आनंदी गोपाळ बायोपिकच्या निमित्ताने

2
65

चरित्रात्मक चित्रपटांचा  अथवा बायोपिकचा जमाना अवतरला आहे. काशीनाथ घाणेकर, पु.ल. देशपांडे, बाळासाहेब ठाकरे आणि पहिल्या भारतीय स्त्री-डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्यावरील चरित्रपट गाजले. कोणत्या गोष्टींचे भान चरित्रपटांतील पात्रे, त्यांच्या जीवनातील घटना, त्यांचे नातेसंबंध आणि त्यांचा काळ चित्रित करताना ठेवावे, सत्यनिष्ठा कशी राखावी, कोणती बंधने पाळावीत असे प्रश्न निर्माण होतात. मी डॉ. आनंदीबाई जोशी यांच्यावर संशोधनपर लघुपट १९९२ साली केला. त्यांचे चरित्रही लिहिले. मी चरित्रात्मक लघुपट आणि ग्रंथ या दोन्ही माध्यमांत काम गेल्या पंचवीस वर्षांत सातत्याने केले आहे. मलाही अशा प्रश्नांची उत्तरे त्या त्या वेळी शोधावी लागली.

चित्रपट हे वेगाने सर्वदूर पसरणारे, लोकप्रिय व प्रभावी माध्यम आहे. ते निरक्षरांपर्यंतही पोचते. त्यामुळे चरित्रात्मक चित्रपट करणे ही जबाबदारी असते. ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाच्या प्रारंभी एक निवेदन आहे. ते लिखित रूपात तर पडद्यावर दिसतेच, शिवाय ऐकूही येते. आनंदीबार्इंच्या जीवनातील काही घटनांवर तो चित्रपट आधारित आहे; त्यात काल्पनिकतेचा भाग आहे आणि तो चित्रपट  सत्यतेचा दावा करत नाही; असे स्पष्टीकरण त्या निवेदनाद्वारा देण्यात आले आहे. चरित्रपट करताना सत्याशी प्रतारणा न करता, घटनाप्रसंग पुनरुज्जीवित केले जाणे अपेक्षित असते. प्रत्येक पात्राच्या चरित्राचे, चारित्र्याचे आणि काळाचे भान राखून चरित्रपटात घटना, प्रसंग, संवाद हे कल्पावे लागतात. त्यामुळे कल्पनाशक्तीचा वापर हा होतोच. तेवढी मुभा तेथे असते. मी डॉक्युड्रामा हा शब्द मी निर्मिलेल्या चरित्रपटांसाठी वापरते, तो त्याच अर्थी. त्यात दस्तावेजीकरण (डॉक्युमेंटेशन) असते आणि ड्रामा अथवा नाट्यदेखील  असते. बायोपिक या शब्दांतही त्याच छटेचा अंतर्भाव आहे. चित्रपट हा बायोपिक म्हणजे चरित्रात्मक असतो आणि त्याच वेळी तो चित्रपटही असतो. त्यामुळे कल्पनेच्या वापरावर बंदी नाहीच. मग ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाच्या प्रारंभी एवढ्या आवाजी पद्धतीने काल्पनिकता अधोरेखित करण्यामागील कारण काय?

स्त्री- शिक्षण, समुद्रोल्लंघन, परदेशगमन ही एकोणिसाव्या शतकात महापातके मानली जात. आनंदीने त्या बुरसटलेल्या समाजकल्पनांना दूर सारून, स्वत:चे डॉक्टर होण्याचे ध्येय प्राणपणाने साकार केले. तिचे पती गोपाळराव यांनी तिच्या स्वप्नाला खंबीर आधार दिला. त्यांचे जीवन मुळातच प्रासंगिक, सामाजिक, वैचारिक, भावनिक नाट्याने आणि समरप्रसंगांनी ओतप्रोत भरलेले आहे. त्यांच्याविषयी चरित्रात्मक माहितीही उपलब्ध आहे. त्यामुळे सत्याशी, वास्तवाशी इमान राखून चित्रपटनिर्मिती करणे अशक्य नव्हते. पण ‘आनंदी गोपाळ’मध्ये प्रत्यक्षात घडले आहे ते वेगळेच. चित्रपटात कलात्म स्वातंत्र्याच्या नावाखाली, मन मानेल तसे बदल केले आहेत. निर्माता-दिग्दर्शक यांचे, ते इतिहासात स्थान असलेल्या व्यक्तीचे जीवनचित्र रंगवत आहेत आणि ते एक जोखमीचे काम आहे याचे भान सुटलेले आहे. त्यातून विविध त्रुटी निर्माण झाल्या आहेत.  

