कडधान्य संशोधन : बदनापूर कृषी संशोधन केंद्रातील कामगिरी

0
355

कडधान्य पिकांचे मानवी आहारात महत्त्वाचे स्थान आहे. कडधान्य हा प्रथिने पुरवणारा मुख्य व स्वस्त स्रोत आहे. कडधान्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण वीस ते पंचवीस टक्के आहे. शरीराची होणारी झिज भरून काढण्यासाठी प्रथिनांची नितांत आवश्यकता असते. कडधान्य पिकांमध्ये खनिजे व जीवनसत्त्वे पुरेशा प्रमाणात असल्याने समतोल आणि पौष्टिक आहार म्हणून उपयोग होतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांनुसार दैनंदिन आहारात प्रति माणसी ऐंशी ग्रॅम कडधान्याचा समावेश असणे गरजेचे आहे. हेच प्रमाण भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या मानकांनुसार प्रति माणसी सत्तेचाळीस ग्रॅम असावे अशी शिफारस करण्यात आली आहे. परंतु सध्या भारतात प्रति दिन प्रति व्यक्ती कडधान्यांची उपलब्धता फक्त तेहेतीस ग्रॅम आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे कडधान्य उत्पादनाची कमी गतीने होणारी वाढ आणि त्यांच्या तुलनेत वाढत्या लोकसंख्येकडून वाढलेली कडधान्यांची मागणी. भारताची कडधान्याची उत्पादकता सातशेपासष्ट किलो/हेक्टर आहे तर महाराष्ट्राची उत्पादकता आठशेअकरा किलो प्रति हेक्टर अशी आहे.

कडधान्य हे पशुधनासाठीही महत्त्वाचे खाद्य आहे. जमिनीचा कस सुधारणे व टिकवून ठेवणे यासाठीदेखील कडधान्य पिकाचे योगदान मोठे आहे.

कडधान्ये हे पिक द्विदल वर्गातील आहे. या पिकांच्या मुळावरील ग्रंथीतील रायझोबियम जीवाणुमार्फत हवेतील नत्र शोषून घेतले जाते. ते मुळावरील ग्रंथीमध्ये मुरते व तेथे त्यांचे स्थिरीकरण होते. त्यामुळे इतर पिकाकरता उत्तम बेवड तयार होते. कडधान्य पिके ही हवेतील नत्र जमिनीत स्थिर करतात. त्यामुळे जमिनीचा पोत टिकून राहण्यास मदत होते आणि जमिनीची सुपिकता वाढते. कडधान्यांचा समावेश आंतरपिक पद्धतीत केला तर अनेक लाभ मिळतात. तसेच, कडधान्य पिकांचा पाला फार मोठ्या प्रमाणात जमिनीवर पडल्याने सेंद्रिय पदार्थ जमिनीत मिसळून तिची उत्पादकता वाढते. कडधान्य पिकांची मुळे खोलवर जात असल्याने खोलातून ओलावा आणि अन्नद्रव्ये मिळवली जातात. आंतरपिक पद्धतीमुळे तणांचा बंदोबस्तदेखील होतो. कारण जमिनीवर जास्त प्रमाणात आच्छादन राहते. त्यामुळे तणास सूर्यप्रकाश मिळत नाही, परिणामी त्याची वाढ खुंटते.

कडधान्याचे पिक तयार झाल्यानंतर शेंगा तोडून घेऊन ती झाडे जमिनीत गाडल्यास त्याची मदत जमिनीचा कस सुधारण्यात होते आणि जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते.

कडधान्याची पिके मिश्र पिक, दुबार पिक, फेरपालट यासाठी उत्कृष्ट मानली जातात. जमिनीची धूप प्रतिबंधक म्हणूनही त्यांचा उपयोग होतो. कडधान्ये ही रोकड, म्हणजे पैशाची पिके म्हणूनही ओळखली जातात.

