एकनाथ आव्हाड – दापूर ते दिल्ली…

1
333

एकनाथ आव्हाड यांना ‘साहित्य अकादमी बाल साहित्य पुरस्कार’ घोषित झाला. त्यांचा समावेश आघाडीच्या बाल साहित्यकारांमध्ये होतोच. पुरस्काराने त्यावर शिक्कामोर्तब झाले. त्यांनी त्यांचा जीवनप्रवास नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील दापूर या छोट्या खेड्यातून सुरू केला. मी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाल्यावर त्यांच्याशी गप्पा मारण्याचे ठरवले. कायम शाळेत, पुस्तकात आणि मुलांमध्ये रमणारा हा सरस्वतीपुत्र; त्यांनी त्यांच्या बालपणापासूनची कथा सांगितली…

“मी सिन्नर तालुक्यातील एका खेड्यातील मुलगा. माझा जन्म नाशिक जिल्ह्याच्या त्याच तालुक्यातील दापूर या छोट्या खेड्यात 1972 मध्ये झाला. वडिलांची थोडीफार शेती. आईपण शेतीलाच हातभार लावत असे. शेती ही बेभरवशाची. त्यामुळे कायम आर्थिक विवंचना. आम्ही चार भाऊ, दोन बहिणी. वडील घर कसे चालवत होते ते त्यांचे त्यांनाच माहीत ! त्या खेड्यात मला थोडीफार अक्षरओळख झाली. पण लगेच, वडील आम्हा सगळ्यांना घेऊन पोटाची खळगी भरण्यासाठी आणि नशीब अजमावण्यासाठी 1977 च्या सुमारास मुंबईत आले. आम्ही चेंबूरच्या पी.एल. लोखंडे मार्गावरील एका चाळीत दहा बाय दहाच्या खोलीत भाड्याने घर घेऊन राहू लागलो. चेंबूर उपनगर, लोखंडे मार्ग, तेथे चाळीतील दमट-कोंदट खोली, आजूबाजूचे सामाजिक वातावरण या सगळ्या वातावरणात रुळण्यास खूप त्रास झाला. खेड्यातील स्वच्छ, निसर्गसंपन्न अशा वातावरणातून चेंबूर येथील सामाजिक वातावरणात गुदमरण्यास झाले, पण आई-वडिलांचे कष्ट आणि त्यांची पोटासाठी सुरू असलेली धडपड यांमध्ये आम्ही भावंडे आहे त्या परिस्थितीत रमत गेलो. आमच्यापुढे दुसरा कोठला पर्यायच नव्हता. वडिलांना गोदी कामगाराची नोकरी रोजंदारीवर मिळाली. आम्ही आईबरोबर लोखंडे मार्गावर भाजी विकायचो. रस्त्यावर भाजीची टोपली घेऊन बसायचो. परिस्थिती माणसाला शहाणे करते.

वडिलांनी शिकण्यासाठी म्हणून माझे नाव ‘स्टेशन चेंबूर मुंबई महानगरपालिका मराठी शाळे’त टाकले. पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण त्याच महानगरपालिकेच्या शाळेत झाले, पुढे आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण स्वामी मुक्तानंद हायस्कूलमध्ये झाले. दहावीनंतर चांगले कॉलेज मिळण्यास हवे या उद्देशाने जीवतोड मेहनत केली. आमच्या त्या दहा बाय दहाच्या खोलीतील पोटमाळ्यावर रात्रीचा दिवस केला. चांगले गुण मिळवून दहावीची बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झालो ! सोमय्या महाविद्यालयात अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. मात्र मी कॉलेज लाइफचा आनंद घेऊ शकलो नाही. कौटुंबिक परिस्थिती समोर दिसत होती. आईवडिलांवर भार होऊन चालणार नाही ही जाणीव बळावत होती. मला डी एडचा दोन वर्षांचा शिक्षकाचा कोर्स खुणावत होता. मी परळच्या शिरोडकर अध्यापक विद्यालयातून डी एड पूर्ण केले. एक वर्ष चेंबूरच्या श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन या शाळेत काम केले आणि त्यानंतर लगेच महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून रुजू  झालो.”