१. कृतक नाट्याच्या मोहापोटी काही पात्रांवर झालेला अन्याय – आनंदीबार्इंचे वडील गणपतराव हे स्त्रीशिक्षणाच्या बाजूने होते. त्यांनीच त्यांच्या मुलीतील बौद्धिक चमक प्रथम ओळखली; घरच्यांचा विरोध असतानाही तिला बालपणापासून शिक्षण दिले. त्यांनाच ती मुलगी मोठेपणी कर्तृत्ववान होणार आहे, याचे भान प्रथम आले. त्यांचा त्यांच्या घरी येणेजाणे असलेल्या गोपाळरावांशी जर तिचे लग्न झाले तर ते तिला धडाडीने शिकवतील असा कयास होता. गोपाळरावांनी तिला लग्नापूर्वीही शिकवले होते. आनंदीनेच ती माहिती अमेरिकेतील तिची मैत्रीण कॅरोलीन डॉल हिला दिली होती. परंतु चित्रपटात, गणपतरावांना स्त्रीशिक्षणाचे विरोधक ठरवले गेले आहे. चित्रपटातील गणपतराव म्हणतात, ‘‘कुलवंतांच्या घरात मुलींना शिकवणे शोभेल का? स्त्रीचा महत्त्वाचा गुण म्हणजे संसारदक्षता.’’ काल्पनिकतेच्या नावाखाली एखाद्या व्यक्तीवर असा अन्याय का करावा? आनंदीबाई आणि तिचे वडील यांतील नाते मधुर आणि मनमोकळे होते. गणपतराव काळाच्या पुढे गेलेले होते. मग त्यांना परंपरावादी ठरवण्याचे कारण काय?

तीच गोष्ट आनंदीबार्इंच्या व्यक्तिरेखाटनाची. आनंदी त्यांनी ‘मी अमेरिकेला एकटी जाईन’ असा शब्द दिल्यावर त्यावर सदैव ठाम राहिल्या. चित्रपटातील आनंदी मात्र बोटीवर चढेस्तोवर गोपाळरावांना विरोध करते, ‘‘का तुमचा मला अमेरिकेला पाठवायचा हट्ट?’’, ‘‘माझी अमेरिकावारी काही चुकत नाही’’ ‘‘तुम्ही येणार नसाल तर मी जाणार नाही’’ अशी विधाने करून अमेरिकेला एकटीने जाण्याची तिची इच्छा नसल्याचे ती दर्शवते; गोपाळरावांवर मनाने अवलंबून असते. गोपाळराव तिला तिच्या मनाविरुद्ध बळेबळे अमेरिकेला पाठवतात असा समज चित्रपटातून निर्माण होतो. ते संपूर्ण चित्रण ध्येयनिष्ठ आनंदीवर अन्याय करणारे आणि तद्दन खोटे आहे. तो चित्रपट जर आनंदीबार्इंच्याऐवजी एखाद्या काल्पनिक मुलीवर असता तर पटकथाकार व दिग्दर्शक हवे ते रंगवण्यास मोकळे होते. पण चित्रपटात ते चारित्र्यहनन आहे.

चित्रपट प्रतिमा-प्रतीकांच्या आणि चित्रांच्याभाषेत बोलतो. शब्दांचा मोजका वापर करूनही खूप काही व्यक्त करतो. या चित्रपटातील काही प्रसंग अशा अबोल बोलीत चांगले रंगवले गेले आहेत. छोटी आनंदी बावऱ्या, घाबरलेल्या अवस्थेत शयनगृहात जाते. घरच्या बायकांनी तिला पढवल्याप्रमाणे ती म्हणते, ‘‘तुम्हाला काय करायचं ते करा.’’ गोपाळरावांच्या लक्षात बालवधूची ती अवस्था येते. ते तिचे अश्रू वात्सल्याने पुसतात आणि म्हणतात, ‘‘मला एवढंच करायचं होतं.’’ त्यांचा समंजसपणा, भावनाशीलता त्या एका वाक्यात प्रकटते. गोपाळराव बाळाच्या मृत्यूनंतर तिला सांगतात,‘‘आता दु:ख विसर आणि उद्यापासून अभ्यासाला लाग.’’ तेव्हा ती पटकन म्हणते, ‘‘आजपासून.’’ आनंदीचा खंबीरपपणा, तिची ज्ञानलालसा त्या एका शब्दातून व्यक्त होते. ती जेव्हा प्रथमच मिशनरी शाळेत पाय ठेवते तेव्हा तिच्यासमोर एक लांबलचक व्हरांडा दिसतो. स्वत:च्या तंद्रीत चालणाऱ्या आनंदीसमोर उलगडलेली ज्ञानवाट म्हणजे तिच्या भविष्याकडे जाणारा मार्ग असतो आणि आनंदीचा एकटीचा प्रवास त्या वाटेवर सुरू झालेला असतो. गोपाळराव दूर उभे राहून पाहत असतात. एकही शब्द न वापरता चित्रपट कसा बोलू शकतो याचे ते उदाहरण आहे. मात्र असे अबोलपणे बोलणारे क्षण अपवादात्मक आहेत.

