ऊस, राजगिरा, साबुदाणा, बटाटा, मिरची

0
26
ccport2

     ऊस, राजगिरा, साबुदाणा, बटाटा, मिरची ही मंडळी आपल्या स्वयंपाकघरातली फार जुनी पाहुणी आहेत. ह्या पुरातन आगंतुकांपासून ते सुबाभळीपर्यंत अनेक वनस्पती आपल्याकडे पृथ्वीच्या नाना कोपर्‍यांतून आलेल्या आहेत आणि येत आहेत. हे जागतिकीकरणच!

     ह्या वनस्पतीविस्ताराला, त्या जगभर पसरायला आर्थिक, राजकीय म्हणजे शेवटी माणसांची प्रेरणा कारणीभूत होती; तर नारळाच्या भौगोलिक विस्ताराला समुद्राची! भारतीयांच्या प्रचलित आहारात ह्यामुळे फारच मोठे बदल झाले. आहारातले बदल आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा विविध आघाड्यांवर परिणाम दाखवतात, आयर्लंडमध्ये बटाटा आला व लोक जगले, त्याच्यावर रोग आला तेव्हा परागंदा झाले.

     ह्या पार्श्वभूमीवर आपण ह्या नवागतांचे काय केले? एखाद्या कल्पनेचे मुक्तपणे, विनाविकल्प स्वागत कसे होते ह्याचा हा वस्तुपाठ आहे. काही आंदोलने करावी लागली नाहीत, जाहिराती कराव्या लागल्या नाहीत की तज्ञसमिती बोलावावी लागली नाही. काही आगंतुक आपले निराळेपण जपत उपासाच्या यादीत गेले, मिरचीसारखे काही रोजच्या आहारात रूढ झाले, मक्यासारखे काही पाहुणे होते की नाही हेही विवादास्पद झाले आहे. इथे पुन्हा भारतात प्रांतवार वैविध्य आहेच. तसे, बाहेरून आलेले सगळेच रुजले नाही: वाइन किंवा विनिगर यांचा आपल्या स्वयंपाकात शिरकाव अजूनही अभावानेच झाला आहे. आपल्याकडून फिजीपर्यंत गेलेला चिकू सामोआमधे मात्र पाय रोवू शकलेला नाही. राजगिरा, बटाटा वगैरे आपल्याकडे टिकून राहिले ते त्यांच्या पोषकतेमुळे, चवीमुळे किंवा सुलभ जोपासणीमुळे. त्यांनी आपले स्थान भारताच्या समृद्ध खाद्यभांडारातही निर्माण केले आहे, इतके की त्यांच्याशिवाय रोजचा स्वयंपाक नक्की अडेल!

     उपयोगी कल्पनांचा प्रसार ही गोष्ट अटळ आहे, हे मान्य केले तर त्यातून तात्कालिक फायदा कोणी करून घ्यायचा एवढाच प्रश्न उरतो. अशा कल्पनांना पाय हे फुटतातच, योजक लोक त्यातून पैसा म्हणा, सत्ता म्हणा साध्य करून घेतात. भारतीय, विशेषत: हिंदी चित्रपटांबद्दल सर्वसामान्य सुशिक्षित प्रतिक्रिया ही बहुदा प्रतिकूल असते. अभिरुची वगैरे जरा वेळ बाजूला ठेवून (हॉलिवूडशीच तुलना असल्याने ते क्षम्य आहे) आपण चित्रपटांकडे, खपणारा माल म्हणून का बघत नाही? चिनी, तुर्की, कझाकी, लाओशियन असे, आंतरराष्ट्रीय सभा-संमेलनांत भेटणारे सहकारी शास्त्रज्ञ भारतीय माणसाशी हटकून बोलतात ते भारतीय चित्रपटांबद्दल! आमच्या ओळखीतल्या एका टॅक्सीवाल्याचा जीव, तो सद्दामच्या इराकमधे असताना केवळ अमिताभ बच्चनचा गाववाला म्हणून वाचला होता! एकेकाळी आपल्याकडून पसरलेल्या हिंदू-बौद्ध धर्मसंस्कृतीचा ठसा आजही जिथे दिसतो अशा अफगाणिस्थान ते जॉर्जिया ते जपान एवढ्या प्रदेशात आपल्या चित्रपटांना, संगीताला बाजारपेठ आहे. आपल्यापैकी कितीजण त्याचा लाभ घेताहेत? हेही लक्षात घ्यायला हवे, की इजिप्तच्या चित्रसृष्टीला तिलांजली द्यायला हॉलिवूडच्या बरोबरीने भारतीय चित्रपट जबाबदार आहेत. सांस्कृतिक जागतिकीकरणाचे आपण फक्त ‘बळी’ नसून पेंढारीही आहोत, आपल्या नकळत. जगामधे आपले सांस्कृतिक वर्चस्व प्रस्थापित करेल अशी ही एक गोष्ट आपल्याकडे आहे, कारण इतर पर्याय असून लोक तिची मागणी करतात.