आव्हाड जुन्या आठवणींत रंगून गेले होते. त्यांच्या डोळ्यांत संघर्षाच्या ठिणग्या आणि अभिमानाची ‘मेडल्स’ चमकत होती ! त्यांच्या शिक्षक होण्यामागचे माझे कुतूहल जाणून ते  म्हणाले, “इयत्ता पहिलीत जेव्हा मी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये प्रवेश केला, तेव्हाच शिक्षकी पेशाने माझ्या मनात कायमचे घर केले. प्रत्यक्षात मी सातवीत ठरवले, की आपण पुढेमागे याच महापालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करायची ! त्या शाळेत माझ्या शिक्षिका विभावरी भोसलेबाई यांनी माझ्यावर संस्कार केले. त्यांनीच आदर्श, मूल्याधिष्ठित शिक्षकाचे बीज माझ्या मनात रुजवले. त्यांनी वाचनाची आवड माझ्यात निर्माण केली. त्या मराठीच्या तासाला मला वर्गात उभे राहून मोठ्याने पुस्तक वाचण्यास सांगायच्या. बाई मला सगळ्या मुलांसमोर पुस्तक वाचण्यास सांगतात यातच आनंद वाटत असे. नंतर त्यांनी मला मी जे काही पुस्तकात वाचले ते हातात पुस्तक न घेता मी मुलांना गोष्टीरूपात सांगावे असे सुचवले. मी लहान मुलांची गोष्टींची पुस्तके वाचत असे. वाचलेल्या गोष्टी वर्गात मुलांना साभिनय सांगण्याचा प्रयत्न करत असे. त्यातून कथाकथनाची, कथाश्रवणाची आवड निर्माण होत गेली. त्या कथाकथनातून शाळेत परिपाठ कसा घ्यावा हे शिकण्यास मिळाले. पुढे, महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून स्थिरावल्यावर व्याख्यानमाला व कथाकथन यांच्या कार्यक्रमातून पु.ल. देशपांडे, व.पु. काळे, द.मा.मिरासदार, विजया वाड, गिरिजा कीर, शंकर पाटील यांचे कथाकथन ऐकण्यास मिळाले. माझ्यातील कथाकथनकार शिकत गेला. मात्र, त्यावेळी मी एक गोष्ट ठरवली, की मी व.पु. काळे होणार नाही किंवा मिरासदारही होणार नाही. मी एकनाथ आव्हाड होईन ! याचा अर्थ मला त्यांची ‘कॉपी’ करायची नव्हती, तर मला त्यांच्या प्रभावाने आणि त्यांच्याच मार्गदर्शनाने माझी स्वतंत्र कथाकथन शैली निर्माण करायची होती ! माझी स्वतःची ओळख म्हणून मी माझी एक पायवाट तयार करावी असे मला वाटत असे. तोच माझा प्रयत्न असतो.”

“तुमच्यातला लेखक कसा विकसित होत गेला? तुम्ही पहिली कविता कधी लिहिली? तुम्हाला तुम्ही लहान मुलांसाठी लेखन करू शकता याची जाणीव कधी झाली?”

