पुस्तकात मी पर्यावरणाचा मुद्दा, येथील भूमिपुत्रांच्या अस्तित्त्वाचा प्रश्न या अनुषंगाने मांडला आहे. पत्रकार हा संवेदनशील असावा लागतो. त्याचा प्रवास हा खडतर असतो. कारण त्याला शोषक आणि शोषणकर्ते या दोघांमध्ये वावरावे लागते. आजच्या काळात चळवळी, आंदोलने यासाठी नाक मुरडले जाते. समाज अलिप्त असा वागू लागला आहे
पुस्तक प्रकाशन नव्हे; आंदोलनाची धगधगती सुरुवात!
– राजेंद्र शिंदे
शनिवार, २१ ऑगस्ट २०१० रोजी मुंबईतील दादर येथे वनमाळी सभागृहात सचिन रोहेकर लिखित ‘कोकण जळतासा’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ झाला. पुस्तकाचे प्रकाशन कोकण विनाशकारी प्रकल्पविरोधी समितीच्या कार्यकर्त्या (अंकुर ट्रस्ट) वैशाली पाटील यांच्या हस्ते झाले.
सचिन रोहेकर यांची पत्रकारितेत चौदा वर्षे व्यतीत झाली आहेत. त्यांनी कोकणात होऊ घातलेले प्रकल्प तेथील पर्यावरणाला तसेच भूमिपुत्रांना कसे घातक आहेत हे परिसराचा, माणसांचा व त्यांच्या विचारांचा अभ्यास करून मांडले आहे. त्यात वृत्तपत्रासाठी केलेले लेखन, त्याचप्रमाणे कोकणाच्या परिस्थितीचा घेतलेला आढावा समाविष्ट आहे.
कोकणी माणूस, विशेषत: तेथील बुद्धिजीवी वर्ग गेल्या दोन दशकांत तेथील परिस्थितीमुळे फार अस्वस्थ आहे. मागील महिन्यातच ‘चाळेगत’ या प्रवीण बांदेकर यांच्या कादंबरीला ‘अनुष्टुभ प्रतिष्ठान’चा पुरस्कार मिळाला. तेव्हा त्याचे प्रत्यंतर आले. कादंबरीत लेखक प्रवीण बांदेकरांनी म्हटले आहे, की “मी ही कादंबरी लिहिताना भरकटत गेलो आहे. तसे म्हटले तर मी ही कादंबरी लिहिली आहे असे ही मला वाटत नाही. कारण गेल्या दोनेक दशकांचा झपाटाच कोकण प्रांतात इतका होता, की त्याचे परिणाम व्यक्तिश: मलाही पकडता आले नाहीत, तसेच त्यात मीही गुरफटत गेलो.” डोक्यातला हा गोंधळ म्हणजे ‘चाळेगत’ कादंबरी असे ते मानतात व ती कादंबरी आहे असा ते दावाही करत नाहीत. बांदेकरांनी वास्तवतेला साहित्याच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
तर अशा पार्श्वभूमीवर, सचिन रोहेकरांनी ‘कोकण जळतासा’ या पुस्तकाने वास्तवतेलाच सरळ-सरळ भिडण्याचा प्रयत्न केला आहे.
मी प्रकाशन समारंभाआधी रोहेकर यांना भेटलो. त्यांना अणुप्रकल्प किती आवश्यक व त्याशिवाय पर्याय नसल्याचे डॉ. अनिल काकोडकर, डॉ. बाळ फोंडके, डॉ. वसंत गोवारीकर यांसारख्या शास्त्रज्ञांच्या मतांचे दाखले दिले असता ते केवळ बुद्धिवाद्यांनी चालवलेला हा बुद्धिभेद आहे असे म्हणून स्तब्ध झाले. त्यांच्या या स्तब्धतेत बरेच काही दडले आहे असे जाणवते. जसे की अन्यायग्रस्त व्यक्ती तिच्यावरील अन्यायाचे योग्य शब्दांत व्यक्तीकरण न झाल्यामुळे आणि समोरची अन्याय करणारी व्यक्ती व तिचे समर्थक यांच्या बिनतोड, अचूक, सडेतोड युक्तिवादामुळे हतबल होते. त्याप्रमाणे सचिन रोहेकरांनी या पुस्तकाच्या माध्यमातून न्यायाच्या, सत्याच्या अशक्त बाजूला सशक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
किंबहुना, सचिन रोहेकर यांना या पुस्तक लेखना व प्रसिद्धीपेक्षा कोकणात चाललेल्या प्रकल्पविरोधी आंदोलनांमध्ये अधिक आस्था आहे असे या समारंभात नंतर, वारंवार जाणवत होते. त्यांना व वक्त्यांना हे पुस्तक म्हणजे त्यांच्या हातातील प्रचाराचे हत्यार आहे असे जणू वाटत असावे. परंतु पुस्तक पाहिले–चाळले, की त्यामध्ये जशी उपयुक्त अनेकविध माहिती दिसते तशा अनेक शंका उभ्या राहतात. उदाहरणार्थ, कोकणातल्या पंचवीस प्रस्तावित विद्युत प्रकल्पांची यादी. ती महत्त्वाची वाटते परंतु तिच्या सत्यासत्यतेबद्दल आणि त्या प्रकल्पांच्या संभाव्यतेबद्दल तत्क्षणी शंका उपस्थित होते. ती रोहेकरांच्याही मनात असणार असे त्यांच्या शेवटच्या टीपेवरून वाटते.
