सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यंम्बके गौरि नारायणि नमोsस्तुते।।
चैत्र महिना वसंताची चाहूल घेऊन येतो आणि त्याचवेळी आगमन होते ‘चैत्रगौरी’चे. गौरी म्हणजे पार्वती त्या काळात तिच्या माहेरी येते अशी समजूत त्यामागे आहे. ती महाराष्ट्रात चैत्रगौर म्हणून ओळखली जाते तर राजस्थानात ‘गणगौर’ या नावाने स्त्रिया तिचे पूजन करतात. ते व्रत तडिगे गौरी किंवा उज्जले गौरी व्रत म्हणून उत्तर कर्नाटकात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक प्रदेशांतील विवाहित स्त्रिया ते व्रत करतात.
वसंताच्या स्वागताचा कृषीशी संबंधित व्रताचा तो सोहळा भारतभरात कोणत्या ना कोणत्या रूपात साजरा केला जातो. शिवपार्वती हे गृहस्थाश्रमाचे आदर्श दांपत्य मानले जाते. त्यांचे गुण त्यांच्या पूजनातून अंगी बाणण्याचा संकल्प करणारे ते व्रत. पार्वतीच्या गौरी या रूपात सृजनाची ओढ दडलेली आहे ती कोणाही स्त्रीला आपलीशी वाटावी अशी आहे. निसर्गाचे सृजन हे कृषीशी संबंधित आहे हे सूचित करणारे; तसेच, ग्रीष्माची काहिली आल्हाददायक करणारे ते व्रत नवनिर्मिती करणार्या वर्षा ऋतूचीही आठवण करून देते.
महाराष्ट्रात गौरीचा दोलोत्सव चैत्र शुद्ध तृतीयेपासून वैशाख महिन्यातील अक्षय तृतीयेपर्यंत साजरा करतात. ते व्रत उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर साजरे होत असते. तेही मानवी जीवनाशी आणि ऋतूचक्राशी निगडित असेच आहे. महाराष्ट्रात सर्वसामान्यपणे अन्नपूर्णेच्या मूर्तीची स्थापना तिला छोट्या झोपाळ्यात ठेवून केली जाते. तिची पूजाअर्चा महिनाभर रोज केली जाते. देवीला स्नान सुगंधित पाण्याने घातले जाते. तिचा झोका मोगर्याच्या फुलांनी सजवला जातो. देवीला नैवेद्य कैरीची डाळ, कैरीचे पन्हे, ओले हरभरे यांचा दाखवला जातो. कलिंगड, टरबूज अशी पाणीदार फळे त्या ऋतूत उपलब्ध असतात. त्या फळांच्या फोडी नैवेद्यात ठेवल्या जातात.
महिला हळदीकुंकू महिनाभराच्या कालावधीत करतात. सुवासिनी महिला आणि कुमारिका यांना बोलावून त्यांना डाळ व पन्हे दिले जाते. त्यांची ओटी ओल्या हरभर्यांनी भरली जाते. माहेरवाशिणींना जेवण्यास बोलावले जाते. त्यानिमित्ताने घरातील स्त्रिया, मुली त्यांच्या हौसेनुसार गौरीभोवती सुंदर सजावट, आरास करतात. त्या व्रताची सांगता अक्षय तृतीयेला होऊन गौरीचे विसर्जन केले जाते.
चैत्रांगण नावाची रांगोळी महाराष्ट्रात चैत्र महिन्यात काढली जाते. घराच्या अंगणात सारवण करून त्यावरही रांगोळी रेखण्याची पद्धत होती. झोपाळ्यात बसलेली गौरी चैत्रांगणाच्या मध्यभागी काढली जाते, तिच्या भोवती चद्र, सूर्य, राधाकृष्ण, गोपद्मांचा गणेश, स्वस्तिक, तुळशी वृंदावन, शंख, चक्र, गदा, कमळ, डमरू, कामधेनू, धनुष्यबाण अशी, भारतीय संस्कृतीशी संबंधित विविध मंगलचिन्हे रेखली जातात. ती रांगोळी अंगणात केवळ चैत्र महिन्यात काढण्याची पद्धत असल्याने तिला ‘चैत्रांगण’ म्हटले जात असावे.
गौरीचे पूजन गुजरातमध्ये चैत्र महिन्यात संध्याकाळच्या वेळेला केले जाते.
उत्तर कर्नाटकात चैत्रदा गौरीच्या व्रतामध्ये माठात पाणी भरून त्याची पूजा केली जाते. तो माठ घराबाहेर पाणपोयीसारखा ठेवला जातो. कलशासमोर गुळाच्या ढेपेवर विड्याच्या पानावर हळद पसरून ठेवली जाते. तिला हरिद्रा गौरी असे म्हणतात. त्या जोडीला मूग, मटकी, ज्वारी असे धान्य एका कलशात पसरून तो कलशही देवीच्या बाजूला ठेवला जातो. वेगवेगळ्या प्रकारांच्या कोशिंबिरी, ताक, लिंबाचा रस, कैरीचे पेय यांचा नैवेद्य दाखवत देवीची हळद, कुंकू, चंदन, फुले, हार, उदबत्ती, निरांजन, आरती हे उपचार करून पूजा केली जाते. महिलांची पाद्यपूजा त्यांना संध्याकाळी बोलावून केली जाते. त्यांना हळदीकुंकू आणि विडा दिला जातो. काही कुटुंबांत शिव आणि पार्वती यांचा दोलोत्सव साजरा करतात.
राजस्थानातील गणगौर हे व्रत होळीच्या दुसर्या दिवशी सुरू होते. ते एकूण अठरा दिवस करायचे असते. शिवपत्नी पार्वती दुर्गेच्या रूपात पूजली जाते. पार्वती आणि शंकर यांच्या मातीच्या मूर्ती तयार करून त्यांची पूजा केली जाते (त्याचे साम्य महाराष्ट्रातील हरितालिका व्रताशी दिसते). कुमारिका आणि विवाहित स्त्रिया ते व्रत करतात – कुमारिका त्यांना चांगला पती मिळावा म्हणून आणि विवाहित स्त्रिया त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबसौख्यासाठी. देवीची पूजा दूर्वा, फुले, फळे अर्पण करून केली जाते. उपवास शेवटच्या दिवशी केला जातो. महिला व मुली रंगीबेरंगी पोशाख व दागिने घालून नटतात. मिठाईची देवाणघेवाण केली जाते. शिव आणि पार्वती यांच्या मूर्तींची मिरवणूक वाजतगाजत काढली जाते. नंतर मूर्तींचे विसर्जन होते. जयपूरमधील गणगौरीची मिरवणूक प्रसिद्ध आहे. नाथद्वार येथेही तसा विशेष सोहळा आयोजित केला जातो. महिला मध्य प्रदेश, हरियाणा, गुजरात या प्रांतांतही ते व्रत करतात. काही भागांत चैत्र प्रतिपदेला गणगौर व्रताची सुरुवात होते. त्यानिमित्ताने जत्रा, मेळे यांचे सामूहिक आयोजन केले जाते. त्या व्रताला गोस्वामी तुलसीदास रचित ‘रामचरित मानस’ ग्रंथातील कथा जोडलेली आहे. सीतेने तिच्या मैत्रीणींसह मंदिरात जाऊन गौरीची पूजा केली आणि योग्य पती मिळावा अशी प्रार्थना केली. गौरीने संतुष्ट होऊन तिला श्रीरामांसारखा पती दिला म्हणून त्या व्रताचे महत्त्व विशेष आहे.
– आर्या जोशी 94220597950, jaaryaa@gmail.com