…आणि भैरवनाथाच्या धडका बंद झाल्या!

दलितांकरवी फलटण तालुक्याच्या गुणवरे आणि जावली या गावांत धडका घेण्याची अघोरी प्रथा दीडशे वर्षांपासून सुरू होती. ती अमानुष प्रथा नष्ट करण्यासाठी महादू गेणू आढाव या लढाऊ कार्यकर्त्याने दलित बांधवांची मोट बांधून, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने कसोशीचे प्रयत्न केले. अखेरीस प्रशासकीय यंत्रणेच्या साहाय्याने धडका प्रथा बंद करण्यात यश 2006 साली मिळाले…

धडका घेण्याची अघोरी प्रथा फलटण तालुक्याच्या गुणवरे आणि जावली या गावांत होती. धडके म्हणजे भैरवनाथ मंदिराच्या पाषाणाच्या शिळेला (त्याला चिरा संबोधले जाते) वीस मीटर लांबवरून धावत जाऊन धडक घेणारे अस्पृश्य समाजातील लोक. त्यांना मानाचे धडकेही म्हणतात. गुणवरे गावात धडका घेणारे धडके हे त्याच गावातील असत, पण जावली गावात धडके मात्र विडणी या गावाहून येत. तेही फलटण तालुक्यातील गाव. त्यांच्यात काही धडके माण तालुक्यातील वारूगड, पालवण या गावांचेसुद्धा असत.

गुणवरे हे गाव फलटणपासून सतरा किलोमीटर, तर विडणी गाव सहा किलोमीटर अंतरावर आहे. धडक्यांची आडनावे अनुक्रमे आढाव व जगताप; तर माण तालुक्यातील पालवण व वारूगड ही गावे जगताप यांची. गुणवरे गावातील दलित बांधव वैशाख शुद्ध नवमीच्या, नाथाच्या यात्रेदिवशी देवळाच्या पाषाणाच्या चिरेवर वीस ते पंचवीस फूट मागे सरून व पुन्हा पळत पुढे येऊन तीन तीन धडका घेत. ती अमानुष प्रथा नष्ट करण्यासाठी महादू गेणू या संघर्षवादी कार्यकर्त्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांची मदत घेतली. स्वतः महादू गेणू यांनी 1976 पर्यंत त्यांच्या आईवडिलांच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी धडका घेतल्या होत्या. त्यांनी एका वर्षी जाहीर केले, की मी ही प्रथा पुढील वर्षी बंद करणार आहे! त्यांचे ऐकून काही बांधवांनी त्या धडका बंद केल्या, परंतु धडका पूर्ण बंद झाल्या नाहीत. गावातील देवस्थान कमिटीलाही ती प्रथा थांबवायची नव्हती. त्यांनी ती प्रथा दलित बांधवांना यात्रेसाठी बोकड, धान्य व पैसे देऊन चालू ठेवली. नरेंद्र दाभोलकर, आर्डे व शेख सर यांनी गुणवरे येथे येऊन ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, गावकरी यांच्याशी चर्चा केली. त्या सर्वांनी धडका बंद का करायच्या हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु गावकरी ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. तेवढ्यात युवराज आढाव हा तरुण त्वेषाने बोलला, “केवळ एक पोती ज्वारी व एक बकरी यांच्या मोबदल्यात आम्हाला गाववाल्यांनी धडका घेण्यास भाग पाडले आहे. शंभर वर्षांपासून हे चालले आहे!” त्यावर ती सर्व मंडळी बोलली, “मग तू का सोडत नाहीस तो आंधळेपणा?” यावर काही तरुणांनी धडका बंद केल्या असल्याचे त्यांना सांगितले. त्यानंतर ती सर्व मंडळी दलित वस्तीत गेली. वस्तीतील बाबुराव आढाव खूप त्वेषाने बोलले, “आम्ही दलितांनीच का दरवर्षी धडका घ्यायच्या? मराठा, माळी यांनी एक वर्ष त्या धडका घ्याव्यात, देव सगळ्यांचाच आहे. जत्रेच्या वेळी गावकरी रथ ओढतात, आम्ही तो ओढतो आणि त्यांनी धडका घ्याव्यात.”

