मानवी क्रौर्याच्या परिसीमांचं दर्शन दुस-या महायुद्धातल्या नाझी अत्याचारांमध्ये दिसतं. माणूस किती क्रूर होऊ शकतो? याच्या फक्त विचारातीत शक्यतांना नाझी छळछावण्यांत प्रत्यक्षात आणण्यात आलं होतं. अॅन फ्रॅंकची डायरी असो किंवा जी.ए. कुलकर्णी यांनी भाषांतरित केलेलं ओल्गा ल्योगेलचं ‘रात्र वै-याची आहे’ असो, किंवा वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेलं कुमार नवाथे यांचं ‘नाझी नरसंहार’ असो, जर्मनीतल्या छळछावण्यांतल्या यातनांचं डॉक्युमेंटेशन आपणांस भेटतं – अंगावर काटा आणतं.
व्हिक्टर फ्रॅंकेलचं ‘मॅन इन सर्च ऑफ मीनिंग’ हे माझं अतिशय आवडतं पुस्तक आहे. आयुष्यात कोसळून जाण्याचे जेव्हा जेव्हा क्षण आले – तेव्हा तेव्हा या पुस्तकानं मला सावरलं. जगण्याचा अन्वय लावत, ‘अर्थ’ शोधणा-या डॉ. फ्रॅंकेलनं मला प्रत्येक ठेचेसमोर मोठी रेष काढायला ऊर्जा दिली. डॉ. फ्रॅंकेल हे नावाजलेले मानसोपचारतज्ञ – त्यांची नाझी छळछावणीत रवानगी झाली. त्या क्षणापासून ते शेवटी युद्धाच्या टोकाला काही छळछावण्यांत माणसं अन्नाच्या अभावानं एकमेकांना खाऊ लागली या टोकाच्या वास्तवापर्यंत प्रत्येक क्षणाला डॉ. फ्रॅंकेल यांनी नोंदवलं आहे. ‘माणूसपण’ मारून टाकण्याच्या प्रत्येक नाझी-प्रयत्नाला त्यांनी आपलं ‘अर्थ’ शोधणारं मन कसं जिवंत ठेवलं याची नोंद म्हणजे ‘मॅन इन सर्च ऑफ मीनिंग’.
‘हॉलोकास्ट’मध्ये फक्त ज्यू नव्हे तर ज्यांना ‘जिप्सी’ म्हणून ओळखलं जातं ते रोमान, कॅथलिक, गे, लेस्बियन अशा जवळ जवळ अकरा दक्षलक्ष व्यक्तींचं शिरकाण करण्यात आलं. लहान मुलं, स्त्रिया, पुरूष, अपंग, आजारी – कोणाला म्हणजे कोणालाही यातून निसटता आलं नाही. आऊशवित्झ आणि दखाऊच्या छावण्यांत दाखल झालेल्या सुरूवातीच्या ज्यूंना आपल्याला मारून टाकणार आहेत याची तर कल्पनादेखील नव्हती. स्पिलबर्गचा ‘शिंडलर्स लिस्ट’ किंवा त्याहून अंगावर काटा आणणारा अलॉं रेनेचा ‘नाईट अॅण्ड फॉग’ पाहिल्यावर त्या क्रौर्याच्या अमानवी मिती डोळ्यांसमोर येतात. अॅडॉल्फ हिटलर नावाचा क्रूर माणूस या सा-या हत्याकांडाच्या पाठीमागे होता – ‘माणूस’ म्हणून त्याची गणती तरी कशी करायची? असा प्रश्न पडतो. काय करायचं अशा वांशिक विद्वेषानं भरलेल्या इतिहासाचं? काय शिकणार आपण त्यातून?
