इगतपुरीतील दारणा धरण

2
248
_Darna_Dam_1.jpg

महाराष्ट्रात 1892 साली भीषण दुष्काळ पसरला होता. त्या दुष्काळात नगर जिल्ह्याची मोठी हानी झाली. त्यानंतर ब्रिटिश शासनकर्त्यानी महाराष्ट्राच्या नद्यांमधील उपलब्ध पाणीसाठा व त्यासाठीचे स्रोत यासंबंधी माहिती संकलित केली. त्या ओघात गोदावरी खोर्‍याचा अभ्यास होऊन दारणा नदीवर धरण बांधण्याचे ठरले.

नाशिक जिल्ह्यातील दारणा नदीवर नांदगाव बुद्रुक या गावाजवळ 1907 साली दारणा धरणाचे बांधकाम सुरू केले. धरण 1912 मध्ये पूर्ण झाले, तेव्हा धरणासाठी सुमारे 2738596 रूपये खर्च झाला होता. एच. एफ. बिलसाहेब हे सुपरिटेंडिंग इंजिनीयर त्या ‘स्पेशल ड्युटी’ हुद्यावर होते. त्यांनी दुष्काळ निवारणार्थ केलेल्या पाटबंधार्‍यांच्या कामांपैकी ते सर्वप्रथम केलेले काम. त्या पाणी साठ्याला बिल यांच्या नावावरून लेकबील असे नाव देण्यात आले.

दारणा धरणातील पाणी नदीतून नांदूर-मध्यमेश्वर बंधार्‍यात व त्यानंतर गोदावरी उजवा व डावा कालव्यांद्वारा शेतीला पुरवण्याची व्यवस्था होती. धरण दगड-चुन्यात बांधण्यात आले आहे. धरणाची लांबी एक हजार तीनशेपासष्ट मीटर तर उंची पायाच्या तळापासून ब्याण्णव फूट व तळाच्यावर ब्याऐशी फूट इतकी आहे. धरण परिसर चारशेचार चौरस किलोमीटर आहे. धरणाची पाणी साठवण्याची क्षमता पूर्वी आठ हजार आठशेअडुसष्ट दशलक्ष घनफूट होती. ती सात हजार एकशेएकोणपन्नास दशलक्ष घनफूट म्हणजे सात टीएमसी एवढी राहिली आहे. धरणाला स्वयंचलित पद्धतीचे पन्नास दरवाजे आहेत. ब्रिटिशांनी धरणाच्या भिंतीवर कोरलेल्या शिलालेखात तो तलाव गोदावरी राइट व लेफ्ट कॅनॉल कालव्यास पाणीपुरवठा करण्याकरता बांधला असल्याचे नमूद करून हे पाणी केवळ गोदावरी कालव्यावरील लाभधारकांसाठी असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. धरणाच्या बांधकामात ब्रिटिश इंजिनीयर्सखेरीज रावबहादूर एन.व्ही.बर्वे (सब-इंजिनीयर) व व्ही.एन.गोडबोले (एलसीई सुपरवायझर) या अधिकार्‍यांचा सहभाग होता असे धरणाच्या कोनशिलेवरून दिसते.

धरण पूर्वीच्या कोपरगाव तालुक्यातील दुष्काळी भागाला शेतीसाठी पाणी देण्याकरता बांधण्यात आले होते. धरणाच्या पाण्यात वाटेकरी वाढल्याने तालुक्यातील ऊसशेती उद्ध्वस्त झाली आहे.

– संजीव कोद्रे- 9850958260

(‘असे होते कोपरगांव’ या पुस्तकातून)

About Post Author

2 COMMENTS

  1. लेखक कोण असे होते कोपरगाव
    लेखक कोण असे होते कोपरगाव

Comments are closed.