गवर म्हणजे गौरीची झाडे आणि फुले. ही फुले फार तर तीन दिवस टिकतात श्रावणातील सगळ्या पूजा, मंगळागौर आणि भराडी गौर सजवताना ‘गौरीची’ फुले आवर्जून वापरली जातात. एकेरी, डबल, तिब्बल पण पातळ पाकळ्यांची अक्षरशः अनंत रंगांतील ही फुले, कोणत्याही पूजेच्या सजावटीत मोठी खुलून दिसतात. इथून तिथून कोणत्याही गौरीला तेरडा असेही म्हणतात.
आमच्या शाळेतील माझ्या आवडत्या शिक्षिका, ‘कल्पनाताई’… मला त्यांच्याइतकीच त्यांच्या घरातली बाग आवडायची. श्रावण सुरू झाला, की त्यांच्या घरातील अंगण गौरीच्या लालबुंद आणि केशरी गेंदेदार फुलांनी भरून जाई. त्यांची ओळख होईपर्यंत मला पांढऱ्या, जांभळ्या आणि गुलाबी रंगाची साधी एकेरी पाकळ्यांची ‘रानगवर’ माहिती होती. त्या गौरीला एक अति मंद सुवास असतो.
एकदा, हिमालयात फिरताना भरपूर पाकळ्यांच्या ह्या एवढ्या मोठ्या फुलांच्या ‘गौरी’ भेटल्या. मंड्याचा जयेश म्हणाला होता, की ‘खऱ्या गौरी’ त्यांच्या इथल्याच… आम्ही मनात म्हटले… “जातोस काय तिकडं…” आमच्या सह्याद्रीत उगवणाऱ्या गौरायांना तोड नाही.
गौरीच्या झाडाचे आयुष्य फार तर महिनाभर आणि फुलांचे तीनच दिवस. तिच्या अल्पायू व्यक्तिमत्त्वामुळे ‘तेरड्याचा रंग तीन दिवस’ असल्या म्हणी जन्माला आल्या. हिंदी आणि उर्दूत तिला ‘गुलमेहंदी’ म्हणतात, कारण त्या फुलांपासून लाल केशरी रंग तयार करता येतात. हे रंग लेमोनेड किंवा जीन या पेयांमध्येही वापरतात. पूर्वीच्या काळी म्हणे बायका आणि मुले नखे रंगवण्यासाठीही तेरड्याच्या रंगीत फुलांचा उपयोग करत.
गवर ऊर्फ तेरडा उर्फ इम्पेशन्ट बाल्सामिना हे झाड अस्सल देशी म्हणजे भारतीय उपखंड आणि विशेषतः म्यांमारमधील आहे. त्या झाडांचा बीजप्रसार कीटकांद्वारे होतो. गौरीच्या झाडाला एवढे महत्त्व प्राप्त होण्याचे कारण म्हणजे त्या झाडाच्या पंचांगात अनेक औषधी गुणधर्म आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत बागेत गेलात की काहीतरी चावणार हे ठरलेले. अंगावर गांधी उठू लागल्या की गौरीची चार पाने पिळून रस लावला की गांधीची खूणसुध्दा शिल्लक राहत नाही. पायांच्या बोटाच्या बेचक्यात होणाऱ्या चिखल्या असू देत नाही तर डोण्या (पावसाळ्यात दिसणारा पिवळट हिरवा साप) साप डसू देत गौरीची पाने सगळ्यांवर चालतात. भाजल्यावर लावण्यासाठी गौरीची ताजी फुले तर उत्तमच असतात. गौरीची फुले वाळवून त्यासाठी मलमही बनवतात. भाजल्याचा अगदी डागसुध्दा रहात नाही. ओठ आणि हात-पाय फुटू नयेत म्हणूनही गवरीच्या फुलांचे आणि खोडाचे मलम लावतात.
