कोणत्याही नवख्या प्रांताशी ओळख करून घेण्याची पहिली पायरी म्हणजे तेथील स्थानिक भाषा. मी ओरिया भाषेचे प्राथमिक शिक्षण मसुरीच्या आयएएस प्रशिक्षणादरम्यान सौदामिनी भुयाँ यांच्याकडून घेतले होते. त्यांची शिकवण्याची पद्धत छान होती. त्या भाषा शिकवण्याबरोबर ओडिशाची माहिती आणि वेगवेगळे संदर्भ देत, ओडिशातील खास पदार्थ स्वतः बनवून खाऊ घालत. त्यामुळे शिकणे मजेदार होई. त्यामुळेच मी ओडिशात दाखल प्रत्यक्ष झालो तेव्हा मला तेथील भाषेबद्दल किमान नवखेपणा नव्हता. लवकरच मी स्थानिकांशी मोडक्यातोडक्या ओरियात बोलू लागलो. तेथील लोकांना त्याची गंमत वाटायची आणि ते आमचे कौतुकही करायचे. गंमत म्हणजे मी इकडे ओरियाचे धडे गिरवत असताना घरी, महाराष्ट्रात माझी पत्नी स्मिताही ओडिशात येण्याची तयारी म्हणून ओरियाची बाराखडी गिरवत होती. तिची तयारी ओरिया वर्तमानपत्र वाचता येईल एवढी झाली होती.
त्रिपाठी म्हणून एक वयोवृद्ध शिक्षक आम्हाला ‘गोपबंधू अकॅडमी’मध्ये ओरिया भाषेत शिकवत. त्यांचीही शिकवण्याची शैली छान होती. त्यांच्याकडून आम्हाला भाषेचे व्यावहारिक अंग कळत होते. त्यांनी बाजारात दुकानदाराशी कसे बोलावे येथपासून ते पार ओरिया भाषेतील शिव्यांपर्यंत सगळे शिकवले. ओरिया भाषा मधुर आहे. मराठीचे बरेच शब्द त्या भाषेत सापडतात. काही शब्द तर वऱ्हाडी व अहिराणी बोली भाषांतून आलेले दिसले. ते शब्द इकडे कसे आले असावेत? मी ओडिशा व महाराष्ट्र यांचे नाते काय ते शोधण्याचा प्रयत्न केला, तर मला महत्त्वाचे धागे मिळाले.
मोगल सत्तेचा अंमल औरंगजेबाच्या काळात ओडिशामध्ये होता. मोगलांनी ओडिशाचे आराध्यदैवत असलेले पुरीचे जगन्नाथ मंदिर बऱ्याचदा उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता. मोगलांचा दबदबा औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्या भागात कमी झाला. पुढे, नागपूरकर भोसले यांनी बेरार काबीज केल्यावर थेट बंगालमध्ये धडक मारली होती. त्यांनी जवळ जवळ प्रत्येक वर्षी बंगालवर स्वारी 1740 ते 1751 या काळात केली. त्या हल्ल्यांचा मुख्य उद्देश राजकीय दबदबा निर्माण करणे आणि ‘चौथ’ वसूल करणे हा होता. बंगालचा नवाब अलिवर्दी खान त्या स्वाऱ्यांमुळे पुरता वैतागून गेला होता. त्या गनिमी पद्धतीने केल्या गेलेल्या हल्ल्यांना ‘बुर्गी’ असे म्हणत. ते हल्ले 1751 सालच्या तहानंतर बंद झाले. पुढे, मराठ्यांनी ओडिशात 1751 ते 1803 या काळात राज्य केले. त्या दरम्यान त्यांनी राज्यकारभाराची विस्कळीत झालेली घडी बसवली व प्रशासनाला दिशा दिली. मराठ्यांनी खूप मोठे बदल न करता मोगल काळात चालू असलेली महसूल पद्धतच पुढे चालू ठेवली.
मराठ्यांचे तेथील सर्वात मोठे योगदान काय असेल तर ते म्हणजे पुरीच्या जगन्नाथ मंदिराची घडी बसवणे. मंदिरावर आधीच्या काळात झालेल्या हल्ल्यांमुळे स्थानिकांना खूप असुरक्षित वाटत होते. मराठ्यांनी त्या वातावरणात बदल घडवून आणला. पुरीला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांची डागडुजी केली, जागोजागी विहिरी खोदल्या, अन्नछत्रे उघडली. नागपूरकर भोसले यांनी स्वतःकडून वार्षिक अनुदान मंदिरासाठी सुरू केले. त्यांनी मंदिराच्या उत्पन्नासाठी जमिनीची तरतूद केली व यात्रेकरूंकडून देणग्या मिळतील याचीही काळजी घेतली. त्यांनी मंदिराच्या व्यवस्थापनासाठी चार प्रतिनिधींची नियुक्ती केली, त्यात दोन प्रतिनिधी स्वतःचे ठेवले. मराठ्यांनी केलेले ते काम ओरियाच्या इतिहासात मोठ्या आदराने बघितले जाते. त्याच दरम्यान मराठी व ओरिया संस्कृती यांच्यामध्ये सरमिसळ झाली. उदाहरणच सांगायचे तर, ‘गोंधळ’ व ‘भारूड’ म्हणून महाराष्ट्रात परिचित असलेली लोककला ओडिशात ‘पाला’ या नावाने जिवंत राहिली आहे. मराठीतील अनेक शब्द, अनेक आडनावे ओरियात रुजली आहेत.
– राजेश पाटील rajeshpatilias@gmail.com
(महा अनुभव, नोव्हेंबर-डिसेंबर 2019 अंकावरून उद्धृत)
———————————————————————————-