२. कालविपर्यास – विशिष्ट कालमान परिस्थितीचे भान न राखता चुकीचे चित्रण करणे, ज्या गोष्टी त्या काळात घडल्याच नाहीत, भविष्यात वा भूतकाळात घडल्या, त्या गोष्टी कथावस्तूत घुसडणे म्हणजे कालविपर्यास. गोपाळरावांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचे नाटक केले आणि नंतर परत हिंदू धर्मात प्रवेश केला, ही घटना आनंदीच्या मृत्यूनंतरची आहे. त्यामागे जी कारणे होती त्यांचा आनंदीच्या अमेरिकेला जाण्याशी काहीही संबंध नाही. त्यांनी आनंदीला चर्चमध्ये नेणे; तिला बांगड्या-नथ उतरवण्यास लावणे; आणि मंगळसूत्र काढण्याची मागणी होताच तिने संतापून निघून जाणे या गोष्टी म्हणजे पटकथाकाराच्या कल्पनाशक्तीचा खेळ आहे. तो अत्यंत भडक, संपूर्णपणे असत्य आणि विपरित आहे. तो आटापीटा असावा. ‘‘जो देश मला माझ्या धर्मासकट मानत नाही तो देश मला मान्य नाही.’’ हे टाळ्यांचे वाक्य आनंदीच्या तोंडी घालण्यासाठी असावा. आनंदीच्या पदवीदानसमारंभात गोपाळरावांनी शिट्टी वाजवणे आणि आनंदीगोपाळांनी मिठी मारणे या गोष्टी लेखक-दिग्दर्शकाला काळाचे आणि पात्रांच्या मनोभूमिकांचे भान नसल्याचे दर्शवतात. त्यातून चरित्राची  हानी झाली आहे. ती कल्पनाशक्ती नसून कल्पनादारिद्र्य आहे.

आनंदीच्या पदवीदानसमारंभासाठी लंडनहून पंडिता रमाबाई आवर्जून आल्या होत्या. त्या चित्रपटात कोठेच दिसत नाहीत. त्या दोघींतील स्नेहबंधही दुर्लक्षित राहिला आहे. त्यांना आणि आनंदीबार्इंना मोठ्या सन्मानाने व्यासपीठावर बसवले गेले होते. चित्रपटात मात्र आनंदीला दोन स्त्रिया हात धरून व्यासपीठावर नेतात. आनंदीच्या जीवनातील आणि हिंदुस्तानच्या इतिहासातील तो सुवर्णक्षण होता. पण त्या तेजस्विनीच्या स्वप्नपूर्तीचा आनंद त्या प्रसंगातून फुलला गेलेला नाही. तिला सतत खोकण्यास लावून तिचे आजारपण जास्त गडद केले गेले आहे. गोपाळराव त्या प्रसंगी ओरडून सांगतात, ‘‘She is the first…She is the first.’’ पण first काय? गोपाळरावांचा गहिवर दाखवण्यासाठी ‘‘She is the first Indian woman doctor’’ हे वाक्य त्यांना पूर्ण करू दिले गेलेले नाही. गहिवराचा इतका अतिरेक केला गेला नसता, तर आनंदी या पहिल्या भारतीय स्त्री डॉक्टर होत्या ही वस्तुस्थिती बापड्या प्रेक्षकांच्या मनावर ठसली असती.

