भारतातील पहिला बोलपट ‘आलमआरा’ हा 1931 साली निर्माण झाला. त्या आधी मूकपट 1913 पासून प्रदर्शित होऊ लागले होते. पहिल्या बोलपटानंतर, 1934 पर्यंत पुढीलप्रमाणे चित्रपट निर्माण झाल्याची नोंद आढळते. ‘अयोध्येचा राजा’, ‘अग्निकंकण’, ‘मायामच्छिंद्र’ (1932); ‘सैरंध्री’, ‘सिंहगड’ (1933); ‘अमृतमंथन’ (1934) येथपर्यंतच्या चित्रपटांची पोस्टर्स जरी उपलब्ध असली तरी त्या चित्रकृती कोणाच्या त्यांचा नामोल्लेख नाही. त्यानंतर, ‘हंटरवाली’ (1935 ) हा चित्रपट आला. त्याचे पोस्टर डी.जी. प्रधान यांनी केले आहे. पुन्हा ‘अमरज्योती’ (1936) या चित्रपटाचे पोस्टर जरी उपलब्ध असले तरी ती चित्रकृती कोणाची याचा नामोल्लेख नाही.
त्यानंतर, 1936 पासून जे चित्रपट निर्माण झाले त्यांची पोस्टर्स मात्र ज्यांनी तयार केली त्यांचे नामोल्लेख स्पष्टपणे आढळतात. त्या कलाकारांची नोंद पुढीलप्रमाणे आहे –
‘संत तुकाराम’ (1936) या चित्रपटाचे पोस्टर जे.बी. दीक्षित यांनी केले आहे.
‘बंबई की बिल्लीम’ (1936) या चित्रपटाचे पोस्टर व्ही.आर. भिडे यांनी केले आहे.
‘ख्वाबोंकी दुनिया’ (1937) या चित्रपटाचे पोस्टर घनश्याम देसाई-हिरालाल यांनी केले आहे.
‘कुंकू’ (1937) या चित्रपटाचे पोस्टर जे.बी. दीक्षित यांनी केले आहे.
‘गोपाल कृष्ण’ (1938) या चित्रपटाचे पोस्टर जे.बी. दीक्षित यांनी केले आहे.
‘फरजंदे वतन’ (1939) या चित्रपटाचे पोस्टर घनश्याम देसाई-हिरालाल यांनी केले आहे.
‘हरिकेन स्पेशल’ (1939) या चित्रपटाचे पोस्टर एन.के. वैद्य यांनी केले आहे.
‘कंगन’ (1939) या चित्रपटाचे पोस्टर एल.एल. मेघाणी, बॉम्बे टॉकीज यांनी केले आहे.
‘बंधन’ (1940) या चित्रपटाचे पोस्टर एल.एल. मेघाणी, बॉम्बे टॉकीज यांनी केले आहे.
‘संत ज्ञानेश्वर’ (1940) या चित्रपटाचे पोस्टर जे.बी. दीक्षित यांनी केले आहे.
‘पैसा’ (1941) या चित्रपटाचे पोस्टर आचरेकर-मिरजकर यांनी केले आहे.
‘पडोसी’/‘शेजारी’ (1941) या चित्रपटांची पोस्टर जे.बी. दीक्षित यांनी केली आहेत.
सुबोध गुरुजी यांनी त्या कलाकार मंडळींचे चरित्र व कार्य अशी माहिती संकलित केली आहे व ती ‘पाऊलखुणा’ या पुस्तकात ग्रंथित केली आहे. आरंभ काळातील चित्रपट आणि त्यांचे पोस्टर कलाकार – या कलावंतांचा कार्यकाल 1924 ते 1941 असा आहे.