जावली गावची जत्रा भरत असे. जावली गाव फलटण पासून एकवीस किलोमीटर अंतरावर आहे. जावली गावात जावलसिद्धनाथ यात्रा दरवर्षी भरत असे. त्या जत्रेत गुणवरे गावचे गावडे, पाटील ही मंडळी जात असत. त्यांना वाटले, की आपल्याही गुणवरे गावात जत्रा भरावी. म्हणून त्यांनी फलटणचे संस्थानाधिपती मुधोजीराजे ऊर्फ बापुसाहेब नाईक निंबाळकर यांना त्यासंबंधी विचारणा केली. त्यांनीही संमती दिली. पण गावात धडका कोण घेणार यावर चर्चा झाली. जे लोक धडका घेतील त्यांना गावकरी वर्गणी काढून बोकड, सात-आठ पायली ज्वारी देतील असे ठरले. परंतु गावच्या महार-दलित बांधवांनी त्याला नकार दिला. पण आबा बाबा महार यांनी गावाला सांगितले, की आबा, नबा, मसुबाबा या तिघांच्या घरातील जेवढे पुरुष जन्माला येतील ते धडका घेतील. त्या घरांतील मंडळी मानाचे धडके झाले! अशी ही प्रथा रूढ झाली. सात धडक्यांपासून सुरू झालेली धडक्यांची संख्या पावणेदोनशेवर जाऊन पोचली!

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोलकर, आर्डे सर यांनी धडका सोडण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “आपण बाबासाहेबांचे नाव घेतो आणि या असल्या प्रथांना चालू ठेवतो, हे योग्य नाही.” त्यावर सायबू नथू आढाव, आनंदराव आढाव व इतर मंडळी यांनीही निवेदनावर सह्या केल्या. 18 मे 1986‍ रोजीचा दिवस उगवला. नरेंद्र दाभोलकर, शेख सर, रवींद्र बेडकीहाळ व रणसिंग असे सर्वजण गुणवरे येथे पोचले. गुणवरेच्या आंबेडकर चौकात बैठक भरली. काही मंडळींनी धडका घेण्याचा निर्धारच केला होता. त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न झाला. त्यांना गावातील काही मंडळींची फूस होती. त्यांनी ‘देव कोपेल. यंदाच्या साली धडका घेऊ द्या’ असा सूर आळवला. काहींनी मात्र धडका बंद केल्याचे जाहीर केले.

महादू गेणू हा लढाऊ कार्यकर्ता मात्र अस्वस्थच होता. त्याने फलटण प्रांतांना निवेदन देऊन प्राणांतिक उपोषणाचा इशारा दिला. महादू गेणू यांनी ठरल्याप्रमाणे प्राणांतिक उपोषणाला सुरुवात 16 एप्रिल 1987 पासून केली. दादा दैठणकर यांनी व प्रांतांनी प्राणांतिक उपोषण सोडण्याचे आवाहन केले. धडका बंद करण्याचे आश्वासन दिले. परंतु गुणवरेच्या धडका काही बंद झाल्या नाहीत.

