औंधचे तळे (Aundh Ponds)

0
169
_Aundhache_Tale_1.jpg

औंध हे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात आहे. औंध हे श्रीमंत पंडित पंतप्रतिनिधी यांच्या संस्थानाचे मुख्य ठिकाण होते. ते ऐतिहासिक स्थानदेखील आहे. त्या ठिकाणी प्राचीन यमाई देवीचे मंदिर आहे. यमाई देवीने औंधासुर या राक्षसाचा वध केल्यानंतर देवीला जखमांच्या दाहकतेने ग्रासले होते. तेव्हा देवीने ती दाहकता कमी करण्यासाठी औंधच्या तळ्यात स्नान केले. त्या तळ्याचे महत्त्व भाविकांसाठी तीर्थाप्रमाणे आहे. यमाई देवीची मोठी यात्रा दरवर्षी पौष पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत असते.

पौराणिक भाग सोडला तर औंधमध्ये पद्माळे, नागाळे व विशाळे अशी तीन तळी होती. त्यांपैकी विशाळे हे तळे बुजले गेले आहे. इतर दोन तळी सध्या वापरात आहेत. ती तळी निर्माण कशी झाली याबद्दल अचूक माहिती नाही, पण ती आटपाडीतील नागोजी सावकाराने बांधली असे म्हणतात. म्हणूनच त्यातील एकाचे नाव ‘नागाळें’ असे आहे. तळ्याच्या ऐतिहासिक खुणा मात्र आहेत. नागाळे तळ्यातील पाण्याने आंघोळ केल्याने खरुज, नायटा नाहीसा होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. तर शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार त्या तळ्यातील पाणी झिरपणाऱ्या खडकांमध्ये काही खडक गंधाचे असल्याने तो प्रभाव पडतो. मोराल्यातील मोराळे व यमाईच्या डोंगरात अजून एक तळे आहे, त्यास दुर्गाळे अशी पाच तळे असल्याच्या खुणा सापडतात.

गावातील वापरात असणारे तळे म्हणजे नागाळे. त्या तळ्याचा आकार चौरसाकृती असून त्याला पाच घाट आहेत. ते पुढीलप्रमाणे- श्री यमाई देवी घाट, श्री मोकळाई देवी घाट, श्री तुकाई देवी घाट, पैलवान घाट, श्रीनिवास घाट.

औंधला जाण्यासाठी सातारा येथून एस.टी. बस असतात. औंध हे साताऱ्याच्या आग्नेयेस सुमारे बेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे. रहिमतपूर हे औंधला सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन. ते एकोणीस किलोमीटरवर आहे. तसेच, कराड रेल्वे स्टेशन चाळीस किलोमीटर व सातारा रेल्वे स्टेशन बेचाळीस किलोमीटर आहे.

माहिती स्रोत: तुकाराम शिंदे आणि औंध इन्फोमधून.

संकलन – नितेश शिंदे

About Post Author

Previous articleश्रद्धेचे व्यवस्थापन – श्री गजानन महाराज संस्थान
Next articleजांभेकरांच्या जगभर पसरलेल्या हिरव्या वास्तू
नितेश शिंदे हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे सहाय्यक संपादक आहेत. त्यांनी इंजिनीयरिंग आणि एम ए (मराठी) असे शिक्षण घेतले आहे. ते क. जे. सोमैया कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी अभ्यासमंडळाचे सदस्य आहेत. त्यांनी ज्येष्ठ संपादक दिनकर गांगल यांच्या साथीने 'महाराष्ट्राचे संस्कृतिसंचित' खंड चौथा या पुस्तकाचे संपादन केले आहे. ते विविध वर्तमानपत्रांत लेखन करतात. त्यांनी एनसीसी आणि एनएसएससाठी विविध सामाजिक विषयांवर ‘स्ट्रीट प्ले’ आणि ‘लघुनाटके’ लिहिली. ते सूत्रसंचालनही करतात. त्यांनी ‘आशय’ या नियतकालिकाच्या ‘मुंबई’, ‘पु.ल.देशपांडे’ आणि ‘त्रिवेणी’ या विषयांवरील विशेषांकांचे संपादन केले आहे. नितेश यांना ‘के. जे सोमय्या गोल्ड मेडलिस्ट बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर’ (2017) हा पुरस्कारही मिळाला आहे. त्यांनी विविध महाविद्यालयीन कार्यक्रमांत, वक्तृत्व स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली आहेत.