“मी लेखक म्हणून महानगरपालिकेच्या शाळेतूनच घडत गेलो. शाळेतल्या माझ्या विद्यार्थ्यांनी मला लेखक बनवले. महानगरपालिकेच्या शाळांत येणाऱ्या समाजाच्या तळच्या स्तरातील त्या मुलांनी माझे भावविश्व, अनुभवविश्व समृद्ध केले. ती झोपडवस्तीमधील मुले आणि त्यांच्याकडून मिळणारे अनुभव- त्यांच्या संवेदना, त्यांच्या व्यथा यांमधून मला लिहिण्यासाठी विषय मिळत गेले. असे अनेक विषय मला शाळेच्या मुलांकडून मिळत असतात. ते सगळे जीवन मनाला कोठेतरी भिडते. मन अस्वस्थ होते आणि मी लिहू लागतो ! माझ्या पाचवीच्या वर्गातील एक मुलगी. सविता पटेकर. ती मुलगी वर्गात गैरहजर नेहमी असे. मी मुलांकडे तिची चौकशी करत असे, पण तिच्या अनुपस्थितीबद्दल माहिती फारशी मिळत नसे. मी एके दिवशी शाळा सुटल्यानंतर शाळेच्या जवळ असलेल्या झोपडवस्तीत तिच्या घरी गेलो. झोपडीवजा छोटेसे खुराडेच ते. त्या मुलीची आई कचरा वेचण्यास जाई. ती कामावरून आली होती. तिच्या आईने त्यांच्या गरिबीची आणि परिस्थितीची व्यथा मला कथन केली. त्या माऊलीच्या डोळ्यांत पाणी आले. म्हणाली, ‘सर, काय बी करा, पण या पोरीला शिकवा. माझ्यासारखा तिनंबी कचरा येचायचा नाही अशी माझी विच्छा हाय. तिला रोज मी मारते, पण ती काही शाळंत जात न्हाई.’

“मला घरी आलेले पाहून सविताला माझा राग आला होता. तरी मी सविताला बोलते केले. शाळेत न येण्याचे कारण विचारले. मी तिच्यासाठी जे जे शक्य होते ते ते करण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी, मी मुलांची हजेरी वर्गात नेहमीप्रमाणे घेतली. सविताचे नाव पुकारले की रोज एका आवाजात मुले ओरडत, ‘गैरहजर’. पण त्या दिवशी सविताचे नाव पुकारले आणि मुलांनी एकच गलका केला, ‘सविता पटेकर -वर्गात हजर’ ! मला आनंद झाला आणि माझी पहिली कविता लिहिली गेली. नव्हे, त्या विद्यार्थिनीने अप्रत्यक्षपणे मला लिहिते केले. त्या कवितेचे नाव होते- ‘सविता पटेकर -सतत गैरहजर’. ती कविता विद्यार्थ्यांना आवडली. मी त्या कवितेतून तिच्यासारख्या अनेक सवितांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला होता. सविता आणि सविताच्या आईचे दुःख, संघर्ष, स्वप्न असे सगळे त्या कवितेत आहे. खरे तर, ती कविता माझी नाही, त्या सविताची आहे. ती कविता महानगरपालिकेच्या मुखपत्रात प्रसिद्ध झाली. सगळ्या शाळांमध्ये पोचली. ती अनेकांच्या बोर्डावर लावली गेली. दर्शनी फलकावर लिहिली गेली. अनेक शिक्षकांपर्यंत पोचली. तेथून पुढे मी लिहीतच राहिलो. मुलांना भावणाऱ्या कथा, कविता असे माझे लेखन सुरू झाले. माझ्यातल्या लेखकासाठी महानगरपालिकेच्या शाळा आणि समाजाच्या तळच्या स्तरातील ती मुले ही परिस्थिती पोषक ठरली. पुढे, ‘मी तरुण भारत’ या वृत्तपत्रातून बोधकवितांचे सदर लिहू लागलो.”

तुमचे पहिले पुस्तक कोणते? कधी प्रकाशित झाले?