बदनापूरचे कडधान्य संशोधनामध्ये योगदान – बदनापूरच्या कृषी संशोधन केंद्राची स्थापना 1951 मध्ये झाली. ते केंद्र परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या नियंत्रणाखाली आहे. तेथे अखिल भारतीय व राज्य स्तर अशा दोन्ही पातळींवर गरजेप्रमाणे संशोधन केले जाते. चार कडधान्ये मुख्यत: महाराष्ट्र राज्यात जास्त पिकतात. त्यांची लागवड मोठ्या प्रमाणात होते. ती पिके म्हणजे तुर, हरभरा, मुग व उडीद. बदनापूर संशोधन केंद्रास राष्ट्रीय व राज्यस्तरीय अशी अनेक मानांकने मिळाली आहेत. भारतामध्ये एक प्रमुख कडधान्य संशोधन केंद्र अशी बदनापूरच्या केंद्राची ओळख आहे. तेथे कडधान्य पिकांच्या अनेक जाती विकसित केल्या गेल्या आहेत. विकसित केलेल्या त्या जातींसाठी लागणारे सुधारित उत्पादन तंत्रज्ञानसुद्धा शेतकऱ्यांसाठी तेथे तयार केले आहे. केंद्राने वीसपेक्षा अधिक संशोधन शिफारशी शेतकऱ्यांसाठी केल्या आहेत. संशोधन केंद्राने विकसित केलेल्या मूग, उडीद, तूर व हरभरा या पिकांच्या जाती शेतकऱ्यांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. त्या संशोधन केंद्रात शास्त्रज्ञ म्हणून काम केलेले काही जण राष्ट्रीय व राज्यस्तरीय संशोधन संस्थांमध्ये; तसेच, कृषी विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून यशस्वीपणे कार्य केलेले आहेत.

मूगाच्या सुधारित जाती

बीएम 4 हे वाण बदनापूरच्या कृषी संशोधन केंद्रातून 1991 ला प्रसारित करण्यात आले. ते वाण करपा व भुरी रोगास प्रतिकारक आहे. ते  पासष्ट ते सदुसष्ट दिवसांमध्ये काढणीस येते. या वाणाचे सरासरी उत्पादन नऊ ते अकरा क्विंटल प्रति हेक्टर मिळते.

बीपीएमआर 145 हे वाण बदनापूर कृषी संशोधन केंद्र येथून 2001 मध्ये प्रसारित करण्यात आले. ते वाण साठ ते पासष्ट दिवसांत परिपक्व होते. ते वाण सात ते आठ क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन देते. ते वाण भुरी, करपा, पिवळा व केवडा रोगास प्रतिबंधक आहे.

बीएम 2002-1 हे वाण बदनापूरच्या कृषी संशोधन केंद्रातून 2005 मध्ये खरीप हंगामासाठी प्रसारित करण्यात आले. ते वाण पासष्ट ते सत्तर दिवसांत काढणीस येते. त्यापासून प्रति हेक्टर सात ते नऊ क्विंटल उत्पादन मिळते. या वाणाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते भुरी रेागास प्रतिकारक आहे व काढणीस एकाच वेळी येते.

बीएम 2003-2 हे वाण केंद्रातून 2010 मध्ये खरीप हंगामासाठी प्रसारित करण्यात आले. ह्या वाणाच्या शेंगा लांब असून, दाणा हिरवा चमकदार व टपोरा आहे. ते पासष्ट ते सत्तर दिवसांत काढणीस येते. प्रति हेक्टर आठ ते दहा क्विंटल उत्पादन मिळते. त्या वाणाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते भुरी रेागास प्रतिकारक आहे व एकाच वेळी काढणीस येते.

उडिदाच्या सुधारित जाती: बी डी यु-1 हे वाण बदनापूर कृषी संशोधन केंद्र येथून 2001 मध्ये प्रसारित करण्यात आले आहे. ते वाण भुरी रोगास प्रतिकारक आहे. त्याची शिफारस महाराष्ट्रासाठी खास केली आहे. ते वाण सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांत काढणीस येते. वाणाचे सरासरी उत्पादन अकरा-बारा क्विंटल प्रति हेक्टर आहे.