१९७६ मध्ये अमेरिकेतल्या बॉस्टनमध्ये दोन शाळाशिक्षकांनी यातून येणा-या पिढ्यांना नवीन धडा शिकवायचा असं ठरवलं आणि त्यातून जवळ जवळ एकोणीस लाख विद्यार्थ्यांना ‘माणूसपणा’ची ओळख करून देणा-या ‘फेसिंग हिस्ट्री अॅण्ड अवरसेल्व्हज’ या कोर्सची निर्मिती झाली. त्या दोन शाळा-शिक्षकांपैकी एक जण होती मार्गो स्टर्न स्टॉर्म. ती अजूनही या नॉनप्रॉफिट संस्थेची कार्यकारी संचालक आहे. हॉलोकास्टच्या शिक्षणातून विद्यार्थ्यांना वंशवाद, वांशिक हत्याकांड, हिंसा याबद्दल जागरूक करायचं हे त्यांचं ध्येय आहे. जागं करणारा ज्ञानाचा क्षण कसं परिवर्तन घडवून आणू शकतो हे पाहायचं तर ‘फेसिंग हिस्टरी…’च्या प्रकल्पाकडे पाहावं लागतं. काय आहे हा प्रकल्प?
‘इतिहासाला आणि स्वत:ला सामोरं जाताना’ हे या प्रकल्पाचं नाव आहे. त्याच्या केंद्रस्थानी आहे त्यांचं एक हॅण्डबुक. हॉलोकास्टमध्ये जे घडलं ते घडण्यापूर्वीची सामाजिक परिस्थिती, इतिहास, जातीय विद्वेषाची कारणं या सा-या इतिहासासकट मुलांच्या शिक्षणाला सुरूवात होते. पण फक्त इतिहास शिकणे या टप्प्यावर हा प्रकल्प थांबत नाही. तर एक व्यक्ती म्हणून आपण काय करू शकतो अशा वातावरणात? असा प्रश्नही विचारला जातो. आपली अस्मिता कशी बनते? आपण जे आपल्यासारखे नाहीत त्यांचा द्वेष का करतो? या द्वेषाची पाळंमुळं आपल्या अस्मितेशी निगडित भयामध्ये कशी असतात? हॅण्डबुकच्या प्रत्येक पानावर वाचणा-या विद्यार्थ्यांला त्या इतिहासाशी आणि त्या इतिहासातून वर्तमानाशी कसं जोडायचं? याचे धडे मार्गोनं आणि त्यांच्या टीमनं तयार केले आहेत.
मी याचं प्रात्यक्षिक पाहायला न्यू यॉर्कच्या ‘फेसिंग हिस्टरी’च्या शाळेत गेले. वर्ग चालू होता. वर्गशिक्षिकेनं मला आत बसायची परवानगी दिली. सातवी-आठवीतली मुलं वंशवादाला प्रश्न करत होती. एक विद्यार्थी उभा राहिला. तो म्हणाला, “सगळे स्कूल टिचर्स डिमोक्रॅट्संना का मत देतात?” मग रिपब्लिकन-डिमोक्रॅट यांच्या वेगवेगळ्या धोरणांवर मुलं बोलायला लागली. धडा चालू होता जर्मन राजकीय पक्षांबद्दल. पण मग चर्चा अमेरिकेपर्यंत आलीच ओघानं. दोन देशांतल्या पक्षीय राजकारणाच्या तुलनेपासून ते अमेरिकन वंशवादापर्यंत अनेक विषयांवर त्या मुलांचा गट तावतावानं बोलत होता. सारे विद्यार्थी न्यू यॉर्कच्या ‘इनरसिटी’ म्हणजे शहरातल्या श्रमिक वस्तीतले होते. दुस-या साहित्याच्या वर्गात नववीचा वर्ग शेक्सपीयरच्या ‘ऑथेल्लो’वर चर्चा करत होता. ते नाटक बसवणार होते आणि त्या वर्गात ऑथेल्लोच्या ‘मूर’ अस्मितेवर विद्यार्थी वाद घालत होते.