आव्हाड त्यांच्या आधीच्या मुद्याचा विस्तार करत म्हणाले, “मी ‘तरुण भारत’मध्ये बोधकवितांचे जे सदर लिहीत होतो त्याचेच पहिले पुस्तक ‘बोधाई’ या नावाने प्रकाशित झाले. त्या पुस्तकाला विजया वाड यांनी प्रस्तावना लिहिली. माझ्यासाठी त्या मावशी आहेत. त्यांनी माझ्या पहिल्यावहिल्या लेखनासाठी प्रस्तावनेच्या रूपात दिलेले आशीर्वाद माझ्यासाठी महत्त्वाचे ठरले. ‘बोधाई’ या पुस्तकाला छोट्या दोस्तांचा उदंड प्रतिसाद मिळाला. एका महिन्यात एक हजार प्रती विकल्या गेल्या. त्या पुस्तकात बोधकथा, बोधकविता, तालकाव्य असे सगळे एकत्रित असल्याने मुलांना पुस्तक आवडले. त्यानंतर, 2007 साली माझे दुसरे पुस्तक, ‘गंमत गाणी’ हे प्रकाशित झाले. त्या कवितासंग्रहाचे वैशिष्ट्य म्हणजे या सगळ्या कविता जोडाक्षरविरहित आहेत. मी बालवाडी आणि प्राथमिक शाळेतील मुले यांच्यासाठी जोडाक्षरविरहित कविता हा लेखनाचा प्रयोग ठरवून केला होता. मुलांना ‘गंमत गाणी’ही खूप आवडले. त्या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा बालसाहित्यासाठी असलेला ‘कै.वा.गो. मायदेव उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार’ मिळाला आणि महाराष्ट्राला एकनाथ आव्हाड हा बालसाहित्यिक म्हणून परिचित झाला. साहित्यसृष्टीत माझी दखल घेतली जाऊ लागली.”

लहान मुलांसाठीच लेखन करावे असे तुम्हास का वाटते? त्या मागची प्रेरणा काय?

त्यांच्या तोंडून उत्स्फूर्त वाक्य आले, “सर, लहान मुलांचा पिंड महत्त्वाचा. त्या पिंडाचे योग्य भरणपोषण होण्यास हवे. मी मुलांमध्ये रमणारा, महानगरपालिकेच्या शाळेचा शिक्षक असल्याने बालवयात मुलांवर वाचनसंस्कार व्हावा आणि भाषेची आवड त्यांच्यात रुजावी असे मला वाटते, म्हणून मी लहान मुलांसाठी जाणीवपूर्वक लिहितो. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा, की लहान मुलांसाठी खूप सोपे लिहावे लागते, सोपे लिहिणे हे कठीण, आव्हानात्मक आहे. त्याचप्रमाणे मी मला जे चांगले जमते ते मनापासून करतो.”

एकनाथ आव्हाड यांची लहान मुलांसाठी तीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत. काही प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. त्यांनी काव्यकोडी, बडबडगीते, बालकविता, बोधकविता, कुमारकविता, बालकथा, नाट्यछटा, चरित्रलेखन असे विविध अंगी लेखन केलेले आहे. त्यांच्या बालकथा आणि बालकविता यांचा ‘बालकथा कोष’ आणि ‘बालकविता कोष’ यांमध्ये समावेश झालेला आहे. त्यांनी लहान मुलांसाठी लिहिलेली अनेक बालगीते आकाशवाणीवरून प्रक्षेपित झालेली आहेत.

मी विचारले, ‘तमुच्या लेखनातील ठळक वैशिष्ट्ये काय? वेगळेपणा काय?’

आव्हाड म्हणाले, की “जोडाक्षरविरहित बालकविता, कवितेतून काव्यकोडी, म्हणी, वाक्प्रचार, व्याकरण यांवर आधारित सोप्या लयबद्ध कविता हे माझ्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. लहान मुलांसाठी अचूक शब्दोच्चार, भाषासौंदर्य, बोलतानाचे आघात, ध्वनी या अनुषंगाने लयबद्ध कविता ही माझी ओळख आहे. एकीकडे इंग्रजी शाळा अन् इंग्रजी माध्यमाचा वाढता प्रभाव अशा परिस्थितीत केवळ मराठी मुलांमध्ये नाही तर अ-मराठी मुलांमध्येसुद्धा प्राथमिक शिक्षणात मराठी विषयाची आवड निर्माण करण्यासाठी माझ्या बालकविता काम करतात. इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळांमध्ये लहान मुले माझ्या कविता म्हणतात. त्यांना त्या बालकविता आवडतात. त्यांच्यात मराठी भाषेची गोडी निर्माण करण्यात काही प्रमाणात मला यश आले आहे. मी लिहिलेल्या कथा, गोष्टी या केवळ करमणूकप्रधान नाहीत, तर त्यात जीवनमूल्य व संस्कार आहे. अशाच बालसाहित्याची आवश्यकता आहे ना !”