तुरीचे सुधारित वाण:

बीडीएन-2 हा तुरीचा वाण डाळीसाठी चांगला आहे. ह्या वाणाच्या दाण्याचा रंग पांढरा असून ते वाण एकशेसाठ-एकशेपासष्ट दिवसांत काढणीसाठी तयार होते. त्या वाणापासून हेक्टरी चौदा ते पंधरा क्विंटल उत्पादन मिळते.

बीडीएन 708 ह्या वाणाचे नाव अमोल असे ठेवले आहे. दाण्याचा रंग लाल आहे. त्या वाणाची शिफारस कमी वार्षिक पर्जन्यमान (साडेपाचशे- साडेसहाशे मिलिमीटर) असणाऱ्या ठिकाणी करण्यात आली आहे. ते वाण मध्यम कालावधीत म्हणजेच एकशेसाठ-एकशेपासष्ट दिवसांत तयार होते. वाणाचे उत्पादन चौदा ते सतरा क्विंटल प्रति हेक्टर इतके आहे. हा वाण मर व वांझ रोगास प्रतिकारक आहे.

बीएसएमआर 736 ह्या वाणाच्या दाण्याचा रंगही लाल आहे. हे वाणही मर व वांझ रोगास प्रतिबंधक आहे. ती जात एकशेपंच्याहत्तर-एकशेऐंशी दिवसांत तयार होते. त्या जातीचे उत्पादन कोरडवाहू क्षेत्रात चौदा ते सोळा क्विंटल प्रति हेक्टर; तसेच, बागायती क्षेत्रात अठरा-बावीस क्विंटल प्रति हेक्टर मिळते.

बीएसएमआर 853 हे वाण वैशाली ह्या नावाने प्रचलित आहे. ते वाण मर आणि वांझ रोगास प्रतिबंधक आहे. त्या वाणाच्या दाण्याचा रंग पांढरा आहे. ते वाण उशिरा हाती येते. ते परिपक्व होण्यासाठी एकशेपंच्याहत्तर-एकशेऐंशी दिवसांचा कालावधी लागतो. त्या वाणापासून बागायती क्षेत्रात भरघेास (अठरा-वीस क्विंटल प्रति हेक्टर) उत्पन्न मिळू शकते. कोरडवाहू क्षेत्रात मात्र ते चौदा-सोळा क्विंटल प्रति हेक्टर येते.

बीडीएन 711 ह्या वाणाच्या दाण्याचा रंग पांढरा आहे. त्याची शिफारस कमी वार्षिक पर्जन्यमान असणाऱ्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. ते वाण हलकी ते मध्यम प्रतीच्या जमिनीत कोरडवाहू ठिकाणी घेण्यास हरकत नाही. संरक्षित पाणी देण्याची सोय झाली तरी चालू शकते. ते वाण दीडशे-एकशेपंचावन्न दिवसांत तयार होते. वाणाचे उत्पादन सोळा-अठरा क्विंटल प्रति हेक्टर इतके आहे. वाण मर व वांझ रोगास प्रतिकारक्षम आहे.

बीडीएन-716 हे वाण 2016 साली वसंतराव नाईक मराठवाडा, कृषि विद्यापीठ (परभणी)कडून प्रसारित करण्यात आले आहे. त्या वाणाच्या दाण्याचा रंग लाल आहे. मर व वांझ रोगास प्रतिकारक आहे. वाणाचा कालावधी एकशेपासष्ट-एकशेसदुसष्ट दिवस असून हेक्टरी उत्पादन अठरा ते वीस क्विंटल आहे. ते वाण वाणास दोन पाणी देण्याची सोय असल्यास पेरण्यास उपयुक्त आहे.

बीडीएन 2013-41 (गोदावरी) हे वाण 2021 साली प्रसारित करण्यात आले. दाण्याचा रंग पांढरा आहे. ते मर व वांझ या रोगांस प्रतिबंधक आहे. पिकासाठी एक/दोन पाण्याची सोय असल्यास हेक्टरी सरासरी पंचवीस क्विंटल उत्पादन येऊ शकते.