पुढे, फलटणला विभागीय उपायुक्त म्हणून नव्या उमेदीचे, तरुण तडफदार आयएएस अधिकारी आले, ते म्हणजे अविनाश धर्माधिकारी. त्यांनी ती प्रथा बंद करण्यासाठी सहकार्य करण्याचे वचन दिले. त्यावर समस्त बौद्धजन लोकांच्या वतीने सरकारला म्हणजेच जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. त्यानुसार विडणी या गावी एक बैठक झाली. सातारा जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती बयाजी जगताप यांच्याशी चर्चा झाली. परंतु त्यांच्याकडून कोणतेही सहकार्य मिळाले नाही. कारण ते राजकारणात होते. नेमकी गोष्ट अशी घडली, की त्याच गावचे धडके रामचंद्र जगताप यांनी जावली येथे जाऊन धडक घेतली आणि ते बेशुद्ध झाले. ते त्यांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात असताना मरण पावले. आश्चर्य म्हणजे त्यांचा मुलगा स्वतः इंजिनीयर असूनही त्या प्रथेचे समर्थन करत होता. अविनाश धर्माधिकारी स्वतः गुणवरे येथे आले. त्यांनी गुणवरे येथील देवस्थानच्या विश्वस्त मंडळींनी असल्या प्रथा बंद करण्याचा आग्रह धरला. प्रांतांनी सगळ्यांना सांगितले, की धडका घेण्यासाठी निमंत्रण आले, तरी ते स्वीकारायचे नाही. यात्रा 14 मे 1989 रोजी भरली. वातावरण तंग होते. सर्व बौद्ध बांधव बायाबापड्यांसह आंबेडकर चौकात बसून होते. आंबेडकरांच्या नावाचा जयघोष सुरू होता. इतक्यात चार-पाच हजार लोकांचा समुदाय ‘सिद्धनाथाचं चांगभलं’ अशा घोषणा देत वस्तीच्या दिशेने पुढे येऊ लागला. तहसीलदारांनी त्या समुदायाला अटकाव केला, पण लोक ऐकत नव्हते. फक्त पुजारी व चार विश्वस्त यांना जाऊ द्यावे अशी विनंती केली गेली. परंतु ती धुडकावून लावण्यात आली. शेवटी पोलिस स्वतः निमंत्रण देण्यासाठी गेले आणि धडका पार पडल्या! लोक प्रक्षुब्ध झाले. त्यांनी पोलिसांचा खरपूस समाचार घेतला.

बाबासाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष 14 एप्रिल 1990 रोजी सुरू झाले. निर्धार पक्का झाला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. धर्माधिकारी यांनी दोन्ही बाजूंच्या मंडळींना २४ तारखेला बोलावले. फक्त दर्शन घ्यावे- गुलाल टाकावा एवढेच ठरले आणि ते तसेच झाले. त्यासाठी तत्कालीन फौजदार बी.एस. मोरे, सी.ए. सांगळे, तहसीलदार शिवाजीराव जगताप यांनी धडका बंद करण्याच्या कामी सहकार्य केले. महादू गेणू, आनंदराव आढाव यांच्यासह इतर बौद्ध मंडळींनीही प्रयत्न केले. आनंदराव आढाव यांनी त्या आंदोलनात पुढाकार घेतला होता. ते ज्या शिक्षण संस्थेत शिक्षक होते, त्या संस्थेच्या प्रमुखांना धडका समर्थक भेटले व आनंदराव यांना संस्थेतून काढून टाकण्याची विनंती केली. परंतु त्यांना संस्था चालकांनी नकार दिला. त्याबद्दल आनंदराव आढाव व साताऱ्याच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष कुमार मंडपे यांनी पत्र पाठवून त्यांचे विशेष आभार मानले. त्यांनी महादू गेणू यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की ‘आमच्या कार्यात तुमचे सहकार्य किती मोलाचे ठरू शकते याचा आदर्श तुम्ही बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दी वर्षात घालून दिला आहे असे आम्ही मानतो.’

देवळाच्या दगडी भिंतीला (चिरेवर) धडक घेण्याची मागासवर्गीय बांधवांवर सुमारे दीडशे वर्षांपासून लादलेली प्रथा जिल्हाधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचा आदेश, प्रांताधिकारी रेश्मा माळी यांची सतर्कता आणि प्रशासकीय यंत्रणेमुळे 2006 सालापासून धडका प्रथा बंद करण्यात यश लाभले. आज प्रत्यक्ष धडका घेणारे धडके आबाजी आढाव यांचा मुलगा अमोल आढाव हे गावचे पोलिस पाटील असून, त्यांचे भैरवनाथाची यात्रा शांततेत पार पाडण्यात महत्त्वाचे योगदान आहे. महादू गेणू आढाव यांची संघर्षातून निर्माण झालेली भूमिका व त्याग मोलाचा आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच या धडका कायमच्या बंद झाल्या आहेत.

– सोमिनाथ घोरपडे 7387145407  sominathghorpade10@gmail.com

फोटो साभार – अमोल आढाव (पोलिस पाटील, गुणवरे)

————————————————————————————————————————-

About Post Author

1 COMMENT

  1. स्तुत्य कार्य केले महादू गेणू ह्यांनी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here