सुबोध गुरुजी यांनी त्या कलाकार मंडळींची चरित्रे व कार्य अशा स्वरूपातील माहिती पुढीलप्रमाणे संकलित केली आहे –
एल.एल. मेघाणी हे ‘बॉम्बे टॉकीज’मधून 1950-51 च्या सुमारास बाहेर पडले. ते ‘चीफ पब्लिसिटी ऑफिसर’ (सीपीओ) होते. त्यामुळे त्यांचा इतर निर्माते-कंपन्यांमध्ये ‘दबदबा’ होता ! ते ‘फिल्मिस्तान’, ‘मेहबूब’, ‘आर.के.’ यांचेही सीपीओ बनले. ते त्यांची पोस्टर्स करत असत. त्या निर्मात्या-कंपन्या पोस्टर्स इतरांकडूनही करून घेत. म्हणून त्या कंपन्या व इतर काही त्या काळातील निर्मात्यांची पोस्टर्स- उदाहरणार्थ, ‘मदर इंडिया’, ‘गंगा-जमना’, ‘जिस देशमें गंगा बहती है’, दगड व माती म्हणून काळापांढरा असे दोनच रंग असलेली, परंतु ‘नामोल्लेख’ नसलेली आहेत; चित्रपटांच्या नामावलीत मेघाणी यांचा सीपीओ असा निर्देश मात्र आहे. मेघाणी यांचा ‘संगम’ हा (1964) शेवटचा चित्रपट. त्यांनी राजकपूर यांच्या सूचनेनुसार ‘आह’ हा कॅन्सरवरचा चित्रपट म्हणून त्याच्या पोस्टरसाठी हिरवा रंगच वापरला होता.
वसंत गोविंद परचुरे (1917-1988) यांनी फर्ग्युसन कॉलेज (पुणे) येथून बी कॉम पदवी घेतली खरी, पण ते कामाला मुंबईत ‘मिनर्व्हा मूव्हीटोन’च्या पेंटिंग विभागात (1938) दाखल झाले. ते ‘बॉम्बे टॉकीज’च्या आर्ट ॲण्ड पब्लिसिटी विभागाचे प्रमुख एल.एल. मेघाणी यांच्या हाताखाली काम 1941 साली करू लागले. तेथेच त्यांचा विष्णू मायदेव या सुलेखनकाराशी परिचय झाला व पुढे त्यांचे मैत्र जमले.
‘बॉम्बे टॉकीज’ची सूत्रे सावक वाच्छा व अशोककुमार या दोघांच्या हातात 1947 साली आली. त्यांनी परचुरे यांना आर्ट डिपार्टमेंटचे प्रमुख केले. परंतु ‘बॉम्बे टॉकीज’ या कंपनीचे भवितव्य 1948 चा ‘जिद्दी’ आणि 1949 चा ‘महल’ या चित्रपटांच्या काळात दोलायमान झाले. त्यामुळे वसंत परचुरे व विष्णू मायदेव या दोघांनी कंपनी सोडली. वसंत परचुरे यांनी विष्णू मायदेव या सुलेखनकार मित्राच्या संगतीने ‘कनीज’ या चित्रपटाचे पोस्टर केले. ते त्यांनी स्वतंत्रपणे ‘परचुरे-मायदेव’ या नावाने (1949) केले. त्या दोघांनी केलेले ते पहिले पोस्टर. त्यांनी नंतर दोघांच्या नावांतील आद्याक्षरे घेऊन ‘पामार्ट’ संस्थेची स्थापना 1950 साली केली. तिचे ऑफिस दादर-शिवाजी पार्कला होते. ‘पामार्ट’मध्ये परचुरे हे चित्रांकन करत तर मायदेव हे सुलेखन सांभाळत असत. खंडेराव बक्षी हा त्यांचा सहाय्यक कलाकार होता. ‘पामार्ट’चा कलासंसार 1984 सालापर्यंत सुरू होता. वसंत परचुरे हे चित्रपटाचे नायक वा नायिका यांचे चेहरे व शरीराकृती ठसठशीत मोठी ठेवण्याची रचना करत व त्यासोबत इतर कलाकारांची मांदियाळी चित्रातून समर्थपणे पेलत असत.
विश्वनाथ गोपाळ भिडे (16 मार्च1916 – 31 मार्च 2000) हे वयाच्या अठराव्या वर्षी, त्यांचे काका- व्ही.आर. भिडे यांच्याबरोबर – ‘भिडे-आरोलकर आर्ट्स’ या काकांच्या संस्थेत त्यांचे सहाय्यक म्हणून काम करू लागले. दोन वर्षांनंतर, विश्वनाथ निर्माता-दिग्दर्शक सोहराब मोदी यांच्या ‘मिनर्व्हा मुव्हीटोन’ कंपनीत नोकरीस लागले. त्यांनी प्रसिद्धी प्रमुख रुसी बँकर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे ‘सैद- ए-हवस’ ह्या चित्रपटाचे पोस्टर 1936 मध्ये केले. त्यांनीच ‘मिनी’साठी आणि नंतर, ‘राजश्री प्रॉडक्शन’ यांच्यासाठी पोस्टर्स 1937 सालापासून कायम केली. विश्वनाथ भिडे यांच्या चित्रांतील रंगसंगती आणि रंगलेपन यावर त्या काळातील परदेशातील अभिजात अशा काही सिनेमा पोस्टर डिझायनर, आर्टिस्ट यांचा प्रभाव जाणवतो. त्यांचे काही निवडक सहकारी म्हणजे इसाक, उम्मर, सऐफुद्दीन, एकनाथ, अंकुश, अंबाजी, सुरेश हे होते.
