शब्दांचे धागे एकमेकांत गुंतलेले असतात. धाग्यांतील रंग वेगवेगळया भाषांतील असतात.आख्यान, व्याख्यान, उपाख्यान हे शब्द ऐकताना सारखे वाटतात परंतु, हे वेगवेगळे शब्द आहेत. या शब्दांची निर्मितीकशी झाली असेल? उखाण्यांचा नाव घेणे याच्याशी काय संबंध आहे ते शब्द शोधच्या या लेखाद्वारे जाणून घेऊया…
शब्दांच्या प्रदेशात फिरताना; त्यांचे अंतरंग-उगम धुंडाळताना जे अधलेमधले थांबे लागतात, तेही रम्य, रेंगाळावेसे वाटणारे असतात. प्रत्येक वळणापाशी एक नवीन शब्द, अर्थ वाट पाहत असतो आणि शब्दांचे कितीतरी धागे एकमेकांत गुंतलेले असल्याचे कळून सुखद धक्के बसतात. धाग्यांतील रंग फक्त मातृभाषेतील असतील असे नाही; परभाषेचे रंगही त्यात मिसळलेले असतात.
‘उखाणा’ किंवा ‘नाव घेणे’ हा लग्नातील खेळीमेळीचा, प्रत्येकाला त्याच्या खास आठवणीची आठवण करून देणारा प्रसंग, एरवी, कोणी काकी-मामी तिच्या अनुभवाचे बोल कानात सांगते म्हणून उखाणे तेथल्या तेथे, ‘र’ ला ‘ट’ जोडून, कसेबसे रचले जातात; पण अलिकडेच एका आप्त मंडळींकडील लग्नात जुन्या बाजाचा दणदणीत, मोठा उखाणा ऐकण्यास मिळाला आणि इतका अस्सल ‘उखाणा’ ऐकून कुतूहल वाढले – कोठून, कसा हा शब्द आला आणि त्याने प्रत्येक लग्नाच्या पंक्तीत मानाचे स्थान पटकावले !
तर त्याचा प्रवास सुरू झाला, तो ‘ख्या’ या संस्कृत धातूपासून. ख्या म्हणजे सांगणे, घोषणा करणे. ‘ख्या’पासून ‘ख्यात’ आणि पुढे निरनिराळे उपसर्ग जोडले जाऊन ‘कुख्यात, ‘विख्यात’ असे शब्द तयार झाले. पण त्या प्रवासातील खरे सहप्रवासी म्हणजे ‘व्याख्या-व्याख्यान-आख्यान-उपाख्यान’; त्यांच्याविषयी जाणून घेण्यास हवे. ‘वि’ ‘आ’ ‘ख्या’ मिळून ‘व्याख्या’ हा शब्द तयार झाला. वि म्हणजे विशेषत्वाने आणि आ म्हणजे सर्व दिशांनी, सर्वतोपरी, सर्व अंगांनी, सर्व दृष्टींनी. म्हणून व्याख्या शब्दाचा मूळ अर्थ होतो ‘पूर्ण स्पष्टीकरण’.
मग आख्यान आणि व्याख्यान यांमध्ये फरक काय आहे? ‘आख्यान’ म्हणजे वर्णन, वृत्तांन्त सांगणे, सूचित करणे. आख्यान या शब्दाचा वापर संस्कृतमध्ये पौराणिक कथा सांगताना होताना दिसतो. आख्यान म्हणजे अशी पौराणिक कथा, ज्यात कथा सांगणारा हा स्वत: त्या कथेतील एक पात्र असतो किंवा कथा त्या व्यक्तीवर बेतलेली असते. ‘आख्यायते अनेनेति आख्यानम्’. म्हणजेच अशी कथा जी कवी/लेखक स्वत: सांगत आहे, तो ती इतर पात्रांकडून वदवून घेत नाही. यात पात्रांमधील संवाद लांबलचक नसतात. कथा शक्यतो भूतकाळाचा वापर करून सांगितली जाते आणि प्रसंगानुरूप वर्तमानकाळाचा वापर केला जातो. बऱ्याचदा, आख्यानांवर आधारित ग्रंथ रचले जातात आणि त्यांतील अध्यायही वेगवेगळ्या आख्यानांवर आधारलेले असतात. उदाहरणार्थ ऋग्वेदातील ‘पुरूरवा-उर्वशी संवाद’ हे आख्यान आहे. ‘आख्यायिका’ हा शब्द आख्यानावरून आलेला आहे. मराठी ‘आख्यानकाव्या’चा (काव्य रचून सांगितलेली गोष्ट/कथा) उदय तेराव्या शतकातील संतसाहित्यात झाला. महाराष्ट्रातील कीर्तन संस्थेमुळे आख्यानकाव्यास विशेष चालना मिळाली. उदाहरणार्थ, एकनाथ यांचे रुक्मिणी स्वयंवर, श्रीधर यांची आख्याने, रघुनाथ पंडित यांचे नलदमयंती स्वयंवर इत्यादी.