‘बालसाहित्याचा वाचकवर्ग वाढावा, बालसाहित्याचा परीघ विस्तारावा यासाठी काय प्रयत्न व्हावे?’

“मराठी भाषेतील साहित्य अन्य भाषांमध्ये मोठ्या स्वरूपात अनुवादित होण्यास पाहिजे. सगळ्या भारतीय भाषा आणि इंग्रजी भाषा यांत मराठी पुस्तकांचा अनुवाद व्हावा आणि साहित्य वितरण मोठ्या प्रमाणावर व्हावे. लहान मुलांसाठी लिहिलेले माझे कवितासंग्रह हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये अनुवादित झाले आणि साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेले पुस्तक ‘छंद देई आनंद’ हे पुस्तक जवळपास सर्व भारतीय भाषांमध्ये अनुवादित होईल. ‘आनंदाची बाग’ या माझ्या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद सदानंद पुंडपाळ यांनी केलेला आहे. ते पुस्तक ‘दि गार्डन ऑफ हॅपिनेस’ या नावाने इंग्रजीत आले आहे. काव्यकोडी पुस्तकाचा हिंदी अनुवाद नारायण कुलकर्णी यांनी केलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी हिंदी-इंग्रजी अनुवाद करताना कवितेचा मूळ गाभा आणि सौंदर्य कायम राखले आहे. माझी सात पुस्तके अंध मुलांसाठी ब्रेल लिपीत छापली गेलेली आहेत. अंध किंवा दिव्यांग मुलांसाठी असलेल्या विशेष शाळांमध्ये मला निमंत्रित केले जाते. ब्रेल लिपीतील माझी पुस्तके प्रकाशित झाली असल्याने त्या मुलांना ती वाचताही येतात. दादर येथील कमला मेहता अंधशाळेने ‘शब्दांची नवलाई’, ‘मज्जाच मज्जा’ व ‘आनंदाची बाग’ ही पुस्तके त्यांच्या मुलांसाठी खास ब्रेल लिपीत प्रकाशित करून घेतलेली आहेत.”

‘तुमची बालकविता पारंपरिक आणि त्यातून डोकावणारे चंद्र, चांदण्या, फुलबाग, बैलगाडी या गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत असे तुम्हाला वाटत नाही का? विज्ञान, तंत्रज्ञान, संगणक हे आता मुलांचे भावविश्व आहे. बालसाहित्याने कात टाकावी असे तुम्हाला वाटत नाही का?

आव्हाड म्हणाले, की “मी विषय, प्रतिमा, प्रतीके तीच ठेवून त्यामध्ये नावीन्य पेरण्याचा प्रयत्न करतो. मी माझ्या कल्पना आणि विचार यांना विज्ञान-तंत्रज्ञानाशी जोडतो. मुलांना प्रश्न पडण्यास हवेत. त्यांना अद्भुतता काय असते याची जाणीव करून देण्यास हवी. मी माझी कविता नव्या बदलांशी जोडतो. उदाहरणार्थ, मी माझ्या कवितेत केवळ फुलबाग, फुलपाखरू, सुगंध, रंगसौंदर्य नाही तर त्यामधून पर्यावरण, स्वच्छता, प्राणवायू, मानवी जीवन, फुलापानांची वैज्ञानिक माहिती, झाडाचे महत्त्व अशी मांडणी करतो. आकाश, चंद्र, चांदण्या यांबद्दल लिहिताना चांद्रयान, शास्त्रज्ञ, चंद्रावरच्या गमतीजमती, कल्पनेच्या पलीकडील चंद्र, चंद्रावरची शाळा, चंद्रावरची सर्कस असे भन्नाट भन्नाट लिहिले, की ते कालबाह्य ठरत नाही. मुले जुन्या प्रतिमा- संकल्पना यांच्याशी जोडली जाऊ शकतात. ती त्या विश्वात रमतात. कवितेतून केवळ गंमतजंमत असणारी काव्यकोडी, किंवा गणित-विज्ञान विषयांतील काव्यकोडी लिहिली तर मुलांना तशी काव्यकोडी आवडतात. त्यांची अभ्यासाची भीती कमी होते. बालसाहित्यसुद्धा अशा प्रयोगांमुळे काळानुरूप बदलत जाते. अर्थात, तशी सर्जनशीलता आणि लेखनक्षमता त्या त्या लेखकाकडे असण्यास हवी. तसे वेगवेगळे प्रयोग बालसाहित्यामध्ये होत आहेत. बालसाहित्य पारंपरिक राहिलेले नाही. ते विज्ञान-तंत्रज्ञानाशी जोडलेले आधुनिक बालसाहित्य म्हणून लिहिले जाते. बालसाहित्यातून शोध, संशोधन, उत्सुकता, अद्भुतता असे विषय हाताळले जातात.”

