कथा गावांच्या नावांची

_Katha_Gavanchya_Navachi_1.jpg

त्र्यंबकेश्वर ते कयगाव टोक (तालुका नेवासा) हा परिसर दंडकारण्याचा मानला जातो. त्या परिसरातून गोदावरी नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. नदीच्या तीरावर कोपरगाव हे तालुक्याचे ठिकाण वसलेले आहे.

प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुण्य झालेला असा कोपरगाव तालुका. गोदावरी नदीच्या उजव्या व डाव्या तीरावरून प्रभू रामचंद्र व सीता यांचे वनवासकाळात भ्रमण झालेले आहे. त्या संदर्भात स्थळ, काळ, घटना व प्रसंगानुरूप अनेक दंतकथा ऐकिवात असून त्यांचा वर्तमान परिस्थितीशी संदर्भ लागू शकतो.

गोदावरी नदीचा कोपरगाव तालुक्यात प्रवेश मोर्विसपासून होतो. ‘मोर्विस’ या गावाजवळ रामाने मारीच राक्षसाचा वध केला म्हणून मारीच – मारीस – मोर्विस असे शब्दस्थित्यंतर झाले. राम बाणाने सोनेरी हरणाचा वेध घेत असताना त्याचा नेम चुकून बाण खडकावर घसरत गेला. त्या बाणामुळे खडक कापत गेला. त्या बाणामुळे खडकावर खोल असे तास (नळी) पडले म्हणून त्या ठिकाणी वसलेल्या वसाहतीस (तास) ‘चासनळी’ असे नाव पडले आहे. शेतकरी शेताला पाणी व्यवस्थित भरता यावे म्हणून पेरणी झाल्यानंतर जमिनीत तास पाडतो व पाणी पिकाला भरतो. तास हा शब्द शेतकऱ्यांच्या परिभाषेतील आहे.

चासगावच्या पूर्व दिशेला मंजूर नावाचे गाव आहे. शिवाजी महाराजांचे वंशज कै. बळवंतराव जयवंतराव राजे भोसले यांचे घराणे तेथे आहे. शाहीर परशुराम व त्यांच्या फडातील गायिका ‘बकुळा’ यांची समाधी मंजूर या गावीच आहे. बकुळेचे एकतर्फी प्रेम परशुरामावर होते. कथा अशी, की शाहीर परशुरामाच्या निधनाची वार्ता समजल्यानंतर बकुळा वावी गावाहून पळत पळत आली व तिने परशुरामाच्या देहाशेजारी प्राण सोडला! त्या गावात सर्पदंश झालेली व्यक्ती दगावत नाही. गावच्या शिवारात सर्पदंश झालेल्या व्यक्तीस बिरोबाच्या (विरभद्र) मंदिरात आणून ठेवतात. जमलेले लोक सर्पदंश झालेल्या व्यक्तीस जीवदान देण्याची मागणी ढोल-डफाच्या गजरात बिरोबाजवळ करतात. भाविकांची मागणी मंजूर होते. म्हणून त्या गावास मंजूर हे नाव पडले असावे. स्त्रियांना त्या बिरोबा मंदिरात प्रवेश नाही.

‘घामोरी’ नावाचे गाव गोदावरी प्रवाहाच्या डाव्या बाजूला काही अंतरावर आहे. त्या गावाचा उल्लेख ‘घामापूर’ असा नवनाथ कथाचरित्रात आहे. तेथे अडबंगनाथाची समाधी आहे. समाधीजवळ चिंचेचे झाड असून त्या झाडास ‘गोरक्षचिंच’ असे म्हणतात. त्यास फळे येतात. गरोदर स्त्रीला प्रसूतिवेदना असह्य होत असल्यास गोरक्षचिंच उगाळून देतात. म्हणून बहुतेक घरांमध्ये आढ्याला गोरक्ष चिंचेचे फळ टांगलेले आढळते.