३. तपशिलांच्या चुका – चित्रपटात अकारण चुकीचे तपशील वापरून त्यावर घटनांचे इमले रचणे हे तर धक्कादायक आहे. उदाहरणार्थ, प्रत्यक्षातील आनंदीगोपाळ कोलकात्याला असताना त्यांच्या प्रत्ययाला आले होते, की बंगालमधील वातावरण महाराष्ट्रापेक्षाही सनातनी आहे. आनंदी अमेरिकेला जाणार हे कळताच तिच्या घराभोवती जमून लोक दिवसभर कसा आरडाओरडा करत होते त्याचे वर्णन खुद्द आनंदीने केलेले आहे. चित्रपटात मात्र आनंदी म्हणे बंगाल मेडिकल कॉलेजात जाते! कोठून आले हे स्त्रियांना प्रवेश देणारे बंगालचे कॉलेज? हिंदुस्तानात शिक्षणाची सोय झाली असती तर मग ते शिक्षण अर्धवट सोडून आनंदी अमेरिकेला कशाला गेली? गोपाळरावांकडे काय पैशांची खाण होती, अकारण कॉलेज बदलून अमेरिकावारी करण्याला? त्याच प्रांतातील श्रीरामपूर गावी आनंदीने ‘‘मी अमेरिकेस का जात आहे,’’ या विषयावर जाहीर भाषण दिले. गोपाळरावांना वाटत होते, की आपण भाषण द्यावे; पण स्वतंत्र बाण्याच्या आनंदीला तिच्या वतीने दुसऱ्या कोणी, अगदी गोपाळरावांनीही बोलावे हे मान्य नव्हते. ती हातात टिपणांचे कागद न घेता, अस्खलित इंग्रजीत बोलली. तिने तिच्या विरोधकांना एकदाच पण ठामपणे उत्तर दिले. तिच्या धीरोदात्तपणामुळे ब्रिटिश मंडळींनीही तिचे कौतुक केले. व्यक्तिचित्रणाच्या दृष्टीने अनिवार्य असलेला हा प्रसंग चित्रपटात गाळलेला आहे. आनंदीच्या भाषणातील काही अंश जरी चित्रित केले असते तरी तिचे व्यक्तिमत्त्व झळाळून उठले असते.

आनंदी गोपाळांना झालेला विरोध चित्रित करण्यासाठी चित्रपटात काही बनावट प्रसंग रंगवले गेले आहेत. गावकऱ्यांनी गोपाळरावांच्या मुलाला पळवून नेणे; त्याची विटंबना करून त्याला बांधून ठेवणे; गोपाळरावांनी व त्यांच्या फौजफाट्याने, हातात मशाली घेऊन गावभर भटकणे; हा प्रसंग म्हणजे अतिरंजिततेचा कळस आहे. मशालीच्या प्रकाशात सुंदर दिसणाऱ्या शॉटचा मोह दिग्दर्शकाला आवरला नाही. गोपाळरावांनी आनंदीच्या डोक्यात गजरा माळणे आणि त्यांच्या त्या कृतीने चकित झालेल्यांशी वादावादी करणे हा प्रसंगही नाटकी वाटतो. त्या काळच्या बायका केसात हौसेने फुले माळत, हे खरे. परसदारी वा घरापुढे छोटीशी बाग असणे ही सामान्य गोष्ट होती. पण गजरा विकत घेणे व माळणे हे गरती स्त्रियांचे लक्षण मानत नसत. गजरा विकण्याची प्रथाही नव्हती. तेव्हा अलिबागसारख्या खेड्यात कोण वेडा गजरे विकत बसेल? या असामान्य जोडप्याला झालेला समाजविरोध लहान, सुबक पण वास्तवपूर्ण प्रसंगांतून टोकदारपणे उभा करता आला असता. तथाकथित सिनेमॅटिक फापटपसाऱ्याची गरज नव्हती. त्यावर जे फूटेज वाया गेले ते वाचले असते आणि आनंदीच्या जीवनातील अस्सल नाट्याला जागा मिळाली असती.

