञानदा देशपांडेचा लेख केवळ अप्रतिम आहे! तो डोळ्यांत झणझणीत अंजन घालतो व परिस्थितीचं अचूक विश्लेषण करतो. कवितासदृश कविता लिहिली जाण्यापाठीमागचं तिचं विश्लेषण अंतर्मुख करायला लावणारं आहे. ‘कवितेसारखी कविता’ या प्रकाराची मुळं व्हर्च्युअल अस्तित्वामध्ये लपलेली आहेत याची दुखरी जाणीव ज्ञानदानं करून दिली आहे”
– कवितेबाबतचं एक विधान आणि त्यावरील दोन आभिप्राय
– ज्ञानदा देशपांडे
एकविसाव्या शतकाचं पहिलं दशक तर संपलं. कशासाठी लक्षात राहतील ही दहा वर्षं? जगाच्या स्मृतीत जसे 9/11, त्सुनामी, ओबामाची निवडणूक, डॉलीचा क्लोन राहिले – तशी कशासाठी लक्षात राहतील ही पहिली दहा वर्षं? म्हणजे उदाहरणार्थ, मराठी भाषेसाठी, मराठी साहित्यासाठी या दहा वर्षांत काय झालं? मराठी कवितेसाठी हे दशक कशासाठी लक्षात राहील? लाडक्या कवींच्या मृत्यूमुळे की मराठी कवितेच्याच नष्ट होण्याच्या प्रक्रियेमुळे?
अरूण कोलटकर, दिलीप चित्रे, अरूण काळे, भुजंग मेश्राम या कवींच्या जाण्यानंच लक्षात राहणार का गेलं दशक? की सकस मराठी कवितेच्या दुर्मिळ होत जाण्यानं?
हे सगळं मनात झरझर आलं कारण नामदेव ढसाळांचं 'निर्वाणाअगोदरची पीडा' वाचलं म्हणून. ज्यांच्या कवितांनी झोप उडवली, घसा कडू जहर केला, 'छबुकलं दारिद्रय' ज्यांनी लिहिली, ज्यांच्या कवितेतल्या उद्रेकानं काळजात काहिली पेरली त्या नामदेव ढसाळांनी या दशकात जी कविता लिहिलीय, ती या दशकालाच साजेशी आहे. फ्रॅगमेंटेड. ढसाळांची कविता जिथे जाऊ शकते तिथे न जाणारी. यात ढसाळांचे कित्येक तुकडे विखुरलेयत – त्यांचं आजारपण, 'विलासराव देशमुख, पतंगराव कदम, सुशीलकुमार शिंदे'- अशी अर्पण पत्रिका, मल्लिका बरोबर लिहिलेल्या 'गोमू संगतीनं' दोन कविता – अनेक नामदेव ढसाळांनी ही 'निर्वाणाअगोदरची पीडा' प्रत्यक्षात आणलीय. त्यात एक ढसाळ गेल्या दशकातल्या मृत कविंचे मृत्यू जिवलग किंवा जिव्हारी लागलेले ढसाळही आहेत. म्हणजे यात त्यांच्या चित्रे-कोलटकरांच्यावरच्या साठीच्या कविताही आहेत.
गेल्या दशकातल्या कवितेच्या वैराणपणाचं दुखरं कारण मला वाटतंय, ते म्हणजे पोस्ट मॉडर्न, पोस्ट इंडस्ट्रियल, पोस्ट सर्व काही, फ्रॅगमेंटेड अस्तित्व. गेल्या दशकात ज्यांनी कवितासदृश नाही लिहिलं त्यांनी या एका कालरेषेवर वेगवेगळी आयुष्यं, एकाचवेळी जगण्याचा अट्टाहास नोंदवलाय. परंतु तो अट्टाहास आणि त्याच्या नोंदी म्हणजे कविता नाही हे त्या कविता-सदृश लेखकांनाही मनातून कळलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या कविता सदृश लेखनाची कडवट टीका करण्यात हशील नाही.
चिरीमिरी, भिजकी वही, अभुज माड, ग्लोबलचं गावकूस, नंतर आलेले लोक – या दशकातला महत्त्वाच्या कविता त्या छापल्या जरी 2000 नंतर तरी बहुतेक आधी लिहिल्या गेलेल्या आहेत. (कदाचित अरूण काळयांच्या काही कवितांचा सन्माननीय अपवाद वगळता.)