कोकणातील आंदोलनांमधल्या कार्यकर्त्यांची नवे शिलेदार म्हणून त्यांनी ओळख करून दिली आहे. त्यापैकी बरेच सारे गेली अनेक वर्षे प्रखरपणे, त्यागभावनेने विकासविरोधी आंदोलने चालवत आहेत. उलट, सरकार पक्षाकडून त्यावर टिच्चून नवनवीन प्रकल्पांचे प्रस्ताव पुढे येत आहेत. पुन्हा हे आंदोलनकर्ते उसळून उठत आहेत. त्यांची ध्येयनिष्ठा कौतुकास्पद आहे. परंतु त्यांनी विरोध करण्याऐवजी पर्यायी विकासधोरणाची नीट मांडणी करून एक जरी प्रकल्प घडवला तरी लोक त्यांच्या बाजूस येतील. जनता कधी नव्हे एवढी विकासाभिमुख झालेली आहे. ही गोष्ट स्वागतार्ह आहे. तिचा फायदा आंदोलनकर्त्यांनी घ्यावा.
रोहेकर तरूण पत्रकार आहेत. त्यांची दृष्टी विधायक आहे. त्यांनी हे पुस्तक वस्तुनिष्ठदृष्टया लिहिले असते तर कदाचित अधिक प्रभावी ठरले असते. पुस्तकात लेखनशैलीची एकात्मता नाही. कधी ते रिपोर्टाजसारखे वाटते. तर कधी वेगवेगळ्या प्रश्नांसंबंधी केलेल्य विवेचनात्मक लेखस्वरूपाचे वाटते. पुन्हा कधी त्यात उपहास येतो, तर कधी विषयाला थेट भिडणे असते. मात्र सर्व लेखनामधून रोहेकर यांची जी संवेदनशीलता जाणवते ती विलक्षण भिडणारी आहे.
पुस्तक प्रकाशन समारंभासाठी, कार्यक्रमाआधीच वनमाळी सभागृह पूर्णपणे श्रोत्यांनी भरले होते.
‘नवता प्रकाशन’चे अशोकराव शिंदे यांचा सामाजिक, राजकीय खदखदणा-या विषयांवर निर्भीडपणे पुस्तके प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. ते त्यांनी त्यांच्या या पाचव्या पुस्तकाचे प्रकाशन करून दाखवून दिले आहे, त्यांच्या ‘नवता प्रकाशन’ संस्थेला अजून पुरते एक वर्षेही झालेले नाही. तोवर त्यांनी संजय पवार यांची दोन (‘समग्र पानीकम’ व ‘चोख्याच्या पायरीवरून’), गोपाळ टोकेकर यांचे ‘एक होती रेशीमनगरी’(‘ नॅशनल रेयॉन कॉर्पोरेशन’ची कहाणी) व द्वारकानाथ संझगिरींचे ‘चॅम्पियन्स’ अशी पुस्तके प्रकाशित केली आहेत.
सचिन रोहेकरांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, की पुस्तकाच्या अभिप्रायासाठी एका ज्येष्ठ व्यक्तीकडे हे पुस्तक दिले असता त्यांनी ‘तूही चलनी नाण्यासारखे कोकणाचा विषय मांडून दुकान सुरू केले आहेस का?’ असा सवाल केला. उलट, या पुस्तकात मी पर्यावरणाचा मुद्दा, येथील भूमिपुत्रांच्या अस्तित्त्वाचा प्रश्न या अनुषंगाने मांडला आहे. पत्रकार हा संवेदनशील असावा लागतो. त्याचा प्रवास हा खडतर असतो. कारण त्याला शोषक आणि शोषणकर्ते या दोघांमध्ये वावरावे लागते. आजच्या काळात चळवळी, आंदोलने यासाठी नाक मुरडले जाते. समाज अलिप्त असा वागू लागला आहे.
राजकीय लोकांनी या पुस्तकाची दखल घेऊन काही पावले उचलली तर मला आनंद होईल असे ते म्हणाले.