संधिवातामुळे होणारी दुखणी आणि कोणतेही हाड मोडले तर त्यासाठी गौरीचे आख्खे झाड वापरतात. हाड मोडल्यावर ताजे झाड मिळाले तर ठीकच, नाहीतर वाळलेल्या गौरीच्या झाडांचे चूर्ण पाण्यात किंवा तेलात खलून लावतात. हाडे छान जुळून येतात. पावसात पाय घसरून पडले तर गौरीच्या पानांनी शेकले असता सूज लगेच उतरते.
कोरियातील आदिवासी लोक अपचन आणि पोटदुखीवर या झाडाच्या खोडाचा काढा पितात. व्हिएतनामी लोक गवरीच्या खोडाचा अर्क शांपूसारखा केस धुण्यासाठी वापरतात. केसांची वाढही चांगली होते आणि डोक्यातील कोंडा जाण्याला मदत होते.
महाराष्ट्रातील गोंड आणि भिल्ल जातीच्या आदिवासी बायका गर्भधारणा होऊ नये म्हणून गवरीच्या पानांचा रस नवऱ्याला पिण्यास देतात आणि स्वत:ही पितात. त्या पानात असलेल्या अल्फा रिडक्टेज् या ‘एन्झाईम’च्या प्रतिकारकामुळे टेस्टेस्टेरॉन हे पुरूष हार्मोन हतबल होते. अनेक बायकांना मेनॉपॉज नंतर चेहऱ्यावर केस येतात. त्यासाठीही या पानांचा रस पितात. पूर्वीचे राजे शत्रूच्या मुलांना निर्बल करण्यासाठी या पानांच्या रसाचा मिठायांमध्ये वापर करत. गौरीच्या झाडात खनिजांचे प्रमाण अधिक असल्याने त्या झाडाची पाने खाण्यासाठी सहसा वापरत नाहीत. पण अपवादात्मक परिस्थितीत आणि आदिवासी भागात मीठ उपलब्ध नसेल तर भाज्यांत किंवा आमटीत गौरीची पाने आणि हिरवे खोड वाटून घालतात.
नेपाळमध्ये श्रावण प्रतिपदा मोठ्या प्रमाणात साजरी करतात. त्या दिवसाला, ‘खाज आणि वेदना चले जाव’ दिवस असे म्हणतात. त्या दिवशी गवरीच्या पानांचा रस लावून आंघोळ करतात. चीन आणि कोरियात गौरीची फुले तुरटीत मिसळून केशरी, लाल, जांभळा आणि निळा असे रंग तयार करतात. गौरीच्या बिया वाटून डोक्यातील खवड्यांसाठी वापरतात. डोळे आल्यावर गौरीची फुले रूमालात बांधून रूमाल डोळ्यांवर ठेवतात. डोळ्यांना थंडावा मिळतो. पण त्यासाठी गौरीची फुले स्वच्छ धुऊन कोरडी करावी लागतात.
जपानमध्ये तर शाळेतील मुलांसाठी ‘गौरीच्या फुलांनी नखे रंगवण्याचा’ दिवस असतो. त्या दिवशी मुले ‘तिनसागू नू हना’ हे गाणे म्हणत एकमेकांच्या नखांवर गौरीच्या केशरी पाकळ्यांनी रंग लावतात. एका जपानी गाण्यात ‘एखाद्या माणसाला त्याची इच्छा असूनही समाजात त्याला कोणी सामावून घेत नसेल तर अशा माणसाचे वर्णन करण्यासाठी त्याला इम्पेशंट बाल्सामिना म्हणजे गौरीचे झाड म्हणतात.
गौरीच्या पक्व बीजांडांना साधा हात जरी लावला तरी ते फुटतात आणि त्यांतील बिया सर्वदूर पसरतात… ‘बीजांडे म्हणतात…मला हात लावू नका… मी बिखरून जाईन’ अशा अर्थाची लोकगीते गाऊन आशियातील अनेक आदिवासी तरूण मुली नृत्याचे फेर धरतात.
