उजनी हे गाव नागपूर – सोलापूर महामार्गावर लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले आहे. तेरणा नदीच्या काठावरची उजनी दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. तेथे महावितरणचे १४४ केव्ही उपकेंद्र आहे. तेथून अर्ध्या महाराष्ट्राची वीज वळते. सोलापूर जिल्ह्यातही एक उजनी आहे. ती तेथील धरणासाठी प्रसिद्ध आहे. म्हणूनच लातूरची उजनी ओळखण्यासाठी त्यास ‘लाइटची उजनी’ असे संबोधन प्राप्तप झाले आहे. पण उजनीची त्याहून मोठी ओळख म्हणजे तेथील घट्ट, स्वादीष्ट बासुंदी! त्या गावाची ‘बासुंदीची उजनी’ म्हणून महाराष्ट्रभर ओळख निर्माण झाली आहे.
उजनीत साधारणपणे ऐंशी वर्षांची बासुंदीची परंपरा आहे. तेथे 1968 साली बासुंदीच्या व्यवसायाला सुरुवात झाली. त्या परिसरात दुधदुभते मुबलक प्रमाणात आहे. त्यातून पूरक व्यवसाय सुरू करण्यासाठी तेथील समुद्रजोशी परिवाराने सर्वात आधी बासुंदीचा व्यवसाय सुरू केला. उजनी हे गाव सोलापूरहून लातूर, नांदेडकडे आणि पुढे विदर्भाकडे जाण्यासाठीच्या रस्यावरील एक स्टॉप म्हणून लोकांना ठाऊक होते. मात्र तेथील बासुंदीच्या चवीचा गोडवा पंचक्रोशित प्रसिद्ध पावला आणि उजनी हा कायमस्वरूपी थांबा झाला. तेथे लांब पल्ल्याच्या बस, खासगी गाड्या बासुंदीसाठी हमखास थांबू लागल्या. उजनीतील गर्दी वाढत गेली आणि त्या प्रमाणात बासुंदीचा पुरवठा करण्यासाठी नवनवीन हॉटेल्स सुरू होत गेली. आज उजनीत रस्त्याच्या दुतर्फा बासुंदीचा व्यवसाय करणारी वीस हॉटेल्स आहेत. तेथील गावकरी उजनीची ‘महाराष्ट्रात बासुंदीसाठी प्रसिद्ध असलेले एकमेव गाव’ अशी ओळख अभिमानाने सांगतात.
उजनीची बासुंदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. ती घट्ट आणि लालसर रंगाची असते. त्यात कुठलाही फ्लेवर वापरला जात नाही. बासुंदी दूध आणि साखरेचे योग्य मिश्रण करून भट्टीवर आटवून तयार केली जाते. तिला लाभलेल्या सुमारे ऐंशी वर्षांपासूनच्या परंपरेमुळे त्या बासुंदीची चव चाखलेले खवय्ये महाराष्ट्रभर पसरले आहेत. उजनीच्या बासुंदीला मुंबई ते नागपूरपर्यंत सर्वत्र बारमाही मागणी असते. ‘महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळा’ने मुंबईकरांना उजनीच्या बासुंदीची चव कळावी म्हणून दिनदयाळ समुद्रजोशी यांना ‘गेट वे ऑफ इंडिया’ परिसरात प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी तीन वेळा निमंत्रित केले होते. उजनीची बासुंदीची चव सोळा लाख लोकांनी ठाण्यातील एका महोत्सवात चाखली होती.
उजनीत दररोज चार हजार लिटर दुधापासून बासुंदी बनवली जाते आणि तेवढी बासुंदी रोज फस्तही होते. एक लिटर दुध आटवल्यानंतर पाव किलो बासुंदी तयार होते. उजनीत आसपासच्या गावांमधून दिवसाला दीड हजार लिटर दुधाचे संकलन होते. व्यापारीही बासुंदीच्या दर्जाबाबत हयगय करत नाहीत. अन्य ठिकाणी बासुंदी तयार करताना कढई भट्टीच्या खाली उतरवून मग त्यातील मिश्रणात साखर मिसळली जाते. त्यामुळे साखर कढईला चिकटते. तसेच, दूध आणि साखर एकसंध करताना मिश्रण हलवण्यात थोडीही चूक झाली तर कढईतील मिश्रण वाया जाण्याची भीती असते. उजनीत वेगळी पद्धत वापरली जाते. कढईतील मिश्रण भट्टीवर उकळले जात असतानाच त्यात साखर मिसळली जाते. त्यामुळे साखरेतील रासायनिक घटक नष्ट होतात आणि बासुंदीचा रंग लालसर होतो. तसेच बासुंदीचा बॅकअप एकदिवस अधिक मिळतो.
समुद्रजोशी सांगतात की, उजनीतील रस्त्यावरून दररोज प्रवास करणाऱ्या पंच्याहत्तर बस आणि हजारोंच्या संख्येने जाणारी इतर खासगी वाहने बासुंदीसाठी हमखास थांबतात. वाढदिवस, सण आणि घरगुती कार्यक्रम यांसाठी बासुंदीची मोठी मागणी असते. त्याकरता महिना महिना आधी ऑर्डर दिली जाते. बासुंदीची मागणी वाढली, ग्राहक वाढले, तशी चांगली सेवा देण्यासाठी सुधारणा झाल्या. बासुंदी पूर्वी प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये बांधून दिली जात होती. आता त्याची जागा कंटेनरने घेतली आहे. व्यापारी पॅकिंगचा दर्जा सुधारल्याने व्यवसाय अडीचपट वाढल्याचे सांगतात. उजनीतील त्या वीस दुकानांच्या माध्यमातून परिसरातील चारशे व्यक्तींना रोजगार मिळाला आहे.
उजनीच्या बासुंदीसोबत खवय्यांना आकर्षित करण्यासाठी उजनीचा चिवडा आणि कंदी पेढेही प्रसिद्ध आहेत. मात्र बासुंदी हे नेहमीच तेथील आकर्षणाचे केंद्रस्थान राहिले आहे. बासुंदीच्या निर्मात्यांनी त्या पदार्थाचा दर्जा टिकवून ठेवल्याने लोक तेथे वर्षानुवर्षे विश्वासाने जातात. माहेरवाशीणींनी माहेरी जाताना, बाजाराला आलेल्या लोकांनी घरी परतताना उजनीची बासुंदी नेणे हा शिरस्ताच आहे. उजनीकरांनी बासुंदीचा दर्जा राखल्यामुळे उजनीच्या बासुंदीला लंडनमधूनसुद्धा मागणी आली आहे.
– मकरंद कुलकर्णी, औरंगाबाद
(महाराष्ट्र टाइम्स, शनिवार, 24 मे 2014 वरून उद्धृत)
Khup sundar basundi.nice
Khup sundar basundi. Nice.
Start a permenant outlet in
Start a permanent outlet in Thane & Dombivli. These two markets are known as notorious but sensitive & completely dominated by paying class who is ready to pay for quality. I bet you will not regret.
माहीती दिलेली खुप आवडली
दिलेली माहिती खूप आवडली.
Comments are closed.