‘व्याख्यान’ हे आख्यानाचे विस्तृत रूप आहे. व्याख्यानामध्ये एखाद्या घटनेचा वृत्तांन्त देणे, वर्णन करणे यांबरोबरच काही गोष्टींची व्याख्या करणे, त्यावर टीकाटिपण्णी करणे, एखाद्या गोष्टीचे ज्ञान करून देणे हेही समाविष्ट असते. ‘वि’ हा उपसर्ग अधिकता दाखवतो. म्हणून व्याख्यान म्हणजे फक्त कथा किंवा वृत्तांन्त सांगणे असे नसून त्याबद्दलची साधकबाधक चर्चा व मुद्दे म्हणजे व्याख्यान असे अपेक्षित आहे. व्याख्याता ही उपाधीदेखील व्याख्यानाशी संलग्र आहे. व्याख्यान देणारा तो ‘व्याख्याता’.
या सगळ्या विवेचनाचा उखाण्याशी संबंध काय, असे वाटू शकते. पण आणखी थोडा शोध घेतला, तर उपाख्या किंवा उपाख्यान हा बोली भाषांमधील आणखी एक प्रकार आहे. म्हणजेच, दैनंदिन व्यवहारात नीतिमत्ता किंवा नीतिमूल्ये दर्शवणारी एखादी गोष्ट, कथा, म्हण. त्यात आख्यानावर आधारित काही रोचक शब्दप्रयोग असतात. उपाख्यान म्हणजे उपकथानकासारखे असेही म्हणता येईल. एखादी गोष्ट सांगण्यास सुरुवात केली की त्यातील आणखी छोटी कथा/गोष्ट; जसे- श्रावणी सोमवारच्या कथा ! त्या कथेत एक कथा सांगता सांगता आणखी उपकथानके सांगितली जातात. त्यातून ‘उतू नये, मातू नये, घेतला वसा टाकू नये’ हे शब्दप्रयोग रूढ झाले. किंवा कीर्तनकार कीर्तन करताना दृष्टांतरूप कथा सागतात, त्या कथा म्हणजेही उपाख्यान. बोली भाषेतील त्याचे संक्षिप्त रूप म्हणजे मराठीतील म्हणी, राजस्थानी बोलीतील रूप ‘ओखाणा’ किंवा हिंदी रूप ‘उख्खान’. म्हणजे म्हणीच. त्या म्हणी म्हणजे कसे वागावे/वागू नये याचा वस्तुपाठ असतो. त्यांचे गोजिरे रूप म्हणजे ‘उखाणे’. पूर्वीच्या काळी त्यात मुलीने लग्न झाल्यावर सासरी कसे वागावे यासाठी हलक्याफुलक्या शब्दांत दिलेला तो उपदेश जुन्या काळी असे; नव्या काळात मात्र उखाणा खरोखर फक्त ‘नाव घेण्या’पुरता उरला आहे. आणखी एक म्हणजे ‘उपाख्य’ हा शब्द ‘ऊर्फ’ म्हणूनही वापरतो. उदाहरणार्थ त्र्यंबक बापूजी ठोंबरे उपाख्य बालकवी. उखाण्याचा प्रवास अशा रीतीने रंजक आहे. शेवटी शब्दांचे प्रवास समजून घेणे म्हणजे त्यात गुंतलेले धागे हळुवारपणे सोडवणे, त्यातील रंगसंगती शोधणे आणि त्यात रमून जाणे !
– नेहा लिमये 9890351902 neha.a.limaye@gmail.com
(राजहंस ग्रंथवेध, ऑगस्ट 2022 अंकावरून उद्धृत, संपादित-संस्कारित)
————————————————————————————————————————————