गोदावरीच्या प्रवाहाच्या दिशेने पूर्वेकडे निघाल्यास ‘कुंभारी’ नावाचे गाव लागते. रामाला वनवास काळात भ्रमण करत असताना ते ठिकाण रमणीय वाटले. त्याने व सीतेने, दोघांनीही तेथे स्नान करून ओल्या वस्त्रांनिशी घागरीने (कुंभ) नदीचे पाणी (वारी) घेऊन, शिवलिंगाची स्थापना केली. म्हणून त्या स्थळास कुंभारी (कुंभ – वारी) असे नाव पडले आहे. शिवाचे मंदिर ‘राघवेश्वर’ नावाने कुंभारी येथे दिमाखात उभे आहे.

प्रवाहाच्या दिशेने थोडे पुढे गेल्यास बाजूस मुर्शतपूर नावाचे गाव आढळते. त्या ठिकाणापासून गोदावरी नदी दक्षिणवाहिनी होते. दक्षिणवाहिनी प्रवाह शुभ असतो. सीतेस तेथे स्नान करावे असा मोह झाला. परंतु तिच्या अंगावर वल्कले, तिला स्नानासाठी वस्त्र नाहीत, पती बरोबर आहे आणि वेळ तिसरा प्रहर आहे. त्यामुळे विवस्त्र स्नान करणे योग्य नाही! तीला स्नान तर करायचेच परंतु ते कसे या विवंचनेत असताना नदीकाठच्या काही स्त्रिया तेथे आल्या. त्यांनी सीतेचे लावण्य व तिच्या चेहर्‍यावरील कष्टी भाव पाहून त्यांच्यातील मातृहृदय जागे झाले. त्यांनी सीतेला अडचण विचारली. सीतेने तिचा मनोदय व अडचण त्यांना सांगितली. तेव्हा त्या स्त्रियांनी त्यांच्याजवळील काही वस्त्रे सीतेस देऊन त्यांच्या हातांनी तिला स्नान घातले. सीता जणू त्यांना त्यांची आप्त वाटली. तेव्हापासून त्या स्थळास सीता आप्त खेडे व पुढे ‘सीतापखेडे’ असे नाव पडले. सीतापखेडे हे नाव स्वातंत्र्यानंतर गेले व त्या गावाचे नाव मुर्शतपूर असे पडले.

सीतेचे स्नान झाले. तिने मावळत्या सूर्यनारायणाचे दर्शन घेण्यासाठी पश्चिमेकडे तोंड करून, हात जोडून स्तवन केले. तिला उजव्या बाजूने वळत असताना सोन्याच्या चकाकीसारखी हालचाल दिसून आली. कपटी मारीच व सीता यांची प्रथम दृष्टिभेट त्याचवेळी झाली. सोन्याच्या चकाकीचा हरीणरूपी मारीच इकडेतिकडे बागडताना सीतेला स्पष्ट दिसू लागला. सीता त्यावर मोहीत झाली. त्या स्थळाला ‘सोनारी’ असे नाव पडले आहे. सोनारी हे गाव गोदावरी नदीच्या डाव्या तीरावर आहे.

कुंभारी गावाच्या पश्चिमेस गोदावरीच्या उजव्या तीरावर माहेगाव आहे. शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांचे पिताश्री लखुजी जाधव यांच्या वंशजांना माहेगाव येथे देशमुखी मिळाली होती तेव्हापासून माहेगावास ‘माहेगाव – देशमुख’ या नावाने ओळखले जाते. जाधव घराण्यांचे वंशज माहेगाव देशमुख येथे वास्तव्यास आहेत.

