(Kalagi Tura)
ग्रामीण महाराष्ट्रात, कलगी तुरा हा लोककलेचा एक लोकप्रिय प्रकार आहे. वैचारिक मुकाबला असावा असा सवाल-जबाबाचा खेळ असतो. तमाशाचा फड असावा तसाच फड पण लावण्यांचा प्रकार वेगळा. सवाल-जबाबाच्या स्वरूपातल्या या लावणीला ‘भेदिक’ म्हणतात. ‘भेद’ म्हणजे रहस्य अर्थात प्रकृती-पुरुषाचे, जीवनाचे रहस्य; याविषयी ज्यात प्रश्नोतरे असतात ते भेदिक होय. त्या भेदिक लावण्यांना ‘कलगी तुरा’ असे म्हणतात. भेदिक गाण्यांच्या फडांनी महाराष्ट्रातील जनसामान्यांना धार्मिक समाधान आणि भावनिक आनंद दिला आहे.
आपल्या अभ्यासपूर्ण लेखातून महाराष्ट्राच्या या लोककलेचा परिचय करून देत आहे जुईली मोहिते.
मोगरा फुलला या दालनातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
-सुनंदा भोसेकर
=============================================
ग्रामीण महाराष्ट्रात, कलगी तुरा हा लोककलेचा एक लोकप्रिय प्रकार आहे. तमाशाचा फड असावा तसाच फड, पण लावण्यांचे स्वरूप अगदी वेगळे. वैचारिक मुकाबला असावा असा सवाल-जबाबाचा खेळ असतो. कुस्तीचा सामना असो की प्राण्यांच्या झुंजी दोन बाजू जेव्हा अटीतटीने आपापली बाजू लावून धरत असतात तेव्हा बघणाऱ्यांचे, ऐकणाऱ्यांचे मनोरंजन हमखास होतेच.
गोंधळ, भारुड, दशावतारी खेळ, वाघ्या-मुरळी, वासुदेवाची गाणी, भेदिक गाण्यांचा फड, अशांसारख्या लोककला सामान्यांचे रंजन करीत असतात, लोकशिक्षण करीत असतात, त्याचवेळी लोककलांच्या परंपरांचे जतनही करत असतात. लोककला प्रकारांत शाहिरी वाङ्मयामध्ये लावणी फक्त शृंगाररसप्रधान असते अशी समजूत आहे परंतू तिथे भेदिक लावणीसुद्धा आहेत हे माहीत नसते. लावणीतील सवाल-जबाबाच्या कवनाला ‘भेदिक’ म्हणतात. ‘भेद’ म्हणजे रहस्य अर्थात प्रकृती-पुरुषाचे, जीवनाचे रहस्य; याविषयी ज्यात प्रश्नोतरे असतात ते भेदिक होय. त्या भेदिक लावण्यांना ‘कलगी तुरा’ असे म्हणतात. भेदिक गाण्यांच्या फडांनी महाराष्ट्रातील जनसामान्यांना धार्मिक समाधान आणि भावनिक आनंद दिला आहे.
‘कलगी तुरा’ हा भेदिक फड या नावानेही प्रसिद्ध आहे. या भेदिक लावण्या गायिल्या जातात त्या मुख्यत्वे कलगीतुऱ्याच्या झगड्यात. भेदिक कलगी-तुऱ्याचा फड आणि तमाशा हया दोन कला प्रकारांमध्ये इतके साम्य आहे की, तमाशाचा उगम भेदिक फडातून झालेला असावा असे म्हणायला हरकत नाही. भेदिक कविता, कलगी तुरा, डफगाणे, अध्यात्मिक शाहिरी कविता अशा नावानेही भेदिक फड ओळखला जातो..
शाहिरी प्रकाराच्या अभ्यासात कलगी-तुरा हया परंपरेला वैशिष्टपूर्ण आणि महत्त्वाचे स्थान आहे. भेदिक रचनेत प्रामुख्याने ‘कलगीवाले’ आणि ‘तुरेवाले’ असे शाहिरांचे व अध्यात्मिक लावणी म्हणणाऱ्यांचे दोन पक्ष असतात. कलगी तुरा या कला प्रकाराची सुरुवात यादवपूर्व काळात इसवी सनाच्या अकरा-बाराव्या शतकाच्या आधी झाली असावी असे मानले जाते. चौदाव्या शतकातील शाहीर ‘वडवालसिध्द नागेश’ यांच्यापासून ही परंपरा अधिक लोकप्रिय झाली.