अरूण वेळासकर (लोकायत संस्था) यांनी कोकणी माणसालाच काय इतरांनाही कोकणचा जिव्हाळा कसा वाटतो याबद्दल विचार मांडून आता कोकणात येऊ घातलेले मायनिंग प्रकल्प, अणुप्रकल्प हे विकासाच्या नावावर लादलेले षडयंत्र आहे व ते विकासाच्या नावावर स्थानिक लोकांचे शोषण कसे करत आहेत यावर भर दिला. त्यांनी या गोष्टीला राजकीय कंगोरे आहेत; तसेच, ही राजकीय चाल आहे आणि ती संपूर्ण भारत देशाला कशी गाळात नेईल याची मांडणी करत तसे दाखले दिले.
गजानन पडियार (निसर्ग बचाव कृती समिती, दापोली) यांनी “कोकण किती जळतंय?” याची भीषणता दाखवून, सगळ्यांनी या लढाईत शिपाई बनून उतरावयास हवे असे आवाहन केले. ते म्हणाले, की आता फक्त लढत राहायचे. अंत आपल्याला माहीत नाही. एकाकी लढा चालू ठेवण्याची हिंमत बाळगायची. या प्रश्नी राजकीय पुढारी संपूर्णपणे उदास आहेत. गावपुढारी साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरसावतोय. खरी गरज आहे ती कोकण्यांनी एकत्र येण्याची अशी हाक त्यांनी दिली.
संजीव अणेराव म्हणाले, की कोकण ज्वालामुखीच्या तोंडावर उभा आहे. सचिन रोहेकरांनी या गोष्टीचा त्यांच्या पुस्तकातून ओझरता आलेख मांडला आहे आणि समस्त मुंबईतील चाकरमान्यांना हाक दिली आहे. अणेरावांनी राज्यकर्त्यांनी संपूर्ण कोकण विकायला काढला आहे; तो विकत घ्यायला सुरूवातही झाली आहे, मुंबईत बसून हजारो एकर जमिनी वेबसाईटवरून खरेदी केल्या जात असतात असे सांगितले. त्यांनीही मुंबईतील चाकरमान्यांनी पुस्तकाला चांगला प्रतिसाद देऊन ह्या आंदोलनाला बळ द्यावे असे आवाहन केले.
डॉ. विवेक भिडे (रत्नागिरी जागरूक मंच) यांनी, राज्यकर्त्यांनी कोकणासाठी वेळोवेळी केलेली वक्तव्ये, योजना… कोकणचा कॅलिफोर्निया, पर्यटन जिल्हे, तसेच कोकणात येऊ घातलेली पंचवीस प्रोजेक्ट्स यांचा साद्यंत आढावा घेतला. ते म्हणाले की चेर्नोबेलनंतरचा मोठा अणुऊर्जा प्रकल्प जैतापूर हा आहे. त्यामुळे
होणा-या दु:ष्परिणामांची कल्पना येण्यासाठी शास्त्रज्ञांची गरज नाही. विजेचा कारखाना बंद करून चालत नाही. त्यामुळे होणारे प्रदूषण हे टाळता येणार नाही. या प्रकल्पविरोधासाठी पाठपुरावा करणारे पत्रकार हवेत. हा लोकलढा उभारावयास हवा असे त्यांनी शेवटी म्हटले.
वैशाली पाटील (अंकुर ट्रस्ट) यांनी भकास करणा-या विकासाची शोकांतिका असे या प्रकल्पांचे वर्णन केले. त्या म्हणाला, की मी आंदोलनात सतरा वर्षे आहे. विकासाच्या नावावर, काही मूठभर लोकांच्या हाती सत्ता असलेल्यांचा फायदा व केवळ पर्यावरणाचा –हास होतोय असे नाही, तर इथला माणूस मुळापासून उखडला जातोय. आता सरकारी धोरण ठोकरून टाकायची वेळ आली आहे असे त्या गर्जल्या…
त्या म्हणाल्या, की सरकारची धोरणे सहजपणे बदलणार नाहीत. ते म्हणतात की ‘आम्ही प्रकल्प लादणार नाही’,पण त्यांना ते रद्द करावयास सांगितले तर तेही होत नाही अशी सरकारची चाल आहे.
जागतिकीकरणाचे विद्रूप रूप म्हणजे कोकणातील जमिनींचा व्यवहार! हा आनंद मानायचा की चेष्टा आहे असे समजायचे? रात्र वै-याची आहे, चर्चासत्रे नको, आता कृती हवी आहे असे त्यांनी बजावले.
‘हा पुस्तकप्रकाशनाचा सोहळा नाही तर आंदोलनाची धगधगती सुरूवात आहे’ असा समारोप त्यांनी केला.
– राजेंद्र शिंदे
भ्रमणध्वनी : 9324635303
thinkm2010@gmail.com