पुढे, ते बी. विश्वनाथ अशा स्वत:च्या नाममुद्रेने पोस्टर्स व बॅनर बनवू लागले. त्यांना 1988 साली झालेल्या कंपवातामुळे काम करणे कठीण होत गेले. त्यांना काम पूर्णत: बंद 1992 मध्ये करावे लागले. त्यांची कारकीर्द बावन्न वर्षांची (1936 ते 1988) आहे.
पद्मराज हे हुन्नरी कलावंत इतरांच्या रंगसंगतीत व स्टाईलमध्ये काम करत असत. ते ‘नाईफ वर्क’ही करत. ते डी.आर. भोसले, वासुदेव, पंडित व सिंघल यांच्याबरोबर पोस्टर्स करत असत.
रघुवीर शंकर मुळगावकर (14 नोव्हेंबर 1918 – 30 मार्च 1976) यांनी चित्रकलेचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या वडिलांकडून घेतले. त्यांनी एस.एम. पंडित यांचे सहाय्यक म्हणून ‘फिल्म इंडिया’च्या कामास 1938 मध्ये सुरुवात केली; तसेच, ते कॅलेंडर, जाहिराती, मासिके अशी कामेही करत. त्यांच्या कामाच्या शैलीवर व रंगसंगतीवर ‘पंडित’ छाप दिसतो. रघुवीर यांनी पंडित यांच्या गैरहजेरीत ‘फिल्म इंडिया’ची मुखपृष्ठेही केलेली आहेत. त्यांनी 1944 ते 1970 ह्या कालावधीत काही मोजकी ‘पोस्टर्स’ केली आहेत. त्यांचे निधन फुफ्फुसाच्या कर्करोगाने अठ्ठावन्नाव्या वर्षी झाले.
गोपाळ बळवंत कांबळे (22 जुलै 1918 – 21 जुलै 2002) हे त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षी – 1934 साली कोल्हापूरच्या ‘छत्रपती सिनेटोन’मध्ये पेंटिंग खात्यात सहाय्यक म्हणून बिनपगारी नोकरीस लागले. त्यांच्या मनावर आबालाल रहेमान, बाबुराव पेंटर आणि एफ. मटानिया (ब्रिटिश) ह्या चित्रकारांचा प्रभाव होता. त्यांनी ‘कालिया मर्दन’ (1935) आणि ‘गंगावतरण’ (1937) ह्यांच्या ‘हंस टॉकीज’ (कोल्हापूर) थिएटरच्या फलकांचे काम केले. पैकी ‘गंगावतरण’ हा दादासाहेब फाळके यांचा एकमेव बोलपट होय. गोपाळ कांबळे यांचे ‘बलस्थान’ वस्त्र-प्रावरणे व अलंकार यांचे वैभवशाली चित्रांकन हे मानले जाई. महाराष्ट्र सरकारने ‘राजमान्य’ केलेले शिवाजी महाराजांचे चित्र ही त्यांची अखेरची कलाकृती होय.