सध्याची फॅशनेबल चाल म्हणजे सा-या दुखण्याचं निदान 'सुमारांची सद्दी' या ढोबळ कॉईनेजनं करायचं. मला ते पटत नाही. सर्व काळात सदा सर्वदा सुमार कवी असतातच… पण सदा सर्वकाळ सळसळत खरी कविताही लिहिली जात असते. त्या कवितेचं या दशकात काय झालं?
रॅण्डम मला असं वाटतं – की जितकं इंटरनेट, फेसबुक, मोबाईल फोन, टेक्स्ट मेसेजिंग, व्हर्च्युअल अस्तित्व वाढतंय तितकी एकसंध व्यक्तिमत्त्वच नामशेष होतायत. प्रत्येक जण जेवताना टीव्ही बघतोय, टीव्ही बघताना फोन घेतोय, फोनवर ऐकताना एसएमएस पाठवतोय, मेल चेक करतोय, इन्टेन्स फिलिंग जगणं आणि ते भावोत्कट पानांवर/स्क्रीनवर उतरवणं क्रमश: दुर्मिळ होतंय. किंवा एकच व्यक्तिमत्त्व कवी, राजकारणी, प्राध्यापक अशा पन्नास भूमिका निभावतंय. यातून कविता कशी निर्माण होणार?
कालच एका कवितासदृश लेखनात प्रियकराशी बोलताना टीव्ही बघणारी बाई दिसल्यावर तर या हायपोथिलिसला बळकटीच मिळाली. मग वाटलं, अरूण कोलटकरांनी अशा मॉडर्निटीला कायम अंतरावर ठेवलं म्हणूनच तो माणूस खरी कविता लिहू शकला का काय? फेसबुकवरचं व्हर्च्युअल अस्तित्व, ट्विटरवरचे मतामतांचे गलबले, हजारो इच्छांची टोकं विणता विणता 'वामांगी' सारखी कविता शक्य तरी होईल का? किंवा मला अत्यंत आवडणा-या मराठीतल्या दोन कवयित्री – सुचिन्हा भागवत जिनं आपलं अस्तित्व आणि त्याच्या गुंतागुंतीला दुस्तर आयडेंटिटीतून दूर ढकललंय आणि मेघना पेठे जिच्या व्हर्च्युअल मिडिआतल्या मौनानं मला कायम चकित केलंय, या दोन्ही व्यक्ती जिवंत, सळसळत्या कविता का लिहू शकतायत? मेघनाची अर्थात 'मी नाय साला तुझी बायको होणार' ही एकमेव कविता या दशकातली आहे – पण ती महत्त्वाची मानावी इतकी ऐतिहासिक आहे.
एकीकडून जगणं तपासत जाताना पोस्ट इंडस्ट्रियल जगण्याची कंपल्शन्स जशी लक्षात येतायत – तितकी कवितेच्या दुर्भिक्ष्याची ओळख नव्यानं व्हायला लागलीय. कवितेसारखं दिसणारं बरंच काही लिहिलं जातंय – पण त्या कविता नाहीत. निखळ कवितेसाठी व्हर्च्युअल प्रलोभनांना दूर ढकलायचं किंवा निदान कवितेपुरतं तरी त्यांना दूर ढकलून आपण दुसरंच व्हायचं – अशा स्ट्रेटेजीज लक्षात येतायत. कदाचित म्हणूनच सकस मराठी कवितेचं केंद्र आता वेगळया गावांकडे सरकायला लागलंय. जरी पुरस्कारांना तिथपर्यंत पोचायला वेळ लागणार असला तरी.
अरिझोनातला मध्ययुगीन जपानी कवितेचा प्रोफेसर फोर्ड यांचा वर्ग मला आठवतोय. धर्म आणि कला अशी फारकत न झालेला जपानी कवितेचा तो काळ. कवी तिथ त्याच्या पूर्ण झेन असण्यात उमलून यायचा. प्रोफेसर फोर्ड त्या कविता शिकवताना माणसाचं विखुरलेपण आणि एकसंघ होण्याची तगमग ह्याबद्दल सांगायचे. संस्कृती जगण्याच्या निरगाठींची उत्तरं कशी कवितेत शोधते याचं फोर्डगुरूजींचं प्रवचन मला अजून आठवतंय. हायकू आणि बुध्दाला उमजलेली नित्यशून्यता यांचं नातं अधिक लक्षात येतं.
सकस कवितेचं नामशेष होत जाणं म्हणजेच सकस 'मी' नावाच्या भूमीचं पूर्ण खालसा होणं. ती निरगाठ न उकलताच – त्याचं शंभर निरगाठींसकट तगमगत राहाणं. ग्लोबलच्या गावकुसात 'कविता' मरण्याचं कारण हेच आहे का काय?