मंजूर गावाच्या पूर्वेस गोदावरीच्या डाव्या तीरावर मायगाव आहे. तेथील रहिवाशांना कधीकाळी गोदावरीच्या महापुरात देवीची मूर्ती वाहत येऊन तीरावर रहिवाशांना दिसली, लोकांनी मूर्तीची स्थापना नदीतीरावरच करून छोटे मंदिर बांधले. ती मूर्ती लक्ष्मी आई (माय) आहे, असा दृष्टांत काही भाविकांना झाला. तेव्हापासून त्या ठिकाणास आईमायचे गाव म्हणजे ‘मायगांव’ असे नाव रूढ झाले. देवीच्या कृपेने गावाचा लौकिक वाढून भरभराट झाली, म्हणून त्या गावास ‘मायगाव देवी’ या नावाने संबोधले जाऊ लागले.

मुर्शतपूरच्या पश्चिमेस गोदावरीच्या उजव्या तीरावर हिंगणी गाव आहे. पेशवाई काळात त्या गावास ‘श्रीमंतांची हिंगणी’ असे म्हणत असत. पेशवे नारायणराव यांच्या वधाच्या कटकारस्थानात राघोबादादा यांचा सहभाग होता, म्हणून राघोबादादास कोपरगाव येथे नजरकैदेत ठेवले होते. तो वाडा गोदावरी तीरावर भग्न अवस्थेत आहे. त्यांना स्वतंत्र असे विश्रांतिस्थान असावे म्हणून दक्षिणवाहिनी गोदावरीच्या तीरावर हिंगणी येथे भव्य बांधकाम सुरू केले. वाड्याच्या तीन भिंती पूर्ण असून पूर्वेकडील भिंत नाही. फक्त पाया भरलेला आहे. भिंतीची जाडी तीन मीटरची असून उंची दहा मीटर असावी. बांधकाम दगड, चुना व शिसे यांचे असून खूप भक्कम आहे. तो वाडा 1969 व 2006 या दोन्ही वर्षींच्या महापुरांत पूर्णपणे पाण्याच्या धारेत होता, परंतु वाड्याचे काहीही नुकसान झाले नाही. त्या वाड्यातून कोपरगावच्या वाड्यात जाण्यायेण्यासाठी भुयारी मार्ग आहे असे म्हणतात. वाड्याचे बांधकाम चालू असतानाच राघोबादादांचे निधन झाले. त्यांचा अंत्यविधी हिंगणीच्या वाड्यात केला गेला. राघोबादादांच्या वाड्याची देखभाल पुरातन वस्तू संशोधन खात्याकडे आहे.

गोदावरी प्रवाहाच्या उजव्या तीरावर डाऊच बुद्रुक व डाऊच खुर्द अशी दोन गावे आहेत. दोन्ही गावांच्या मधून दक्षिणोत्तर उमावती (उंबरी) नदी वाहते. राम वनवासात असतानाच त्यांना पिता दशरथाची निधनवार्ता कळली. राम-लक्ष्मण या बंधूंनी त्यांच्या पित्याचे पिंडदान (श्राद्ध) डाऊच खुर्द येथे केले. डाऊचच्या पश्चिमेकडील भाविक लोक पितरांच्या पिंडदानासाठी डाऊचला येतात. तेथे शिवलिंग असून महाशिवरात्रीला छोटेखानी यात्रा भरते.