‘भारतातील बालसाहित्य आणि विदेशातील बालसाहित्य यांमध्ये फरक काय जाणवतो?’

आव्हाड सर बोलू लागले. “विदेशातील पालक, शिक्षक आणि एकूणच समाज वाचनाबद्दल आग्रही आहे. तेथे वाचनसाक्षरता मोठ्या प्रमाणात आहे. विदेशातील लहान मुलांची पुस्तके, त्या पुस्तकांची छपाई, पुस्तकांचे सादरीकरण, पुस्तकांची बांधणी, आकर्षकता आणि पुस्तकनिर्मिती जाणीवपूर्वक लहान वाचक डोळ्यांसमोर ठेवून केली जाते. लहान वयातच त्यांच्या पंचेंद्रियांचा उपयोग आणि त्यातून लहान मुलांना वाचण्याची आवड निर्माण करणे यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न होतात. त्यांची पुस्तके महागडी असतात, कारण त्या पुस्तकांचे निर्मितीमूल्य हे जास्त असते. महाग असूनही तेथे पुस्तके मोठ्या प्रमाणावर विकली जातात. मराठीत-भारतीय भाषांत तशी पुस्तके किंमतीच्या दृष्टीने परवडणारी नाहीत. विदेशात लहान मुलांसाठी आकर्षक आणि विशेष ग्रंथालये उभारलेली आहेत. तेथे पालक आणि मुले रमतात. त्यामुळे बालवयात वाचनाची गोडी लागते. भारतात बालसाहित्याची निर्मिती अजूनही त्या दृष्टीने होत नाही. भारतात खूप मर्यादा आहेत. आर्थिक परिस्थिती, बालसाहित्यनिर्मिती, प्रकाशन, वितरण आणि पुस्तकनिर्मिती यांचे अर्थकारण जमलेले नाही. शासन, पालक, शाळा, ग्रंथालय आणि ग्रंथ वितरक या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नांतून वाचनसाक्षरता वाढवता येईल.”

मराठी भाषेच्या अनुषंगाने माझा आणखी एक प्रश्न- ‘इंग्रजी माध्यमाच्या शाळा मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. पालकांकडून बालवाडी, अंगणवाडीपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा स्वीकार मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. नर्सरी, प्ले ग्रुप यांपासूनच मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवण्याचा अट्टाहास केला जात आहे. अशा स्थितीत तुमची काव्यकोडी, गंमतगाणी, बालकविता आणि मुळात मराठी भाषा, हे सगळे कसे टिकणार? मराठीत समृद्ध वाटणाऱ्या बालकविता आणि बालसाहित्य यांचे भवितव्य काय?’