     सुशिक्षित, विशेषत: परदेशात असलेले तथाकथित उच्चभ्रू लोक ज्यांना नाके मुरडतात, पण जागतिकीकरणामधले जे आपले दुसरे बलस्थान आहेत ती म्हणजे आपली तिकडची काही माणसे. अमेरिकेतले पटेल, युरोपातले पंजाबी, गल्फमधले केरळी हे सारे शिक्षण, पैसा, कौटुंबिक आधार, काहीही नसताना सुबत्तेच्या देशांत जातात. बहुधा अवैध मार्गाने, स्वत:च्या हिमतीवर. त्यांच्यात सरकारची शैक्षणिक गुंतवणूक जेमेतेमच असते. ते विशीतच परदेशी जातात म्हणून इकडच्या आरोग्यव्यवस्थेला फारशी तोशीस लावत नाहीत. त्यांनी आयफेल टॉवरखाली विकलेल्या चण्यांचे युरोज मात्र येतात भारतात, सरकारचा निव्वळ नफा म्हणून. हे आपले ‘कोलंबस’ आणि ‘गामा’ आपल्या इतर खास भारतीय मालासाठी परदेशात बाजारपेठ निर्माण करतात, ती वेगळीच. थकत चाललेल्या युरोपीयन अर्थव्यवस्थेत आपण आपल्या ह्या जिगरबाजांच्या हिमतीवर अढळपद मिळवू शकतो. ही हुन्नरी माणसे आपल्याकडे भरपूर आहेत. आपण ह्या लोकांचा आदर करायला हवा, ते जर फ्रांकफुर्ट-पॅरिसमधे कधी-कुठे दिसले, तर नजर न चुकवता त्यांच्याशी किमानपक्षी चार शब्द बोलायला हवे. ती भारतीय धडाडी, महत्त्वाकांक्षा आणि धाडस ह्यांची निर्यात असते. तिची कदर करायला हवी. प्राप्त परिस्थिती बदलायच्या, परदेशी समृद्धीसाठी हवे ते धाडस करायच्या जुन्या युरोपीयन धडाडीने आजची जागतिक वित्तसारणी निर्माण केली आहे. ती बदलायची संधी आपल्याला आहे ती ह्या लोकांमुळे.

     अनुकरणीय कल्पनांचा, आहे त्याहून वेगळे कल्पू शकणार्‍या माणसांचा प्रसार पूर्वापार होत आलेला आहे. त्यात आपल्या ज्ञात वास्तवाचा लोप आणि म्हणून पर्यायाने संपूर्ण मानववंशाची हानी होते असे मानायची पद्धतही जुनीच आहे. स्वत:चे, स्वत:च्या जीवनकालाचे स्थान एकूण मानवेतिहासात किती हे ठरवायचा व त्या आधाराने जगबुडीची भाकिते वर्तवायचा अधिकार प्रत्येक पिढी हिरिरीने बजावत आलेली आहे. त्यातला खरा मुद्दा असतो तो घडणार्‍या बदलांच्या वेगाचा. संवादमाध्यमे, दळणवळणाची साधने ह्यांतल्या आधुनिक वेगाचा, प्रगतीचा लाभ घेता यावा, पण त्या अनुषंगाने येणारे बदल मात्र स्वत:च्या कलाकलाने व्हावेत ही अपेक्षा अव्यवहार्य आहे. अनुकूल किंवा प्रतिकूल बदलांशी जुळवून घेतल्यानेच उत्क्रांती शक्य झाली आहे हे विसरणे कुणालाही परवडण्यासारखे नाही.

संपर्क : ऋचा गोडबोले – भ्रमणध्वनी : 9819321852, इमेल : rcagodbole@gmail.com

आकडेवारीचे फुलोरे

{jcomments on}

About Post Author