तिस-या तासाला, मी मुद्दामहून सायन्स क्लासमध्ये गेले. जीवशास्त्राचे बेसिक धडे, डीएनए- गुणसूत्रे शिकताना – सायन्स टिचरनं ‘युजेनिक्स आणि त्याचा हॉलोकास्टमधला वापर’ यावर छोटं प्रेझेंटेशन दिलं. मुलांनी शास्त्राची नाळ समाजापर्यंत कशी जोडली जाते यावर वर्गात चर्चा केली.
हिटलरला वेडा, राक्षस, अतिरेकी, अघोरी माणूस असं संबोधलं, की नाझी अत्याचार समजून घेता येत नाही. पण त्यानंही ‘माणूस’ म्हणूनच हे शिरकाण केलं हे तपासायचं ठरवलं, की माणूसपणाच्या आणि प्रतिकाराच्या शक्यता तपासता येतात. ज्या प्रत्येकानं हिटलरचे आदेश पाळण्यापासून ते त्याला निमूटपणे समर्थन देण्यापर्यंत भूमिका निभावल्या, त्या प्रत्येक भूमिकेची चिरफाड मुलं करु शकत होती. हॉलोकास्टचा अनभुव केंद्रस्थानी ठेवून त्यातून काय शिकायचं? काय बदलायचं? कसं बदलायचं? अस्मितेच्या राजकारणाचे तोटे का होतात? या सा-या सामाजिक/राजकीय प्रश्नांना आठवी-नववीतली मुलं सामोरी जात होती. इतर अभ्यासक्रम होताच, परंतु त्या सर्व अभ्यासक्रमाकडे बघताना – परत कधीही हॉलोकास्ट होऊ द्यायचं नसेल तर नागरिकांची भावी पिढी कशी घडवायला हवी याचं भान शिक्षकांकडे होतं.
अमेरिकेतल्याच नव्हे तर जगभरातल्या इतिहासाच्या शिक्षकांसाठी ‘फेसिंग हिस्टरी…’ शिबिर घेते. रवांडा या देशात हुतु आणि तुत्सी जमातींत दंगे होऊन त्याचं पर्यवसान वंशविच्छेदात झालं. पण त्यानंतर रवांडातल्या शाळांना प्रश्न पडला, की इथं ‘इतिहास’ कसा शिकवायचा? तेव्हा ‘फेसिंग हिस्टरी…’ ला पाचारण करण्यात आलं. वांशिक दंगलीनंतरच्या रवांडात ‘फेसिंग हिस्टरी’नं त्या वांशिक दंग्यांना केंद्रस्थानी ठेवून शाळेचे अभ्यासक्रम आखले. मुलांना जबाबदारीचं, माणूसपणाचं भान देत ते शिकवले. तुम्ही ‘फेसिंग हिस्टरी’च्या वेबसाईटवर गेलात तर जगभरातल्या घडामोडींवर तिथं शिक्षकांना – विद्यार्थ्यांना उपयुक्त होईल असं अभ्यासपूर्ण मटेरिअल भेटतं. ‘२६/११ नंतर मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यांना कसं समजून घ्यायचं?’ हे शिकवणारा धडाही ‘फेसिंग हिस्टरी’च्या वेबसाईटवर आला होता. आपल्याकडच्या शाळांतूनही असे प्रकल्प राबवायला हवेत असं मनात नेहमीच वाटतं.
इतिहासाकडे सत्तेचं/घडामोडीचं डॉक्युमेंटेशन असं केवळ न बघता – शास्त्रीय ते सामाजिक सर्वच परिवर्तनात घेतलेल्या निवडींचा, निर्णयांचा इतिहास विद्यार्थ्यांना शिकवण्याची ‘फेसिंग हिस्टरी’ची पद्धत अत्यंत लक्षणीय आहे.