एकनाथ आव्हाड म्हणाले, “तुम्ही म्हणताय ती वस्तुस्थिती आहे. मात्र इंग्रजी शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या घरात बोलले मातृभाषेतूनच जाते. मराठी, गुजराती, बंगाली कुटुंबे त्यांच्या घरात त्यांच्या त्यांच्या मातृभाषेतून बोलतात. माझी पुस्तके इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये जास्त विकली जातात, कारण तेथील पालकवर्ग मराठी असतो. दुसरे म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे, सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळांनासुद्धा मराठी विषय सक्तीचा झालेला आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमातील मराठी मुलांनासुद्धा सोप्या शब्दांत मराठी शिकणे आहे. इंग्रजी माध्यमाच्या मुलांच्या बाबतीत प्रत्यक्ष घडलेला प्रसंग सांगतो. मी घुमान येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आटोपून मुंबईला परत येत होतो. मी अमृतसर विमानतळावर उभा होतो. माझ्याबरोबर मराठीतील कवयित्री मंदाकिनी पाटील आणि माजी शिक्षणाधिकारी केळुसकर सर होते. मुंबईचे विमान दीड तास लेट झाले होते. आमच्यासमोर मुंबईच्या इंग्रजी माध्यमाच्या एका शाळेची चाळीस-पन्नास मुले होती. त्यांचे शिक्षकही होते. विमान लेट झाल्यामुळे मुले कंटाळली होती. दंगामस्ती, आरडाओरड सुरू होती. त्यांच्यामुळे विमानतळाची शांतता आणि शिस्त यांनाही बाधा उत्पन्न होत होती. केळुसकर सर मला म्हणाले, ‘आव्हाड, तुम्ही छान कथाकथन करता ना, या मुलांना एखादी गोष्ट सांगा, कविता ऐकवा.’ मी त्या मुलांच्या शिक्षकांशी बोलून मुलांना एका जागेवर एकत्र बसवले आणि पंधरा मिनिटे एक गोष्ट सांगितली. एकदोन कविता ऐकवल्या. मुलांचा गोंगाट थांबला, आश्चर्य म्हणजे गोष्टीला, कवितांना वन्स मोर मिळत होता. गाणी-गोष्टींचा कार्यक्रम पुढे आणखी पंधरा मिनिटे सुरू राहिला. इंग्रजी माध्यमातील मुले मराठी गोष्टी, कविता यांत रमली होती. मुलांनी माझ्याबरोबर फोटो काढले, सेल्फी घेतल्या आणि शिक्षकांनीही माझा फोन नंबर मागितला. माझा हा अनुभव म्हणजे तुमच्या प्रश्नाचे आणि चिंतेचे उत्तर आहे. भाषा संवर्धनासाठी प्रयत्न सुरू ठेवावेच लागतील. मराठी भाषेतील बालसाहित्य हे संस्कारक्षम आणि मराठी, अ-मराठी मुलांना आवडते, पण लेखकांना त्याची परिणामकारकता वाढवावी लागेल. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी सुलभ भारतीचे पाठ्यपुस्तक आहे. त्या पाठ्यपुस्तकात माझा धडा आहे. इंग्रजी माध्यमाच्या शाळेतही सुलभ मराठी आहे.”

आव्हाडसरांचा बालसाहित्य, मराठी भाषा याबद्दलचा आत्मविश्वास त्यांच्या बोलण्यातून जाणवत होता. त्या अनुषंगाने माझा पुढचा प्रश्न, ‘बालसाहित्य लिहिणाऱ्या बालसाहित्यिकांनी मुलांसाठी लेखन करताना काय काळजी घ्यावी?