माझ्या लाडक्या कविंच्या नसण्यानं – म्हणजे विंदा , चित्रे, कोलटकर, अरूण काळे, भुजंग मेश्राम यांच्या नसण्यानं हे शतक सुरू झालंय – या नंतर? मराठी भाषेला युनिकोडमध्ये जगवताना कवितेच्या नसण्याकडं कोणाचंच लक्ष जाणार नाहीए का काय? की भाषा जगवताना कवितेचा सायलेंट मृत्यू हा इश्चेनिया आम्ही मान्य केलाय बहुधा.
'निर्वाणाअगोदरच्या पीडे'मध्ये ढसाळांचे फ्रॅगमेंट म्हणतंय – तसंच म्हणावं लागेल मग कदाचित, ''किती कडू असतं, हतबल माणसाचं जगणं'' – आणि हतबल वर्तमानात कवितेनं ठार नामशेष होत जाणं.
– ज्ञानदा देशपांडे – dnyanada_d@yahoo.com
कवितेचं नामशेष होत जाणं – काही'फ्रॅगमेंटेड' कॉमेंटस्
– सदानंद डबीर
– ज्ञानदा देशपांडेचं 'थिंकिंग' आवडलं, बरंचसं पटलंही.
– त्यांचं एक विधान – 'अरुण कोलटकरांनी अशा मॉडर्निटीला कायम अंतरावर ठेवलं म्हणून तो माणूस खरी कविता लिहू शकला की काय?' ह्यावरून सुचलेली गंमत – 'अरुण कोलटकरांना, मॉडर्निटीला दूर ठेवणारे 'मॉडर्न पोएट' म्हणायचं की काय?' – आणि आम्ही मॉडर्निटीला दूर ठेवलं असतं तर ज्ञानदांचं हे 'थिंकिंग' आमच्यापर्यंत 'पोचलं' असतं काय?
– 'सरत्या दशका'चा विचार – त्याचं 'अॅनॅलिसिस' ठीकच आहे. पण गेल्या पन्नास वर्षांचा विचार केला तर काय दिसतं? जनमानसात कुठले कवी शिल्लक आहेत? काही नावं – बहिणाबाई चौधरी , ग. दि. माडगूळकर , सुरेश भट .. ही यादी लांबवायची म्हटलं तर शांता शेळके , पाडगावकर, मोघे… इत्यादी. इथं 'जनमानस' महत्त्वाचं आहे. कवितेच्या 'अभ्यासकां'त म्हटलं तर, केशवसुत , मर्ढेकर , बालकवी, कुसुमाग्रज … इत्यादी नावं येतील.
– आता गोची अशी, की ग.दि.मा., सुरेश भट इत्यादी मंडळींना 'कवी'च न समजण्याची आपली 'रीत' 'परंपरा' आहे! त्यामुळे ज्ञानदांचं हे थिंकिंग 'वेबसाइट रुदन' ठरण्याची शक्यता आहे!
– जे कमी गायले गेल्यामुळे जनमानसात जिवंत राहिले, त्यावर ते 'माध्यमांतर' होतं (संगीत हे अतिरिक्त माध्यम) असा प्रतिवाद केला जाईल (जातो) – पण मुळात त्यांच्या शब्दांत कवितेची ताकद होतीच! अन्यथा अनेक सुमार 'गीतकार' कधीच नामशेष झाले आहेत.
– 'लाभले आम्हास भाग्य – बोलतो मराठी' ही सुरेश भटांची कविता, त्यांच्या पहिल्या 'रूपगंधा' संग्रहातली आहे. कौशल इनामदारांनी त्याचं 'स्वाभिमान गीत' केल्यावर ती पुढे अजून पन्नास वर्षं (कदाचित शंभरही!) जिवंत राहील व त्यामुळे सुरेश भटही राहतील असं वाटतं. (त्यात त्यांच्या शब्दांचा वाटा नाही काय?) – आणि हे 'विशफुल थिंकिंग' नाही, तर आजवरचा इतिहास बघता केलेलं तर्काधारित विधान आहे!
– 'लोकप्रिय होणं – म्हणजे 'कवींचा आणि कवितेचा मृत्यू' अशी भंपक विधानं केली गेली आहेत. पण 'जनाधार' लाभल्याशिवाय कुठल्याही कवीची 'चिरंतना'कडे वाटचाल होत नाही. हे सत्य तथाकथित विद्वान मंडळी समजून घ्यायलाच तयार नाहीत!