४. काल्पनिक पात्रांची निर्मिती कल्पित पात्रांची निर्मिती करून त्यांचेही बरेच स्तोम या चित्रपटात माजवले गेले आहे. आनंदीच्या विवाहानंतर प्रत्यक्षात आनंदीची विधवा आजी लाडक्या नातीला संसारात मदत करण्यास, आनंदी गोपाळांबरोबर राहत असते. गोपाळरावांचा धाकटा भाऊदेखील तेथेच असतो. त्या आजीच्याऐवजी गोपाळरावांच्या पहिल्या बायकोची आई विमलाबाई आणि भावाच्याऐवजी गोपाळरावांचा मुलगा कृष्णा यांना आणले आहे. सत्याचा अपलाप करून पात्रांची पार्श्वभूमी बदलण्याचे कारण काय? त्याने कोणता परिणाम साधला? एकंदरच चित्रपटात त्या पात्राला अतोनात महत्त्व दिले गेले आहे. आनंदाबार्इंना अमेरिकेला जाता यावे म्हणून विमलाबाई त्यांचे दागिने गोपाळरावांच्या हवाली करतात, असाही एक प्रसंग रंगवला गेला आहे. खरे तर, आनंदी स्वत:चे दागिने पैशांसाठी विकते. त्यांच्या भाषणाने प्रभावित झालेले पोस्टखात्याचे डायरेक्टर जनरल जेम्स वृत्तपत्रातून आवाहन करून फंड उभारतात. अन्य पाश्चात्य मंडळीही फंडाला मदत करतात. ख्रिश्चनांचा धर्मातराचा प्रयत्न, कावेबाजपणा या गोष्टी रंगवून सांगितल्या जातात. पण ब्रिटिशांच्या त्या औदार्याचा उल्लेख साध्या संवादातूनही केला जात नाही. हा पक्षपातीपणा वाटतो.

५. गाळलेली पात्रे- ज्या कार्पेंटरबार्इंनी आनंदीला अमेरिकेत माहेरघर दिले, ममत्वाने तिचा प्रतिपाळ केला, ज्या कुटुंबातील माणसांशी आनंदीचे प्रेमाचे नाते जुळले, जेथे आनंदीला तिचे हरवलेले बालपण गवसले ते घर आणि ती माणसे चित्रपटात कोठेच दिसत नाहीत. कार्पेंटरबाई फक्त एकदा दाताच्या डॉक्टरांकडे दिसतात. आनंदीचे उत्कट भावसंबंध डीन बॉडले व आनंदीच्या इतर शिक्षिका, मैत्रीण कॅरोलीन डॉल यांसारख्या व्यक्तींशीदेखील होते. त्यांचा मागमूसही चित्रपटात लागत नाही. आनंदीच्या कॉलेजजीवनाचे चित्रणही अतिशय चुटपुटते झाले आहे. आनंदीचा तेथील वावर, तेव्हाचे वातावरण, वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी तेथे आलेल्या जगभरच्या स्त्रिया, आनंदीने लिहिलेला प्रबंध आणि तिचा अभ्यासक्रम यांना वाव दिला असता, तर कालचित्रण सुंदर झाले असते. आनंदी अमेरिकेत शिकण्यास का गेली हे प्रेक्षकांच्या मनावर बिंबले गेले असते. एकंदरच, अमेरिकेतील आनंदीचे जीवन फार ढोबळ, वरवरचे आणि रूक्ष झाले आहे. 

अमेरिका ही आनंदीची कर्मभूमी होती. त्याच देशाने तिचे स्वप्न साकार केले. मृत्यूनंतरही तिला त्याच देशात चिरविश्रांती घ्यावीशी वाटली. तिचा रक्षाकलश पोकीप्सी गावी कार्पेंटरमावशींच्या माहेरच्या दफनभूमीत पुरला गेला. आनंदीला अवघे एकवीस वर्षांचे आयुष्य लाभले. पण एकोणिसाव्या शतकातील आनंदी एकविसाव्या शतकातही जिवंत आहे. तिच्यावर कादंबरी, नाटक, लघुपट, दूरदर्शनमालिका निर्माण झाली. कोणी एकपात्री कार्यक्रम केले, तर कोणी तिच्या चरित्राचे अभिवाचन केले. आनंदीची जीवनकथा समाजमनात खोलवर झिरपली. वादळात फडफडणाऱ्या एका ज्योतीने किती तरी मने प्रज्वलित केली.