गोपाळ कांबळे हे मुंबईला 1938 साली आले. शेठ चंदुलाल शहा यांच्या ‘रणजीत मुव्हीटोन’मध्ये काम करू लागले. कांबळे पोस्टर विभागाचे प्रमुख एका वर्षात बनले. कांबळे कंत्राटी पद्धतीने ‘मेहबूब प्रॉडक्शन’ व ‘बॉम्बे टॉकीज’ यांचेही बॅनर्स करत असत. कांबळे यांची ‘राजकमल कलामंदिर’च्या पोस्टर व बॅनर विभागात (1949-50) नेमणूक होऊन, ते तेथेच ‘प्रमुख’ही 1955-65 पर्यंत झाले. त्यांचे सहकारी म्हणून संपत जाधव, मधुकर उपळेकर, बाळकृष्ण सुतार, के.आर. कुंभार, सुदाम चव्हाण असे कलावंत होते. त्यांचा सहकारी विलास सुतार पुढे (1959) एस. विलास झाला. विलास सुतार हे ‘राजकमल’च्या पोस्टर विभागात रूजू झाले आणि त्यांनी व्ही. शांताराम यांच्या नव्या व जुन्या पोस्टरांचे नुतनीकरण केले. पुढे, ते स्वतंत्रपणे दिनदर्शिकांची चित्रांकने करत असत. त्यांची कारकीर्द 1938-1972 अशी चौतीस वर्षांची आहे.
दिवाकर वासुदेव करकरे (1930 – 2021) हे जी डी आर्ट (अप्लाइड) पदविका घेऊन चित्रपटांच्या पोस्टर रंगकाम विभागात दादा भडसावळे, सदाशिव जे. रावकवी व सुनील दत्त यांच्या ‘अजंठा आर्ट असोसिएट्स’मध्ये दाखल झाले. ते आधी उमेदवारी व नंतर ‘वेतन’दारी करत होते. त्यांना सुनील दत्त यांच्या शिफारशीनुसार, बी.आर. फिल्म्सचा ‘वक्त’ या चित्रपटाचे पोस्टर करण्याचे स्वतंत्र काम 1964 साली मिळाले. त्यांनी ‘व्हिज्युअल आर्ट्स’ नावाने चित्रपटांचे बॅनर्स करण्यास ‘जुगनू’ या चित्रपटाद्वारे 1972 साली सुरुवात केली. दिवाकर करकरे यांनी रचना व रंगलेपन यांत वेगवेगळे प्रयोग केले, पण त्यांनी चेहऱ्यांतील ‘डेप्थ’चा (त्रिमिती) विचार मात्र फारसा केला नाही. त्यांच्या रंगलेपनात फ्लॅटनेस येई. गंमत म्हणजे तीच दिवाकर यांची स्टाइल झाली. दिवाकर यांनी पोस्टर व बॅनर्स केलेला शेवटचा चित्रपट म्हणजे 1984 सालातील ‘मशाल’ हा होय. त्यांनी त्यांचे काम 1985 साली बंद केले. त्यांची कारकीर्द वीस वर्षे (1965 ते1985) होती. त्यांचे सहकलावंत – यशवंत परब, आप्पा कुलकर्णी, रमेश कुलकर्णी, बाळकृष्ण गावडे हे होते.
रामकुमार शर्मा (23 सप्टेंबर 1924 – 14 एप्रिल 2001) हे कलंदर व्यक्तिमत्त्व होते. ते ‘रणजीत’मध्ये ‘पेंटिंग’ विभागात 1941 ते 1943 कार्यरत होते. ते त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यामुळे कधीही कोठेही निघून जात. असेच ते ‘फिल्मिस्तान’च्या ‘सेटिंग’ विभागात कार्यरत (1952 -1960) असताना, अज्ञात स्थळी गायब झाले होते, नंतर ते परतले आणि त्यांनी सलग अकरा वर्षे (1972 ते1983) काम केले. रामकुमार हे सिनेमाची पोस्टर्स करत असतानाच चित्रकृती ‘अमूर्त’ शैलीत करत. त्यांचे स्थान हुसेन, आरा, गायतोंडे, कोलते, रझा अशा काही नामांकित कलावंतांच्या यादीत मानले जाई. त्यांचे शेवटचे काम ‘रझिया सुलतान’चे (1983) पोस्टर हे होय. त्यांचे सहकलाकार होते – विजेंद्र शर्मा, वेद प्रकाश, सी. मोहन, रवी, लक्ष्मण, पृथ्वी सोनी.
रामकुमार यांचा वेगळाच धाडसीपणा रंगलेपन व चित्ररचना यांत जाणवतो. त्यांची विरोधी रंगसंगती ही पाहणाऱ्याच्या नजरेस खटकत नसे. उलट, काहीशी सुखद व चमत्कृती वाटे. त्यांना किमयागार म्हणत.
– सुबोध गुरुजी 9850966207