– कविताच काय कथा/कादंबरी/ललित… सारेच प्रकार नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. मराठी नाटकांची अवस्थाही घरघर लागण्यासारखी झाली आहे. त्याची कारणं, ज्ञानदांनी म्हटल्याप्रमाणे 'फ्रॅगमेंटेड' होण्यात आहेत, हे खरं आहे. अन्य काही कारणं अशी असू शकतात:
– इंग्रजी भाषेनं शालेय/महाविद्यालयीन शिक्षणक्षेत्रावर आक्रमण केलं आहे. (उध्दव ठाकरेंचे चिरंजीव इंग्रजी कविता/गाणी लिहितात – असं वाचल्याचं स्मरतं.)- आणि हा प्रश्न साऱ्या भारतीय भाषांना सतावत आहे.
– 'डी.टी.पी.'ने छपाईतंत्रात क्रांती झाली. परिणामी आपला कवितासंग्रह दहा-पंधरा हजार रुपयांत कवीच काढू लागले. त्यामुळे 'सुमार' संग्रह 'बेसुमार' संख्येने आले… व वाचकांना कविताच नकोशी झाली.
– समाजातला तरुण बुध्दिमान (स्कॉलर) वर्ग मोठया प्रमाणात तंत्रज्ञान/आय.टी./मेडिकल इत्यादी 'नगदी पिकांकडे' वळला. जो पूर्वी लेखन/संपादन/तत्त्वज्ञान इत्यादींकडे लक्ष ठेवून असायचा. पैसा/श्रीमंती हीच महत्त्वाकांक्षा झाली.
चांगली कविता समोर यायला हवी
– अंजली कुलकर्णी, पुणे
‘कवितेचं नामशेष होत जाणं…’ हा ज्ञानदाचा लेख (बृहत्कथा) वाचला, लेख केवळ अप्रतिम, डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारा आणि परिस्थितीचं अचूक विश्लेषण करणारा आहे! कवितासदृश कविता लिहिली जाण्यापाठचं तिचं विश्लेषण वाचकांना/कवींना अंतर्मुख करायला लावणारं आहे. मी ‘कवितेसारखी कविता’ या नावाचा एक लेख ‘सत्याग्रही’च्या जुन्या अंकात लिहिला होता, परंतु त्याची मुळं अशी व्हर्च्युअल अस्तित्वामध्ये लपलेली असतील याची दुखरी जाणीव मात्र ज्ञानदानं नेमकी करून दिली आहे.
या अशा, तुकड्या तुकड्यांत विखुरलेल्या जगण्यात उत्कटपणे जगता येण्याएवढी सवड/अवकाशच दुर्लभ होऊन बसलं आहे. कुठल्याही भावनेला ताबडतोबीची परंतु वरवरची प्रतिक्रिया देऊन माणूस त्यातून मोकळा होण्याची धडपड करतो. त्यामुळे आतपर्यंत काही झिरपत जाण्याची शक्यता मावळत चाललीय. केवळ प्रतिक्रियांना कवितारूप देण्याची घाईही वाढत आहे. अनुभूतीचा आवाका न समजणे, स्वत:च्याच शैलीच्या प्रेमात पडून तिचे अनुकरण करणे, रूपबंधाचा अवाजवी पगडा बसणे, प्रत्यक्ष जीवनाऐवजी जीवनसंकेतांचा अनुभूतीसाठी स्वीकार करणे, निव्वळ प्रतिक्रियांना अनुभूती मानणे किंवा कविसंमेलनासाठी भडक, टाळ्याखाऊ रचना करणे यांच्यामधून कवितेसारखी कविता निर्माण होते.
ज्ञानदाशी थोडे differ होताना असे वाटते, की तुकड्यातुकड्यांतून जगताना किंवा एकाच वेळी अनेक तुकड्यांतून जगताना माणूस उत्कटपणे जगण्याचे विसरला आहे हे खरे, पण म्हणून कवितासदृश कविता समोर येत आहे हे शंभर टक्के खरे नाही. खरी गोष्ट अशी आहे, की कवितेसारखी कविता ही सर्वच काळात लिहिली जात होती. तो काही पोस्ट मॉडर्न काळाचा विशेष नाही. संत काळातही अडीच हजार लोक काव्यरचना करत होते – परंतु त्यांतले दहा-पंधरा लोकच कवी या पदाला पोचले!
नामदेव ढसाळांच्या कवितेच्या पातळपणाचे उघड कारण त्यांच्या वयात, आजारपणात आणि त्यांच्या राजकारणी नेतेपणात आहे. पण ठीक आहे ना!