मी माझ्या वैयक्तिक जीवनात आनंदीची जीवनकथा किती प्रेरक आहे याचा अनुभव घेतला आहे. मी पोकीप्सीच्या दफनभूमीतील समाधी अशोक गोरे आणि त्यांचे स्नेही विराज सरदेसाई यांच्या मदतीने १९९१ साली शोधली. तो दिवस माझे जीवन बदलणारा ठरला. मी आनंदीवर लघुपट करावा हे स्वप्न उराशी घेऊन परतले. चरित्राआधी लघुपट केला आणि लघुपटासारख्या समर्थ माध्यमाने मला झपाटून टाकले. मी जी काही आज आहे ती आनंदीमुळे. ती भेटली नसती तर लघुपट माध्यम मला गवसले नसते. तिच्यावरील चित्रपट खरोखरच कसदार आणि त्या तेजस्विनीला न्याय देणारा झाला असता, तर मला अत्यानंद झाला असता. मात्र काल्पनिकतेचा अतिरेक, सत्यनिष्ठा व जबाबदारीच्या जाणिवेचा अभाव आणि हानीकारक बदल यांमुळे चित्रपट अतिरंजित, भडक आणि उथळ झाला आहे.

निर्माता-दिग्दर्शकांना या संदर्भातील माहिती उपलब्ध नव्हती असा दावा करता येणार नाही. कारण मी लिहिलेल्या ‘डॉ. आनंदीबाई जोशी : काळ आणि कर्तृत्व’ या चरित्रात इत्थंभूत माहिती उपलब्ध आहे. ज्या अर्थी विशेष आभारात माझे नाव आवर्जून घातले आहे, त्याअर्थी माझे पुस्तक निर्माता-दिग्दर्शकांना ठाऊक होते. चित्रपटात ‘आनंदीगोपाळ’ या कादंबरीचे चित्रण आहे असा त्यांचा दावा असेल, तर मग मला न विचारता, माझी परवानगी न घेता माझ्या नावाचा वापर केला तो कशासाठी? तेही चुकीचे आहे. मी चित्रपटातील चुकांना जबाबदार नाही, हे मी जाहीरपणे सांगू इच्छिते. प्रत्यक्षात होऊन गेलेल्या व्यक्तीवर चित्रपट तयार करताना वा ग्रंथ लिहिताना त्या चरित्रातील कोणत्याही माणसाचे असत्य, अप्रामाणिक, विकृत चित्रण करणे हे सर्वथैव गैर आहे. आनंदी-गोपाळांच्या जीवनाचा सखोल अभ्यास न केल्याचे दुष्परिणाम त्या चित्रपटाला भोगावे लागले आहेत. त्यावर प्रतिक्रिया देणे हे मला माझे कर्तव्य वाटले, म्हणून मी हा लेखप्रपंच केला.

अंजली कीर्तने 9967516913 ,anjalikirtane@gmail.com
 

 

About Post Author

Previous articleकोरा कॅनव्हास: आकार आणि अर्थ
Next articleमराठीत मोलिअर
अंजली कीर्तने यांनी बी. ए.ला मराठी विषय घेऊन मुंबई विद्यापीठात सर्वप्रथम क्रमांक पटकवला आहे. त्यांनी 'मोलिएरचा मराठी नाटकावरील प्रभाव' याविषयावर पि.एच.डीसाठी प्रबंध लिहिला आहे. त्यांनी महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, नवशक्ती, तरुण भारत, सकाळ या वृत्तपत्रातून अनेक सदरलेखन केले आहे. त्यांची प्रवासी पावलं, नोंदवही कवितेची, लिबर्टी बेल, संगिताचं सुवर्णयुग अशी अनेक सदरलेखने प्रसिद्ध आहेत. त्यांचे डॉ. आनंदीबाई जोशी(चरित्र), पाऊलखुणा लघुपटाच्या यांसारखे चरित्र, अनुभवकथा, लघुकथा, प्रवासवर्णनावर पुस्तके प्रसिद्ध आहेत. लेखकाचा दूरध्वनी - 99675 16913

2 COMMENTS

  1. सर्वप्रथम सौ अंजली किर्तने…
    सर्वप्रथम सौ अंजली किर्तने यांचे मनःपूर्वक आभार
    त्यांनी सडेतोडपणे विश्लेषण करून झणझणीत अंजन घातले आहे
    अशा अनुभवी, सच्च्या , अर्थपूर्ण प्रतिक्रियेची गरज होतीच
    आजकाल कोणीही उठतो आणि बायोपिक काढतो की कायसे वाटू लागले आहे.
    जसे मालिके मध्ये टी आर पी मिळविण्यासाठी भडक चित्रण केले जाते तसे काहीसे झाले आहे असे खेदाने नमूद करावेसे वाटते.
    विशेषतः हिंदी मध्ये असे भव्य दिव्य सिनेमे आले आहेत .
    पुनः एकदा सौ अंजली ताई यांना धन्यवाद द्यावेसे वाटतात.

Comments are closed.