ऋतुसंहार प्रदर्शन

0
32

ऋतुसंहार प्रदर्शन

– प्रतिनिधी

कवी-चित्रकार षांताराम पवार यांची कारकीर्द धगधगती आहे. ते वयाचा अमृतमहोत्सव साजरा करण्याच्या टप्प्यावर आले तरी त्यांची निर्मिती-ऊर्जा शांत झालेली नाही. उलट, सभोवतालच्या परिस्थितीच्या दारूणतेबरोबर तिचा तडफडाट वाढलेला आहे. त्यांचा पूर्वीचा कलासक्त सोस आता भेदकतेने व्यक्त होतो. त्यांनी योजलेले ‘ऋतुसंहार’ हे प्रदर्शन म्हणजे त्यांच्या अस्वस्थेतेचे प्रतिक होते. प्रदर्शन महिन्यापूर्वी जे.जे. उपयोजित कला शिक्षणसंस्थेच्या दालनात भरले होते. प्रदर्शनाला निमित्त होते पवार यांच्या कवितेचे. ती कविताच मुळी अस्वस्थतेमधून जन्माला आली. माणसाने सध्या निसर्गनाश चालवला आहे आणि वर मानभावीपणे तो पर्यावरण रक्षणाच्या गोष्टी बोलत आहे! हा जो मानवी जीवनातला खोटेपणा आहे त्यामधून पवार यांच्या ‘ऋतुसंहार’ या कवितेचा जन्म झाला. ती कविता ‘थिंक महाराष्ट्र’ या आपल्या वेबसाईटवरच सार्वजनिकरीत्या प्रथम अवतरली ! त्यानंतर पवार यांना ती एक कॅम्पेनच व्हावी असे वाटले. त्याचाच एक भाग म्हणजे हे प्रदर्शन.

पवार स्वत: या कवितेबद्दल आणि त्यांच्या तडफडाटाबद्दल सतत आवेगाने अनेक लोकांशी बोलत राहिले. त्यांची भूमिका ढोबळपणे अशी मांडता येईल:

“मी गिरणगावातला माणूस. तिथं पाण्याचं दुर्भीक्ष्य. ज्या दिवशी आमच्या गावात पाणी असे तो आमचा दिवाळसण ! लोक सतत पाण्याची वाट बघत असत. एक दिवस, असाच पाण्याची वाट बघत पेपर वाचत बसलो होतो. पेपरमध्ये छोटीशी बातमी होती बिहारमध्ये महापूर आल्याची. कारण काय, तर हिमालय वितळत होता ! पण याचं मला काही विशेष वाटलं नाही, कारण त्या महापूराचं पाणी माझ्या दारापर्यंत पोचलं नव्हतं. आमच्याकडे एखादी पाईपलाईन फुटली तर महापूर यायचा, तसंही काही झालं नव्हतं.  मग त्याचाही फार विचार केला नाही. नंतर मी विसरूनच गेलो. विशेष म्हणजे त्याच दरम्यान मी

पुणे-महाबळेश्वरला जाऊन आलो होतो. तिकडचं वातावरण बदलल्यासारखं वाटलं, पुण्या-महाबळेश्वरला असणा-या तापमानापेक्षा ते अधिक जाणवायला लागलं आणि मला ‘टाइम’ मॅगझीनमधल्या बातमीचं जे ओझोन वायुला भोकं पडलीत त्याबद्दल वाचलं होतं त्याची लिंक लागली, ती हिमालय पर्वत वितळू लागल्याची आणि त्यामुळे बिहारमध्ये महापूर आल्याची. मी कवी असल्यामुळे पुढचं व्हिजन इमॅजिन करू लागलो. जर हे असंच चाललं म्हणजे हे कशामुळे झालं तर पर्यावरणामुळे जसं की पृथ्वीचं कवच जो ओझान वायू, वृक्षतोडी वगैरेंसारख्या आपल्याच चुकीमुळे सूर्याची प्रखरता वाढली त्यामुळे पृथ्वीच्या कवचाला म्हणजे ओझोन वायूच्या थराला भोकं पडली. कविता सुचली नाही तर झाली! हे खूप महत्त्वाचं.