हरभरा पिकाच्या सुधारित जाती: बीडी.एन.जी.797 वाण बदनापूर संशोधन केंद्राने संशोधित केले. ते वाण मुख्यत: मराठवाडा विभागासाठी प्रसारित करण्यात आले आहे. त्या वाणापासून जिरायतात चौदा-पंधरा क्विंटल तर बागायतात वीस ते बावीस क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन मिळते.

काबुली चणा बी.डी.एन.के 798 हे हरभऱ्याचे काबुली वाण 2013 मध्ये प्रसारित केले. ते मर रोग व घाटेअळीस प्रतिकारक आहे. वाणाचा कालावधी एकशेदहा ते एकशेपंधरा दिवस आहे. सरासरी उत्पादन सोळा ते अठरा क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन देते. त्या वाणाची वंशावळ बी जी डी 2048 x आय सी सी 118 ही आहे.

कडधान्य पिकाचे उत्पादन हे प्रामुख्याने जिरायत भागात व हलक्या जमिनीवर घेतले जाते. त्याचे प्रमुख कारण म्हणजे पाण्याची उपलब्धता झालेले क्षेत्र ऊस, गहू यांसारख्या जास्त उत्पन्न देणाऱ्या पिकांच्या लागवडीकडे वळवले जाते. कडधान्य उत्पादनात रोग व कीड यांच्या प्रादुर्भावाने फार मोठ्या प्रमाणावर घट होताना दिसते. भारतीय कृषी संशोधन संस्था व कृषी विद्यापीठे यांमध्ये कडधान्यांच्या जास्त उत्पादन देणाऱ्या, पाण्याचा ताण सहन करू शकणाऱ्या, रोग व कीड प्रतिकारक, कमी कालावधीत तयार होणाऱ्या जातींवर संशोधन सुरू आहे. हरभरा, तूर, मूग, उडीद व मसूर यांच्या अनेक जाती प्रसारित करण्यात आल्या आहेत. तुरीच्या बीएमआर-736, बीएसएमआर-853, विपुला, एकेटी- 8811 व बीडीएन 711, मुगाच्या बीएम 2003-2, बीएम 2002-1, बीपीएमआर- 145, एकेटी- 8802 आणि उडदाच्या टीएयु-1, टीएयु-2, टीएयु-3, त्याचप्रमाणे हरभऱ्याच्या बीडीएनजी-797, विजय, विशाल, विराट, बीडीएनजीके-798 या सुधारित जातीचा वापर केल्यास उत्पादनात भरीव वाढ होण्यास मदत होईल. राज्यातील बहुतांश भागामध्ये पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमामुळे निर्माण झालेल्या सिंचनाचा लाभ तूर व हरभरा पिकांसाठी करून उत्पादनात पन्नास ते साठ टक्क्यांनी वाढ करणे शक्य आहे. कृषी विद्यापीठे व राज्य शासनामार्फत बिजग्राम योजनेअंतर्गत कडधान्य पिकांच्या सुधारित जातींचे बियाणे मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते. त्यामुळे उत्पादकतेत नजीकच्या काळात चांगलीच वाढ होण्याची लक्षणे आहेत. कडधान्य पिकांसाठी वापरण्यात येणाऱ्या ठिबक व तुषार सिंचन पद्धतीने त्यांची उत्पादकता मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तसेच, सूक्ष्म सिंचन पद्धतीचा जर तुरीत वापर वाढला तरी उत्पादन वाढवण्यास मदत होईल. पाण्याची बचत होईल ती निराळीच !

डॉ. डी.के. पाटील 7588562608, डॉ. सी. बी. पाटील आणि डॉ. पी. एल. सोनटक्के
504cbpatil@gmail.com

कृषि संशोधन केंद्र, बदनापूर जिल्हा जालना 431202

——————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here