दंडकारण्यात काशासूर नावाचा दैत्य राहत होता. लोक त्याच्या छळाला त्रासून गेले होते. त्याला अमरत्वाचा वर असल्यामुळे देवही घाबरून होते. सर्व देव मिळून शंकराकडे गेले व त्यांनी शंकरास सर्व हकिकत सांगितली व ते विनवणी करू लागले. तेव्हा शंकरांनी ती जबाबदारी अष्टभैरवांपैकी बालभैरवावर सोपवली. लूटमार, वित्तहानी झाल्यानंतर लोक ‘काशारे? काशारे?’ असे मोठमोठ्याने ओरडून सांगायचे. तेथे त्याकाळी गवळी लोकांचे वास्तव्य होते. तेव्हापासून त्या स्थळास काशारे – काशारे – कासारे असे नाव पडले. नंतर गवळ्यांनी भीतीपोटी तेथून स्थलांतर केले. त्यांचे वंशज मढी येथे आहेत. काशासूर सोने, चांदी, नगद रक्कम व मौल्यवान वस्तू लुटून ठरावीक ठिकाणी ठेवायचा. तेथे पूर्वपश्चिम जांब नदी वाहते. त्या नदीला खडकीनाला असे म्हणतात. त्या नदीच्या काठावर चांदीच्या वस्तू व चांदी साठवत. म्हणून त्या ठिकाणास ‘चांदे’ असे नाव पडले. त्या परिसरात राहणार्‍या लोकांना ‘चांदकर’ म्हणतात. कालांतराने, चांदे व कासारे मिळून त्या ठिकाणास ‘चांदेकसारे’ असे नाव पडले. ज्या ठिकाणी सोने व सोन्याच्या वस्तू लपून ठेवत त्या ठिकाणास ‘सोनेवाडी’ असे नाव पडले, तसेच, जेथे रोख रक्कम (नगद, कॅश) ठेवली जाई त्या जागेस ‘नगदवाडी’ असे नाव पडले. सोनेवाडी व नगदवाडी ही दोन्ही गावे चांदेकसारे गावाच्या दक्षिणेस आहेत.

भगवान शंकराचा आशीर्वाद घेऊन बाळभैरव दंडकारण्यात दाखल झाले. त्यांनी काशासूराशी युद्ध पाच दिवस केले. परंतु काशासूर अजिंक्य राहिला. बाळभैरव प्रात:काळी स्नानासाठी डाऊच येथे गोदातीरी गेले, त्यांनी तेथील शिवलिंगाचे पूजन केले. ते तेथून परत येत असताना त्यांना एक तपस्वी दिसले. तपस्वी मुनीने बाळभैरवास सांगितले, की ‘बालका? काशासूराचा वध संसारी माणसाकडून होईल, तू तर बालब्रह्मचारी आहेस.’ ते संभाषण घाटावर स्नान करणार्‍या काही लोकांनी ऐकले व हा हा म्हणता चोहीकडे वार्ता पसरली. भोजडे (तालुका कोपरगाव) येथील पोटे घराण्यातील चर्मकार समाजातील जोगाबाई नावाची मुलगी जनकल्याणासाठी बालब्रह्मचार्‍याबरोबर तात्पुरते लग्न करण्यासाठी तयार झाली. लग्न विधिवत झाले. बाळभैरव संसारी बनले. त्यांनी चैत्र शुद्ध चतुर्दशीला हाल हाल करून काशासूराचा वध केला. जोगाबाईने (जोगेश्वरी) बाळभैरवाच्या ब्रह्मचारी व्रताला बाधा नको म्हणून काशासूराचा वध झाल्यानंतर विहिरीत उडी मारून आत्मसमर्पण केले. काशासूराचा वध जेथे झाला, तेथे भैरवनाथ – जोगेश्वरीचे सुरेख मंदिर उभे आहे. चैत्र शुद्ध त्रयोदशीला मोठी यात्रा भरते. त्याप्रसंगी पोटे घराण्यातील वंशजांना मानाचे स्थान असते. बाळभैरवाने काशासूराचे प्रेत त्रिशूळावर घेऊन आकाशात भिरकावले. ते प्रेत (मढे) पश्चिम दिशेला उम्रावती नदीत जाऊन पडले. त्या ठिकाणास मढी असे नाव पडले. तेथे मढी खुर्द व मढी बुद्रुक अशी दोन गावे झाली आहेत. प्रेत एवढे मोठे होते, की ते पाहण्यासाठी खूप लोक जमा झाले. पाहण्यासाठी गावच तयार झाले. लोक त्यास म्हणाले ‘पाहा हे गाव’. त्याचेच ‘पोहेगाव’ निर्माण झाले.