षांताराम पवार यांची जे.जे. कॉलेजमधील प्राध्यापक म्हणून कारकीर्द अनेक कारणांनी गाजली. त्यांचा वावर कॉलेज वगळता नाटय व साहित्य-संस्कृती क्षेत्रात सर्वत्र असे. त्यातून काही नाटकांचे नेपथ्य, काही पुस्तकांची मुखपृष्ठं–मांडणी, काही प्रदर्शनांसाठी उभे केलेले स्टॉल्स असे त्यांचे विविधढंगी कर्तृत्व होते. त्या ओघात ते कविताही लिहित राहिले व फाडत गेले. त्यांना गप्पांचा सोस भारी होता. पुन्हा सर्व गोष्टींवर त्यांना आसुसून बोलायचे असे. त्यांच्या या मैफलीत एका बाजूला दामू केंकरे आणि दुस-या बाजूला सदानंद रेगे, अशोक शहाणे, दिलीप चित्रे असे मात्तबर असत. ते सर्व पुढे आपापल्या क्षेत्रात ‘स्वयंभू श्रेष्ठ’ ठरले. पवारांची खासियत व्यक्त झाली ती शिक्षकी पेशातून. त्यांच्याइतका बांधील राहिलेला शिष्यपरिवार दुस-या कोणाही शिक्षकाला लाभला नसेल. रघुवीर कुल त्यांना गुरूजी म्हणूनच संबोधतो तर रंजन जोशी त्यांचे वर्णन ‘मानगुटी बसलेला वेताळ’ असे करतो. विनय नेवाळकर हा बहुगुणसंपन्न परंतु लौकिकविन्मुख कलाकार पवारसरांच्या दिमतीस असलेला गेली कित्येक वर्षे आढळून येतो. याशिवाय अरूण काळे, विकास गायतोंडे, नलेश पाटील असे पवारसरांचे शिष्य उच्चपदी जाऊन पोचले आहेत.


पवार यांच्या ‘ऋतुसंहार’! या कवितेचा अर्थ त्यांच्या पंचवीस विद्यार्थ्यांना जसा भावला  तसा त्यांनी तो प्रगट केला. त्याचे प्रदर्शन म्हणजे ‘ऋतुसंहार’!  त्यामध्ये कोणी चित्रे काढली तर कोणी मांडणीशिल्प रचले. हे वेगवेगळे आविष्कार पाहत असताना मन थक्क होऊन जात होते. अविनाश गोडबोले यांनी उभे केलेले कॉक्रिटचे जंगल, अरूण काळे यांनी साक्षात ढगावरच घातलेला कु-हाडीचा घाव, रतन गोडबोले यांनी फाशीला टांगलेला पक्षिसमूह, दिलीप शिवलकर यांनी छायाचित्र व संगणकीय प्रणाली यामधून उभे केलेले मातीचे दालन, दीपक घारे यांनी कवितेचे भीत्तिचित्र मांडून घडवलेली कारणमीमांसा, रंजन जोशी यांनी भावव्यक्त केलेली अधोगतीची कमान…, प्रत्येक नमुना निसर्ग–हासाची प्रत्ययकारी जाणीव देणारा. सर्वांत सहज कळणारे परंतु भेदक चित्र होते ते गंगाधरन यांचे, तीन फोटोफ्रेम्सचे. पहिल्या फ्रेमध्ये निर्माता ब्रम्हा, दुस-या फ्रेमध्ये पालनकर्ता विष्णू आणि तिस-या फ्रेमच्या जागी त्यांनी आरसा टांगला होता, म्हणजे संहारकर्त्या शंकराच्या जागी आपलीच छबी दिसत असे! यापेक्षा वेगळा ‘ऋतुसंहार’ तो काय असणार?

– प्रतिनिधी

About Post Author

Previous articleकधी येईल स्वप्नातली ती परिवहन व्यवस्था?
Next article‘आयपॅड’वर मराठी पुस्तके! (Marathi Books On Ipad)
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.