ते म्हणाले, “लेखन कसे करावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. माझ्यापेक्षाही वयाने आणि अनुभवाने मोठे असलेले अनेक बालसाहित्यिक दर्जेदार लेखन करत आहेत. मी लहान मुलांसाठी लेखन करताना वयोगटाचे भान ठेवतो. सरसकट सगळी लहान मुले एका तराजूत तोलत नाही. वय वर्षे तीन ते सहा म्हणजे शिशुगट, त्यानंतर प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांचा बालगट (वय वर्षे सहा ते आठ) आणि पुढे कुमार गट (वय वर्षे आठ ते बारा). साधारणत: अशी विभागणी करून लहान मुलांसाठी लेखन केल्यास त्यात विविधता येईल. त्या त्या वयोगटातील साहित्याचा दर्जाही उंचावेल. शिशुगटात कृतियुक्त गाणी महत्त्वाची; कुमारगटात भावनेला आवाहन करणाऱ्या कविता महत्त्वाच्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेखकाने मुलांसाठी लिहावे, स्वतःसाठी नाही. मुलांच्या भावविश्वात जाऊन बालसाहित्य लिहिण्यास हवे. बालसाहित्यिकांची किमया शहरातील मुलांना खेड्यात आणि खेड्यातील मुलांना शहरात बालसाहित्याच्या माध्यमातून घेऊन जाणारी असावी. बालसाहित्य वर्तमान विषय, वर्तमान संदर्भ, विविध क्षेत्रांत होणारे बदल यांचे भान ठेवून लिहिले जावे.”

आम्ही गप्पांच्या शेवटच्या टप्प्यात आलो होतो. आव्हाड यांचा दापूरपासून सुरू झालेला आणि दिल्लीपर्यंत पोचलेला साहित्यप्रवास आणि जीवनप्रवास यांबाबतची बरीच गुपिते गप्पांतून उलगडत गेली होती.

शेवटी, समारोपाचा प्रश्न – ‘बालसाहित्यापुढील आव्हाने काय?’

“बालसाहित्य आणि बालसाहित्यिक यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्यास पाहिजे. मुळात बालसाहित्य हे दुय्यम आहे आणि कोणीही लिहू शकतो हा समज डोक्यातून काढून टाकण्यास हवा. वाचनसंस्कृतीचा प्रसार आणि प्रचार, खरे तर बालसाहित्यातूनच मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. स्वत:चे स्वतःसाठी न लिहिता, मुलांचे मुलांसाठी लिहिले गेले पाहिजे.”

एकनाथ आव्हाड हे स्वतः मुलांमध्ये रमतात, एकरूप होतात. साने गुरुजी यांच्या ‘करी मनोरंजन जो मुलांचे-जडेल नाते प्रभूशी तयांचे’ या ओळी एकनाथ आव्हाड यांच्यासाठी समर्पक आहेत. त्यांच्या कविता ‘बालभारती’च्या पाठ्यपुस्तकातून शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. त्यांच्या कवितांचा समावेश मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील ‘संगीत अभ्यासक्रमा’मध्ये झालेला आहे. आव्हाडसरांची कविता ‘बालभारती’च्या उर्दू माध्यमाच्या पाठ्यपुस्तकात आहे. त्यांचे कवितासंग्रह, कथासंग्रह नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठांमध्ये एम एच्या अभ्यासक्रमात लागलेले आहेत. काही विद्यार्थी त्यांच्या समग्र बालसाहित्यावर पी एचडी करत आहेत. सदानंद पुंडपाळ यांनी ‘एकनाथ आव्हाड यांच्या बालकविता: स्वरूप आणि शोध’ हा त्यांच्या बालकवितांवर संशोधनात्मक ग्रंथ लिहिलेला आहे. सुरेश सावंत आणि मथू सावंत यांनी ‘एकनाथ आव्हाड यांचे बालसाहित्य, बालसमीक्षकांच्या नजरेतून’ हे पुस्तक संपादित केलेले आहे.

एकनाथ आव्हाड 9821777968 eknathavhad23@gmail.com

– नरेंद्र पाठक 9167406050 chaitreya@yahoo.com

About Post Author

1 COMMENT

  1. खरंच फार सुंदर लिहिलंय डिजिटल जमान्यामध्ये या गोष्टीची गरज आहे आणि ते साध्य करण्याचा प्रयत्न केला खूप सुंदर असाच प्रयत्न करत रहा आणि असेच पुढे वाटचाल चालू ठेवा असेच यश मिळत राहो अशीच प्रगती होत राहो कळावे तुमच्या कृपा विलासो सुनील चंद्रभान काकड मुक्काम पोस्ट देवठाण तालुका अकोले जिल्हा अहमदनगर फोन नंबर 95 95 52 73 73

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here