काशासूराचे मृत शरीर कोल्हे, कुत्रे, लांडगे खाऊ लागले. श्वापदांच्या त्या ओढाताणीत त्याचे शरीर (धड) पूर्वेकडे ओढले गेले. त्या ठिकाणास ‘धड रे! धड रे!’ असे म्हणता ‘देर्डे’ असे नाव पडले. ती गावे देर्डे – चांदवड व देर्डे – कोर्‍हाळे या नावांनी प्रसिद्ध आहेत.

काशासूराचे मांस खाण्यासाठी गिधाड, घार असे पक्षीही गोळा झाले. घार पक्षांचा थवा खाणे झाल्यानंतर पाणी पिण्यासाठी जांब नदीच्या डोहावर जात असे. त्या ठिकाणास घार या पक्षावरून ‘घारी’ असे नाव पडले. ते गाव चांदेकसारे गावच्या उत्तरेस सलग आहे. जंगली श्वापदांनी काशासूराच्या छातीचा भाग गोदावरीच्या तीरावर टाकून दिला. छातीला ग्रामीण भाषेत ‘ऊर’ असे म्हणतात. जेथे ऊराचा भाग पडला, त्या ठिकाणास ‘जेऊर’ असे नाव पडले आहे. जेऊरला जेऊर – कुंभारी व जेऊर – पाटोदा या नावांनी ओळखले जाते. जेऊर गावच्या पूर्वेला गोदावरीच्या उजव्या तीरावर बेट वसाहत होती. ती जागा दैत्यगुरू शुक्राचार्य यांची तपोभूमी होती. त्यांना त्यांची तपश्चर्या सुरू असताना गोदावरीच्या पश्चिम – पूर्व प्रवाहाची अडचण येऊ लागली, म्हणून त्यांची तपश्चर्या भंग होऊ लागली म्हणून त्यांनी त्यांच्या हाताच्या कोपराने गोदावरीचा प्रवाह दूर लोटला. तेथे वसाहत तयार झाली. त्या वसाहतीस ‘कोपरगाव’ असे नाव पडले. कोपरगाव हे तालुक्याचे ठिकाण आहे.

– सोमनाथ सा. गायकवाड गुरूजी, डाऊच बुद्रुक 9325912825

(मूळ लेख : ‘असे होते कोपरगाव’ या पुस्तकात)

About Post Author

Previous articleसंवत्सर – अर्थात वर्ष
Next articleपाजवा
9325912825 सोमनाथ गायकवाड हे कोपरगाव तालुक्यातील डाऊच बुद्रुक गावचे राहणारे. त्यांचे वय बहात्तर वर्षे. त्यांनी संजीवनी साखर कारखाना (जिल्हा परिषद) शाळेत सदतीस वर्षे शिक्षक म्हणून काम केले. निवृत्तीनंतर ते सध्या 'महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मुंबई' येथे संचालक पदावर कार्यरत आहेत. ते 'डाऊच बुद्रुक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित' या पतसंस्थेचे चेअरमन आहेत. त्यांना राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते शैक्षणिक आणि सामाजिक कार्याबद्दल 2003 साली नवी दिल्ली येथे पुरस्कार प्राप्त झाला. त्यांना 'आदर्श शिक्षक' हा पुरस्कार 2002 साली प्राप्त झाला. गायकवाड हे 'महाराष्ट्र पेंशन असोसिएशन पुणे' तर्फे कौटुंबिक कलह आणि कामगारांचे प्रश्न सोडवतात. ते विविध सामाजिक उपक्रमांशी 1988 पासून जोडलेले आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9325912825

2 COMMENTS

  1. मस्त माहिती share केली
    मस्त माहिती share केली

  2. छान लेख आहे सुंस्कृत माहिती…
    छान लेख आहे सुंस्कृत माहिती दिली आहे

Comments are closed.