‘ज्ञानेश्वर तुकाराम सार्त्र काफ्का गटे
या सर्वांना गटाराचे मेनहोल उघडून
सलिंग सडत ठेवावे….’
अशी प्रचलिताची मोडतोड करून नंतरची एक सुंदर व्यवस्थाही जो कवी देतो…
‘माणसाने माणसाकडे माणसासारखे वागावे’ असे लिहितो, याउपर आणखी काय हवे?
ज्ञानदा म्हणते तशी आजची कविता वैराण झाली आहे असे म्हणण्यापेक्षा ती बदलत आहे असे म्हणता येईल. कवितेच्या भाषेला नेहमीच अनेक वाटा असतात. सरळ सोपी वाट, व्यामिश्र आणि अधिक व्यामिश्र. जगणे जेव्हा सरळसोपे होते तेव्हा त्यात सरलता होती. प्रासादिकता हा कवितेचा गुण मानला जाई. ‘मला भीती वाटली’, ‘मला दु;ख झालं’ इतके ते व्यक्तीकरण थेट आणि स्पष्ट होते. नंतर जगणे कॉम्प्लेक्स होऊ लागले तेव्हा कवितेतही कॉम्प्लेक्सिटी आली. कोलटकर
‘आपले दात आपलेच ओठ खाल्ले
मोकळ्यानं हसलो’
असा गुंतागुंतीचा अनुभव व्यक्त करू लागले. आज, नव्वदोत्तरी काळामध्ये जगणे अधिक गुंतागुंतीचे, गतिमान आहे. इतके की ते कवितेतून, भाषेतून पकडणेही मुश्किल आहे. ते वेगळ्याच नव्या दिशांकडे ओढत नेत आहे. गोंधळात टाकत आहे. नुसतीच परिस्थिती बदलत आहे असे नाही, तर माणसेही बदलत चाललीत. या सगळ्या बदलांचे नीट आकलन करून, त्यातून एकच एक सार काढून लिहिणे हे मोठेच आव्हान काळाने समोर ठेवले आहे.
समकालीन प्रवाहातले कवी हे आव्हान चांगल्या त-हेने पेलण्याच्या प्रयत्नात आहेत. काळाशी स्वत:ला सतत सुसंगत ठेवणे ही फार अवघड गोष्ट आहे. फार कमी लोक स्वत:ला शेवटपर्यंत contemporary ठेवू शकतात. पण नवीन कवींच्या कवितांत ती शक्ती दिसते. अनुभवाला थेट पकडणारी, गुंतागुंतीला नीट उलगडत जगण्याच्या गाभ्याशी थेट पोचणारी कविता कवी लिहीत आहेत. विशेष म्हणजे केवळ महानगरांत नाही तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांतून, ग्रामीण भागांतून लिहिणा-या या सगळ्या कवींच्या कवितांचे मिळून घट्ट, आतून जोडलेले आणि हळुहळू स्पष्ट होत जाणारे चित्र तयार होत आहे. तोंडवळाच नसलेल्या मराठी कवितेला चेहरा प्राप्त होत आहे. कमी आहे ती तिकडे जाणकारीने आणि खुल्या दिलाने बघण्याची. त्यांची दखल घेण्याइतकी सवड काढण्याची. चांगल्या कवितेचा शोध घेण्यासाठी सवड काढण्याची कोणते प्रकाशक/संपादक धडपड करतात हा खरा प्रश्न आहे.
स्वत: ज्ञानदा देशपांडे एक चांगली, संवेदनशील कवयित्री आहे. तिच्या पत्रकारितेत संवेदनशीलता आहे आणि तिच्या कवितेत बहुश्रुतत्त्व आणि आकलनाची मोठी झेप दृष्टोत्पतीस येते. १९९५-९६ च्या आसपासपर्यंत ‘अभिधानंतर’सारख्या नियतकालिकांत तिच्या अप्रतिम कविता वाचायला मिळत होत्या. जगणे समजल्याच्या खुणा त्यात सापडतात. Trying to cut nearer the aching nerve हे तिचे वैशिष्ट्य आहे. मात्र नंतर तिच्या कविता कुठे गायब झाल्या? तिच्या कवितांचे एकत्रित collection मला तरी आढळलेले नाही. पत्रकारितेच्या गलक्यात त्या हरवल्या तर नाहीत?
चांगली कविता, खरी कविता समाजासमोर यायला हवी हा अट्टहास आपण सर्वांनीच धऱला पाहिजे.
– अंजली कुलकर्णी, पुणे– भ्रमणध्वनी: 9922072158