भारतातल्या आठवी-नववीच्या विद्यार्थ्यांना काय होईल आपण फाळणीचा इतिहास नीट उलगडून दाखवला तर! जर त्यांनी दीपा मेहतांचा ‘अर्थ’ किंवा ‘ट्रेन टु पाकिस्तान’ पाहिला, गांधीजींच्या नौखालीतल्या दैनंदिनीतली काही पानं वाचली, मुंबईतल्या मोहल्ल्यांची निर्मिती समजून घेतली आणि आपल्याला टोचणा-या निरगाठी न सुटलेल्या इतिहासाकडे बघितलं तर आपण अधिक खुल्या मनाचे नागरिक नाही का तयार करू शकणार? टोबा टेकसिंग बघून नववीतले विद्यार्थी भारतीय जातीयवादाकडं नव्या नजरेनं बघतीलच की नाही ? की जाऊन नंतर दंगलीत दगड मारतील?
खूप वर्षांपासून एक प्रकल्प माझ्या मनात आहे. महाराष्ट्रातल्या एकोणिसशेबहात्तरच्या दुष्काळाचं डॉक्युमेंटेशन करून, त्यातून महाराष्ट्रातल्या जातीयतेबद्दल विद्यार्थ्यांशी नीट खुलेपणानं बोलायचं, असा. त्यात बहात्तरमध्ये मुंबई माटुंगा लेबर कॅम्प, गोवंडीत माणसं कुठून आली? यावर एक धडा असेल. डॉ. मुकुंदराव घारे, डॉ. तात्याराव लहाने यांसारख्यांसोबतचे संवाद, युक्रांदमधल्या कार्यकर्त्यांचं लेखन, कॉम्रेड प्रभाकर संझगिरींच्या घरी पाहिलेले दुष्काळाचे फोटो, मिशन-यांचं महाराष्ट्रातलं बहात्तरचं काम- हे सारं विद्यार्थी बघतील, शिकतील. या काळाचा अभ्यास करताना बहात्तरच्या दुष्काळानं महाराष्ट्रातली कार्यकर्त्यांची फळी घडवली हे लक्षात येतं. आधुनिक महाराष्ट्राच्या पाठीशी बहात्तरचा हा दुष्काळ उभा आहे. यातून माणसं घडली, चळवळी उभ्या राहिल्या, गावागावातली जातीयता उघड झाली. आपले विद्यार्थी कुठलं परदेशी मर्टन, पार्सन्सचं समाजशास्त्र शिकतात? का नाही आपण निर्माण करू शकत या दुष्काळासोबत एक समाजशास्त्रीय अभ्यासक्रम? महाराष्ट्राचं एक देशी समाजशास्त्राचं पुस्तक नाही का तयार करता येणार आपल्याला? इतिहासाकडून फक्त भडकावणारा, अर्धवट ज्ञानावर आधारलेला भाषावाद स्वीकारून छोट्या युवराजांना शरण जायचं की इतिहास घडवण्याची आपली जबाबदारी ओळखून मानवी मूल्यांना जपण्याची इच्छा बाळगायची? यावर करू दे ना विद्यार्थ्यांना विचार! नव्यानं जग बघणाऱ्या विद्यार्थ्यांना बहात्तरचा दुष्काळ जे शिकवेल, ते या भूमीत रुजलेलं शिक्षण असेल ना?
हॉलोकास्टकडून, गुजरातच्या दंगलीकडून, बहात्तरच्या दुष्काळाकडून, फाळणीकडून शिकण्यासारखं अगाध आहे. आपल्या समाजाबद्दल, तसंच आपल्या स्वत:च्या धारणांबद्दलही. ‘फेसिंग हिस्टरी’च्या प्रकल्पानं हे सारं कसं शिकवता येईल याचं एक मॉडेल बनवलंय. याचं कलम मराठी भूमीत व्हायला हवं. मग इतिहासाचं ओझं कशाला अवघड वाटेल?
–ज्ञानदा देशपांडे
मोबाईल – ९९३०३६०५५०
ईमेल – dnyanada_d@yahoo.com