कलगी-तुरा हा शब्द कलगी आणि तुरा हे दोन शब्द मिळून तयार झाला आहे. कलगी म्हणजे कालागीत-कालीगी-कलगी तर तुरा हे हर हराचे गीत हे हरागी-तुरागी-तुरा अशी या शब्दांची उत्पत्ती डॉ. शिवाजीराव चव्हाण लावताना दिसतात. तसेच कन्नड भाषेत दगडाला कळगे, कल्लगे असे म्हणतात. तर्राकळगे यापासून तुरा-कलगी, कलगी-तुरा असा शब्द आला अशी ज्येष्ठ संशोधक डॉ. रा.चिं. ढेरे यांची भूमिका आहे. कलगी या शब्दाचा अर्थ उर्दू-इंग्रजी कोशात पागोटे किंवा टोपी यांना लावायचा एक अलंकार किंवा लहान वलय असा आहे. तुऱ्याचा अर्थही तोच आहे. कलगी शब्द मूळ तुर्की भाषेतला आणि तुरा शब्द मूळ अरबी भाषेतला. हे दोन्ही शब्द फारसी भाषेत जसेच्या तसे आढळतात. तिथूनच ते मराठीत आले. कलगी तुरा हा शब्द मराठीत मुसलमान राजवटींच्या काळात आला. परंतु हा शब्द मराठीत येण्याअगोदर या कलाप्रकारासाठी मराठीत ‘डफगाणे’ असा उल्लेख आढळतो. याचाच अर्थ असा की, कलगी तुरा हे नाव प्राप्त होण्याच्या अगोदर ‘डफगाणे’ या नावाने ही परंपरा मराठी लोकजीवनात रूढ होती. याच काळातील महानुभाव संप्रदाय साहित्यात व संतसाहित्यात याचे उल्लेख आढळतात. प्राचीन मराठी वाड्.मयातील आद्य ग्रंथ लीळाचरित्रातील १३३ व्या लीळेत खालील उल्लेख आढळतो.
” तव खेळो कुंभार:तो डफगाणे जाणे:पद बांधे
तो गोसावीयाचीया दर्शनासि:आपुले या मेळेनासी आला
मग अध्यात्म गावो लागला.
उपनिषधाचे रहस्य जातपदी बांधोनि गाईले…”
कलगीतुऱ्याच्या सामन्यात कलगीवाल्यांना ‘नागेशी’ वा ‘शिवदासी’ (हरदासी) अशी नावे आहेत. ही नावे दैवतांवरुन आलेली आहेत. भेदिक कलगी तुऱ्याच्या हया पक्षांना कलगी-तुरा, ब्रह्म-माया, शिव-शक्ती अशा नावाने ओळखले जातात. स्त्रीतत्त्व श्रेष्ठ की पुरुषतत्त्व श्रेष्ठ अशा तऱ्हेचा वाद या दोन पक्षांत असतो. कलगीपक्ष माया, प्रकृती, शक्ती यांचे मोठेपण वर्णन करतो तर तुरापक्ष ब्रम्ह, पुरुष, शिव यांचे स्वरुप सांगतो. कलगी आणि तुरा हे दोन्ही निर्गुण निराकार ब्रम्हाचे स्वरुप स्पष्ट करणारे असले तरी त्या एकरूप, निराकार, निरामय, ब्रम्हाला सगुण रूपात साकार करुन त्याचे रूप स्पष्ट केल्यावर सामान्यांना तो अधिक भावतो. त्यामुळे अद्वैत रूपाची ब्रह्म-माया, पुरुष-प्रकृती, शिव-शक्ती अशी द्वैत रुपे मानली. कलगीवाले शक्तीचे श्रेष्ठत्व गातात, तर तुरेवाले शिवाचे श्रेष्ठत्व गातात. कलगीवाले शिवाचे उपासक म्हणजे शैव असतात, तर तुरेवाले विष्णूचे उपासक म्हणजेच वैष्णव असतात. कर्नाटकात शैव व वैष्णव संप्रदायात कट्टर वैर असल्यामुळे त्या दैवतांवरून देखील कलगी-तुऱ्याचे सामने झडत असतात. या वादात एका पक्षाचा शाहीर दुसऱ्या पक्षाच्या शाहिराला प्रश्न विचारत असतो. हे प्रश्न अनेक वेळा अध्यात्मातील ‘कूट’ असतात. डफ आणि तुणतुणे यांच्या साथीवर ही कलगी-तुऱ्याची गाणी गाइली जातात. ठराविक तीन चार चालीत ती गाणी म्हणतात. तमाशाच्या फडावर हे दोन्ही पक्ष समोरासमोर उभे ठाकतात व रात्रभर त्यांचे सवाल-जबाब होतात. या दोन्ही पक्षांची स्वतंत्र निशाणे असतात. कलगीवाल्यांचे निशाण भगवे असते, तर तुरेवल्यांचे निशाण हिरवे किंवा पांढरे असते. या पक्षात जेव्हा सामने होतात तेव्हा ते आपापल्या डफावर संप्रदायाचे चिन्ह व निशाण लावतात. मायावादी वा शैवसंप्रदायी डफावर कलगी लावतात आणि ब्रम्हवादी व वैष्णवसंप्रदायी तुरा लावतात. कलगी ही तुळशीच्या मंजिरीसारखी असते, तर तुरा मक्याच्या कणसावर असणाऱ्या शेंडीसारखा. मुळाशी हिरे आणि तिथून वर फुलणार केसांचा पिसारा ही कलगी आणि वरून खाली लोंबणारे मोत्यांचे सर वा जरीच्या झिरमिळ्या हा तुरा. यांतील सरांना ‘मोत्याचा तुरा’ व जरीच्या झिरमिळ्यांना ‘जरीझोंब’ अशीही नावे होती. या सामन्यात कलगीवाल्यांनी सवालाची लावणी म्हणायची मग तुरेवाल्यांनी जबाबाची लावणी म्हणायची आणि शेवटी कलगीवाल्यांना प्रतिसवाल टाकायचा अशी ही सवाल-जबाबाची स्पर्धा असते. या स्पर्धेत जो हरेल त्याचे निशाण व डफ दुसऱ्या पक्षाने हिसकावून घ्यायचे अशीही पध्दत आहे.