बस्तरच्या आदिवासी भागात या गौरीच्या फुलासंबंधात एक गोड लोककथा ऐकली. एकदा म्हणे सूर्यदेवाला खूप दुःख झाले. तो आपला ढगांच्या आड मुसमुसत बसला. इकडे आदिमाता म्हणजे पार्वतीने सर्वांना जेवायला बोलावले होते. सगळे देव, चंद्र आणि चांदण्यासुध्दा जेवण्यास आले, पण सूर्यदेव काही आला नव्हता. सगळे जेवले पण आदिमाता सूर्याची वाट पाहत बसली. आपण रूसल्यामुळे आपली आई उपाशी राहिली. हे कळल्यानंतर सूर्यदेवाला वाईट वाटले. तो त्याचे दुःख बाजूला ठेवून आदिमातेकडे गेला. आदिमातेने त्याला जवळ घेतले. त्याच्या सोनेरी कुरळ्या केसांवरून हात फिरवला आणि स्वतःच्या हाताने त्याला खीरपुरी भरवली. सूर्याला आनंदाने रडू आले आणि त्याचे अश्रू पावसाने पृथ्वीवर नेले. त्या अश्रूंची ‘गौरीची’ झाडे झाली आणि त्याला आई आणि लेकराचे प्रतीक असणारी रंगीबेरंगी फुले आली. अश्रूंचे आयुष्य कितीसे असणार त्यामुळे ते गौरीचे झाड आणि फुले हे दोन्ही अल्पायुषी असतात.
दुसरी कथा ऐकली ती गढवाल प्रदेशात. हिमालय कन्या पार्वतीचे लग्न शंकराशी झाल्यावर ती दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडून गेले. शंकराची तपश्चर्या थांबली. जगात काही संहार होईना. पृथ्वीला सृष्टीचा भार होऊ लागला. पार्वतीमाता तर अनेक शक्ती-रूपात काम करत असते. तिची सगळी शक्ती शंकरावर प्रेम करण्यात खर्च झाल्याने सृष्टी निस्तेज झाली. पृथ्वीचा विनाश होईल की काय अशी भीती वाटू लागली. सर्वांनी मिळून नारायणाची स्तुती केली. नारायणाने त्याचा शंखध्वनी केल्याबरोबर शंकर पार्वती भानावर आले आणि त्यांनी त्यांच्यामधल्या प्रेमरंगाचा त्याग केला. तो प्रेमरंग वरूणाने झेलला आणि त्याची असंख्य फुले झाली. प्रेम काय, दु:ख काय, आशा काय, निराशा काय…सर्व भावना तात्पुरत्याच ना! त्यामुळे ही फुलेही क्षणभंगुर…ती झाडेही तेवढ्यापुरतीच…
म्हणून तर गौरीच्या झाडाला पार्वतीचे रूप समजून तिची गणेशाबरोबर पूजा करतात. पश्चिम महाराष्ट्रात म्हणून तर या गौरीच्या झाडांनाच ‘गौरी’ म्हणून गणपतीच्या दिवसांत बसवण्याची पध्दत आहे. कारण, पृथ्वीने म्हणे, पार्वतीला तिच्याकडून पाहुणचार करून घेण्याची गळ घातली होती. आमच्या सांगावच्या आक्का म्हणत, सासरहून माहेरी आलेल्या मुलीने “गवरीसारकं तीन दिस ऱ्हावं… म्हंजे तिजा मान ऱ्हातो !” अशी ती तीन दिवसांची गवर आणायला घरोघरच्या सासरी गेलेल्या मुली माहेरी जातात.
या गौरीच्या झाडात पार्वती ही धन्वंतरी आणि लक्ष्मी रुपाने वास करते. गौरीच्या झाडाखालील मातीही औषधी असते. उष्णतेने लहान मुलांना नायटे किंवा करट होतात. त्यावर त्या मातीचे पोटिस बांधतात. गौरीची झाडे येऊन गेल्यानंतर ती माती विशेषतः हिवाळी भाज्या लावण्यासाठीही वापरतात. म्हणून तर गौरीच्या या रूपाला धन धान्य समृध्दी देणाऱ्या लक्ष्मीचे रुप मानतात. ती अंगणात बहरली की ते अंगण बाकीच्या फुलाफळांनीही बहरून जाते आणि घरदार सुखासमाधानाने तृप्त होते.
– मंजूषा देशपांडे 9158990530 dmanjusha65@gmail.com