कलगी- तुऱ्यात पौराणिक वाङ्ममयाचा वापर दोन प्रकारात होतो. एक म्हणजे ती पुराणातील कथा सांगण्यासाठी आणि दुसरे म्हणजे पुराणातल्या कथेचे रुपक वापरून त्याआधाराने रचना तयार करून ती सादर करण्यासाठी. कलगी-तुऱ्याच्या लावण्यांवर त्या त्या परिसरातल्या वातावरणाची मोठ्या प्रमाणात छाप पडलेली दिसते आणि त्या त्या प्रदेशाची म्हणून काही वेगळी गीतेसुद्धा यामध्ये सापडतात. संतांच्या रचनेत तीर्थक्षेत्रांच्या व इतर स्थळांचा उल्लेख येतो, तेव्हा कलगी-तुऱ्यामध्ये शाहिरांनी त्यांचा अध्यात्मिक अर्थ देऊन रूपकांच्या माध्यमातून वर्णन केले आहे. त्याचप्रमाणे त्या त्या प्रदेशातील सण-उत्सवांचे उल्लेखही या रचनांमध्ये आढळतात. सणांच्या माध्यमातून सुंदर अध्यात्मिक रूपक रचलेले दिसते.
” ब्रह्मांडीचा वारुळ पुजाया पहा सुंदरी जाती |
संग घेऊन गडनीला कशी शेषाची पूजा करिती ||
कामक्रोध लाहया फुटाणे वंटील होत |
मन बुद्धीचं हाळद कुंकू तबकामंदी ठेविती ||
दंभ आणि अहंकार पाने सुपाऱ्या सहा घेती |
समाजजीवनात आदर्शांची, नीतितत्त्वांची जाणीव समाजाला वारंवार करून द्यावी लागते. कलगी-तुऱ्यातही मोठ्या प्रमाणात उपदेशपर रचना आढळतात. सामाजिक रूढी, प्रथा, धर्म, परंपरा यांचेही दर्शन घडते. लोकरंजनासोबतच राष्ट्रनिष्ठा आणि विश्वबंधुत्वाची भावना याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न दिसतो.
कलगी-तुऱ्याची भाषा ही वाङ्मयीन भाषेपेक्षा बहुजन समाजाची भाषा आहे. रचनांमध्ये स्थानिक बोलींचा प्रभाव, अनेक भाषांचे मिश्रण दिसून येते. स्थानिक संस्कृतीचाही प्रभाव कलगी-तुऱ्याच्या रचनेवर झालेला दिसून येतो. कलगी-तुऱ्याचे बहुतेक साहित्य-मौखिक स्वरुपात आहे त्यामुळे संक्रमणाच्या अवस्थेत त्यात अनेक बदल झालेले दिसतात. महाराष्ट्राच्या बाहेर माळवा, निमाड, उत्तर भारतात व राजस्थानातही कलगी-तुऱ्याचा प्रसार झाला आहे. ते तुऱ्याला ‘तुरी’ म्हणतात. या प्रदेशांत कलगीवाले कलगीला ‘माता’ व तुऱ्याला तिचा ‘पुत्र’ मानतात. तुरावाले त्या दोघांना ‘दंपती’ समजतात. त्यांच्याही आखाड्यात दोन्ही पक्ष समोरासमोर उभे ठाकून सवाल-जबाब करतात. त्या दोघांत मध्यस्थाचे काम ‘टुंडा’ नामक पक्ष करतो. कलगी पक्षाची धारणा अशी की आदिशक्ती हीच शिवाच्या उत्पत्तीला कारण आहे. तुरापक्षाला ही भूमिका मान्य नाही. तो त्या दोघांचा दांपत्यभाव घोषित करतो. कलगीपक्ष त्याच्याही पुढे जाऊन विचार करतो की ‘ जगताची उत्पत्ती ही शक्तीच्या इच्छेचे फल आहे. तिच्याच साहाय्याने शिव कर्मरत होतो.’ या विचारात कलगीवाल्यांनी वामकेश्वर तंत्राचा आधार घेतलेला दिसतो. वामकेश्वरतंत्र म्हणजे शक्ती शिवाला विचारते “भगवान, तू माझ्यासमोर सर्व ६४ तंत्रे प्रकट केलीस. पण तू मला १६ विद्यांबद्दल सांगितले नाहीस.” शिव उत्तर देतो की हे अद्याप प्रकट केलेले नाही आणि ते आतापर्यंत गुह्य आहे’. मग शिव आधी प्रकट केलेल्या तंत्रांपैकी एकेक हे तंत्र देवीला सांगू लागतो. या तंत्रातील प्रत्येक गोष्ट अत्यंत सूक्ष्म पद्धतीने प्रकट झाली आहे. दोन्ही पक्षांवर नाथ व सिद्ध यांच्या दार्शनिक विचारांचा प्रभाव आहे. काहींच्या मते उत्तर प्रदेशातला बनासीदास (कलगीपक्ष) व कवितागिरजी (तुर्रापक्ष) हे या प्रथेचे जनक आहेत. तर अन्य काहींच्या मते दक्षिणेतला शाहअली (कलगीपक्ष) व तुकनगीर (तुर्रापक्ष) या दोघांनी संयुक्तपणे या प्रथेला जन्म दिला. माळव्यात या प्रथेचा प्रारंभ १९ व्या शतकात झाला, असे कळते. त्याच्याही पूर्वी तिथे प्रश्नोत्तरपद्धती विद्यमान असावी पण कलगी-तुऱ्याच्या सवाल-जबाबांनी तिला एक नवीन लोकप्रिय स्वरुप प्राप्त झाले. एका बाजूने मुसलमान आणि दुसऱ्या बाजूने मराठे यांनी जेव्हा माळव्यात पदार्पण केले तेव्हा मुसलमानांबरोबर ख्याल आणि मराठ्यांच्या बरोबर लावणी त्या भागात दाखल झाली. कलगी-तुऱ्याच्या गाण्यांना तिथे ‘ख्याल’ असेही म्हणतात. ख्यालाच्या परंपरेने पुढे माळव्यातल्या ‘माच’ (लोकनाट्य) प्रथेशीही संबंध जोडला. माच व कलगी-तुरा यांतले गजल, झेला, दादरा, तितारी, चोतारी, इ. गेयप्रकार समान असेच आहेत. माळव्यातली कलगी-तुऱ्याची ही प्रथा आधी धार्मिक होती. पण पुढे पुढे तिच्या वर ‘खडी बोली’चा प्रभाव पडला. रीतिकालातल्या लोककवींनी तिला शृंगाराचा साज चढविला. रीतिकाल म्हणजे इ.स. 1700 च्या आसापासचा काळ. या काळात उत्तरेत दरबारी वातावरण आणि संस्कृत साहित्याच्या प्रभावाखाली शृंगार आणि वीररसयुक्त कविता मोठ्या प्रमाणावर लिहिली गेली. माळव्यात रमदंगल नावाची एक परंपरा आहे, ती या कलगी-तुऱ्याच्या प्रथेतून आली आहे.
कलगी तु-याचे स्वरूप हे असे व्यापक आणि सखोल आहे. त्यात मनोरंजनाबरोबरच द्वैत अद्वैताचे तत्त्वज्ञान आहे. समन्वयाचा संस्कार आहे. कलगी तुऱ्याची परंपरा टिकून रहायला हवी असेल तर लोककलाकारांना वाङ्मयाचा अभ्यास करण्याएवढी, तत्त्वज्ञान समजून ते आत्मसात करण्याएवढी सवड मात्र मिळायला हवी.
जुईली मोहिते
7715088841
संदर्भ:
मऱ्हाटी लावणी: म.वा. धोंड
शाहिरी वाङ्मयाच्या धारा:विश्वनाथ शिंदे
पैंजण: म.ना. अदवंत
अक्षरवैदर्भी (फेब्रुवारी 2018)
भारतीय संस्कृतीकोश, मराठी वाङ्मयकोश आणि महाराष्ट्र सारस्वत यांतील नोंदी